..आणि शेवटी तिने तोडला सोन्याचा पिंजरा.

Written by

अंजली.. लहानपणापासून सर्व गोष्टीत तरबेज…अगदी अभ्यासापासून ते खेळण्यापर्यंत… एका राजकारणी घरात तिचा जन्म झालेला..अशा घरात मुलीला जास्त बाहेर जाऊ देत नसत..पण तिच्या घरात मात्र तिला संपूर्ण पाठिंबा होता..ती हवे ते करू शकत होती…वडील पक्षाच्या कामात व्यस्त असत, आई पाहुण्यांच आगत स्वागत पाही, पण अंजली कधीच या गोष्टीत मिसळली नाही, स्वप्नांच्या दुनियेत ती कायम विहरत असे… अंजली चं शिक्षण संपलं, विद्यापीठात ती पहिली आली.. तिच्या वडिलांनी मोठी पार्टी केली…पार्टी मध्ये एक मोठे मंत्री आलेले…अंजली ला पाहून त्यांना वाटलं की हिला आपली सून करून घ्यावं.. पण ही बोलण्याची वेळ योग्य नाही म्हणून नंतर बोलणं करू असं त्यांनी ठरवलं… शिक्षण झालं आणि अंजली ला विविध ठिकाणाहून नोकरी साठी बोलावणं आलं… भरपूर पगार आणि सर्व सुविधा असलेल्या सगळ्या कंपन्या होत्या.. अंजली ने नोकरी करायचं ठरवलं… तिचे वडील म्हणाले “अंजली तुला खरच नोकरी करायची आहे का?त्यापेक्षा तू पक्षाचं काम बघ, दुपटीने पगार देतो की तुला…” अंजली ला पैशांसाठी नोकरी नकोच होती, काहीतरी नवीन शिकायला, बाहेरचं जग अनुभवायला आणि तीच्या शिक्षणाचा योग्य वापर करायला तिला नोकरी हवी होती.. तिने वडिलांची ऑफर धुडकावली, आणि नोकरी करायचा निर्णय घेतला..तिच्या वडिलांनी काहीही हरकत घेतली नाही, उलट अंजली चा त्यांना खूप अभिमान वाटला… इकडे त्या मंत्र्यांनी अंजली च्या वडिलांना आपला हेतू कळवला.. वडिलांना आनंद झाला, इतक्या मोठ्या मंत्र्याची सून होणार माझी पोर..पैशांमध्ये खेळेल नुसती…मुलगाही चांगला आहे…काहीही हरकत नाही.. अंजली ला हे कळलं तेव्हा ती हिरमुसली, नुकतीच नोकरी लागलेली आणि लग्नाचं लगेच सुरू केलं म्हणून तिला वाईट वाटलं… त्या मंत्र्यांनी स्वतःची इमेज खूप रंगवून उभी केलेली, मात्र त्यामागचं सत्य फार कटू होतं.. तो मंत्री आणि त्याचा मुलगा..अत्यंत जुनाट आणि खालच्या विचारांचे…मुलीच्या जातीला गुलाम म्हणून वागवणारे आणि आपल्या वर्चस्वाखाली ठेवणारे असे ते लोकं होते…त्यांना आपला राजकीय हेतू फक्त साध्य करायचा होता… बघण्याचा कार्यक्रम झाला, मुलगा तसा देखणा होता, आणि समोर एकदम सालस मुलाप्रमाणे वागला..अंजली त्याच्या या वागण्याला फसली आणि तिने होकार दिला..

