आई ही आईच असते मग ती कोणीही का असेना

Written by

काळोख वाढत गेला तशी ‘काशीची’ नटायची गडबड वाढत होती. चेहऱ्यावर अजून पावडर फासत लिपस्टिक जरा अजून डार्क करत-करत ती स्वतःला आरश्यात न्याहळत होती आणि तितक्यात तिची तंद्री भंग झाली ती तीच्या लहान बाळाच्या आवाजाने. व्याकूळ होऊन तिने आपल्या बाळाकडे झेप घेतली आणि पटापटा ब्लाऊज ची बटनं उघडत बाळाला पाजू लागली.कीती गोंडस पोर जनमलय म्हणत स्वतः च स्वतः च्या बाळाचं कौतुक करत होती.बाळाकडे बघत काय नाव ठेवावं ह्या गोंडूलीचं म्हणत तीला न्याहाळत होती. अगदी थोड्याच वेळात ते गोड लेकरू गोड स्वप्नात झोपी गेलं आणि काशीची काळरात्र सुरू झाली.

तेवढ्यात अगदी कर्कश्य अावाजात फर्मान आलं.

“अग् ए भवाने, किती त्या कार्टिचं करनार हाय? धंदा पानी काय हाय का नाय”. आज मोठ्ठा शेट आलाय त्याला खुष कर म्हंजे पुढचे दिस खान्याचे वांदे व्हनार न्हाय.अन् जरा परत आदीचे दिस आठव, कसा घसाघसा पैसा मिळवायची अन् कसं इशा-यात कशटमर ला नाचवायची , हाय का जरा डोस्क्यात”? बाई बाई कसलं त्ये खुळ म्हनावं ऎन जवानीतच पोर जन्माला घालायचं ,आता झाले का नाय वांदे कमवायचे? आता उट अन् लाग परत कामाला ही असली पोरं लय जनमतात ह्या घाणीत अन् हीत्तंच मरत्यात बी, हीच्या नादी लागलीस तर कोन थुंकनार बी नाय तुज्याकडं. समजलीस का?, म्हणत तीची मालकीण तरातरा निघून गेली.

तिनं अलगद बाळाला खाली झोपवलं आणि कामाला तयार झाली अगदी तिथच चिटकून असलेल्या एका मळकट खोलीत शेट तीची वाट बघत होता अाणि ती येताच जंगली श्वापदासारखा तिच्यावर झेपावला.ती गुमान होती आणि तो त्याची भुक मिटवत होता अन् तेवढयात तिचं बाळ अचानक उठून जोर जोरात रडायला लागलं. ती बाळाच्या आवाजाने बेचैन झाली आणि शेटला राग आला त्याने तीला एक जोरात लात घातली आणि म्हंटला ‘ जितकं पैसं दिलय त्याहून जास्त वसूली करता येते मला, नाटकं करू नको’ म्हणत तिचे लचके तो तोडू लागला. तीकडे बाळाच्या आवाजाने ती खोली दुमदुमत होती अन् इकडे काशीच्या मनाचा मुक आवाज टाहो फोडत होता.

बराच वेळाने बाळ शांत झालं आणि शेट ने पण हिची सुटका केली जसा तो गेला तशी ती कपड्यांचं भान न ठेवत बाळापाशी पोचली.शेंबडानं आणि आसवांनी भरलेल्या तोंडाने बाळ परत रडत झोपी गेलं होतं आणि त्याला बघताच ती स्वतःलाच चापटं मारत “कसलं नशीब ग् तुझं पोरी, की तू मला जनमलीस”, म्हणून बाळाला मिठीत घेत भुकेल्यासारखी पटापट मुके घेत घळाघळा रडत होती. आणि बाकीचे तिच्याकडे छद्मी हसत, बघत होते जणूकाही एक मूक संदेश होता की आता तुझ्यानंतर नंबर हा तुझ्या पोरीचाच असणार.

काशी त्या रात्री झोपलीच नाही बेचैन होती आणि त्याच बेचैनीत एक निर्णय घेऊन तिनं पोरीला घेऊन पेटीतली लपवलेली कट्यार उचलली अन् ती वेगाने निघाली. खालच्या राम्या नं तिला पकडलं तसं तिनं चवताळून कट्यार त्याच्या पोटात मारली अन् ती पळाली, बोंबाबोंब झाली पण ही जिवाच्या आकांताने पळाली, आपल्या त्या इवल्याशा जिवाला नवीन जग द्यायला.

पळता पळता सकाळ झाली. आणि जिथं थांबली तिथं तीच्या समोर एक स्वच्छतागृह होतं.आता मनाच्या स्वच्छतेची वेळ झाली आहे आणि ह्या काशीलासुध्दा आता शुध्द व्हावं लागेल म्हणत एका निर्धाराने ती मनात हसली आणि लगेच तिथल्या माणसाजवळ पोहोचून तिनं कामासाठी विनवणी केली आणि इथच सुरू झालं तिचं नवीन आयुष्य…..

आणि तिनं पोरीलाही नाव दिलं ‘परी’ ! जी स्वत: जगून दुसरयाचं दु:ख कमी करेल अशी ती परी! परीला कधी ह्या स्वच्छतागृहात तर कधी ओट्यावर ठेवत तर कधी तीला घेऊनच काशी काम करू लागली, जणूकाही आधीची केलेली घाणच ती स्वच्छ करत होती.

जशी परी मोठी झाली तसं काशीनं आधी तीला शाळेला घातलं आणि बापाच्या जागेवर स्वतः चं नाव लावलं. रोज परीला शाळेत सोडताना ती तीच्या शाळेच्या कपड्यांना खुप अप्रूपपणे पहायची आणि म्हणायची ‘माझी बाय ग् , लय मोट्टी व्हनारे सिकून अन् परीवानी -हानारे म्हणत कडाकडा बोटं मोडत तिची दृष्ट काढायची’…….

आतातर काशीनं चार घराची कामंही घेतली होती आणि मिळेल ते कामपण करू लागली.संघर्ष हा होताच पण निर्धारही होता की, आता परत त्या घाणीत जाऊन शरीर कधीच विकायचं नाही.

इथं पोरगी चांगलं नाव काढत होती आणि ती रोज उठून संघर्षासाठी तयार होत होती.

कधी पाणी पिऊन तर कधी उपाशी झोपायची पण पोरीला मात्र शाळा शिकवायचीच हे तीचं पक्क होतं. आपल्या मुलीचं आयुष्य सुंदर करायला ती तिचं आयुष्य वेचत होती तरीही खंत अजिबात नव्हती. लोकांचे टोमणे, घाणेरडी नजर आणि स्वतः ला सावरत ती तीचं संगोपन करत होती.

परी मोठी – मोठी होत गेली आणि काशी मात्र खंगत होती. देहविक्री करतानाचे आजार तीला आता जगू देत नव्हते तरीही “बाप्पा जरा अजून जगू दे रे! पोरगी अजून शिकू दे म्हणत ती परत कामाला लागत होती”.

आपल्या मुलांसाठी आई काय करत नाही? 

तिनं देहविक्री करुन झालेल्या त्या मुलीसाठी आधी दुर्गेचं रुप घेतलं, आणि नंतर ती प्रसंगानुरूप अनेक रूपं घेत गेली. तिच्यातली आई आणि बरच काही होती ती. वेश्येपासून ते सफाई कामगार आणि मिळेल ते काम खंबीरपणे करत ती तिच्या लेकरासाठी झटत होती.

स्त्री हताश होते , थकते आणि हारतेही पण, “आई ! कधीच थकत नाही आणि हारतही नाही मग ती अाई कोणी वेश्या का असेना ” ……..

        आज तीची सगळी स्वप्नं पूर्ण होणार होती. सकाळीच परीनं काशीला मिठीत घेत सांगितलं की,  “आई ! आज नवीन साडी घालून तयार रहा, आज तुझी परी ही खरोखर परी होणार आहे जिच्या हाताखाली खुप लोकं काम करणारे असतील आणि तुला आता फक्त आराम करायचाय आणि हवं ते मागायचंय कारण, आता तुझी पोरगी तुझं सगळं स्वप्न पूर्ण करणार आहे “.

काशीला ह्यातलं काही कळालं नाही फक्त परी कोणीतरी मोठ्ठी बनून मोठ्या गाडीत येणार होती एवढंच तीला कळालं होतं.

पण आज सकाळपासूनच तिचा त्रास मात्र बळावला होता पण तरीही तिनं आरतीचं ताट तयार केलं आणि देवाजवळ दिवा लावला आणि त्या दिव्याच्या प्रकाशात आपलं गेलेलं आयुष्य आठवत कधी रडत होती तर कधी हसत होती तीची सगळी स्वप्न तर आता पुर्ण झाली होती.ज्या जीवासाठी काशीनं स्वतः च्या जीवाचा आटापीटा केला त्या जिवाच्या  पंखात आता गरूड भरारीचं बळ अालय,आता ते सन्मानाने जगणार आणि लोक तिला सलाम करणार म्हणून ती आज खुप समाधानी होती. दिव्याच्या मंद प्रकाशात काशी मंद हसत प्रकाशाकडे बघतच राहीली आता तीची पापणीही लवत नव्हती आणि बाकी कसला त्रासही होत नव्हता ती अगदी शांत होती आणि बाहेर लोक जमा झाले होते.

पॅ पॅ पॅ पॅ करत एक सरकारी गाडी घराबाहेर आली. आई, अजून बाहेर का नाही आली म्हणून बेचैन होत परी घरात गेली आणि आईला पाहताच मटकन् खाली बसली.

एक आर्त टाहो फुटला आणि बाहेर गाडीच्या पॅ पॅ च्या आवाजात दु:ख मोठं का मिळालेलं सुख मोठं याचं गणित च जमत नव्हतं तरीही देवाजवळच्या त्या दिव्याच्या प्रकाशात तिची झोपडी लखलखत होती.

©Sunita Choudhari. 

Article Categories:
नारीवादी

प्रतिक्रिया व्यक्त करा