आत्मसन्मान लग्नानंतरचा

Written by

आत्मसन्मान आणि लग्न..अगदी परस्परविरोधी शब्द वाटू लागतात. लग्न करून एखाद्या घरात जाणं म्हणजे त्या घरातल्या लोकांशी एकरूप होणं..स्वतःच्या आत्मसन्मानाची गळचेपी करणं म्हणजे उत्तम सून अणि बायको बनणं असं समीकरण होऊन बसलंय… पण किती गल्लत केली जाते काही गोष्टीत?

लग्न झाल्यानंतर तिथल्या प्रमाणे होऊन जाणं, हा स्वाभाविक नियम असेल…अर्थात ते सांगावं लागत नाही, नैसर्गिकरित्या ते होऊन जातं…

पण म्हणून आपण आपल्या सवयीचे कपडे घालणं सोडणं, आपल्या करिअर ला कमी महत्व देणं, घरात प्रत्येकाला हातात सर्व वस्तू देणं असा होत नाही.

नवीन घरात मिसळतांनाही आपलं स्वतःच अस्तित्व अबाधित असावं, एकाच घरातल्या आईचे विचार वेगळे असतील, वडिलांचे विचार धार्मिक असतील, मुलाचे विचार आधुनिक असतील पण ते एकमेकाला समजूनच चालत असतात ना? त्यासाठी कोणीही तक्रार करत नाही, पण मुलीने विचार सुद्धा आपल्याला हवा तसा करावा ही अपेक्षा…

ईशा ने लग्ना नंतर तिचा दवाखाना चालू केला, पेशंट ची गर्दी खूप असायची..पण नवीन लग्न झाल्याने घरात सतत कोणी ना कोणी येत असे, मग ईशा ला घरून फोन येई, ती धावत पळत घरी येई, पाहुण्यांचा पाहुणचार करण्यात दिवस जात असे आणि हॉस्पिटल मध्ये पेशंट डॉक्टर नसल्याने परत जात असत…

असंच एकदा घरून फोन आला, “ईशा, मुंबईहून खास पाहुणे येणारेत, जेवण बनवायचं आहे, लवकर घरी ये…” 

इतक्यात ईशा समोर एक सिरिअस पेशंट दाखल झाले, रस्त्यात अपघात झालेला होता आणि पेशंट रक्तबंबाळ झालेले, तातडीने ऑपरेशन करावे लागणार होते, ईशा ने सर्व तयारी करून ऑपरेशन ला सुरुवात केली, इकडे घरी कळवायला वेळही मिळाला नाही आणि या गडबडीत ईशा च्या मनातही आले नाही..

तिकडे घरी ईशा येत नाही म्हणून फोन वर फोन…सासू चिडली, “इतकी बेफिकरी? मी म्हणते का शिकावं मुलींनी? हे असं घरात सासवांना कामाला लावण्यासाठी? आता मी करायचं का सगळं? या घरात आली म्हणजे इथले नियम पाळावे हे सुद्धा समजत नाही का हिला?…”

इकडे ऑपरेशन ला वेळ लागणार होता, पेशंट शुद्धीत येईपर्यंत सर्वांचा जीव टांगणीला लागला होता…

पेशंट शुद्धीत आला आणि जीव भांड्यात पडला..ईशा ने पेशंट च्या नातेवाईकांना निश्चिन्त व्हायला सांगितले, तसे त्यातले 2 जण फ्रेश होण्यासाठी जवळच्या नातेवाईकांकडे जातो म्हणाले, जाता जाता डॉक्टर चे आभार मानले… आणि एक जण पेशंट जवळ थांबला…

ते दोघं गेले तसे ईशा ने दवाखान्याची एकदा पाहणी केली, आणि मग ती घरी यायला निघाली…

घरात पाय ठेवताच सासू ओरडली, “या मॅडम, आत्ता वेळ मिळाला काय? ही पद्धत आहे का? घरात पाहुणे आले आणि स्वतः मात्र खुशाल बाहेर थांबायचं…आता गप घरात चल, गेल्या गेल्या आधी जे घरात पाहुणे आलेत त्यांचे पाया पड, बाकीचे 2 कुठेतरी अडचणीत अडकलेत म्हणे…काय झालंय देव जाणे, सांगतही नाही ही लोकं…”

ती घरात गेली…

साडी नेसली, डोक्यावर पदर ओढला..

पाया पडायला त्या लोकांसमोर गेली..

दोघांनी एकमेकांकडे पाहिलं..

ईशा चे हात अडवले 

आणि ईशाचेच पाय त्या दोघांनी धरले “तुम्ही नसता तर आमचा भाऊ आज आमच्या सोबत नसता..” जे घडत होतं ते मात्र सासू च्या आकलना पलीकडचं होतं…

प्रतिक्रिया व्यक्त करा