आठवणीतील दिवाळी…♥😊

Written by

मानवी जीवनात सणांना अनन्य साधारण महत्व आहे… सण आपल्याला रोजच्या धकाधकीच्या जीवनातुन थोडासा विरंगुळा , चार आनंदाचे क्षण , जगण्याची नवीन उमेद देऊन जातात…रणरणत्या उन्हात एक थंड हवेची झुळूक जशी मनाला शितल गारवा देऊन जाते , अगदी तसचं सण हे आपल्याला एक नवी उमेद देऊन जातात… थोडक्यात काय तर जीवन नावाच्या लढवय्या सोबत लढण्यासाठी रिचार्ज करून जातात…तर अशा ह्या सणांची तयारीही जय्यत व्हायला हवी ना? सणांची पूर्वतयारी म्हटलं की सुरुवात होते ती साफसफाई पासून नंतर खरेदी , घराची सजावट , पाहुण्यांना आमंत्रण…आणखी बरच काही…या सगळ्यात बच्चेकंपनीचा उत्साह तर अगदी ओसंडून वाहत असतो…😊
सणांचे आगमन म्हटले की साफसफाईला पर्याय नसतो…मग काय हातात टीव्हीचा रिमोट आणि मोबाइल असणारे पतिदेवही उतरतात मैदानात लढण्यासाठी झाडू , पोछा , खराटा घेऊन…अहो , लढायचं म्हटलं की हातात शस्त्र नकोत का ? 😉…चिल्लर पार्टी पण असतेच मध्ये मध्ये लुडबुड करायला… मग काय हसत खेळत , गप्पा गोष्टी करत , मस्त सफाई अभियान सुरू होत…
घराच्या कोनाकोपऱ्याची सफाई करता करता घराचे कोपरे सुध्दा जुन्या आठवणींना उजाळा देण्याचं काम बजावत असतात…अहो , परवा सफाई करताना कपाटाच्या कोपऱ्यात दोन महिन्यापूर्वी हरवलेले माझे कानातले सापडले…कधी माझ्या मुलांची आवडती खेळणी…तर कधी पतिदेवांच्या शर्टाच एखाद बटण…
आज मला माझा माझ्या आजीसोबतचा जूना फोटो सापडला…जो माझ्या मुलांनी खेळता खेळता बॉक्स खाली सरकवून दिलेला…आणि न कळत मन भूतकाळात गेलं…
दिवाळीची सुट्टी लागली की मी दिवाळीसाठी मामाच्या गावी जाण्यासाठी खुप उत्साहित असायचे… गावी माझ्या आजी आजोबांचा मोठा चौसोपी वाडा होता…समोर मोठं आंगण…दोन-दोन फुट रुंद वाड्याच्या भिंतीत बनवलेल्या दिवळ्या…वाड्याची लाकडी कोरीव काम केलेली मोठी कीवाडं…बाहेरच्या पडवीत बांधलेला लाकडी सुंदर झोपाळा…मधल्या छोट्या अंगणात तुलसी वृंदावन…
दिवाळीच्या दिवशी पहाटे लवकर उठून शेणाने सारवलेल्या अंगणात सुंदर रांगोळी काढण्याची मजा काही औरच…नंतर आजीने तेल आणि उटण्याने केलेली मालिश, उटण्याचा मन मोहणारा वास…वाह वाह !!! त्याला काही तोडच नाही…आजीने केलेलं औक्षण…आमच्या गावी मोठ
एकत्र कुटुंब असल्यामुळे सगळ्या मुलांना एकाच ताग्यातील , एकाच कपड्यातील कपडे शिवुन घायचे…त्यामुळे सगळे एक सारखेच दिसायचे…तुला एक मला एक करत नंतर व्हायची ती फटाक्यांची वाटणी …या सगळ्यात एक वेगळाच आनंद होता…सगळ्यात आधी कोणाचा फटका फुटतोय यावर ही आमची पैज लागायची…फटाक्यांची आतिषबाजी झाली की मग कडकडून भुक लागलेली असायची आणि फराळावर मारलेला मनसोक्त ताव…अहाहा !!! सुख-सुख म्हणजे आणखी काय असतं हो…मग सुरू व्हायची आजीच्या हुकुमावरन शेजाऱ्यांना फराळाला बोलावण्याची गडबडघाई…सगळं कसं एखाद्या सुंदर स्वप्नासारखं होत…आता सगळंच हरवलंय राहिल्या त्या फक्त आठवणी…आता चौसोपी वाड्याच्या जागी उभारलंय एक शॉपिंग कॉम्प्लेक्स…नात्यातला गोडवा ही हरवत चाललायं…😔
पतिदेवांच्या प्रेमळ हाकेने मी भानावर आले , बघते तर काय स्वारी हातात चहाचे कप घेऊन उभी…त्यांनी नजरेंनीच विचारलं काय झालं ? मी फक्त नकारार्थी मान हलवली…त्यांना काय माहीत की मी एका सुदंर जगाची सफर करून आले…😘 जुनी लोक पैशांनी गरीब जरूर होते पण मनाने खूप श्रीमंत होते…
आजची पिढी अधुनिकतेच्या नावाखाली किती मोठ्या सुखापासून वंचित आहे याची त्यांना कल्पना नाही…
चला खूप झाल्या गप्पा…खोचा पदर आणि लागा कामाला…अजून खुप तयारी बाकी आहे…😄

#माझेलेखन

सुनीता पाटील…

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा