आई कामाला गेल्यावर मुलांना ‘वळण’ कसं लागणार?…..

Written by

काय सांगतेस काय?  खरंच का? ….

हो मग काय तर …… अग् ते पोरगं बहुतेक आजारी होतं त्याच्या चेहऱ्यावरून वाटत होतं. पण ही गेली खुशाल कामाला निघून …. मोठी पोरगी होती घरातच पण तिला काय कळणारे …. आई बाप कामाला निघून गेल्यावर दोघं आरामात राहत असतील … कोण बघायला नाही की कोण शिस्त लावायला नाही ….शाळेतून आल्यावर पोरं पाळणाघरात आणि मग ही आल्यावर पोरं सोबत येतात…. त्या पोरांना कसंकाय वळण लागेल? ….

तू बघच ही पोरं नक्की बिघडणार ….

इथे आपण आपल्या पोरांना किती छान वागायला शिकवतो नाही का? …. पण ह्या पोरांच्या नशिबात हे असलं सुख नाहीच हो …..

अग् तीला तर कशाचच काही वाटत नाही. कधी आपल्याशी बोलायला पण येत नाही सदान् कदा आपल्यातच राहते …..जरा म्हणून माणूसकीची वाटत नाही हो मला ती …

नव्यानंच सोसायटीत रहायला आलेल्या कुमुद आणि रवी ह्या जोडप्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. नवराबायको दोघं कामाला जातात आणि आई पण मुलांना सोडून कामाला जाते म्हणून ह्यांचे शेजारी अशा प्रकारचे गाॅसीप्स करत होते.

आई – वडील दोघं काम करत असल्याने पोरांना बघायला अाणि वळण लावायला कोणीच नाही म्हणून ती पोरं बिघडतील असं ह्या बायकांना वाटतंय …..आणि ह्या घरात राहतात म्हणून त्या आपल्या मुलांना चांगलं वळण लावत आहे असंही ह्यांना वाटतंय ……

गणरायाचं आगमन होणार होतं म्हणून सगळे तयारीला लागले. इकडे कुमुदची फॅमिलीपण गणेशाच्या स्वागतासाठी सज्ज झाली.

शेजारच्या बायकांची नेहमीसारखी गाॅसिप चालूच होती. आणि उडत-उडत थोडंफार कुमुदच्या कानीही हे आलं होतं.

गणेशाचं आगमन झालं आणि कुमुदच्या घरातून सकाळ – संध्याकाळ आरतीचे बोल पण ऎकू येऊ लागले. ….तसे शेजारचे चकीत होत गेले.

सोसायटीत वेगवेगळ्या स्पर्धाही ठेवल्या होत्या. मुलांनी आपापले कलागुण दाखवायचे होते. स्पर्धेसाठी कुमुदच्या दोन्ही मुलांचं , पाच वर्षाचा अथर्व आणि नऊ वर्षाच्या वैदेही चं नाव बघून सोसायटीतल्या बायकांमधे एकच हशा पिकला की ही पोरं काय करतील …

स्पर्धा सुरू झाली तोपर्यंत कुमुदही आली होती.

बाकी मुलांनी त्यांच्या पुस्तकातली इंग्लिश गाणी आणि सिनेमातली गाणी म्हणत काहींनी भाषणही केलं. कुमुदच्या मुलांची वेळ आली तशी सगळ्यांना उत्सुकता लागली की ही पोरं काय म्हणतील?…. पोरांनी माईक हाती घेतला आणि  खणखणीत आवाजात म्हणायला सुरूवात केली.

  • “प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम्
  • भक्तावासं स्मरेनित्यम आयुष्कामार्थ सिध्दये” ….

सगळ्या गाॅसिप करणाऱ्या बायका अथर्व आणि वैदेहीकडे तोंडाचा आ….. वासून पहात होत्या. पोरांना कसंकाय येतं म्हणून त्यांना त्यांच्या थोबाडीत मारल्यासारखं झालं होतं……नंतर त्या दोघांनी मनाचे श्लोकही म्हंटले …आणि कलागुणांची ही स्पर्धाही त्यांनीच जिंकली….

आज कुमुदच्या घरी हळदी-कुंकवाचा कार्यक्रम होता म्हणून तिने संध्याकाळी सगळ्यांना बोलावलं होतं. सगळ्या बायका तर तिच्या घरी जायला उत्सुकच होत्या कारण त्यांना तिच्यातला कमीपणा दाखवायचा होता.

