आई बाबा माझे लाडच करत नाही..

Written by

 

“का गं आई तू अशी वागतेस? पप्पा पण ऐकत नाही माझं.. मी काही लहान नाहीये आता…” नेहा आईला कधी नव्हत ते बोलून गेली…

सरिता म्हणजेच नेहा च्या आईला नवल वाटलं, ही अशी का बोलायला लागली अचानक? तिने सुहास म्हणजेच नेहा च्या वडिलांच्या कानावर हे घातलं… “अहो नेहा आजकाल अशी का बोलतेय? काय खटकतयं तिला नेमकं?” सुहास विचारात पडला… मागचे काही महिने त्याचा डोळ्यासमोरून गेले.. नेहा ला नवीन मैत्रिणीं झाल्या होत्या…त्यांचं राहणीमान खूप उच्च दर्जाचं आणि मॉडर्न होतं… नेहा त्यांचं अनुकरण करायचा प्रयत्न करत असे… हट्ट न करणारी नेहा आता रोज नवीन काहीतरी घेण्यासाठी हट्ट करू लागली.. तिच्या मनात सतत हेच चालू असायचं की “आई पप्पा माझे लाड करत नाहीत, माझ्या मैत्रिणींना कसं अगदी शब्द काढल्या काढल्या हातात मिळतं… आई पप्पा दोघेही कमावतात..त्यांच्याकडे भरपूर पैसे येतात पण तरीही पैसे नाही म्हणून बऱ्याचदा मला वाट पाहायला लावतात…एक दिवस मित्र मैत्रिणींसोबत पार्टी वरून घरी यायला उशीर झाला म्हणून मला किती सुनावलं…मला प्रत्येक गोष्ट विचारावी का लागते? मी स्वतःचे निर्णय घेऊ शकते” याच्या पलीकडेही अजून एक गोष्ट तिला सलत होती, ती म्हणजे घरात पप्पांचीच मक्तेदारी का आहे? आई आणि मी सुद्धा निर्णय घेऊ शकतो तरी पप्पांच का म्हणून ऐकायचं? नेहा चं बऱ्याच दिवसापासून हेच बिनसलं होतं…

ती नुकतीच कॉलेज ला जायला लागली होती…आई वडील दोघेही कमावते…एकुलती एक नेहा.. पण तरीही सरिता आणि सुहास ने नेहा ला लाडावुन न ठेवता चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न केला होता… नेहा चं हे वागणं पाहून सुहास विचारात पडला…

आजवर नेहा ला उत्तम असं सगळं देण्याचा प्रयत्न केला होता…चांगली शाळा, चांगलं कॉलेज..पण यातच ती हट्टी बनू नये यासाठीच काही गोष्टींवर मर्यादाही घातली होती… रात्रभर त्याला झोप आली नाही, त्याने मनाशी एक गोष्ट पक्की केली…त्याला जशी एक आयडिया सुचली तसा तो निश्चिन्त झाला आणि एकदम मोकळं हसून त्याने एक निश्वास टाकला… दुसऱ्या दिवशी नेहा कॉलेज मधून घरी आली, आल्या आल्या ती फ्रेश झाली आणि तिच्या खोलीत दार बंद करून बसली…कानाला हेडफोन लावून गाणे ऐकत होती…सुहास ने सरिता आणि नेहा ला हाक मारली, सरिता किचन मधून बाहेर आली पण नेहा ने हेडफोन मुळे आवाज ऐकला नाही…ती बाहेर आलीच नाही.. “बघा हो,ही अशीच वागतेय सध्या…काही म्हणून ऐकत नाही” असं म्हणत रागाने सरिता नेहा च्या खोलीचं दार वाजवायला निघाली…सुहास ने तिला अडवलं.. “सरिता…शांततेत घे…मी बरोबर बोलावतो तिला…” सुहास ने मोबाइल काढला आणि व्हाट्सएप वर तिला मेसेज केला.. “नेहा प्लीज कम आऊटसाईड, आय वॉन्ट टू डिस्कस समथींग विथ यु…” दुसऱ्या सेकंदाला नेहा बाहेर आली…जरा घाबरली, पप्पांनी आजवर कधीच असा मेसेज केला नव्हता.. “सरिता, नेहा…बसा माझ्यासमोर…” नेहा घाबरत, बिचकत पण तरीही आक्रमकतेने समोर बसली…सरिता तिच्या शेजारी बसली, आता सुहास काय सांगणार याकडे दोघींचे कान लागले होते… सुहास ने बोलायला सुरुवात केली… “नेहा ची मी माफी मागतो, आम्ही पालक म्हणून तुझ्याशी चुकीचं वागलो…तुझे हट्ट पुरवले नाही, तुला स्वातंत्र्य दिलं नाही…आणि म्हणूनच मी आजपासून एक निर्णय घेतलाय, की आजपासून घराचे सर्व निर्णय आणि आर्थिक गोष्टी नेहा कडे द्यायच्या…

सरिता आणि मी दर महिन्याच्या पूर्ण पगार नेहा च्या हातात जसाच्या तसा देणार, मग नेहा ठरवेल की त्यात ती काय विकत घेणार, कुठे खर्च करणार वगैरे…त्यात आम्ही काहीही हस्तक्षेप करणार नाही, नेहा ला सर्व पैसे खर्च करायचं संपूर्ण स्वातंत्र्य असेल आणि आम्ही कधी हिशोब सुद्धा विचारणार नाही…” सरिता ला सुहास चा मनसुबा समजला…तिनेही होकार दिला…आणि नेहा तर जाम खुश झाली…ती स्वतःशीच बोलायला लागली.. “एक नंबर…आता सर्व पैसे माझ्याकडे येणार, मी हवा तसा खर्च करणार आणि घरातले सर्व निर्णय मीच घेणार…आता मी आई पप्पांना शिकवते की लाड कसे करतात ते…” एकंदरीत “यांना आता दाखवुनच देते” या अविर्भावात नेहा होती… आता तिने आधी कोणता ड्रेस घेणार, काय शॉपिंग करणार याची लिस्ट बनवायला घेतली, 15 तारीख चालू होती…पुढच्या 15 दिवसात तिने भलीमोठी लिस्ट बनवली आणि 1 तारखेला पगार हातात यायची वाट पाहू लागली…

1 तारीख आली, नेहा वाटच बघत होती आई पप्पा घरी केव्हा येताय त्याची…6 वाजले आणि आई पप्पा घरी आले.. नेहा च्या चेहऱ्यावर चमक होती… सरिता आणि सुहास ने ठरल्याप्रमाणे दोघांचे मिळून असे 25000/- रुपये नेहा च्या हातात दिले… नेहा ने ते घेतले, तिच्या खोलीत गेली आणि तिने ते पैसे पर्स मध्ये ठेऊन दिले… तिने तिची शॉपिंग ची लिस्ट वर काढली, सर्व वस्तूंचा हिशेब केला..तिच्या लक्षात आले की सर्व मिळून फक्त 10000 ची खरेदी आहे, म्हणजे 15000 उरून पुरून निघताय… ती खुश झाली.. दुसऱ्या दिवशी शॉपिंग ला गेली आणि 10000 पेक्षा जास्त अशी 13000 ची आगाऊ शॉपिंग करून आली, कपडे, सँडल्स, पर्स, ब्रँडेड मेकअप किट, ब्रँडेड क्रीम्स सगळं विकत घेतलं आणि घरी आली.. सरिता आणि सुहास सगळं बघत होते पण नेहा ला काहीही बोलायचं नाही असं त्यांनी ठरवलं होतं.. दुसऱ्या दिवशी सरिता आणि सुहास नेहा ला म्हणाले, “नेहा, आम्हाला पैसे हवे आहेत…रोजच्या प्रवासाला किमान रोज 100-150 रुपये लागतात…आता सर्व कारभार तुझ्याकडे आहे म्हणून तुझ्याकडेच आम्ही पैसे मागू शकतो…” नेहा ला आपण एका फार मोठ्या पदावर असल्याचा भास झाला, आणि मोठया अभिमानाने उरलेल्या 12000 मधले आईला 150 आणि बाबांना 150 असे 300 रुपये तिने काढून दिले… नेहा कॉलेज ला गेली, तिने सर्व मित्र मैत्रिणींना महागड्या हॉटेल मध्ये मोठी पार्टी दिली…तिथे परत 2000 रुपयांचा चुना लागला.. नेहा ला वाटलं आपणच नेहमी पार्टी देत जाऊ म्हणजे सर्वांमध्ये माझं स्टेटस चांगलं राहील… दुसऱ्या दिवशी दूधवाला बिल मागायला आला…

संध्याकाळी पेपर वाला..

नंतर एकदा सिलेंडर वाला आला.. ह्या सर्व बिलांसाठीही पैसे लागतात हे तिच्या डोक्यातच नव्हतं… जरा टेन्शन मधेच तिने सर्वांना नेहा ने पैसे दिले.. इतक्यात लाईट बिल आलं… घरात हा सगळा खर्चही असतो हे तिच्या डोक्यातच आलं नाही.. संध्याकाळी आई पप्पांनी भाजी आणायला पैसे मागितले.. किराणा संपला होता, त्यासाठी आईने काही पैसे मागितले… काही मुलं वर्गणी जमा करायला दरवाजात आली.. या सर्वांना पैसे देत देत तिच्या आता जीवावर आलं होतं… आणि रोज आई पप्पांना 200-300 रुपये द्यावे लागत होते…

नेहा घरातली मुख्य झाली होती म्हणून नियमाप्रमाणे पप्पा रात्री झोपताना सर्व खोल्या नीट बघून, दरवाजाला नीट लॉक करून झोपायचे तसंच नेहा करत होती,

एक दिवस सुहास ला महत्वाची मीटिंग होती, रात्री उशिरा पर्यंत चालणार होती, त्याने सरिता ला तसं सांगून ठेवलेलं मात्र नेहा ला माहीत नव्हतं.
नेहा रोजच्या प्रमाणे खोल्या बघायला गेली पण पप्पा घरात नव्हते आणि आई झोपी गेलेली…पप्पा यायची वाट बघू म्हणून तिने tv चालू केला…खूप वेळ झाला तरी पप्पा घरी येत नाही म्हणून तिची काळजी वाढली,पप्पांचा फोनही लागेना… आईलाही उठवू वाटत नव्हतं… त्यातच tv वर विचित्र बातम्या दाखवत होते, तिची धडधड वाढली…इतक्यात पप्पा आले…तिचा संताप झाला…इतक्या वेळ कोणी बाहेर राहतं का? ती काही शब्द बोलणार इतक्यात तिला पप्पांच्या जागी मीही अशीच उशिरा आलेले हे आठवलं… ती काहीही बोलू शकत नव्हती…मग तिच्या खोलीत जाऊन कसला तरी विचार करत झोपी गेली…

महिन्याची 10 तारीख आली… नेहा ला वाटलं किती पैसे शिल्लक आहेत ते बघूया जरा.. ती हलक्या पावलाने तिच्या खोलीत गेली, तिची पर्स काढली आणि तिला ती बरीच हलकी जाणवू लागली… आता घाबरतच तिने पैसे मोजायला सुरवात केली…आणि बघते तर काय?? फ़क्त 5500 रुपये शिल्लक होतें… आता या पैशांत पुढचे 20 दिवस काढायचे होते… नेहा आता भानावर आली असली तरी “यांना आता दाखवुनच देते” असा अविर्भाव तिने काही सोडला नव्हता… तिने आता काटकसर करायला सुरुवात केली… मित्र मैत्रिणींना पार्टी देणं बंद केलं… नवीन अवाजवी खरेदी करणं बंद केलं… आणि अजून कुठे पैसे वाचवता येतील ते बघू लागली… कायम तोऱ्यात असणारी नेहा आता जरा गंभीर दिसू लागली… सरिता आणि सुहास च्या ते लक्षात येत होतं आणि आपण आपल्या प्लॅन मध्ये बरोबर पुढे सरकतोय याची खात्रीही त्यांना पटली.. असे पैसे वाचवत वाचवत शेवटी 25 तारीख आली… सुहास नेहा कडे गेला, आणि म्हणाला… “नेहा, या महिन्यात एका पॉलिसी चे 10000 भरायचे आहेत, देतेस का?” नेहा ला धक्का बसला… “कसली पॉलिसी?? भरावेच लागतील का??”  “हो बेटा, 30 तारखे पर्यंत भरायचे आहेत..तुझ्या पुढच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी पैसे असावेत म्हणून ही तरतूद.” “ठीक आहे मग नंतर देते…” नेहा तिच्या खोलीत गेली…पैसे परत मोजले, फक्त 700 रुपये शिल्लक होते… इतक्यात आईच्या मैत्रिणीचा फोन आला,  “नेहा बेटा अगं आईचा अक्सिडंट झालाय, किरकोळ लागलंय फक्त, तू अपेक्स हॉस्पिटल ला ये पप्पांना घेऊन…”

