आनंददायी श्रावण

Written by

‘हासरा नाचरा,जरासा लाजरा,
सुंदर साजिरा श्रावण आला.’
‘श्रावण महीना’ सर्वांना आवडतो.कारण हा महिना असतो सणांचा महिना.भाऊ-बहीणींच्या प्रेमाचे प्रतिक असलेला रक्षाबंधन हा सण याच महीन्यात येतो.नागपंचमी,१५ऑगस्ट,गोकुळ अष्टमी अशा आनंददायी सणांची रेलचेल याच महिन्यात असते.त्यामुळे स्त्रियांच्या आनंदाला उधाण आलेले असते.
चल गं सये वारूळाला,
नागोबाला पुजायाला
अशी गाणी म्हणत.नटूनथटून नवीन रंगीत साड्या नेसून मुली,स्त्रिया झिम्मा-फुगडीचा खेळ खेळतात.महिनाभर धार्मिक वातावरण असतं. आनंदाने सण उत्सव साजरे केले जातात.सगळीकडे आनंदीआनंद ओसंडून वाहत असतो.
निसर्गप्रेमी असलेल्या मला श्रावण महिना आवडतो कारण निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेल्या निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद घ्यायला मिळतो म्हणून….
‘श्रावण मासी हर्ष मानसी,हिरवळ दाटे चोहीकडे,
क्षणात येते सरसर शिरवे,
क्षणात फिरूनी ऊन पडे’
‘बालकवींनी’ या कवितेतून श्रावण महीन्याचे किती यथार्थ वर्णन केले आहे.
डोंगर , दर्या,टेकड्या शिवार जिकड पहाव तिकडं हिरवळ,हिरवाई माझ्या मनाला उल्हसित करत असते.नेत्रसुख भरभरू मिळत असत.अवघी सृष्टि हिरवागार साजश्रृंगार. नेसून नटून थटून सजलेली असते.ते तिचे रूपडे न्याहाळताना माझ्या चित्तवत्ती उल्हसित होतात.
‘असा रंगारी श्रावण’
माळरानावर विवीध रंगी नाजुक फुल उमलेली असतात.ऊन पावसाचा खेळ चालू होतो,तेव्हा आकाशात इंद्रधनुष्य अवतरते अन अवघी सृष्टी रंगांचा उत्सव साजरा करत असते ,ते तिच रूप न्याहाळताना मी हरवून जाते.
‘तांबूस पिवळे ऊन कोवळे पसरे चौफेर’
सायंकाळच्या वेळी तांबूस पिवळे ऊन जेव्हा शिवारावर पडते,त्या कोवळ्या उन्हात न्हाऊन निघणार्या शिवाराच हे रूप अतिशय विलोभनिय अस असत.
रिमझिम रिमझिम पडणारा पाऊस,दुधाळ ,फेसाळत कोसळणारे धबधबे ,ते अंगावर उडणारे तुषार,आल्हादायक गारवा ,तुडुंब भरून वाहणारे नदी नाले.झाड,वेली पशु पक्षी सगळे आनंदाने डोलत असतात.
अंगणात पडलेला पारिजातकाचा सडा,फुललेल्या जाई जुई,सोनचाफ्याचा मंद मंद सुवास.सगळा आसमंत सूवासाने दरवळत असतो.सगळीकडे आनंदी आनंद अन चैतन्य भरून राहिलेल असतं.
निसर्गाचा हा अविष्कार अनुभवायला मी निसर्गाच्या सानिध्यात जाते.कास पठार,ठोसेघर धबधबा मला खुणावत असतो.तिथला निसर्ग शब्दात वर्णन करता येणार नाही.
आनंदी आनंद गडे,
इकडे तिकडे चोहीकडे,
ही कविता गुणगुणत मी श्रावणातल्या या निसर्गात न्हाऊन निघते.असा हा श्रावण माझ्यासारख्या निसर्गवेडीला भुरळ घालतो.अन माझ्या चित्तवृत्ती प्रफुल्लित करतो.माझ्या मनला प्रसन्न करतो,चैतन्य देतो, माझ्या आत्म्यास आनंद देऊन जातो……..
असा हासरा,नाचरा श्रावण जसा मला आवडतो तसा सगळ्यांनाच हवाहवासा वाटतो……

मित्र मैत्रिणींनो हा लेखनाचा विषय आहे म्हणून लिहलयं असं नाही,तर खरच मी निसर्गप्रेमी आहे.सगळ्या ऋतूतला निसर्ग मला भुरळ घालतो,कारण निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केलेल्या सातारा जिल्हयातिल पाटण हे माझ गाव लहानपणापासून अनुभवलेला निसर्ग माझ्या लिखाणात येतो.
माझ्यासाठी श्रावण म्हणजे…….नक्की आवडेल तुम्हाला.मला कमेंट करून सांगा.
पण या वर्षीचा श्रावण महिन्यातील वरूणाने रौद्ररुप धारण करून अतिशय संपन्न अशा पश्चिम महाराष्र्टातील सांगली,सातारा,कोल्हापुर या विभागात जे विनाशकारी रुप दाखवलेय ते अतिश दु:खद आहे.
वरूणराजाने असा हाहाकार पुन्हा माजवू नये हीच त्याला विनंती.
सौ.सुप्रिया रामचंद्र जाधव

प्रतिक्रिया व्यक्त करा