” आपल्या घरासाठी… संसारासाठी!!”—भाग-3 ©दिप्ती अजमीरे

Written by

भारतीच्या डोक्यांत सगळे विचार फिरत होते… तिने आजीला पाणी दिले आणि काहीतरी विचारणार, तोच आजी तिला म्हणाली, “भारती तू आईला असं बोलायला नको होतं… तिने आजपर्यंत खूप कष्ट घेतले तुझ्यासाठी, आपल्या सगळ्यांसाठी, या घरासाठी…”

“हे… याला तू कष्ट म्हणते, आजी???”

“अग, तुला हे आज दिसतंय… पण हे सगळं ती आम्हाला सांगूनच करत होती… तुझ्या बाबांना सुद्धा माहिती आहे… काय करणार ती बिचारी तरी… आणि कोणी का स्वखुशीने असे कामं करतात का?? नाईलाजाने करत आहे ग ती… समजून घे तिला…“–आजी.

“नाईलाजाने… असं काम???”–भरती.

“असं म्हणजे?? काय खराबी आहे ग??”

“तिथे जाऊन पिणाऱ्याला लाज नाही… गाणं, नाच बघायला लाज नाही वाटत… मग तिने किंवा तसं काम करण्याऱ्याने का लाजवं???”

“सांग???”

“तुझी आई, या घरांत लग्न होऊन आली तेव्हा 17 वर्षाची होती फक्त… खूप छळलं मी तिला… माझ्या सासूचा राग सगळा तिच्यावर काढला… तरीही ती सहन करत होती… एका शब्दाने सुद्धा कधी बोलली नाही…”

“म्हणजे!!! तू सासू..!! म्हणजे, आई तुझी मुलगी नाही, सून आहे!!”

“हो… सून आहे!! पण पोरीची कमी जाणवू नाही दिली तिने मला… खूप माया लावली…”

“तुझ्या बाबांना कामावर असताना च accident झाला आणि खालच्या शरीराचा भाग निकामी झाला… खूप डॉक्टर वैद्य केले पण फायदा झाला नाही…”

“पैसा पाण्यासारखा वाहत होता… घर गहाण पडलं… आम्ही रस्त्यावर आलो… फूटपाथवर राहिलो… अन् अरचु पोटुशी असल्याचे कळले तेव्हाच… मग तुझ्या काळजीने ती अजूनच त्रस्त होत होती… पण तुझी आई हिम्मत नाही हारली…  तीने रस्ता सफाईचे काम मिळवले… रोज दिवसभर सफाईचं काम झालं की मग एक छोट्या हॉटेलात भांडी धुवायला जायची रात्रीची…”

“तिची दिवसरात्रीची मेहनत, आमची काळजी, सगळं कसं एकटीवर येऊन पडलं होतं… मला मेलीला, तुझ्या बाबांसोबत राहावे लागे… तिला मदत करू शकत नाही याची आणि तिला छळ छळ छळल्याची जाणीव पदोपदी होऊ लागली…”

“अरचु जायला लागली, तेव्हापासून मालकाचं हॉटेल चांगलं चालायला लागलं… त्याने दुसऱ हॉटेल टाकलं… अरचु च पायगुण लागला म्हणे… तिची मेहनत, प्रामाणिकपणा पाहून
मालकाने अरचु ची बढती करून, अरचु ला वेटर च काम दिलं नव्या हॉटेलात…”

“मालक खुश होता… पण अरचु च पोट वाढत होतं… कधी कधी तिला कस्टमर ला सामान नेऊन देणं होत नव्हतं… तेवढ्या चपळाईने कामं होत नव्हती…”

“अरचु ला एक दिवस मालकाने गाणं गुनगूणताना ऐकलं आणि त्यानं अरचु ला सिंगर म्हणून काम करायला लावलं… पैसे जास्त मिळणार होते… शिवाय मालक घर सोडवून द्यायला तयार होता… त्यामुळे तुझी, बाबाची आणि माझी सोय होणार होती… मी च ‘हो’ म्हटलं मालकाला…”

“मग अरचु गाऊ लागली… दिवसभर घरचं आवरून, तुला आईची ममता देऊन, रात्रीचा दिवस करून, आमचं पालन पोषण एखाद्या आईसारखी करत होती…”

“बिचारीच कमी वयात लग्न झालं… शिक्षण नाही… त्यामुळे असं काम करून जास्तीत जास्त वेळ देऊन, तुझ्या शिक्षणासाठी तळपत होती माझी अरचु… तिच्यावर शिक्षणाच्या अभावी जी वेळ आली, ती तुझ्यावर येऊ नये म्हणून ती आता हे सगळे कामं करत आहे…”

“ते म्हणतात ना “मजबुरी का नाम……..
काय करणार बिचारी… घरात खाणारे तोंड जास्त… त्यांत तू लहान… शिक्षण नाही तिला…”

“भांडी-कपडी करून तेव्हढे पैसे मिळाले नसते… तुझं शिक्षण, बाबांचं आजारपण, औषध याचा ताळमेळ जुडत नव्हता… शिवाय मी म्हातारी, दिवसभर काही काम करू शकत नाही, बाबांचं सगळं अंथरुणात, माझ्याकडून त्याचं ते ही करणं होत नाही… मग बाहेरचे काम दिवसा कसे झाले असते?? सांग बरं!!”

“मग हे बरं होतं ना!! दिवसभर तुला आईचं प्रेम ही मिळत होतं… घरचं आवरून हवं-नको ते बघून, आमची औषधपाणी करून, ती रात्रीची कामं करत होती… शिवाय मालक चांगला आहे खात्री होती… गेल्या कित्येक वर्षांपासून काम करत आहे तिथे ती… त्यामुळे सुरक्षीत आहे तिथे ती… अडीअडचणीला मदत ही करतो मालक… मग काय पाहिजे होतं… तू तुझ्या पायावर उभी राहणं महत्त्वाचे होते आमच्यासाठी…”

“आणि लोकांचं काय ग काहीही केलं तरी बोलतातच… केलं तरी आणि नाही केलं तरी…
लोकांची तोंड नाही बंद करू शकत…”

“हे सगळं तिला तुझ्यापासून लपवायचं नव्हतं… पण हे असं, या प्रकारे तुझ्यासमोर येईल असं कधी वाटलं नव्हतं ग… तू तिला आई म्हणून समजून घेशील! असंच वाटत होतं… पण त्या मेलीचं नशीब च खराब…”

“ज्याचं करावं भलं, तो म्हणतो माझंच खरं”

“सगळ्यांना आईचं प्रेम, आधार देणारी माझी अरचु आज कोसळली ग्… कोसळली.!!”

आजी रडत होती…

भारती हे सगळं ऐकून स्तब्ध झाली होती…
आता तिला स्वतःचीच लाज वाटू लागली…

किती बोलली होती ती आईला… आईची बाजूही तिला नीट माहिती नव्हती की, ते जाणून घेण्याचा तिने प्रयत्न ही केला नाही…

एखाद्या सुसाट वाऱ्याप्रमाणे, सगळं बोलून उध्वस्त करून टाकलं होतं… एक छोटीशी आशा लावून बसलेल्या आईला, नकोनको ते बोलून, लाज काढून ठेवली… ती ही कष्टाळू आईची…

“चुकलंच माझं… आजी मला माफ कर ग…

मी नाही मान खाली घालणार आता…

कॉलेजमध्ये मी ताठ मानेने च जाईन अन् माझ्या आईचा मान सन्मान परत मिळवून देईल मी…”

अर्चना संध्याकाळी घरी परतली… भारतीनी तिला ओवाळून तिचं स्वागत केलं… तिला माफी मागितली… आईचंच मन ते… चूक पदरात घेणारच.!!

दोघीही एकमेकींच्या मिठीत कित्येक वेळ रडत राहिल्या…

अर्चना भारतीला सॉरी म्हणत होती… “तुला मी हे आधीच सांगायला पाहिजे होतं… माझं चुकलंच… माझ्यामुळे तुला खूप काही सहन कराव लागलं… तुझी नाचक्की झाली माझ्यामुळे… मला माफ कर…

भारती म्हणाली, “नाही ग आई.! अस म्हणून मला लाजवू नको.. मी तुझ्यासमोर खूप छोटी आहे ग.!! तुझे पांग मी कितीही जन्म घेतले तरीही फेडू शकणार नाही… माझंच चुकलं… लोकांवर विश्वास ठेवून, मी तुला नकोनको ते बोलली… मला माफ कर… तुझा मान मी तुला मिळवून देईल…”

“तू काही चुकीचं नाही केलंस… जे केलं ते आपल्या घरासाठी… संसारासाठी.!!! तुझ्या संसारासाठी केलंस ग्!!!

आणि तसंही……
“कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना.!!”

दोघींच्याही डोळ्यांत अश्रूंच्या धारा लागल्या होत्या आणि ओठांवर हसू…

समाप्त…

(कशी वाटली कथा तुम्हाला??? नक्की कळवा… वाचत राहा, share करत राहा? हसत राहा??Thank you so much … आपलं प्रेम असंच राहू द्या …)

Article Categories:
नारीवादी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत