आजीस पत्र

Written by

पत्रलेखन कु.सई चिन्मय सप्रे,
विघ्नहर्ता बंगला,
गावदेवी पथ,
बदलापूर पुर्व
पिन कोड-४२१ ५०३
०५/११/२०१९

प्रति,
आजी,
देवबाप्पाचं घर.

प्रिय आजीस,
साष्टांग नमस्कार
ए आजी असंच लिहितात ना गं.पण आजी साष्टांग म्हणजे काय गं?तू मला पत्रात लिहून कळव हं.अगं आजी,आमच्या बाईंनी आम्हाला आवडत्या व्यक्तीस एक पत्र लिहा असं सांगितलय दिवाळीच्या अभ्यासात.ती व्यक्ती खूप आवडती पण लांब रहाणारी हवी म्हणे.माझ्या डोळ्यासमोर पटकन तुच आलीस बघ.नाहीतरी वर्षातून एकदोनदाच भेटतोना आपण.तुला माहीत आहे का मी किती आठवण काढते तुझी.

आजोबा बरे आहेत ना गं? अगं आजी नेमकं सांगायचं राहूनच गेलं बघ.तू व आईने हॉस्पिटलमधून बाळ आणलं होतं नं ..ते आत्ता मोठं झालंय व रांगू लागलय.तुला म्हणून सांगते,हातात भेटेल ते चाटत बसतो..मी टिंग्या नाव ठेवलंय त्याचं.नुसता उच्छाद मांडलाय गुलामाने.

रात्रभर रडत रहातो आणि दिवसा मस्त लोळत पडतो.ना शाळा ना अभ्यास.मजा आहे बेट्याची.आईलापण रात्री जागरण होतं टिंग्यामुळे.मग नं ती दिवसभर चिडचिड करते नुसती.रात्री कुशीत पण नाही झोपायला घेत ती मला.मला म्हणते,”तू आत्ता मोठी झालीस.आत्ता तू तुझ्या रुममध्ये झोपत जा.”माझ्या रुममध्ये तसं आवडतं मला.पण नं तो शाळेतल्या बसमधला निशांत शिंदे रोज एक भुताची गोष्ट सांगतो.मग..मग मला भिती वाटते रात्रीची एकटीला.माझ्या स्वप्नात रात्री ती भुतं येतात..श्रावणी म्हणते की भूत वगैरे असं काही नसतं तरीपण माझं मन ऐकतच नाही.

आजी,मला आई हल्ली रात्री गोष्टीपण नाही सांगत.त्या टिंगोजीची कामं करत असते रात्री.टिंगोजी खूप छान सायकल चालवतो.आईने खिडकीला फुगे लावले आहेत.ते हवेने हलले की हा बोळकं उघडून हसतो व पायांनी सायकल चालवतो.

हल्लीना एक वस्तू खाली ठेवता येत नाही.टिंगोजी रांगत रांगत सगळीकडे फिरतो.हाताला भेटेल ती वस्तू चाटतो.अगं आजी,चप्पलपण चाटतो.तरी आई त्याला ओरडत नाही.
त्या दिवशी मी दिवाळीचा घरचा अभ्यास पूर्ण करत होते.दारावर कोणीतरी बेल वाजवली म्हणून दार उघडायला गेले एवढंच.टिंग्या तिथे आला रांगत रांगत व माझ्या वहीची पानं खाऊ लागला.याच्यामुळे खाली बसून अभ्यास करता येत नाही.

पुऱ्या घराचं टॉयलेट करुन ठेवलंय याने.शू झाली की सरळ सोडून देतो.आईला सांगण्याच्या भानगडीत पडत नाही.कालतर आई घाईघाईत किचनमधून हॉलमध्ये येत होती.या टिंग्याने वाटेत शू करुन ठेवलेली.कसली पडलेय आई!

दोन दिवस आधी ट़िंग्याने टिपॉयवरची स्कुटीची चावी आईच्या शूजमध्ये टाकलेली.बाबा बिचारे घरभर चावी शोधत होते.शेवटी बाबाला मिळाली ती.असा सगळा सावळा गोंधळ.

अगं आजी,मी सोसायटीच्या नाचाच्या स्पर्धेत भाग घेतलेला.आईबाबा माझा नाच बघायला आलेले.माझा नाच सुरु झाला..आणि टिंग्याने पसरलं भोकाड.बिचाऱ्या आईबाबांना तिथून काढता पाय घ्यावा लागला.

मला वाटतं तुच या टिंग्याला शिस्त लावू शकशील.आईचं तो काहीच ऐकत नाही.आई त्याच्याशी बोबडं का बोलते कळतच नाही.

आजी,आत्ता शाळा सुरु होईल गं.मला नं शाळा आवडते पण ते दप्तर.खूपच जड असतं ग.निबंधवही,ग्रुहपाठ वही,पुस्तकं,इतर वह्या..सगळं मिळून तीन चार किलोतरी भरतं.खांदे नुसते भरुन येतात.हल्ली नं शाळेत घरचा अभ्यासपण अती देतात.त्यामुळे शाळेतून आलं की सगळा वेळ घरचा अभ्यास करण्यात जातो.सकाळी ट्यूशन असतं.मग मी खेळणार तरी कधी?

आजी मी पुढच्यावर्षी चौथीत जाणार..मी काही मस्ती केली की आई म्हणते ,”तू मोठी झालीस आत्ता .शहाण्यासारखं वागायचं”.सायकल मागितली तर म्हणते,”तू अजून लहान आहेस.”म्हणजे यांच्या सोयीनुसार मला लहानमोठं ठरवतात.

आजी मला तू दिलेली ती गुलाबीफ्रॉकवाली निळ्या डोळ्यांची बाहुली माहितीय नं.तर काय झालं माहितीय,त्या टिंग्याफिंग्याने माझ्या बाहुलीचा फ्रॉक खराब केला.तिच्या डोळ्यात बोटं घालून घालून तिचा एक डोळा तिरपा केला.आम्ही माझ्या बाहुलीचं त्या बाजूच्या चिंगीच्या बाहुलीशी लग्न लावायचं ठरवलेलंना.म्हणजे तसं दोन महिने आधीच ठरलेलं पण ना आत्ता ती चिंगीटली नाही म्हणते गं.म्हणते अशी तिरळी सुनबाई मुळी नकोच मला.आत्ता माझी बाहुली लग्नाशिवाय रहाणार.पण मी दुसरा बाहुला शोधतेय तिच्यासाठी.एकदोन बघण्यात आहेत माझ्या.

ती वरच्या मजल्यावरची पाजूताई आहे ना तिने विवाह मंडळ स्थापलंय,बाहुलाबाहुलींसाठी.मी आपल्या बाहुलीचं नाव नोंदवलंय तिथे.पक्क झालं की कळवते तुला.तू तिच्यासाठी छान मोरपिसी लाँग फ्रॉक.. नको तो नको हिरव्या खणाचा परकर पोलका शिवून दे.

ती बाजूची आत्तू इमिटेशनचे दागिने बनवते नं.तिच्याकडून बाहुलीसाठी ठुशी,कोल्हापुरी साज आणि एक मोत्यांची नथ बनवून घे.पैसे घे आजोबांकडून.

आजोबांकडे भरपूर पैसे आहेत असं आई सांगत होती बाजूच्या काकूंना.मीपण एकदा आजोबांबरोबर गेलेले.तिथे एक मशीन होतं.आजोबांनी बटणं दाबली..एवढे पैसे बाहेर आले.तूपण जा गं कधीतरी आजोबांसोबत पैसे काढायला.माहिती असलेलं बरं असतं ना.

या बाबालापण मी सांगितलं तसं.”मला म्हणतो कसा तुमच्यासाठी पैसे जमा करुन ठेवतोय.”
मी म्हंटलं त्याला, “आजोबांसारखं मशीनजवळ जायचं नी बटणं दाबायची मग हवे तितके पैसे” तर खोखो हसायला लागला.त्यालायना काही कळतच नाही.नुसता मोबाईल घेऊन कायतरी खेळत असतो,वाचत असतो.ती आई असते टिंग्यासोबत.मग आजी माझ्यासोबत कोण गं??

तू लवकर येशील नं माझ्याशी गप्पा मारायला.बाबा म्हणतात आजी तुझी बाप्पाकडे गेली व आजोबा मोठ्या काकांकडे रहातात.ए आजी, पण मी बाप्पाला सांगितलंय तुला माझ्याकडे परत पाठव म्हणून.तो बाप्पायना तो लहान मुलांच सगळं ऐकतो असं म्हणतात.तो माझंपण ऐकेल व तुला पाठवेल परत.मला माहितीय माझी आजी येणार मला भेटायला.नक्की येशील ना गं आजी.मी वाट बघतेय गं तुझी.

तुझी लाडकी नात
सई
**गीता गजानन गरुड,आंब्रड,मोगरणेवाडी.

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा