..आणि तिढा सुटला

Written by

“किती वेळा सांगितलं, डब्यांना हात लावत जाऊ नको म्हणून, ईतके चकाचक केलेले डबे, हात लावून नुसते डाग उमटवतात… निदान घराला झाडू तरी मारत जावं, फक्त भाज्या केल्या म्हणजे झालं का?? सगळ्या वस्तू घरात पसरवून ठेवल्यात, मी आहे आवरायला दिवसभर…”

श्रीकांत ची आई पुटपुटत होती…

तिकडे संध्या श्रीकांत वर राग काढत होती, “निदान निघायच्या वेळी तरी कटकट घालू नये माणसाने, ऑफिस ला जाते, काही गुन्हा नाही करत मी…जमेल तेवढं करते मी घरातलं, आता तुमच्या आंघोळी 11 वाजेपर्यंत चालतात, मग मशीन लावतो…म्हणजे मी काय कपडे वाळत घालण्यासाठी ऑफिस ला दांडी मारायची का??”

“माझ्या जागेवर असती तर समजलं असतं तिला” हा श्रीकांत च्या आईचा….आणि “त्या माझ्या जागेवर असत्या तर जाणीव झाली असती त्यांना” हा श्रीकांतच्या बायकोचा अगदी ठरलेला डायलॉग.

दोघींचेही आमच्या घरी येणं जाणं असायचं…पण येतांना दोघीही वेगळ्या येत पण हमखास एकमेकांची तक्रार करायला काही चुकायच्या नाहीत…सुरवातीला मी आणि माझ्या सासूबाईंनी गंभीरपणे ऐकलं, पण नंतर आम्हालाही कंटाळा यायला लागला तेच तेच ऐकून.

श्रीकांत च्या लग्नाला 1 वर्ष झालं होतं, बायको शिकलेली, कमावणारी…आईही सुशिक्षित, पण घरच्यांनी काही त्यांना नोकरी करू दिली नाही, नाहीतर त्यांना सहजपणे त्या काळी शाळेत शिक्षिकेची नोकरी मिळणार होती.

नोकरी नाही म्हणून श्रीकांत च्या आईने घरकामात आपलं आयुष्य घालवलं.. सून आल्यावर आता तिनेच सर्व संभाळावं ही अपेक्षा…पण आलेली सून नोकरी करत असल्याने घरकामात कमी लक्ष देई..

दोघींच्या कुरबुरी सुरू झालेल्या, “संध्या ला समजायला पाहिजे घरात किती कामं असतात ते, मग समजलं असतं” असं श्रीकांतच्या आईचे मत आणि “ऑफिस मध्ये किती काम आणि किती प्रेशर असतं हे सासूबाईंना समजायला पाहिजे” हे संध्या चं मत…दोघीही श्रीकांत ला भंडावून सोडत…वाद नको म्हणून एकमेकींना टाळत असत…

श्रीकांत आता कंटाळला होता हे रोजरोजचं ऐकून…

श्रीकांत चे वडील रिटायर झाले होते… अगदी बिनधास्त आणि हसऱ्या चेहऱ्याने वावरणारे त्याचे वडील, श्रीकांत चं मन त्यांनी ओळखलं…. त्यांनी यावर तोडगा काढायचा ठरवला…

“श्रीकांत, बेटा आई आणि बायको मध्ये सँडविच होणं कोणालाही चुकलेलं नाही…बाईला जसं प्रसवपीडा दिल्या गेल्या तश्याच पुरुषाच्या जातीला हे भोग दिले, निसर्गाने काहीही भेद केलेला नाही…हा हा हा….”

“बाबा तुम्हाला हसू येतंय? इथे मी काय करु मला सुचत नाहीये आणि तुम्ही?? जाऊद्या तुमचं सर्व झालंय आता, तुम्ही फक्त ऐश करा…मी बसतो निस्तरत सर्व…”

“श्रीकांत, तसं पाहिलं तर दोघी आपापल्या जागेवर बरोबर आहेत, पण समोरच्याला पडणारे कष्ट एकमेकींना दिसत नाहीत हाच प्रॉब्लेम आहे..”

“मग आता काय करू शकतो बाबा आपण??”

“श्रीकांत, मला एक आयडिया सुचली आहे, बघ तुला पटते का??”

“कसली आयडिया??”

“हे बघ, दोघींचे रोल आता आपण बदलू, म्हणजे तुझ्या आईला नोकरीला पाठवू आणि संध्या ला घरकाम सांगू…”

“त्याने काय होईल??”

“त्याने होईल असं की दोघींना कळेल की ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या जागेवर काम करताना काय कष्ट पडतात ते…आईला कळत नाही की नोकरी करणे म्हणजे मजा मारणे नाही, आणि संध्या ला हे कळत नाही की घरकाम म्हणजे नुसती 4-5 कामं नाहीत…”

“सॉलीड हा बाबा, पण आता आईला नोकरी कशी मिळणार आणि संध्या ला जॉब सोडायला कसा लावणार??”

श्रीकांत चे वडील त्याला सासू सुनांची कटकट मिटवण्यासाठी एक आयडिया सुचवतात.

ज्यामध्ये दोघींच्या कामाची अदलाबदल करायची होती.

जेवणं झाली, रात्री सर्वजण आपापल्या खोलीत गेले,

श्रीकांत चे बाबा त्याचा आईला म्हणाले,

“खरंच सुनबाई हुशार आहे हो, शिक्षण झालंय आणि वर चांगली नोकरीही आहे…”

“त्यात काय एवढं?? माझंही शिक्षण झालंय, पण तुमच्या घरच्यांनी करू दिली का कधी नोकरी?? नोकरी करू दिली असती तर खूप पुढे गेले असते बर का….अगदी या संध्या चाही पुढे…”

“छे… काहीही…मला नाही वाटत…सुनबाई तुझ्याहून जास्त हुशार आहे…”

आता मात्र आईचा संताप झाला,

“काय आपलं सुनबाई सुनबाई लावलंय हो?? थांबा आता मी दाखवुनच देते तुम्हाला…”

श्रीकांत च्या बाबांना हेच हवं होतं, तोंड कसंबसं लपवून त्यांनी हसण्याला वाट करून दिली…

“चलो, अपना मिशन तो पुरा हुआ.. देखते है श्रीकांत मिया का नाटक काम करता है या नहि…” बाबा स्वतःशीच पुटपुटत झोपी गेले…

तिकडे श्रीकांत ने काड्या लावायला सुरवात केली..

“संध्या, तू नको करत जाऊस भाजी…आईच्या हाताला काय चव आहे…तुला नाही जमणार…अगं आईसारखं घर कोणी कधी संभाळूच शकत नाही…”

“काय झालं हो तुम्हाला अचानक?? आणि म्हणायचंय काय तुम्हाला?? मी घर सांभाळू शकत नाही?? नोकरी करते म्हणून वेळ नाही मिळत…नाहीतर घराची अशी ठेप ठेवली असती ना…घरात काय, फक्त स्वयंपाक, भांडी आणि झाडू…एका तासाचं काम फक्त…पण आई त्यालाच 5-5 तास लावतात…मी असती ना अशी घरी, शप्पथ सांगते असली पंचपक्वान्न करून रोज खाऊ घातली असती ना…”

“छे बुवा, मला नाही पटत, अगं तू काय तेवढी कामातच फक्त हुशार, घरातल्या कामात अगदी ढं आहेस…”

आता मात्र संध्या संतापली, काहीही न बोलता दात विचकत झोपी गेली…

“वडील बाबा की जय हो, आपका नूस्का काम कर गया बाबूजी…” श्रीकांत पुटपुटला….

श्रीकांत आणि त्याचा वडिलांनी बरोबर योग्य त्या ठिकाणी ठिणग्या टाकल्या होत्या…

दुसऱ्या दिवशी संध्या ऑफिस साठी तयार झालेली नव्हती, श्रीकांत ने विचारले, काय ग आज सुट्टी का ऑफिस ला?

“नाही, मी राजीनामा मेल केलाय, आता मी घरीच असणार आहे…”

“बरं झालं, मी नुकतीच नोकरी शोधली, माझा भाऊ इथल्या शाळेचा मुख्याध्यापक आहे, त्याचा शाळेत लावणार आहे तो मला नोकरीला…” श्रीकांत ची आई म्हणाली…

“काय??”

बाबा आणि श्रीकांत एकसुरात ओरडले..दोघांचा निशाणा योग्य जागेवर लागला होता….बाबांचा जोश आवरता घेण्यासाठी श्रीकांत ने हळूच बाबांना मागून चिमटा काढला आणि excitement ला आवर घालायचं खुणावलं…

संध्या ला आश्चर्य वाटलं…सासूबाई अचानक नोकरी करायचं म्हणताय??

आणि “संध्या ने अचानक नोकरी का सोडली??”

दोघीही विचारात पडल्या, योगायोग समजून दोघींनी जास्त विचार केला नाही, उलट त्यांना आनंद झाला…स्वतःला सिद्ध करण्याची संधी दोघींना मिळणार होती..

दुसरा दिवस उजाडला…

संध्या नेहमीपेक्षा लवकर उठली, झाडझुड, रांगोळी, नाष्टा, साफसफाई तिची करून झाली होती…सासूबाई उठल्या आणि त्यांनी स्वतःचं आवरलं, संध्या ने त्यांना डबा दिला, आणि नवीन कामासाठी शुभेच्छा दिल्या..

एकमेकींना निरोप देतांना “आता बघू कशी फजिती होते हिची”

अश्या आविर्भावात दोघीही कामाला लागल्या..

सासूबाई गेल्या तश्या संध्याने घरातली कामं करायला घेतली, मस्त छान छान स्वयंपाक, साफसफाई, घरातली सजावट, भांडी, कपडे अगदी वेळेवर आवरले…दुपारी कामं आवरून झाली आणि मस्त झोप काढली…”किती निवांत असतं ना घरात असलं म्हणजे?? कसलंही टेन्शन नाही..सासूबाईंना विनाकारण कंटाळा यायचा….”

तिकडे सासूबाई शाळेत शिकवायला लागल्या, नवीन टीचर म्हणून मुलांनी छान रिस्पॉन्स दिला, सासूबाईंना हुरूप आला…नोकरी करणं म्हणजे किती निवांतपणा असतो, कसलंही टेंशन नाही, संध्या उगाच टेंशन असल्याचा आव आणायची…

सगळं कसं अगदी मजेत सुरू होतं…

असेच काही दिवस आनंदात गेले..

संध्या घरकामात रुळली होती,

एक दिवस झाडझुड करताना अचानक एक उंदीर समोरून पळाला… ती दचकली, इतक्या वर्षात एकही उंदिर दिसला नव्हता..मग आज कसा? तिने पाहिलं, दरवाज्यामागे पोत्यात जे धान्य ठेवलं होतं ते सडलं होतं.. त्याला बुरशी लागलेली…

अरेच्या, सासूबाई दर 6 महिन्यांनी धान्य साफ करायच्या, उन्हात वळवायच्या…ते यामुळे होतं तर…

तिने अंगणात पाहिलं, पालापाचोळा, आणि इतकी घाण झालेली…तिने सर्व साफ करायला घेतलं… हे रोज करावं लागतं हे तिच्या लक्षात आलं…कामं अजून वाढली…

सासूबाईंच्या शाळेत त्यांचा वरचा लोड वाढला होता…मुलांचे पेपर तपासणे, त्यांच्या गृहपाठच्या वह्या तपासणे, हजेरीचा रिपोर्ट बनवणे… त्यांना घरी यायला उशीर होऊ लागला…

दुसऱ्या दिवशी पाडवा होता, घरात पुरणपोळी सकट सगळा स्वयंपाक करायचा होता, सासूबाईंना सुट्टी असेल म्हणून संध्या निवांत होती…

तिकडे सासूबाईंनी शाळेतली कामं घरात आणली, त्यांचं टेंशन वाढलं होतं, कामाचा व्याप वाढला होता…रात्री उशिरा पर्यंत त्यांनी काम केलं, सकाळी उठायला उशीर झाला…

उठल्यावर बघते तर काय, संध्या गपगुमान कामं करत होती, तिची चिडचिड होत होती…

सासूबाईंना लक्षात आलं, संध्या सुद्धा कामं घरी आणायची, कधी उठायला तिला उशीर व्हायचा…मी मात्र आळशी असा शिक्का तिच्यावर मारून मोकळी व्हायची…पण खरंच ही कामं सुद्धा महत्वाची असतात, संध्या सुद्धा अशीच मनापासून कामं करायची,पण इतकं करूनही घरात जमेल तेवढं करायची…

सासूबाईंनी पदर खोचून संध्या ला मदत केली, संध्या ला हायसं वाटलं…

एके दिवशी दुपारी सर्व आवरून संध्या वामकुक्षी घ्यायला आपल्या खोलीत जायला लागली इतक्यात गावाहून 4 पाहुणे हजर झाले, जेवायलाच आलोय असं त्यांनी सांगितलं तेव्हा संध्या ने परत घाईत सर्वांचा स्वयंपाक केला..पाहुण्यांसोबत आलेल्या लहान मुलांनी घरभर पसारा केला…सर्व आटोपलं तरी पाहुणे काही जायचं नाव घेईना…आम्ही अजून 2 दिवस मुक्काम करतो असं त्यांनी स्वतःहूनच डिक्लेर केलं…संध्या ला खुप कामं पुरली, सासूबाई घरी आल्यावर त्यांचा कामात मग्न, थोडीफार मदत करायच्या…मग संध्या लाच सगळं बघावं लागे, सासूबाईंनी थोडीफार तरी मदत करावी असं संध्या ला वाटायचं…तिच्या हेही लक्षात आलं की मी नोकरीला गेल्यावर घरात पाहुणे चालूच असायचे, सासूबाई घर आवरून त्यांचंही पहायच्या..

सकाळी मात्र सासूबाई स्वतः उठून स्वतःचा डबा बनवायच्या…फक्त पहिल्या दिवशी काय तो संध्या ने त्यांना डबा दिलेला…पण संध्या जेव्हा नोकरी करायची तेव्हा तीही स्वतःच डबा बनवायची…म्हणून सासूबाईही तेच करत..

सकाळी उठून सासूबाई कामं करत, कामं इतकी होती की संपायचं नाव घेईना… त्यात इतका वेळ गेला की त्यांना डबा बनवायला वेळच मिळाला नाही, त्या तश्याच निघाल्या…सासूबाई डबा नेत नाहीये हे पाहून संध्या ने त्यांचा पिशवीत डबा भरून ठेवून दिला…सासूबाईना हायसं वाटलं…संध्या ला मीसुद्धा असा आयता डबा दिला असता तर तिलाही किती बरं वाटलं असतं??

शाळेतल्या कामाच्या टेंशन मुळे सासूबाई आता चिडचिडया झाल्या होत्या…

संध्यालाही अशीच कामं असतील ना? तिलाही टेंशन होतं ना?? पण तिने कधी चिडचिड नाही केली…सासूबाई जरा नरमल्या…

आता सासूबाईंच्या हातात पगार आला. कष्टाची पहिली कमाई होती, पहिल्यांदा स्वतःच्या हक्काचे पैसे हातात आले होते… एरवी नवऱ्याकडून, मुलांकडून मागता मागता त्या पूर्ण परावलंबी बनल्या होत्या…आज त्यांचा स्वाभिमान जागृत झाला…एक वेगळंच समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं…

प्रत्येक स्त्री ने असं स्वावलंबी असायला हवं असं त्यांना वाटू लागलं..मग संध्याही तेच तर करत होती? मग का आपण बोलायचो तिला?? प्रत्येक स्त्री म्हणजे त्यात संध्याही आलीच की…ती कोण वेगळी होती??

इकडे संध्या ला घरातल्या बारीकसारीक कामांची कल्पना येऊ लागली..फ्रीज साफ करणे, ट्रॉलीज साफ करणे, भाजीपाला आणणे, किराणा भरणे, नातेवाईकांचं येणं जाणं, घरातले कार्यक्रम, घरातल्या प्रत्येकाचं पथ्यपाणी…आपण नोकरीवर जायचो खरं पण घराला मात्र सासुमुळे घरपण आलेलं…

घरात इतकी सगळी कामं असतात हे संध्या चा लक्षात आलं, यासाठीच सासूबाईंची चिडचिड होत असेल याची तिला जाणीव झाली…

सासूबाईंना पगार मिळाला तसं त्यांनी खर्च करायला सुरुवात केली…स्वतःला आणि संध्याला साड्या घेतल्या, काही शॉपिंग केली…

सासरे म्हणाले, “मॅडम कमवायला लागल्यात…आता तेवढं लाईट बिल आणि दुधवाल्याचे बिल देऊन टाका बरं…”

“अहो मी तर निम्मे पैसे खर्च केलेत, कुठून देऊ”

“अहो मॅडम, ही सगळी बिलं आणि घरातलं खर्च संध्या करायची…विसरल्या का??”

सासूबाई भानावर आल्या…संध्या इतकं कमावून सुद्धा घरासाठीच खर्च करायची…तिला स्वतःला किती कमी पैसे ठेवत असेल ती??

आता त्या दोघींना उपरती झाली…एकमेकांकडे त्यांनी मन मोकळं केलं…

नोकरी करणं म्हणजे सोपं काम नाही, आणि स्वावलंबी बनून स्वतःचा आत्मसन्मान जपणं किती महत्वाचं आहे…आणि घरातली कामं म्हणजे कधीही न संपणारं असं काम असतं… बाहेरून सोपं वाटत असलं तरी बारीकसारीक भरपूर कामं असतात…हे दोघींनाही समजलं…

एक निर्णय घेतला आणि सर्वांना बोलवून डिक्लेर केला…

“आता आम्ही दोघींनीही जॉब करायचं ठरवलंय, घरातली कामं आणि खर्च आता वाटून घ्यायचा…श्रीकांत आणि त्यांचा वडिलांनी सकाळच्या चहा च आणि साफसफाई ची कामं करूनच बाहेर जायचं, स्वयंपाकाचं मी आणि संध्या मिळून बघू..श्रीकांत आणि यांनी आता घरातही मदत करायची.. .”

तिढा सुटला होता..आता एकमेकींबद्दल गाऱ्हाणी बंद झाली होती…श्रीकांत आणि वडिलांचा प्लॅन यशस्वी झाला होता…दोघांनीही बाहेर जाऊन पार्टी केली…

पण साफसफाई आणि सकाळच्या चहा चं प्रकरण श्रीकांत आणि वडिलांच्या चांगलंच अंगाशी आलं ???

 

Article Categories:
विनोदी

Comments

प्रतिक्रिया व्यक्त करा