 

तिच्या सासरी इतकी सुबत्ता होती की अगदी स्वयंपाकपासून ते कपड्यांच्या घड्या घालायला नोकर मंडळी होती, अंजली ने सुरवातीचे दिवस छान घालवले…दिवसभर गाणे ऐकणं, tv बघणं, आवडीचे पदार्थ नोकरांना सांगून बनवून घेणं…

इकडे तिचा नवरा निवडणुकीसाठी उभा राहिला होता, त्यामुळे त्या कामामुळे त्यांचा जास्त संवाद होत नसे.. घरात पाहुणे मंडळी येत, पण स्त्रियांना समोर जायची परवानगी नव्हती, त्यांचे खाणे पिणे सगळे नोकर मंडळी बघून घेत… अंजली आता कंटाळली, तिला जुने दिवस आठवले, रोज नोकरी साठी कशी धावपळ व्हायची, आई कसा छान डबा भरून द्यायची…नोकरीवर मित्र मैत्रिणीसोबत किती छान गप्पा व्हायच्या, बॉस कसा कौतुक करायचा…तिला वाटायला लागलं की लग्न करून आले तरी इथे काहीच काम नाहीये, घरात कुठेही माझ्यावाचून अडून राहत नाहीये आणि अशीही मी तासनतास कंटाळून जातेय घरात बसून, नोकरी परत सुरू केली तर?

साध्या सरळ मनाची अंजली, आपला नवरा आपल्याला नाही थोडीच म्हणेल, सासू सासरे पण ऐकतील आणि त्यांनाही अभिमान वाटेल.. तिचा नवरा घरी आला, तिने त्याला सांगितले तसा तो कडाडला..

“खबरदार जर पुन्हा असलं काही विचारायची हिम्मत केली तर, आपल्या घरात स्त्री ने गप गुमान खोलीत बसायचं, काही कमी आहे का तुला? कपडे लत्ते, खाणं, पिणं.. पैसे हवेत का तुला? किती हवे बोल…” अंजली ने नवऱ्याचे हे रूप पहिल्यांदा पाहिले, तिला हे अपेक्षितच नव्हतं, स्त्री बद्दल इतका खालचा विचार?? मग तिने सासू सासऱ्यांना ही गोष्ट सांगितली, तिला वाटलं ते तरी समजून घेतील, कारण नोकर चाकरांमुळे घरात लक्ष देण्याची अंजली ला गरज पडतच नसे, त्यामुळे अंजली घरात असली काय अथवा बाहेर असली काय, काहीही फरक पडणार नव्हता… सासू सासऱ्यांनी तर अजूनच विरोध केला

“हे असलं आपल्या घरात चालत नाही, या घरात काही चालीरीती आहेत, त्या आता तुला पाळायला हव्यात, हे तुझ्या आई वडिलांच घर नाही” आपल्याला फक्त एक शोभेची बाहुली म्हणून आणि यांचा राजकीय हेतू साध्य करण्यासाठी यांनी इथे आणलय, हे अंजली ला कळून चुकलं… काही महिने गेले,  अंजली आता अस्वस्थ होऊ लागली,

तिची हुशारी, तिची कला, तिचं कौशल्य तिला स्वस्थ बसू देत नव्हतं…

“काय करावं, बाहेर कोणी जाऊ देत नाही,

घरात बसून काही उद्योग करू देत नाही,

एक चांगली गृहिणी बनावं तर काही काम शिल्लकच राहत नाही, किती दिवस राहणार या सोन्याच्या पिंजऱ्यात?” इतक्यात तिला बाहेरून काही गप्पा कानी पडल्या.. “जिंकणं एवढं सोपं नाही, लोकांना आपलं महत्व समजायला हवं, आणि त्यासाठीं जोरदार भाषणच हवे, शब्दांचा मार हृदयात बसला की हात आपोआप आपल्या पक्षाच्या चिन्हाकडे वळतील…” हे सगळं राजकारणा बद्दल बोलणं होतं पण अंजली च्या मनावर बिंबलं… समोर पर्याय होते, बंड पुकारायचे, किंवा आहे त्या परिस्थितीतून मार्ग काढायचा… बंड पुकारून हाती अव्हेलनाच आली असती, मग आहे त्या परिस्थितीत मार्ग काढायचा.