संध्याकाळी बायकांचा ग्रुप जमून सगळ्या कुमुदच्या घरी आल्या. कुमुदचं नीटनेटकं आवरलेलं घर आणि सुंदरपणे सजवलेली गणेशाची आरास बघून सगळ्यांना आश्चर्य वाटलं. तितक्यात अथर्व आणि वैदेहीने छानसं आवरून येऊन सगळ्यांना नमस्कार केला आणि हाती पाण्याचा ग्लास देत काय हवं काय नको पहात होती. तेवढ्यात हसतमुख कुमुद आली आणि आरतीची तयारी करून कोणाची तरी वाट पाहू लागली आणि तेवढ्यात सोसायटीत एक अनाथ आश्रमाची गाडी आली काही पोरं बाहेर येत कुमुदच्या घरात शिरली.  त्या मुलांच्या हातून कुमुदच्या घरातली गणेशाची आरती झाली. आणि मग मुलं जेवायला बसली.

इकडे कुमुद ने सगळ्या बायकांना हळदीकुंकू लावले, प्रसाद दिला पण बायका मात्र तिथे चालत असणाऱ्या सगळ्या घाडामोडी पाहून थक्कच झाल्या.

कुमुदला त्यांची ही मनस्थिती समजली आणि ती त्यांना बोलती झाली. दर वर्षी आम्ही गणेशोत्सवात अशाप्रकारे खरंच “ज्यांना भुक आहे त्यांना खाऊ घालतो यामुळे भुकेल्यांच्या पोटात अन्न जाऊन गणेशाची खरी भक्ती होते असं आम्ही मानतो”….. आणि आता तुम्हा सगळ्यांना असंच वाटतंय ना की, आम्ही दोघं नवराबायको कामावर जातो आणि तरी आमची पोरं अशी कशी? …..

हल्ली बदलत्या गरजा आणि राहणीमानामुळे आईवडील दोघांनाही काम करावं लागतं आणि मग पर्यायाने त्यांना त्यांच्या मुलांची सोय करावी लागते. पाळणाघरात थोडा वेळ राहून नंतर माझी मुलं माझ्यासोबतच असतात.

माझी मुलगी आणि मुलगा दोघंही जमेल तेवढं स्वतःची कामं स्वतः च करतात. लहानपणापासूनच ही सवय मी त्यांना लावली आहे.

आम्ही कामाला म्हणजे खरंतर मी कामाला जाते म्हणजे माझ्या मुलांना काही येत नसेल असंच वाटतं ना तुम्हाला? …..पण दिवसभर मुलांसोबत राहूनपण त्यांना खरंच शिस्त लावता येते का? ….आपण मुलांना दिवसभर वेळ देतोय हे महत्त्वाचं नसतं तर त्यात क्वाॅलीटी टाईम देणं फार महत्त्वाचं असतं. मूल हे आपलंच अनुकरण करत असतं. मुलांसोबत आपण जेंव्हा वेळ घालवतो तेंव्हा त्यांना आपण नक्की त्या वेळेत काय देतोय ह्यावर ठरतं की मूल आपल्याकडून काय शिकतंय ते …..

मी कामाला जाते ह्याचा अर्थ माझ्या मुलांना काहीच येत नाही किंवा मी त्यांना काहीच शिकवत नाही असा होत नाही. मी कामाला जाते पण मी माझं आईपण विसरलेले नाही…… हे तर तुम्हाला आतापर्यंत समजलंच असेल …. आणि हो चार बायकांमधे गप्पा मारत नाही ह्याचा अर्थ माझ्यात माणुसकी नाही असाही होत नाही हं म्हणत कुमुद डोळा मारत हसली.

कुमुद इकडे बोलत होती आणि तिच्या मुलांनी लगेच अनाथ आश्रमातून आलेल्या मुलांना वाढायला घेत त्यांच्याशी गप्पा गोष्टींचा आनंद घ्यायला सुरूवात केली.

©Sunita Choudhari. 

(मित्रमैत्रिणींनो आणि माझ्या प्रिय वाचकांनो नमस्कार. काळाची गरज म्हणून आज आईलाही बाहेर काम करायला जावं लागतं पण अशामुळे काही लोकांना असं वाटतं की त्यांची मुलं वाया जातील किंवा त्यांना वळण नसतं. पण मुलांबरोबर आपण वेळ कसा घालवतो आणि त्यावेळेत आपण त्यांना किती चांगलं शिकवतो हे खुप महत्वाचं असतं आणि  असं मला वाटतं, तुम्हाला काय वाटतं हे ही मला लाईक कमेंट करून आवर्जून सांगा.) 

 

 

 

Article Categories:
इतर

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत