..आणि शेवटी तिने तोडला सोन्याचा पिंजरा..(भाग 3)

Written by

मागच्या भागात तुम्ही पाहिलं की अत्यंत हुशार आणि धडाडीच्या अंजली च लग्न  राजकारणी घरात झालं आणि तिथे तिला खूप बंधनं आली, सासरची मंडळी तिला काहीही करू देण्यास तयार नव्हते, पण अंजली ने धीर सोडला नाही… नवरा आणि सासू सासरे तिला बोलल्यानंतर कोणाकडे मदत मागण्याची आशा तिने सोडून दिली… भिंतीवर असलेल्या चित्रांच्या कॅलेंडर कडे तिचं लक्ष गेलं…

हळूच तिने खुर्चीवर चढून ते खाली काढलं, त्या कॅलेंडर ची मागची पानं कोरी होती, तिला लिहायला कागद मिळाला…तिच्या पर्स मध्ये तिने पेन लपवला होता, तो तिने काढला आणि लिहायला सुरुवात केली.. कादंबरी चा विषय होता “सोन्याचा पिंजरा”…तिला खूप काही सुचत गेले आणि ती लिहीत गेली…त्यात तिने समाजपरिवर्तनाचे काही मुद्देही मांडले होते, कथेसोबतच समाजाला योग्य दिशा कशी दिली जाऊ शकते, कुशल नेतृत्व कसे हवे, सर्वांची प्रगती कशी साधली जाऊ शकते याही मुद्द्यांना कथेच्या रुपात हात घातला होता… नवरा गेला की तिचं लिखाण सुरू असायचं, आणि तो यायच्या आत ती कॅलेंडर पुन्हा भिंतीवर लावून द्यायची, कॅलेंडर चा चित्राचा भाग पुढे दिसायचा आणि लिहिलेलं भिंतीच्या दिशेला असल्याने नवऱ्याला कसलीही शंका आली नाही… या काळात तिचा नवरा निवडणुकीत हरतो… त्यामुळे त्याला घरी थांबणं नको वाटायचं, कायम मित्रांसोबत बाहेरच तो राहू लागला…अंजली ला याचे दुःख वाटून न घेता तिने विचार केला की नवरा घरी येत नाही म्हणजे मला लिहायला अजून वेळ मिळेल… कित्येक महिने ती लिहितच होती,  पण पानं तरी किती पुरणार? कॅलेंडर ची पानं संपली आणि अंजली कडे लिहायला काही साधन राहिलं नाही, घरात काही मागितलं तर शंका कुशंका काढल्या जातील… पण चांगल्या कामाला देवही साथ देतो… वर्ष संपले, तसा घरातला एक नोकर अंजली च्या रूम मध्ये आला आणि कॅलेंडर काढायला लागला, अंजली घाबरली.. “काय झालं? कॅलेंडर का काढताय?” “ताई अहो इतकं घाबरायला काय झालं?, वर्ष संपलं तसं जुनं कॅलेंडर फेकून नवीन लावायचं आहे…” अंजली चा जीव भांड्यात पडला ..

तिला वाटले तिच्या लिखानाचं घरात समजलंय की काय म्हणून… ती म्हणाली,  “मला या कॅलेंडर मधली चित्र आवडली आहेत खूप, तुम्ही एक काम करा, जुनं फेकून देण्यापेक्षा ते तसंच राहू द्या आणि त्याच्या वरून नवीन कॅलेंडर टांगून द्या…” नोकराला खरं वाटलं, अंजली ने सांगितल्याप्रमाणे त्याने केलं… अंजली ला पुढची पानं मिळाली होती, काटकसर म्हणून अजून छोट्या अक्षरात तिने लिहायला सुरुवात केली… म्हणता म्हणता 2-3 वर्ष निघून गेली, अंजली तिच्या कादंबरीत अखंड बुडाली होती, त्यामुळे बाहेर काय चाललंय याचा तिला कधीच त्रास झाला नाही… एक दिवस तिच्या नवऱ्याचा एक मित्र, सागर घरी आला.. सागर हा तिच्या नवऱ्याचा खास मित्र, अगदी लहानपणापासून, दोघांच्या वाटा अगदी वेगळ्या होत्या, एक राजकारणात तर दुसरा कलेचा व्यासंगी..

सागर ला वाचनाचा आणि चित्रकलेचा प्रचंड छंद होता…कुठलीही कलात्मक वस्तू त्याला आवडत असे… तिच्या नवऱ्याने सागर ला घरी बोलावलं…सागर ला घर दाखवलं…अंजली आणि तिच्या रूम मध्ये त्याने नेलं..अंजली ला बाहेर जाण्यास सांगितले तशी ती बाहेर गेली आणि हे दोघं खोलीत गप्पा मारत बसले… अंजली च्या नवऱ्याला एका ज्येष्ठ आमदारांचा फोन आला..

त्याने सागर ला खोलीत बसण्यास सांगत तो लगबगीने बाहेर निघून गेला…सागर ने खोलीत नजर फिरवली… त्याचे लक्ष कॅलेंडर कडे गेलं.. त्यावरची चित्र त्याला खूप आवडली… त्याने कॅलेंडर काढून हातात घेतले आणि एकेक चित्र बघू लागला.एका मागे एक कॅलेंडर सापडले आणि सर्व चित्र तो मनापासून न्याहाळू लागला… पान उलटवतांना त्याला मागच्या कोऱ्या कागदावर काहीतरी लिहिलेले दिसले…एक पान झाले, दोन पानं झाली… “अरे हे काय? सगळ्या पानांवर हे काय लिहिलंय?? आणि कशासाठी लिहिलंय?? तो खूप गोंधळला… तेवढ्यात अंजली त्याला दिसली, दाराच्या आडून उभी राहून पाहत होती आणि खूप घाबरली होती, “नाही, नाही” असं ती सागर ला खुणावत होती… अंजली चा नवरा खोलीकडे यायला निघाला तेवढ्यात ती पटकन तिथून पसार झाली… इकडे सागर ला समजले की काहीतरी गडबड आहे, आणि अंजली वहिनी धोक्यात येतील… त्याने अंजली च्या नवऱ्याला ते कॅलेंडर त्याच्या घरी घेऊन जाण्याची विनंती केली… अंजली च्या नवऱ्याला काहीही हरकत नव्हती…त्याला वाटले सागर ला चित्रांची आवड आहे म्हणून तो नेतोय… सागर ते घरी घेऊन गेला.. आता पुढे सागर ती कादंबरी वाचून काय करतो, अंजली च्या सासरी कसं सर्व समजतं आणि हळूहळू अंजली चा राजकारणात कसा प्रवेश होतो हे पहा पुढील भागात.. पुढील भाग लवकर … लेख आवडल्यास लाईक आणि कंमेंट जरूर करा…

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा