आई आहे मी… वेळ आल्यास रणरागिणी सुद्धा..

Written by

 

शर्वरी छान, सुंदर मुलगी.शिक्षणातही हुशार पण नेहमी भावामुळे हिला योग्य न्याय मिळालं नाही. प्रत्येकवेळी स्वतःची हुशारी सिद्ध केली तिनी त्यामुळे जास्त पैसे खर्च न करता तिचं शिक्षण सुरु होतं.. सहज व सोपं म्हणजे D.Ed होतं (13 वर्षाआधी ) त्यानुसार तिला D. Ed ला ऍडमिशन मिळालं.. तस तिला डॉक्टर व्हायचं होतं.. पण… भाऊ वंशाचा दिवा त्याला डॉक्टर केल घरच्यांनी.. आणि बाबांजवळ दोघांना शिक्षणाला पुरेल इतका पैसा नव्हता. तडजोड मुलींनाच करावी लागते कारण त्या परक्याचे धन असते न… ???

शर्वरीच D.Ed झालं.. (2.5 वर्षात ) लागलीच तिला Z. P ला नोकरीं लागली.. भावाचं शिक्षण चालूच होतं डॉक्टरकीच.  शर्वरीच्या पगाराचा हातभार तीनवर्षानंतर लागला घराला (शिक्षणसेवक काळ ).

तोपर्यंत भाऊ डॉक्टर झाला.. बाबांना पुन्हा त्याची प्रॅक्टिस सुरु करायला, क्लिनिक साठी जागा वगैरे साठी. बराच पैसा खर्च करावा लागला. एकदाचा तो सेटल झाला. मग शर्वरीच्या लग्नाची बोलणी सुरु झाली… यथायोग्य स्थळ( म्हणजेच शिक्षक ) सांगून आलं, रजत नाव मुलाचं तोही Z.P ला होता त्यामुळे लगेच पसंती झाली आली लग्न पण झालं.
सुरुवातीचे दोन -तीन वर्ष दोघांनाही लांब राहावं लागल.. (पतिपत्नी एकत्रीकरण ) बदली नव्हती न झाली त्यांची. छान चाललं होतं त्यांच अशातच त्यांच्या आयुष्यात एक सुंदर परी आली… म्हणजे शर्वरी व रजत ची मुलगी. पहिली मुलगी म्हणजे “धनाची पेटी ” यानुसार परीचे खुप लाड झाले. शर्वरीने मनात ठरवलं होतं आपण मुलगी होतो म्हणून आपल्याला बऱ्याच तडजोडी कराव्या लागल्या शिक्षणासाठी..अपल्या मुलीला जे बनायचं आहे ते आपण नक्की बनवू यासाठी मग कुणाचाही विरोध पत्करावा लागला तरी चालेल. माझ्या मुलीच्या पाठीमागे मी सदैव खंबीरपणे उभी राहील. 

परी चार वर्षाची झाली.. शर्वरी व रजतची बदली जवळ जवळ झाली.. शाळा दूर होत्या पण राहणं एकत्र होतं.. आता परीला बाबा रोज दिसायचे नाहीतर आठवड्यातून नाहीतर महिन्यातून एकदाच भेट व्हायची तिची व बाबांची. परी रजतची खुप लाडकी होती. रजत व शर्वरीने दुसऱ्या बाळाचं प्लॅनिंग केल. दुसऱ्यांदा शर्वरी मातृत्व अनुभवणार होती. तिने रजतला सांगितलं “तुम्ही पुन्हा बाबा होणार ” रजत तर आनंदाने उड्या मारू लागला.आनंदाच्या भरात त्याच्या तोंडून निघालं “परीला भाऊ येणार आता.. ” आणि त्याने शर्वरीला मिठीत घेतलं.

  “परीला भाऊ येणार आता… “ या रजतच्या वाक्यांनी शर्वरी जरा गोंधळलीच. सर्व आवरल, परीला झोपवलं आणि ती ही झोपणार तेच रजत तिच्या जवळ येउन.. “मुलगा झाला पाहिजे यावेळी म्हणजे आपल कुटुंब पूर्ण. काळजी घे स्वतःची. माझा एक मित्र आहे डॉक्टर त्याला सगळं विचारतो मी. ” 

शर्वरी – काय विचारायचं आहे. परीच्या वेळेस काहीच नाही विचारलं असं स्पेशल मित्राला.

रजत :- अग पहिलं बाळ होतं. मुलगा असो वा मुलगी काही फरक नाही पडत. पण दुसरा मात्र मुलगाच हवा. 

शर्वरी :- का..??  म्हणजे मुलगी जरी झाली तरी काय फरक पडेल. आजकाल सगळं सारखंच आहे न. स्त्री -पुरुष समानता. आणि तसही गर्भलिंग निदान हे चुकीचं आहे कायद्याने गुन्हा आहे.

रजत :- हो ग.. कागदोपत्री समानता सगळी. आणि कायद्याने गुन्हा आहे हे माहिती आहे मला. म्हणूनच जरा…. गुपचूप करूया आपण. आताच टेन्शन नको घेऊ. वेळ आहे अजून तोपर्यंत काळजी घे माझ्या मुलाची. असं म्हणून रजत झोपला.

शर्वरी मात्र विचारच करत राहिली. जो बाबा आपल्या मुलीला इतकं प्रेम करतो तो दुसर बाळ मुलगा आहे की मुलगी हे कस काय आधीच बघून मग त्याला जन्म द्यायचा की नाही हे ठरवू शकतो. ????या विचारात तिला झोपच लागली नाही.

दिवस खरच पटापट निघून जातात.  तीन, साडेतीन महिन्यांनी रजत एकदिवस म्हणाला चल मी अपॉइमेन्ट घेतली डॉक्टरची, तयारी कर.

शर्वरी जरा आश्चर्यानेच.. कसली तयारी आपण परवाच तर चेकअप करून आलो. बाळ चांगल आहे असं सांगितलं न डॉक्टर नी..

रजत :- मी म्हणालो नव्हतोका तो स्पेशल चेकअप करायला जाणार आहोत चल लवकर तयार हो..

शर्वरी :- रजत काही गरज नाही त्या स्पेशल चेकअप ची. अहो आपण स्वतः शिक्षक आहोत. पैसा भरपूर आहे. दुसरी मुलगी झाली तरी तिला काही कमी पडणार नाही. मला हे पटत नाही.

रजत :- हे बघ ही वेळ या विषयावर चर्चा करण्याची नाही आहे. शिक्षणाचाच उपयोग करतात न हे डॉक्टर गर्भलिंग निदान करण्यासाठी. मग आपण पैसे देऊन बघितलं मुलगा आहे की मुलगी तर कुठे बिघडलं. आणि हे बघ स्पष्टच सांगतोय मला व माझ्या आईला पण आता दुसरा मुलगाच हवा आहे. तेंव्हा तयार हो मानसिकरित्या सुद्धा. जर मुलगी असेल तर आपण ऍबॉर्शन करूया.. मुलगी नाही म्हणतं नाही आहे मी एक आहे न.. आता एक मुलगा झाला की परिवार पूर्ण होईल आपला. 

शर्वरी :- आणि मुलगी झाली तर पूर्ण होणार नाही का आपला परिवार?

रजत :- हे बघ.. असले बावळटासारखे प्रश्न विचारू नको. सांगितलं न कागदोपत्री समानता असली तरी मुली वडिलांचं नाव शेवट प्रयन्त चालवत नाही. नवऱ्याचंच लावते. तुझंच बघ तू नोकरीं करतेस पगार येतो तो तुझ्या आई -बाबांना देतेस का?  नाही न.. मी पुरुष आहे.. त्यामुळे तुझ्याशी लग्न झाल्यावर माझं नाव तुला लागल व तुझा पगारही माझ्या घरात आला.. मी दोन पगाराचा मालक. हा फरक तुला सांगावा लागेल असं वाटलं नव्हतं मला. पण शेवटी तुम्ही स्त्रीयाच…कितीही शिकल्या तरी कळतं काहीच नाही.  चल लवकर उशीर होईल.

शर्वरीला एकदम राग आला?.. रजत च्या बोलण्यात आपण, आपल असं काहीच नव्हतं.. मी, माझं, माझ्या घरी, मी मालक,  यात मी कुठे आहे.. त्याचंच नाव.. लग्नाआधी वडिलांचे नाव.. मग मी केलेला अभ्यास,माझी नोकरी, माझा अभ्यास कुठे आहे?  शर्वरीला आठवलं, आपण बाबाला म्हणू नाही शकलो की मला डॉक्टर व्हायचं आहे.. जसं बाबा म्हणाले तसंच वागले मी, सासर हे मुलीचं घर असते असं सांगण्यात आलं होतं.. त्यानुसार इथे सगळं माझं पाहिजे पण नाही इथे तर रजत “मी, माझं ” म्हणत आहेत.. माझं अस्तित्व कुठे आहे?  माझ्यासारखंच माझ्या मुलीचं होईल का?  हे असच चालेल का परंपरेने…? माझ्या मुलीला न्याय देण्यासाठी तरी मला आज विरोध करावा लागेलच.. गर्भात जर मुलगी असेल तर तिलाही न्याय मिळालाच पाहिजे… ती या जगात आलीच पाहिजे. आज मला माझ्या साठीच नाहीतर स्त्री साठी विरोध करायलाच पाहिजे… नाही.. अजिबात नाही.. मी हे थांबवेल.. आणि सगळी शक्ती एकवटून शर्वरीने रौद्ररूप धारण केल.. आणि रजतला बोलली.?

हे.. बघा रजत मी तुमच्या सोबत येणार नाही. त्यामुळे मुलगा की मुलगी हे तपासण्याचा प्रश्नच येत नाही. कागदोपत्री समानता तुम्ही मानत असाल… मी मात्र प्रत्यक्षात ती मानते व आणण्याचा प्रयत्न करते. मी माझ्या दोन्ही मुलीला सांभाळायला सक्षम आहे आर्थिक आणि मानसिक रित्या सुद्धा. जो माझा पगार तुम्ही तुमचा म्हणताय ती माझी नोकरी आहे, माझी मेहनत. आपल्या सोबत इतक्या स्त्रिया काम करतात.. याच नाही तर प्रत्येक क्षेत्रात तरीही तुमची मानसिकता इतकी खालावलेली असेल असं वाटलं नव्हतं मला. तुम्ही कधी मला मान दिलाच नाही असं वाटतंय तुमच्या बोलण्यातून..

 स्त्री म्हणजे पैशे कमावणारी मशीन..

स्त्री म्हणजे घरकाम करणारी बिनपगारी मोलकरीण..

स्त्री म्हणजे मुलांना जन्म देणारी आया बस इतकाच विचार फिरतो तुमच्या डोक्यात..

तुम्हाला माहिती आहे.. ऍबॉर्शन करताना त्या मातेला शारीरिक व मानसिक किती त्रास होतो..??. तिच्या गर्भाचे किती तुकडे होतात…? विदेशात डिलिव्हरीच्या वेळी नवरे सोबत असतात तस आपल्या कडे व्हायला पाहिजे.. बायकोच्या त्या बाळंतपणाच्या कळा, वेदना,आणि जेंव्हा बाळ होतं त्यावेळचा( मरणयातना ) सुखमिश्रित वेदना स्वतः डोळ्यांनी बघितल्या असत्या तर कदाचित तुम्ही ऍबॉर्शनचा विचार मनात देखील आणला नसता. 

तुम्हाला सांगून काय उपयोग आहे.. त्यासाठी आई होणंच गरजेचं आहे..

तुम्हाला आनंद याचा वाटतो ब्याद सुटली दुसऱ्या मुलीची.. आता मशीन पुन्हा तयार मुलगा द्यायला आपल्याला. 

ती एखादी कठोर, निर्दयी माता असेल जी स्वतःचा गर्भ स्वतःहून पाडेल.. नाहीतर मातेचा जिव्हाळा व नाळ ही गर्भधारणेपासूनच एकमेकात गुंतलेली असते.

मी येणार नाही. व हे पाप करणार नाही तुम्हाला काय करायचं ते करा.. मी माझ्या मुलींची जबाबदारी उचलायला तयार आहे.. पण त्यांना नाव तुमचं लावणार नाही तर माझं एकटीचच लावेल.. 

तुम्हाला मुलाची आवड आहे तर तुम्ही खुशाल दुसर लग्न करा.. माझी हरकत नाही.. आता पर्यंत मी कशालाच विरोध केला नाही.. तुमच्या वागण्यातून तस काही जाणवलं पण नाही… आज मात्र तुम्ही एका आईला,, स्त्रीला, पत्नीला तिघीनांही अपमानित केल.. मी परंपरेला कुरवाळत बसणाऱ्यातली नाही. मी प्रगत विचार अंगिकारले आहे. त्यामुळे जिथे स्त्रीत्वाचा मान नाही तिथे मला राहायला पण आवडणार नाही.. मी आई आहे पण जेव्हा एका आईच्या मुलांनवर संकट येते तेंव्हा ती दुर्गा..रणरागिणी ही बनू शकते..

इतकं बोलून ती बेडरूम मधे गेली.. दरवाजा लावून घेतला.. झोपलेल्या परीकडे बघून विजयी स्मित करू लागली.. आज शर्वरीने एक लढाई जिंकली होती स्वतःच्या मानाची व आपल्या मातृत्वाची..एखाद्या रणरागिणी सारखी ती शब्दातून रजतवर सपासप वार करत होती.. तो काय प्रतिउत्तर देईल याची वाट न बघता ती जिंकल्याच्या आनंदातच रुममधे गेली.. 

खरंच, एक आई आपल्या मुलांन साठी रणरागिणी होऊ शकते.. 

रजत विचारच करत राहिला.. “शर्वरी नेहमी शांत असते आज इतकी शक्ती कुठून आली तिच्यात.. तिचंही खरंच आहे.. ती पण माझ्या इतकाच पगार मिळवते शिवाय घर व मुलीची जबाबदारी पण. मी चूक करणार होतो खुप मोठी आज.  शर्वरी जर दुर्गा बनली नसती व माझ्या सोबत मुकाट्याने आली असती तर किती मोठ पाप घडलं असत माझ्या हातून.. कोणत्या तोंडाने माफी मागू शर्वरीची व येणाऱ्या बाळाची.. खरंच एक पुरुष नाही समजू शकत या मातृत्वाच्या वेदना.. पण आज शर्वरीच्या शब्दांच्या वाराने मी आतून घायाळ झालो आहे.. त्या वेदना इतक्या होतं आहेत मला.. सहन नाही होतं आहे..

एक स्त्रीच या मातृत्वाचा भार सांभाळू शकते ती पुरुषांपेक्षाही महान आहे.. ” विचारातून जेव्हा रजत बाहेर आला तेंव्हा सगळी हिम्मत एकवटून त्याने शर्वरीची व येणाऱ्या बाळाची माफी मागितली.. 

समाप्त… ?जयश्री कन्हेरे -सातपुते

ही गोष्ट सत्य घटनेवरून लिहिलेली आहे.. शिक्षकी पेक्षा नमूद केला.. त्यात कुणीही वयक्तिक घेऊ नये मी स्वतः शिक्षिका आहे.  बऱ्याच मैत्रिणी या चुपचाप तयार होतात या सगळ्या गोष्टीसाठी.. पण माझ्या कथेतील नायिका शर्वरी ही आपल्या अर्भकासाठी रणरागिणी बनते.. परीच्या भविष्यासाठी रणरागिणी बनते. स्त्रियांच्या व मुलीच्या हक्कासाठी रणरागिणी बनते..

जी प्रत्येक स्त्री बनली पाहिजे असं मला वाटते.. शोषिक व अबला बणून काहीही उपयोग नाही तुम्ही जर आर्थिक रित्या सक्षम आहात तर तुम्ही कोणतीही लढाई जिंकू शकता.. हक्कासाठी आवज उठवणं वाईट नाही असं मला वाटते.. 

या लेखातील मत हे माझे वैयक्तिक आहे.. नारी सबलीकरणासाठी.. तेंव्हा आवडल्यास like करा,, तुमच्या प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत.. जास्त आवडल्यास शेअर करा.. पण नावासकट.. ??जयश्री कन्हेरे -सातपुते

Article Categories:
नारीवादी

प्रतिक्रिया व्यक्त करा