नेहा ने ताडकन पप्पांना सांगितलं आणि दोघेही दवाखान्यात पोचले, हे अक्सिडंट च मात्र प्लॅन मध्ये काहीही नव्हतं… दोघे दवाखान्यात गेले, आई च्या हाताला ड्रेसिंग केलं होतं, सुदैवाने काही गंभीर इजा नव्हती… नर्स ने बिल सुहास कडे दिलं… 1500/- रुपये… सुहास ने नेहा कडे बघितलं.. आता मात्र नेहा रडायला लागली… कारण फक्त 700 रुपये होते आणि ही फी आणि वरून औषध गोळ्यांसाठीही पैसे उरले नव्हते… सुहास ने त्याचा atm कार्ड मधून पैसे दिले, नेहा ला आश्चर्य वाटलं… मग सर्वजण घरी परत आले… नेहा ला आता जाणीव झाली होती…की आपले आई वडील किती काटकसर करून आपली हौस पुरवत होते आणि मला वाटायचं की इतके पैसे जातात तरी कुठे…सतत काहीतरी नवीन वस्तू साठी मी उगाच हट्ट करत होते…

नेहा रडायलाच लागली, तिला माफी कशी मागावी हेच कळत नव्हतं… तिच्या तोंडून शब्द फुटत नव्हता…तिची ही अवस्था पाहून सुहास म्हणाला..

“नेहा बाळ, बेटा नको वाईट वाटून घेउस, तुला आता समजलंय ना की घरात पैसे कुठे जातात ते? तुझ्या मनाला हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे, आणि मला चांगलं वाटलं की तू तुझी खदखद मनात दाबून न ठेवता व्यक्त केलीस…”

“नेहा बाळ, जगण्यासाठी फक्त कपडे लत्ते आणि उंची साधनंच लागत नाहीत, तर आपल्या दैनंदिन गरजा आणि भविष्यासाठीची तरतूदही वर्तमानातील पैशातूनच करावी लागते..” नेहा ची आई म्हणाली… “आता हेच बघ ना, मी माझ्या मागील काही पगारातून काही बचत केली होती आणि तीच आता आईच्या उपचारासाठी कामात आली, जर मी प्रत्येक पगारात फक्त उधळपट्टी करत बसलो असतो तर आज पैसे कुठून भरले असते?” “हो पप्पा, मला आता समजलंय, मी स्वतः अनुभवलंय की घरात आर्थिक अडचण असल्यावर किती दडपण येतं ते…तुम्ही दोघे अडचण असतांनाही मला कधी तसं जाणवू दिलं नाही…मला माफ करा, माझी चूक मला कळली, पण आता पॉलिसी चं काय करायचं आणि बाकीचे दिवस तुम्हाला प्रवासाला द्यायलाही पैसे नाहीयेत…??” सुहास आणि सरिता हसू लागले,  “बेटा नेहा, आम्ही तुला म्हटलो होतो ना की प्रत्येक पगारातून आम्ही काही पैशांची बचत करत होतो आणि आता तेच पैसे कामात येतील…” नेहा ला आता पूर्ण उपरती झाली… तिला तिच्या प्रश्नांची उत्तरं या अनोख्या प्रयोगातून मिळाली होती… सुहास आणि सरिता मधले पालक आज जिंकले होते…. ©संजना सरोजकुमार इंगळे

(लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे असून स्वतःचे नाव टाकून लेख पसरवल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल…लेखिकेचा उल्लेख असल्यास लेख शेयर करण्यात काहीही हरकत नाही..धन्यवाद)

Article Categories:
सामाजिक

प्रतिक्रिया व्यक्त करा