पण नक्की काय करायचं? “शब्दांचा मार हृदयात बसतो” हे वाक्य तिला आठवलं.. “शब्द…वाक्य…भाषण…लिखाण…अय्या हो की, लिखाण…मी लिहू शकते, शाळा कॉलेजात दिलेली भाषणं तिला आठवली, निबंध स्पर्धेत अवल येणाऱ्या अंजलीला मार्ग मिळाला..” एक विषय सुचला, आणि त्यावर एक कादंबरी लिहू शकेल इतकं तिला सुचायला लागलं. तिला खोलीत एक डायरी सापडली, कोरी.. तिने लिहायला सुरुवात केली.. दिवसभर तासनतास विचार करून ती लिहीत असे.. तिच्या नवऱ्याला अंजलीत काहीतरी बदल जाणवू लागला.. अंजली हुशार आहे, काहीतरी धडपड करेल याची भीती त्याला होतीच.. एकदा ती डायरी त्याचा हाती लागली, त्याने वाचली आणि त्याला समजलं की अंजली काहीतरी लिहितेय.. तो संतापला,  “तुला सांगितलं ना की या घरात असले काहीही उद्योग करायचे नाही म्हणून?” त्याने ती डायरी घेतली आणि खोलीतल्या सगळ्या डायऱ्या, वह्या आणि सगळी कोरी कागद जाळून टाकली.. अंजली ला विश्वास बसत नव्हता आपल्या फुटक्या नशिबावर.. आता बंद खोलीत तिच्याकडे लिहिण्याचं काही साधनही राहिलं नव्हतं पण तरीही ती हार मानणारी नव्हती, काहीतरी मार्ग निघेल.. खोलीत लिहिण्यासाठी काही मिळतंय का, सर्व शोधलं, पण तिच्या नवऱ्याने मुद्दामहून एकही कागद ठेवला नव्हता… इतक्यात तिची नजर भिंतीवरच्या जुन्या चित्रांच्या कॅलेंडर कडे गेली..

अंजली ने धीर सोडला नाही… नवरा आणि सासू सासरे तिला बोलल्यानंतर कोणाकडे मदत मागण्याची आशा तिने सोडून दिली… भिंतीवर असलेल्या चित्रांच्या कॅलेंडर कडे तिचं लक्ष गेलं…

हळूच तिने खुर्चीवर चढून ते खाली काढलं, त्या कॅलेंडर ची मागची पानं कोरी होती, तिला लिहायला कागद मिळाला…तिच्या पर्स मध्ये तिने पेन लपवला होता, तो तिने काढला आणि लिहायला सुरुवात केली.. कादंबरी चा विषय होता “सोन्याचा पिंजरा”…तिला खूप काही सुचत गेले आणि ती लिहीत गेली…त्यात तिने समाजपरिवर्तनाचे काही मुद्देही मांडले होते, कथेसोबतच समाजाला योग्य दिशा कशी दिली जाऊ शकते, कुशल नेतृत्व कसे हवे, सर्वांची प्रगती कशी साधली जाऊ शकते याही मुद्द्यांना कथेच्या रुपात हात घातला होता… नवरा गेला की तिचं लिखाण सुरू असायचं, आणि तो यायच्या आत ती कॅलेंडर पुन्हा भिंतीवर लावून द्यायची, कॅलेंडर चा चित्राचा भाग पुढे दिसायचा आणि लिहिलेलं भिंतीच्या दिशेला असल्याने नवऱ्याला कसलीही शंका आली नाही… या काळात तिचा नवरा निवडणुकीत हरतो… त्यामुळे त्याला घरी थांबणं नको वाटायचं, कायम मित्रांसोबत बाहेरच तो राहू लागला…अंजली ला याचे दुःख वाटून न घेता तिने विचार केला की नवरा घरी येत नाही म्हणजे मला लिहायला अजून वेळ मिळेल… कित्येक महिने ती लिहितच होती,  पण पानं तरी किती पुरणार? कॅलेंडर ची पानं संपली आणि अंजली कडे लिहायला काही साधन राहिलं नाही, घरात काही मागितलं तर शंका कुशंका काढल्या जातील… पण चांगल्या कामाला देवही साथ देतो… वर्ष संपले, तसा घरातला एक नोकर अंजली च्या रूम मध्ये आला आणि कॅलेंडर काढायला लागला, अंजली घाबरली.. “काय झालं? कॅलेंडर का काढताय?” “ताई अहो इतकं घाबरायला काय झालं?, वर्ष संपलं तसं जुनं कॅलेंडर फेकून नवीन लावायचं आहे…” अंजली चा जीव भांड्यात पडला ..

तिला वाटले तिच्या लिखानाचं घरात समजलंय की काय म्हणून… ती म्हणाली,  “मला या कॅलेंडर मधली चित्र आवडली आहेत खूप, तुम्ही एक काम करा, जुनं फेकून देण्यापेक्षा ते तसंच राहू द्या आणि त्याच्या वरून नवीन कॅलेंडर टांगून द्या…” नोकराला खरं वाटलं, अंजली ने सांगितल्याप्रमाणे त्याने केलं… अंजली ला पुढची पानं मिळाली होती, काटकसर म्हणून अजून छोट्या अक्षरात तिने लिहायला सुरुवात केली… म्हणता म्हणता 2-3 वर्ष निघून गेली, अंजली तिच्या कादंबरीत अखंड बुडाली होती, त्यामुळे बाहेर काय चाललंय याचा तिला कधीच त्रास झाला नाही… एक दिवस तिच्या नवऱ्याचा एक मित्र, सागर घरी आला.. सागर हा तिच्या नवऱ्याचा खास मित्र, अगदी लहानपणापासून, दोघांच्या वाटा अगदी वेगळ्या होत्या, एक राजकारणात तर दुसरा कलेचा व्यासंगी..

सागर ला वाचनाचा आणि चित्रकलेचा प्रचंड छंद होता…कुठलीही कलात्मक वस्तू त्याला आवडत असे… तिच्या नवऱ्याने सागर ला घरी बोलावलं…सागर ला घर दाखवलं…अंजली आणि तिच्या रूम मध्ये त्याने नेलं..अंजली ला बाहेर जाण्यास सांगितले तशी ती बाहेर गेली आणि हे दोघं खोलीत गप्पा मारत बसले… अंजली च्या नवऱ्याला एका ज्येष्ठ आमदारांचा फोन आला..

त्याने सागर ला खोलीत बसण्यास सांगत तो लगबगीने बाहेर निघून गेला…सागर ने खोलीत नजर फिरवली… त्याचे लक्ष कॅलेंडर कडे गेलं.. त्यावरची चित्र त्याला खूप आवडली… त्याने कॅलेंडर काढून हातात घेतले आणि एकेक चित्र बघू लागला.एका मागे एक कॅलेंडर सापडले आणि सर्व चित्र तो मनापासून न्याहाळू लागला… पान उलटवतांना त्याला मागच्या कोऱ्या कागदावर काहीतरी लिहिलेले दिसले…एक पान झाले, दोन पानं झाली… “अरे हे काय? सगळ्या पानांवर हे काय लिहिलंय?? आणि कशासाठी लिहिलंय?? तो खूप गोंधळला… तेवढ्यात अंजली त्याला दिसली, दाराच्या आडून उभी राहून पाहत होती आणि खूप घाबरली होती, “नाही, नाही” असं ती सागर ला खुणावत होती… अंजली चा नवरा खोलीकडे यायला निघाला तेवढ्यात ती पटकन तिथून पसार झाली… इकडे सागर ला समजले की काहीतरी गडबड आहे, आणि अंजली वहिनी धोक्यात येतील… त्याने अंजली च्या नवऱ्याला ते कॅलेंडर त्याच्या घरी घेऊन जाण्याची विनंती केली… अंजली च्या नवऱ्याला काहीही हरकत नव्हती…त्याला वाटले सागर ला चित्रांची आवड आहे म्हणून तो नेतोय… सागर ते घरी घेऊन गेला..

