आणि तिने निर्णय घेतला…

Written by

एका सधन कुटुंबात वाढलेल्या सुजाता ची ही कहाणी. 

लहानपणापासून तिच्या हुषारीच्या चर्चा वर्तमान पत्रातून छापून येत. कुठलेही क्षेत्र असो, कायम अग्रेसर. अशा मुलीचे जेव्हा लग्न झाले तेव्हा काय परिस्थिती तिच्या वाट्याला आली ते पहा. 

त्यांचा बरोबरीच्या कुटुंबात तिचं लग्न झालं, फरक एवढाच की सासू अशिक्षित आणि सासरे जेमतेम शिकलेले होते.

तिने कुटुंबाला वाहून दिलं, आपलं शिक्षण, हुशारी बाजूला ठेवत घरात सगळ्यांची सेवा करण्याचं व्रत उचललं, तिने विचार केला की आजपर्यंत सगळं तर मिळवलं स्वतःसाठी, आता कुटुंबाची सेवा करण्यात आनंदाने जीवन व्यतीत करावं. 

अशा घरात तिच्या गुणांचं कौतुक तर सोडाच पण दखलही घेतली जात नव्हती. तिचा नवरा मात्र बायकोचं कौतुक करण्यात थकत नसे, आपल्या बायकोचा जाम अभिमान होता त्याला. तिने काहीतरी काम करावं असं घरात तिने सांगितलं तर तीच साधं बोलणंही ऐकून घेतलं जातं नसे, उलट तिच्या कुठल्याही गोष्टीमागे काहीतरी वाईट हेतू आहे असा समज घरात केला जाई.

तिच्या सासरची मानसिकता का कोण जाणे, पण अशी होती की घरात मुलाची बायको आली की ती घर तोडते, मुलाला वेगळं काढते…या गोष्टी त्या घरात मुलं 16 वर्षाची झाली तेव्हापासून त्यांना हॅमर करण्यात आल्या. त्यामुळे असं होणारच या दृष्टीने सुजाता कडे सगळे पाहत असत. मुलं सुद्धा आपल्या बायकोकडे याच नजरेने बघत आणि जरा काही झालं की त्यामागे बायकोचा किती वाईट हेतू आहे हे सांगून भांडण करत असत. 

तिच्या जवळपास 15-20 ट्रॉफी तिने सोबत आणलेल्या, दिवाणखान्यात एक जागा शोधून तिने लावून ठेवल्या, घरात आलेले पाहुणे कौतुकाने विचारत, प्रशंसा करत पण सासूच्या तोंडून एक अक्षर निघत नसे. 

सुजाता ने आपल्या आई वडीलांसाठी कधी काही केलं नसेल इतकं आपल्या सासू सासऱ्यांसाठी केलं, पण तरीही त्यांचा दृष्टिकोन बदलला नाही. 

तिच्या सासूने कामावरून काहीतरी कुरापत काढून मुलाला सुजाता विरूद्ध भडकवलं, त्याने तिला मारहाण केली, शिवीगाळ केली…सुजाता माहेरी निघून गेली. तिच्या आई वडिलांनी तिची समजूत घालून पुन्हा सासरी आणून सोडले, तिची इच्छा नसतांना..आल्यावर पाहिलं तर तिच्या ट्रॉफी गायब केलेल्या…वाद नको म्हणून तिने विचारलेही नाही…. सुरवातीचे काही दिवस चांगले गेले, पण पुन्हा तेच…हे चक्र 4 वर्ष असंच चालू राहिलं. 

यावेळी मात्र सासू ने अत्यंत वाईट आरोप केले, 

“तुझ्यामुळे माझा संसार उध्वस्त झाला, मी नवीन साड्या घेते त्याचं दुख लागतं तुला, माझ्या मुलाला माझ्यापासून दूर केलंस, घर तोडलस, हे माझं घर आहे, तू कोण आली” 

इतक्यावर थांबली नाही, तर सुजाता च्या नवऱ्याला काहीतरी भलतच सांगून कान भरले, आणि तो सुजाता ला मारायला तिच्या अंगावर धावला.

आता सुजाता ची सहनशक्ती संपली.

आणि तिने निर्णय घेतला,

ना आई वडिलांकडे, ना नवऱ्याकडे राहणार,

स्वतःचा नवीन फ्लॅट घेऊन एकटी राहणार.

तिने जसा हा निर्णय घेतला तसे एकेकाचे धाबे दणाणले,

पण ती तिच्या निर्णयावर ठाम होती.

“आजवर घरासाठी खूप केलं, पण त्याची जाणीव कोणाला नसेल आणि हे घर माझं नाही ही जाणीव मला सतत करून देण्यात येत असेल तर मी इथे राहणार नाही, आजपर्यंत मला टोमणे, वाकड्यात बोलणे यावरून खूप मानसिक त्रास दिला गेलाय पण एकही शब्दाने मी उलट उत्तर दिले नाही, समाजाचा, माझ्या आई वडिलांचा विचार करून मी शांत राहिले, माझ्या आई वाडीलांकडेही मी राहणार नाही, मी स्वतःच्या हक्काच्या जागेत स्वाभिमानाने राहीन”

आणि तिने कसलाही विचार न करता घर सोडले, 

स्वतःचे दागिने विकून भाड्याने एक फ्लॅट घेतला, स्वतःचा व्यवसाय सुरू केला. तिला इतकं यश मिळालं की काही वर्षात तिने स्वतःची जागा घेऊन एक बांगला बांधला आणि अनाथ मुलांना दत्तक घेऊन त्यांचं संगोपन केलं. घर भरल्या गोकुळासारखं बनलं. 

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत