आचरण

Written by
  • 2 आठवडे ago

आचरण

।।ओम।।

आपण सगळ्यांनीच लहानपणी एक गोष्ट ऐकलेलीय ती गोष्ट म्हणजे :
“मी शेंगा खाल्या नाहीत मी टरफले उचलणार नाही” अर्थात लोकमान्य टिळकांची ही गोष्ट. ज्यांना हि माहिती नसेल त्यांना मी महाराष्ट्रीयन म्हणणारच नाही!
तर सोहम ला आजीने आजच हि गोष्ट सांगितली.. रामायण झालं,महाभारत झालं,छत्रपतींच्या गोष्टी तर 14 वर्षाच्या सोहम ला तोंडपाठ झाल्या होत्या..आता मात्र त्याने आजीला हट्ट केला की आजी मला लोकमान्य टिळकांच्या गोष्टी सांग ना आणि आजीने त्याला टरफलाची गोष्ट सांगितली …आता तर सोहम ला टिळकांविषयी जाम आदर वाटू लागला,त्याला टिळक आवडायला लागले…दररोज तो आजीजवळ हट्ट करू लागला आजी अजून सांग टिळकांच्या गोष्टी…
एकेदिवशी काय झालं ,सोहम च्या मित्राचा म्हणजेच राहुल चा वाढदिवस होता,त्यासाठी राहुलने शाळेत मुलांना वाटण्यासाठी चॉकलेट आणले होते. राहुल ने सार्यांना चॉकलेट वाटले तेही वर्गात शिक्षक नसताना, आणि मग मुलांनी चॉकलेट खाऊन त्याचे कव्हर मात्र इकडे तिकडे वर्गात फेकून दिले…तेवढ्यात तिकडून गणिताचे वैद्य सर आले आणि त्यांनी सगळ्या मुलांकडे रागाने पाहिले. त्यांनी सगळ्या वर्गाला ते सगळं साफ करायला सांगितलं. त्यावेळेस मात्र सोहम एका कोपऱ्यात शांत उभा होता.सरांनी त्याला बोलावलं व विचारलं, तू का नाही हे साफ करत?? त्यावर सोहम म्हणाला ,सर मी चॉकलेट खाल्लं पण मी त्याचं कव्हर मात्र माझ्या दप्तरात ठेवलं आहे.त्यामुळं मी गप्प उभा आहे सर…
सर म्हणाले , असं केल्याबाबत तुझं खूप कौतुक,पण तू जर तुझ्या मित्रांना आता हे साफ़ करायला मदत केलास तर कुठं काय बिघडणार आहे?
सोहम म्हणतो,नाही सर, तुम्ही याना शिक्षा म्हणून हे काम करायला सांगितलंय, मग जी चूक मी केलीच नाही त्याची शिक्षा मी का भोगू?? आता मात्र सर चिडले त्यांनी सोहम ला रागाने विचारलं,तू स्वतःला लोकमान्य टिळक समजतोस कि काय? निमूटपणे हे सगळं गोळा करायला मदत कर तुझ्या मित्रांना… सोहम म्हणाला टिळकांनी जर त्यावेळेस शेंगांची टरफले गोळा केली असती तर मी हि आज हे सगळं गोळा केलं असतं, पण त्यांनी तस नाही केलं…सर, टिळकांची हि गोष्ट आपण त्यांच्या अंगी असणाऱ्या खरेपणाला जोडतो तर मग मी असं वागलो ते काय चुकीचं आहे का? टिळक मला समजले म्हणून मी त्यांना आचरणात आणले ह्यात मी खरंच काही चुकलो असेन तर मग मी चुकीचा आहे सर….

ता.क. …टिळकांच्या खरेणाच्या गोष्टी मोठ्या कौतुकाने आपल्या पाल्याला सांगतो किंवा विद्यार्थाना सांगतो ,पण वास्तवात जर त्या गोष्टींचं आचरण करणं चुकीचं आहे का ???…

Comments are closed.