 

सागर ते कॅलेंडर घरी नेतो, इकडे अंजली सैरभैर झालेली असते..इतक्या वर्षांपासून आपलं लिखाण आता सागर च्या ताब्यात गेलं होतं….सागर त्याचं काय करेल? त्याने घरी सांगितलं तर? या विचारांनी ती असह्य झाली…सागर ने ज्या दिवशी कॅलेंडर नेलं त्याच दिवशी तिची कादंबरी पूर्ण झाली होती…

तिकडे सागर ने कादंबरी वाचायला सुरुवात केली, इतकं सुंदर लिहिलं होतं की सागर स्वतःला थांबवू शकत नव्हता.. संपूर्ण 2-3 दिवसात त्याने ते वाचून काढले…त्याचा डोळ्यात पाणी आलं..त्याला हेही लक्षात आलं की अंजली किती हुशार आहे पण घरच्यांनी लादलेल्या बंधनांमुळे तिला हे कॅलेंडर मागे लिहावं लागतंय…

काही दिवसांनी सागर घरी आला, त्याला एकट्यात गाठून अंजली ने कॅलेंडर बद्दल विचारले, सागर म्हणाला

“वहिनी, घाबरू नका…सर्व लिखाण माझ्याकडे सुरक्षित आहे…आणि तुमच्या सासरी ते कोणालाही कळणार नाही याची जबाबदारी मी घेतो”

सागर चा समजूतदार पणा पाहून अंजली ला हायसं वाटलं.. ती निश्चिन्त झाली…

काही महिने लोटली…अंजली च लिखाण आता बंदच होतं…

अंजली च्या नवऱ्यामध्ये एक बदल जाणवू लागला…तो त्याच्या राजकारणात सकारात्मक रित्या भाग घेऊ लागला, त्याचा स्वभाव आधीपेक्षा खूप शांत झाला…आणि सक्रियपणे तो नव नवीन गोष्टी करू लागला…

एक दिवस अंजली साठी त्याने गुलाबाचे फूल आणले…अंजली चा विश्वासच बसेना…इतका बदल? अचानक?? पण आपला संसार आणि आपला नवरा आपल्यात येतोय याचा तिला आनंद झाला..

एक दिवस तो अंजली ला म्हणाला…

“अंजली, एखादी गोष्ट आपलं पूर्ण आयुष्य बदलून टाकते, यावर आहे का तुझा विश्वास?”

अंजली विचारात पडली…कशाबद्दल बोलताय हे?

“अंजली मी एक पुस्तक वाचलं, त्यात मी स्वतःला बघितलं, मला जगण्याचाच नाही तर राजकारणात कसं वागायचं, दुसऱ्याला कसं आपलं करायचं हे सुदधा त्या पुस्तकाने शिकवलं..खरंच हे जे कोणी लिहिलंय ना त्याला माझा सलाम, त्याला भेटायची खूप इच्छा आहे, पण बघ ना, लेखकाने आपलं नाव जाहीर केलं नाहीये, अनामिक लेखक म्हणून उल्लेख आहे…आणि आता तर मार्केट मध्ये बेस्ट सेलर म्हणून हे पुस्तक गाजतय”

त्याला वाचनाची गोडी लागली म्हणून अंजली खुश झाली…

तिने विचारले, “कोणतं पुस्तक? बघू जरा..”

त्याने तिला पुस्तक आणून दिलं..

नाव होतं, “सोन्याचा पिंजरा”

वाचायला सुरुवात केली, एकेक पान.. प्रत्येक पान भराभर उलटवतांना तिची धडकी वाढत चाललेली..तिचे हात थरथरू लागले…

“कुठून आणलं हे पुस्तक?”

“सागर ने दिलंय”

अंजली ला समजलं, सागर ने तिच्या नकळत तिची कादंबरी प्रकाशित केली होती…

तिला काय करावं सुचेना…

अंजली चा नवरा बाहेर गेला आणि काही वेळात सागर त्यांच्या घरी आला, घरी कोणीही नव्हते, नोकरांनीं चहा पाणी देऊन ते कामाला निघून गेले तसं अंजली ने सागर ला गाठलं..

दोघे एकमेकांसमोर उभे होते, अंजली च्या तोंडातून शब्द फुटत नव्हता, तिच्या डोळ्यात पाणी आलं..

“वहिनी, बास झालं आता, वेळ आलीये सत्य सर्वांसमोर आणण्याची…”

अंजली घाबरली,

“सागर भाऊ, आमच्या घरात मी असलं काही केलंय हे समजलं तर वादळ उठेल”

“पुढे काय होतंय बघू आपण”

सागर घरातली सर्व मंडळी येइपर्यंत थांबला..

घरी सर्वजण आले…

अंजली चे सासरे सागर ला पाहून खुश झाले,

“सागर, तुझ्यामुळे माझ्या मुलात खूप बदल झालाय, तुझे मनापासून आभार”

इतक्यात अंजली ला हॉल मध्ये बघून त्यांनी डोळे मोठे केले…आणि तिला आत जायचा इशारा केला…

“काका थांबा, वहिनी आत जाणार नाहीत…तुम्ही म्हटले ना तुमच्या मुलात बदल घडून आलाय? तो माझ्यामुळे नाही तर या अंजली मुळे…”

काय??

सासरे चक्रावले…नवरा कोड्यात पडला आणि सासू गोंधळली…

ज्या पुस्तकामुळे तुमच्या मुलात बदल झाला ते अंजली ने लिहिलंय,

“तुम्ही तिच्यावर इतकी बंधनं आणली पण तिने त्यातूनही मार्ग काढत कठीण परिस्थितीत हे पुस्तक लिहिले, आणि बघा ..ज्या गोष्टीला तुम्ही तिला विरोध करत होते त्याच गोष्टी मुले तुमचा मुलगा चांगल्या वाटेवर मार्गी लागलाय…”

“अंजली ने हे पुस्तक कधी लिहिलं?, कुठे लिहिलं? मी तर खोलीतले सगळे कागद….” सागर समोर खरं बोलता बोलता अंजलीचा नवरा थांबला…

अंजली ने पुस्तक लिहिलंय हे समजल्यावर तिच्या सासरी खळबळ माजली. पण ते काही बोलायच्या आत सागर म्हणाला, “काका, तुम्ही तुमच्या प्रचारसभेत सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, झाशीची राणी असा उल्लेख करतात ना ? मग घरात त्याच स्त्रियांवर अशी बंधन ? स्त्रियांना बंधनात ठेवल्यावर कुठलाहि पुरूषार्थ प्राप्त होत नाही, उलट त्यानां, त्यांच्या कर्तृत्वाला चालना दिली तर तिच्या लोकांना समाजात आदर मिळतो आणि पुस्तक प्रकाशीत करण्याचं तिच्या डोक्यात वगैरे काही नव्हतं. ती बिचारी कॅलेंडर च्या मागच्या पानांवर आपला छंद म्हणून लिहत होती. मी जर ते पहिल नसत तर ती कादंबरी कधी अस्तित्वातच अली नसती. तिच्या नकळत मी हि कादंबरी प्रकाशित केली ”

अंजलीच्या सासऱ्यांनी ते पुस्तक सागर च्या हातातून घेतले, आणि चाळले.

ते कडाडले, “यावर माझा सुनेचे नाव का नाही ?”

ते असे बोलले आणि सर्वजण चक्रावले, त्यांचं मत परीवर्तन झालं होतं.

अंजलीच्या नवऱ्यालाही त्याची चूक समजली.

अंजलीची सासू पुढे आली आणि म्हणाली, “मी एक स्त्री असून सुद्धा तुला समजू शकले नाही ज्या बंधनांमध्ये मी अडकले तिथेच तुलाही अडकवून दिलं , मला माफ कर ! “.

अंजलीचे सासरे परत म्हणाले , “तुझा नवरा तुझ्या सासूच्या पोटात होता तेव्हा मी सतत म्हणायचो की मला मुलगाच हवाय, पण आज असं वाटतंय की माझ्या पोटी मुलगी म्हणून तूच का नाही जन्माला आलीस ?”

अंजलीला भरून आले, आजपर्यंतच्या तिच्या सहनशील वृत्तींचं फळ तिला मिळालं होतं.

पुस्तकाचं पुन्हा एकदा प्रकाशन आणि तेही अंजलीच नाव टाकून करायचं असं ठरलं. पुस्तक जस मार्केटमध्ये गेले तसे वाचकांचे अमाप प्रतिसाद आले, कित्येकजण दारी भेटायला येऊ लागले, आता येणाऱ्यांच स्वागत अंजलीची सासू करत होती, अंजलीचा नवरा आणि सासरे आपल्या सुनेचं कौतुक ऐकायला आवर्जून बसत होते.

सागर ने एक गोष्ट सुचवली, अंजली वहिनींना निवडणुकीला का नाही उभे करत? सर्वाना पटले, अंजलीही तयार झाली.

अंजलीच्या सच्चेपणाचा, कुशल वक्तृत्वाचा आणि सेवाव्रतांचा फायदा निवडणुकीत झाला. अंजली भाषणात शिक्षणाचे, स्री स्वातंत्र्याचे आणि आधुनिकीकरणाचे मुद्दे मांडत होती, जे अंजलीच्या नवऱ्याला कधीच जमल नाही.

अंजली निवडून आली, घरात आनंदी आनंद झाला, अंजलीच्या नवऱ्याने तिच्यासाठी एक सरप्राइज ठेवले, अंजलीचे डोळे झाकत त्याने तिला खोलीत आणले, आणि बघते तर काय, खोलीचा एकदम कायापालटच केला होता.

अंजलीसाठी महागडी खुर्ची, टेबल, तिला लिहायला महागडी पानं, महागडी पेन, वाचायला उत्तमोत्तम साहित्य, गाणे ऐकायला एक आयपॉड आणि ताजतवानं वाटावं म्हणून टेबलावर गरमगरम कॉफी ठेवली होती. अंजली खूप आनंदली, तिने सहज भिंतीवरच्या कॅलेंडरकडे पाहिलं, ती पहाते म्हणून नवऱ्यानेही पहिलं, दोघांनीं एकमेकांकडे पहिलं आणि दोघेही हसायला लागले.

मौत्रिणींनो कथा जरी काल्पनिक असली तरी त्यापासून खूप काही शिकण्यासारखे आहे.

अंजलीने परिस्थितीला दोष देत न बसता आहे त्या परिस्थितीतुन मार्ग काढत यश मिळवलं होतं.

आपण तक्रार करत असतो, की नवरा करू देत नाही, सासरचे एकत नाही, मुलांमुळे जमत नाही, पण लक्षात ठेवा,

“परिस्थिती बदलल्यावरच कर्तुत्व करता येते असे नाही, तर कर्तुत्व सिद्ध झाले कि परिस्थिती आपोआप बदलते”

वेळ आली आहे आता आपणही अंजलीसारखा बनायची, जरुरी नाही की मी लिखाणच करेल, कुणाला पाककला येत असेल तर ‘मधुराज रेसिपी’ सारखं घराघरात पोहोचण्याचं स्वप्न पाहू शकतो, चित्रकला येत असेल तर त्याचे प्रदर्शन भरवू शकतो, चांगलं बोलता येत असेल तर अपर्णाताई सारखं व्याख्याती बनू शकतो.

आपली परिस्थिती अंजली एवढी बिकट नक्कीच नाही ना ? विचार करा …

कथा आपल्याला आवडल्यास नक्की लाइक, आणि कमेंन्ट करा

 

Article Categories:
रोमांचक

प्रतिक्रिया व्यक्त करा