आम्ही खेळायचं कुठं ???

Written by

आमच्या घरासमोर खूप वर्ष (टॉवर व्हायच्या प्रतीक्षेत) खितपत पडलेलं बऱ्यापैकी मोठं मैदान आहे.

सर्व वयोगटातली मुले तिथे खूप सारे मैदानी खेळ खेळत असतात……..गजबजून गेलेलं असतं मुलांच्या उत्साहाने अगदी……. कित्ती मस्त वाटतं सांगू मुलांना असं मोठ्या मैदानावर मोकळं खेळताना बघून…….

कुठे माहितीये??????

दिवसा उजेडी उघड्या डोळ्यांनी बघितलेल्या माझ्या मनोहारी स्वप्नात……हो स्वप्नातच ……..

कारण प्रत्यक्षात मैदानावर लहान मोठ्या विविधरंगी चार चाकी गाड्यांच आक्रमण आहे………..
मोठा पार्किंग लॉट करून टाकलाय त्या मैदानाचा……
मुलांच्या बिनकामाच्या खेळण्यापेक्षा केवढा तरी मोठा सदुपयोग………मुलं काय खेळतील कुठं पण……काय पडलंय कोणाला?????

तसा सोसायटीचा आवार पण मोठा आहे ……..मागे चार बिल्डींगच्या मध्ये बऱ्यापैकी मोकळी जागा आहे…………खेळली असती मुलं तिथंही आनंदाने………….
पण त्याही जागेवर दुचाकी, चारचाकींचा वेढा………..
मग मुलं बिचारी त्याच जागेत जमेल तसं खेळत असतात………मग कधी चुकून पोरांची सायकल आदळते चार चाकीच्या चमचमाटावर………
मग काय सगळ्या पोरांच्या पलटणीचा उद्धार ……..येता जाता त्यांच्यावर डाफरणं……..आई वडील जवळपास असतील तर बऱ्या भाषेत नाहीतर धमक्यांच्या भाषेत………….
गाडीला टच नाय झाला पाहिजेल…….. इथं खेळायचं नाय……….

मग खेळायचं तरी कुठं??????

मैदानं गाड्यांची, सोसायटीचा परिसर गाड्यांचा, रस्स्यावर दुचाकी, चारचाकी घेऊन पायलट बाबा उडत असतात……….खेळायचं कुठं…….आणि म्हणे आजकालची पोरं मैदानी खेळ खेळत नाहीत……..मोबाईलला चिकटून असतात……….

जागा द्या की खेळायला, बागडायला, दंग्या- धोप्याला ………….मैदानी खेळ खेळायला मैदान द्या की …………ठेवलीयेत का बाकी?????

माझ्या लहानपणी आमच्या बिल्डिंगसमोर मोठ्ठ मैदान होतं……….. खूप खेळलो आम्ही मुले तिथे अगदी मनसोक्त…….. पाहिजे तितक्या वेळ…….हवं तसं………..कारण ते मुलांसाठी होतं……..चारचाकी काय दुचाकी ही नव्हत्या फारश्या मैदान अडवायला………आमचं राज्य होत ते……..आम्ही पुरेपूर उपभोगलं………..

आताच्या घरासमोरच्या मैदानाला बघून तर रोज त्या मैदानाची आठवण येते………… कुठे ते हाका मारून मारून थकलेले घरातले, काठी घेऊन येत नाहीत तोवर चिक्कार खेळू देणारं आम्हा पोरांचं लाडकं मैदान आणि कुठे हे पार्किंग लॉट बनलेलं केविलवाणं मैदान………..

पोरांना हुसकवताना एकाने मला ऐकवलं जीव जळतो हो आमचा आमच्या गाडीला छोटासा सुद्धा स्क्रॅच बघून……हो ना महागाई मोलाची गाडी जीव जळणारच की………पोरांचा खेळ कवडीमोलचाचाच की त्यापुढे………….

पण जीव आम्हा आई-बापांचा पण जळतो हो; पोरांच्या खेळण्याच्या जागेवर वाहनांचा अडथळा बघून………जीव जळतो मुलांची मैदानं बऱ्याच कारणांनी बळकावलेली बघून…………जीव तेव्हाही जळतो, एखाद्या जुन्या ओळखीच्या मैदानावर दिमाखात उभा राहिलेला टॉवर बघून……….

सगळी पोरं सांगतात……. गाडीवाले येता जाता आमच्यावर गुरगुरतात……इथं नका खेळू……तिथं नका खेळू……..ही काय खेळायची जागा आहे?????

जीव खरच खूप जळतो हो आमचा………जेव्हा पोरं सारखी विचारतात, आम्ही खेळायचं कुठं ????
आम्ही खेळायचं तरी कुठं????

 

©️स्नेहल अखिला अन्वित

 

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत