आठवणीतला तू..

Written by

आठवणीतला तू..

कितीदा नव्याने तुला आठवावे..
डोळ्यातले पाणी कितीदा झरावे..

खर तर तुझ्या आठवणींचं आभाळ रोज भरून येतं. रोज झरत असतं कधी डोळ्यांतून तर कधी मनातून.. पण आज जरा जास्तच तुझी आठवण येतेय. डोळ्यातले भाव ओसंडुन जातील जणू.. आठवणींच्या सरी अविरत कोसळू लागतात काय करावं? सांगशील का? खर तर पावसाळा चारच महिने असतो ना रे पण तू मला जणू कायमचा आंदण देऊन गेलास.

मला आठवतो रे तुझा मी साजरी केलेला पहिला आणि शेवटचा वाढदिवस.. तेव्हा वाटलं नव्हत कधी की हा शेवटचा असेल. तुला आवडायचं नाही असं सेलिब्रेशन. म्हणायचा तू “काय ही पाश्चिमात्य संस्कृती.. मी असा खेडवळ मला नाही पटत”. पण मला आवडायचं तुझ्यासाठी नटायला. छान दिसायला. मी म्हणायचे तुझ्या पध्दतीने पण करू.. पण मला पण जगू दे तुझ्यात.. आईंना सांगायचे औक्षण करायला. त्याही खुष अन तूही.. घरी छानसा गोड पदार्थ.. तुझ्या आवडीचा मेनू.. मग काय स्वारी एकदम खुश!!!. आई म्हणायची नवऱ्याच्या सुखाचा मार्ग त्याच्या पोटातूनच जातो ग बाई..😊 पटायचं मला..

मग त्या नंतर मला माझ्या पद्धतीने सेलिब्रेशन हवं असायचं. केक कापायचा.. तुझ्या साठी सरप्राईज गिफ्ट..ते पाहून तुझ्या चेहऱ्यावरचा तो आनंद मला दिसायचा. तो आनंद पाहिला न की मन भरून यायचं. डोळ्यातून वाहू लागायचा तो. मला न तुझ्यासोबत बाहेर जायचं असायचं. गणपती बाप्पा च्या मंदिरात जायचं..देवाकडे तुझ्यासाठी उदंड आयुष्य मागायचं. गप्पा मारायच्या असायच्या. तू घेऊन दिलेला मोगऱ्याचा गजरा. त्या सुगंधानें मोहरुन जायचे मी.. आता गजरा माळण सोडलय मी.. तुझ्या स्पर्शाचा गंध नाही न आता त्या मोगऱ्याच्या फुलांना..😢

तू माझा मित्र झालास.. माझा सखा, दीपस्तंभ, खुप छान आपलं नातं.. मित्र म्हणून जगताना तुला आताशी कुठे ओळखू लागले होते. तुझं माझ्यावर किती प्रेम आहे रे? हा प्रश्न मी कधीच तुला विचारला नाही.का माहिती?? प्रेम थोडी न कधी मोजून मापून करायची गोष्ट आहे? ती तर मनापासून जोपासची. हळुवारपणे रुजत जाण्याची गोष्ट.. प्रेमालाही वेळ हवाच ना थोडसं रुजायला ..मनात फुलायला..

डोळ्यांत पाणी आणून मी तुला विचारायचे..नाही ना सोडून जाणार तू मला ?? कुठे गेलास की मला सोबत घेऊन जायचं तू!! मला नाही काही माहीत.. आईबाबांना काय सांगायचं ते. तू ठरव. मी कायम तुझ्याच सोबत.. हसून तू बोलायचा.. “अग येडू!! कुठे जाऊ तुला सोडून..सात जन्म मागून घेतलंस ना.. किती इमोशनल होतेस वेडा बाई!!😊 नाही जाणार कुठे तुला सोडून. कायम तुझ्या सोबत..
तू खोटं बोललास न.. गेलास न सोडून..

किती जगले तुझ्या सोबत शब्दात सांगता येणार नाही पण आयुष्य समृद्ध केलंस. वाटायचं माझीच दृष्ट लागेल की माझ्या सौख्याला. आणि बघ न खरच दृष्ट लागली रे माझ्या आनंदाला.😢

तूझ्या आठवणी की आठवणीतला तू.. नाही सांगता यायचं..
आता माहीत आहे मला
आता फक्त तुझ्या आठवणीत च जगायचं.. आणि आठवत राहायचं.. मनात साठवत राहायचं कुठेतरी वाचलेल्या ओळीं..

भेट तुझी रे ओढ मनाची
समजूत कैसी घालू मनाची
तुझी आठवण तुझी साठवण..

साथ तुझी रे आस मनाची
सजवू कशी रे भेट जीवाची
तुझी आठवण तुझी साठवण..

निशिगंध एक आठवण…
निशा थोरे..💐

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा