आक्रोश

Written by

अहो , काय हे !! सगळीकडे आक्रोश सुरु झालाय वाटत …

विस्फोटलेल्या उद्रेकी भावना रस्त्यावर येऊ लागल्या आहेत …

अरे बघा ना , तिकडे कुणीतरी कँडल मार्च पण काढला आहे !!

न्यूजवाले तर माझ्यावर चर्चासत्र आयोजित करताय म्हणे …

अबब !! अचंबित !! नेतेमंडळी माझ्याबद्दलच बोलताय वाटत !!

ते सोडा हो …

पण मला काजळ लावणारी माझी आई कुठे आहे ??

डोक्यावरून प्रेमाने  नेहमी हाथ  फिरवणारा बाबा मला कुठेच का दिसत नाहीये ?

“ताई , ताई ” म्हणणारा माझा बोबडा भाऊ कुठे दडून बसलाय ?

बाहेर एवढा आक्रोश अन इथे एवढी स्मशानशांतता का ??

अरे ती बघा माझी आई अश्रुना वाट देऊन धाय-धाय रडत आहे …

बाबा डोक्याला हात लावून कोपऱ्यात मन घालून बसले आहेत ?

भरलेल्या डोळ्यांनी माझा सोन्या भयग्रस्त  झालेला आहे …

पण मी मात्र दवाखान्यात निपचित पडलेली आहे …

शांत , निशब्द !!

चेहऱ्यावरचा रक्तस्राव आता कमी झाला आहे …

शरीरभर जखमा आहेत पण आता वेदना अजिबात होत नाहीये !!

“काय झालंय ?” असं का विचारताय तुम्ही ?

अहो , तुम्ही वाचला नाही का पेपर मध्ये ??

माझ्यावर बलात्कार झाला आहे …

अन माझा प्राण शरीर सोडून कधीच निघून गेलाय …

पोलिसांनी त्या नराधमांना अटक केलीये म्हणे …

त्यापेक्षा त्या वृत्तीला अटक करा असं सांगा कुणीतरी त्या पोलिसांना …

आज आक्रोश होईल … मोर्चे , कँडल मार्च निघतील …

पण उद्या मात्र सर्व शांत होणार …जैसे थे एकदम …

मग पुन्हा एखादी कळी खुरडली जाणार ,  देश पुन्हा रस्त्यावर येणार …

सगळे चक्र तसेच फिरणार !!

होय , माझ्यावर बलात्कार झाला आहे …

शरीरभर जखमा आहेत पण आता वेदना अजिबात होत नाहीये !!

पण  माझा प्राण शरीर सोडून कधीच निघून गेलाय …

झोपलेल्या समाजाला जागं करून दूर निघून गेलाय …

आई अजूनही आक्रोश करतेय , बाबा रडतोय …

” ताई बोल ना माझ्याशी ” म्हणत माझा सोन्या हंबरडा फोडतोय !!

पण काय करणार हो , माझा प्राण शरीर सोडून कधीच निघून गेलाय …

Article Tags:
· · ·
Article Categories:
सामाजिक

प्रतिक्रिया व्यक्त करा