..आणि शेवटी तिने तोडला सोन्याचा पिंजरा..(भाग 2)

Written by

मागच्या भागात तुम्ही पाहिलं की अंजली च लग्न एका राजकारण्याच्या घरात झालं.. तिच्या सासरी इतकी सुबत्ता होती की अगदी स्वयंपाकपासून ते कपड्यांच्या घड्या घालायला नोकर मंडळी होती, अंजली ने सुरवातीचे दिवस छान घालवले…दिवसभर गाणे ऐकणं, tv बघणं, आवडीचे पदार्थ नोकरांना सांगून बनवून घेणं…

इकडे तिचा नवरा निवडणुकीसाठी उभा राहिला होता, त्यामुळे त्या कामामुळे त्यांचा जास्त संवाद होत नसे.. घरात पाहुणे मंडळी येत, पण स्त्रियांना समोर जायची परवानगी नव्हती, त्यांचे खाणे पिणे सगळे नोकर मंडळी बघून घेत… अंजली आता कंटाळली, तिला जुने दिवस आठवले, रोज नोकरी साठी कशी धावपळ व्हायची, आई कसा छान डबा भरून द्यायची…नोकरीवर मित्र मैत्रिणीसोबत किती छान गप्पा व्हायच्या, बॉस कसा कौतुक करायचा…तिला वाटायला लागलं की लग्न करून आले तरी इथे काहीच काम नाहीये, घरात कुठेही माझ्यावाचून अडून राहत नाहीये आणि अशीही मी तासनतास कंटाळून जातेय घरात बसून, नोकरी परत सुरू केली तर?

साध्या सरळ मनाची अंजली, आपला नवरा आपल्याला नाही थोडीच म्हणेल, सासू सासरे पण ऐकतील आणि त्यांनाही अभिमान वाटेल.. तिचा नवरा घरी आला, तिने त्याला सांगितले तसा तो कडाडला..

“खबरदार जर पुन्हा असलं काही विचारायची हिम्मत केली तर, आपल्या घरात स्त्री ने गप गुमान खोलीत बसायचं, काही कमी आहे का तुला? कपडे लत्ते, खाणं, पिणं.. पैसे हवेत का तुला? किती हवे बोल…” अंजली ने नवऱ्याचे हे रूप पहिल्यांदा पाहिले, तिला हे अपेक्षितच नव्हतं, स्त्री बद्दल इतका खालचा विचार?? मग तिने सासू सासऱ्यांना ही गोष्ट सांगितली, तिला वाटलं ते तरी समजून घेतील, कारण नोकर चाकरांमुळे घरात लक्ष देण्याची अंजली ला गरज पडतच नसे, त्यामुळे अंजली घरात असली काय अथवा बाहेर असली काय, काहीही फरक पडणार नव्हता… सासू सासऱ्यांनी तर अजूनच विरोध केला

“हे असलं आपल्या घरात चालत नाही, या घरात काही चालीरीती आहेत, त्या आता तुला पाळायला हव्यात, हे तुझ्या आई वडिलांच घर नाही” आपल्याला फक्त एक शोभेची बाहुली म्हणून आणि यांचा राजकीय हेतू साध्य करण्यासाठी यांनी इथे आणलय, हे अंजली ला कळून चुकलं… काही महिने गेले,  अंजली आता अस्वस्थ होऊ लागली, 

तिची हुशारी, तिची कला, तिचं कौशल्य तिला स्वस्थ बसू देत नव्हतं…

“काय करावं, बाहेर कोणी जाऊ देत नाही,

घरात बसून काही उद्योग करू देत नाही,

एक चांगली गृहिणी बनावं तर काही काम शिल्लकच राहत नाही, किती दिवस राहणार या सोन्याच्या पिंजऱ्यात?” इतक्यात तिला बाहेरून काही गप्पा कानी पडल्या.. “जिंकणं एवढं सोपं नाही, लोकांना आपलं महत्व समजायला हवं, आणि त्यासाठीं जोरदार भाषणच हवे, शब्दांचा मार हृदयात बसला की हात आपोआप आपल्या पक्षाच्या चिन्हाकडे वळतील…” हे सगळं राजकारणा बद्दल बोलणं होतं पण अंजली च्या मनावर बिंबलं… समोर पर्याय होते, बंड पुकारायचे, किंवा आहे त्या परिस्थितीतून मार्ग काढायचा… बंड पुकारून हाती अव्हेलनाच आली असती, मग आहे त्या परिस्थितीत मार्ग काढायचा.

पण नक्की काय करायचं? “शब्दांचा मार हृदयात बसतो” हे वाक्य तिला आठवलं.. “शब्द…वाक्य…भाषण…लिखाण…अय्या हो की, लिखाण…मी लिहू शकते, शाळा कॉलेजात दिलेली भाषणं तिला आठवली, निबंध स्पर्धेत अवल येणाऱ्या अंजलीला मार्ग मिळाला..” एक विषय सुचला, आणि त्यावर एक कादंबरी लिहू शकेल इतकं तिला सुचायला लागलं. तिला खोलीत एक डायरी सापडली, कोरी.. तिने लिहायला सुरुवात केली.. दिवसभर तासनतास विचार करून ती लिहीत असे.. तिच्या नवऱ्याला अंजलीत काहीतरी बदल जाणवू लागला.. अंजली हुशार आहे, काहीतरी धडपड करेल याची भीती त्याला होतीच.. एकदा ती डायरी त्याचा हाती लागली, त्याने वाचली आणि त्याला समजलं की अंजली काहीतरी लिहितेय.. तो संतापला,  “तुला सांगितलं ना की या घरात असले काहीही उद्योग करायचे नाही म्हणून?” त्याने ती डायरी घेतली आणि खोलीतल्या सगळ्या डायऱ्या, वह्या आणि सगळी कोरी कागद जाळून टाकली.. अंजली ला विश्वास बसत नव्हता आपल्या फुटक्या नशिबावर.. आता बंद खोलीत तिच्याकडे लिहिण्याचं काही साधनही राहिलं नव्हतं पण तरीही ती हार मानणारी नव्हती, काहीतरी मार्ग निघेल.. खोलीत लिहिण्यासाठी काही मिळतंय का, सर्व शोधलं, पण तिच्या नवऱ्याने मुद्दामहून एकही कागद ठेवला नव्हता… इतक्यात तिची नजर भिंतीवरच्या जुन्या चित्रांच्या कॅलेंडर कडे गेली..

(अंजली पुढे काय करते, वाचा पुढील भागात)

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा