आयुष्याच्या संध्याकाळी……..अंतिम!!

Written by

©️सौ.योगिता विजय टवलारे ✍️

मला वेड लागायची पाळी आली होती…माझी बिघडलेली अवस्था बघून एक दिवस बाबांनी,  आई घरात नसतांना मला जे काही सांगितले त्यावर माझा विश्र्वासच बसतं नव्हता..?

आईने माझ्या प्रेयसीला माझ्या आयुष्यातून निघून जाण्यासाठी पैसे देऊ केले होते..तिने ते पैसे घेण्यास नकार दिल्यावर तिला आणि तिच्या कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी दिली ..तेव्हा मात्र तिने आधी तिच्या कुटुंबाला निवडले..आणि ती माझ्यापासुन कायमची दुरावली…तिने गावा बरोबरच मलाही सोडून दिलं …?

तेव्हाच  मी कधीही लग्नं न  करण्याचा  निर्णय घेतला ..? आणि मला त्या बाबतीत अजिबात पश्चाताप होत नाही.. त्यावेळी मला बाबांकडून आईबद्दल बरंच काही कळलं …आई गरीब घरातून आलेली.. आईविणा वाढलेली..त्यामुळेच की काय ?? माझी आजी तिला खूप जपायची..तिला माया लावायची…?

पण आईचं खर रूप काहीतरी वेगळचं होतं..माझ्या आजीसोबत गोड बोलून सगळी प्रॉपर्टी स्वतः च्या नावावर करून घेतली…आणि माझ्या आजीची रवानगी वृद्धाश्रमात   केली…? तेव्हा आम्ही लहान होतो..जेव्हाही आजीबद्दल विचारायचो तेव्हा ती एकच सांगायची, ” अरे आजी ना?? ती तर खूप वाईट बाई होती रे?? गेली असेल कुणाबरोबर पळून !?

तेव्हा ती काय बोलायची??? कळायचे नाही.. फक्त ती वाईट आहे, एवढंच कळायचे.. जसं जसे दिवस जातं होते.. तस तशी आजी माझ्या मनातून निघून गेली..पण जेव्हा कळले तेव्हा वेळ निघून गेलेली..? आजी आता हयात नाही..? मला आईचा खूप राग येतो..ती ना चांगली आई झाली ना बायको, ना सून!

माझ्या बाबांकडून सगळे अधिकार घेतले व घरातील नोकरा पेक्षाही त्यांची वाईट अवस्था करून टाकली..कशासाठी?? ह्या प्रॉपर्टी साठी ??एवढा पैसा ती सोबत घेऊन जाणारं आहे का??असो, तो तिचा  प्रश्न आहे…  ?

खरंतर.. तिथेच थांबले नाही ग हे सगळं…आपल्या गावातील आबा पाटलांसोबत तिचे अनैतिक संबंध सुद्धा आहेत..? तुझा नवरा म्हणजे माझा सावत्र भाऊ ! हो, सावत्रच..तो आबा पाटलांचा मुलगा होता..

माझा जन्म झाल्यानंतर तिने माझ्या बाबांना कधी जवळच येऊ दिले नाही ..हे सगळं मला बाबांनी सांगितले…आई अशी कशी वागु शकते ?? हा प्रश्न मी रोज स्वतः ला करतो…?

आणि आता तर कहरच केला…राधाला जिवे मारण्याची धमकी??? ह्या कोवळ्या जिवाने काय बिघडवले तिचे??  तूच सांग मी काय करायला हवं आता??? ?

मी त्यावर काही बोलले नाही..बोलणार तरी काय होते?? माझ्या हातात तरी काय होते?? ते गेल्या नंतर कितीतरी वेळ मी कॉट वर निपचित पडून होते…पहाटे झोपेतून उठल्यानंतर  तडक दिराच्या खोलीत गेले..तेही माझ्याकडे आश्चर्याने बघत होते..मी ही पहिल्यांदाच त्यांच्या खोलीत पाय ठेवत होते..?

मी जे काही बोलले त्यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता..मी थेट त्यांना लग्नाची मागणी घातली..? ते माझ्याकडे विस्फारल्या नजरेने बघत राहिले..मी मात्र त्यांच्या उत्तराची वाट बघत राहिले..कदाचित त्यांना हे सगळं अपेक्षित नव्हते..पण त्यांच्या तोंडातून नकळत लग्नासाठी होकार निघाला…☺️

आम्ही दोघांनी आमचा निर्णय माझ्या सासूबाईंना सांगितला..त्यावर त्यांनी कुठलीही तक्रार न करता लग्नाला होकार दिला..त्यांना फक्त त्यांच्या वंशाला दिवा हवा होता…?

आमचं लग्नं साध्या पद्धतीने देवळात पार पडलं..तेव्हा त्याचं घरात मी माझ्या दिराची नववधू म्हणून वावरत होते..नवरा जरी बदलला तरी सासू मात्र  तीच होती..आणि तिच्या वागण्यात किंचितही बदल झालेला नव्हता..?

पण त्यावेळी मात्र माझे दिर म्हणजेच माझा हक्काचा नवरा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा होता..केवळ त्यांच्यामुळेच सासूबाईंचा छळ बंद नाही पण खूप प्रमाणात कमी झाला होता…☺️

तेव्हा हे मला म्हणायचे , पूर्वी नाही दिला मी तुला आधार..आणि त्यासाठी मी कधीच स्वतः ला माफ करू शकणार..त्याला कारणही तसेच होते..मला वाटायचे , मी जर तुझ्या बाजूने उभा राहिलो असतो तर कदाचित आईने आणि माझ्या भावाने दुसरा अर्थ काढला असता.. खरंतर मला ते नको होते..?

आई तुझ्याशी इतकी वाईट  वागायची तेव्हा मला    एक माणूस म्हणून  फार वाईट वाटायचं ..पण आता असे नाही होणार..मी आहे ना?? मग नाही घाबरायच कुणाला..?हे सगळं ऐकुन मला फार बरं वाटायचं..अचानक माझे नशीब इतके उजळून निघेल ? ह्यावर माझा विश्र्वासच बसायचा नाही..पण ते सगळं खरं होत…

मी नव्याने संसाराचा डाव मांडला होता..आणि मी , तो डाव जिंकलेही होते..कधी कधी वाटायचे.. ते माझं स्वप्न तर नाही ना?? म्हणून स्वतः ला चिमटा काढायचे आणि स्वतः शीच हसायचे …?

राधाही होतीच सोबतीला..ह्यांचा फार जीव तिच्यावर..ह्यांनी तिला कधीच अंतर दिलें नाही..अश्यातच मला दिवस गेलेत..मी गोड बातमी ह्यांना दिली तेव्हा ह्यांना किती आनंद झाला म्हणून सांगू?? गरोदर असताना खुप जपले …मला कुठे ठेऊ आणि कुठे नको? असे झाले होते.. .?

ह्यांचं इतकं प्रेम बघून नकळत  मी भूतकाळात प्रवेश करायचे..माझ्या पहिल्या नवऱ्याचा अलिप्तपणा आठवायचा.. मी गरोदर असताना त्याने न घेतलेली काळजी आठवायची..? तेव्हा वाटायचं बाळंतपण किती अवघड असतं ?? कारण तेव्हा माझ्यावर मातृत्व लादल्या गेले होते..मी स्वतः स्वीकारलेल नव्हते..चार भिंतीच्या आत माझ्या नवऱ्याने केलेला बलात्कारच तो…?

कधीच माझी मर्जी विचारली नाही..प्रेम तर कधी केलेच नाही..ते दिवस आठवले की अजूनही अंगावर शहारे येतात..? पण असे वागून कसे चालेल?? जी चूक मी राधाच्या वेळी केली तीच चूक मला परत करायची नव्हती..आणि लागलीच वर्तमानकाळात प्रवेश करायचे..?

खरंतर  दुसऱ्यांदा गरोदर असताना मला पहिल्यांदा कळाल की मातृत्व इतकं गोड असतं..कारण तेव्हा मातृत्व मी स्वतः स्वीकारलं होत..ह्यांचं प्रेम माझ्या बरोबरच माझ्या पोटात वाढणारं बाळ सुद्धा अनुभवत होतं..?

सातव्या महिन्यात माझे बाबा मला घ्यायला आले होते..हो, माझेच बाबा! ह्यांच्याशी लग्नं झाल्या नंतर परत माझे माहेर मला मिळाले होते..त्यावेळी मात्र माझी सासूबाई मध्ये बोलली नाही..त्यांच्या मनाविरुद्ध का होईना?? मला माहेरी जायला मिळालं होत..☺️

मी कितीतरी दिवसांनी, महिन्यांनी, वर्षांनी माहेरपण अनभवत होते..आई बाबांच्या सावलीत माझे बाळंतपण पार पडले..मला मुलगी झाली..मी ह्यांना तसेच  पत्र पाठवले.. जसे  पत्र मिळाले तसेच हे मला आणि माझ्या लेकीला भेटायला आले..?

तेव्हाचा  ह्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मी आजतागायत विसरलेली नाही..केवढा तो आनंद?? किती ती बापाची माया?? मला कधी कधी वाटायचं , मला माझीच नजर लागायला नको..मला यांच्यासोबत आनंदात खूप खूप जगायचे होते..?

बाळंपणानंतर मी २ महिने राहून सासरी गेले..ह्यांनी आम्हा तिघी मायलेकींच थाटात स्वागत केले..माझे सासरे सुद्धा आनंदात दिसत होते..पण माझी सासू?? तिच्या कपाळावरच्या आठ्या मात्र स्पष्ट दिसत होत्या..कारण मला मुलगा नाही तर मुलगी झाली होती..?

त्यांनी तसेच आल्या पावली मला घरातून हाकलून लावले..काही कळायच्या आत माझ्या सासऱ्यांनी सासूबाईंच्या मुस्काटात लगावली..हे सगळं आम्हा दोघांसाठी अनपेक्षित होते…?

जे जे म्हणून आम्ही सर्वांनी सासूबाईंचा मानसिक त्रास सहन केला होता.. तो सगळा राग माझ्या सासर्यांनी एका झटक्यात सासुबाईंवर काढला होता..त्या दिवशी माझ्या बरोबरच माझा नवरा आणि सासरे घराबाहेर पडले…?

आता असं वाटतं , जर माझ्या सासऱ्यान्नी संपूर्ण करोभार स्वतः सांभाळला असता आणि सासूबाईंना त्यांची खालची पातळी ओलांडू दिली नसती..तर कदाचित आमच्यावर अशी घर सोडण्याची वेळ आली नसती..?

आम्ही आमच्या शेतातील घरात राहायला गेलो..तेव्हाच खऱ्या अर्थाने माझा संसार सुरू झाला होता..मी, माझ्या दोन मुली,माझा नवरा आणि सासरे! एवढंच माझं कुटुंब..सासूबाई आमच्या चौकटीत नव्हत्याच… त्यांचं नावही कुणी काढायचं नाही…

आणि एक दिवस अचानक आमचा घर गडी निरोप घेऊन आला , सासू बाईंना अर्धांगवायूचा झटका आल्याचा..आम्ही तसेच घरी गेलो..त्यांची अवस्था खूप वाईट होती..त्यांच्या डोळ्यातून ओघळणाऱ्या अश्रुंना बघून लक्षात येत होते की त्यांना त्यांच्या वागण्याचा पश्र्चाताप होतोय…?

मीही मग कसला विचार केला नाही..दिवस रात्र त्यांची सेवा करायचे…माझ्या बरोबरच माझे सासरे आणि नवरा सुद्धा त्यांची काळजी घ्यायचे…त्यांच्या डोळ्यात क्रुतज्ञता, पश्र्चाताप,वेळाने का होईना ? माझ्या दोन्ही मुलींबद्दल प्रेम दिसायचे…?

दिवस जात होते..माझा संसार सुरळीत सुरु होता..पण एक दिवस माझी लेक ‘ राधा ‘ अचानक मला सोडून गेली..मी कोलमडले…मी देवाचा फार राग राग करायचे..मी कुठे कमी पडले म्हणून देवाला प्रश्न विचारायचे???माझ्या नशिबाचे भोग म्हणून    स्वतः लाचं दोष द्यायचे..??

पण खूप प्रयत्ना नंतर स्वतः ला सावरले..माझी लेक   मला सोडून गेल्याचं दुःख मनाच्या चोर कप्प्यात दडवून ठेवायला मी अयशस्वी प्रयत्न करायचे..कारण अख्खं घरं आणि माझ्या लहानग्या कुसुमला मला सांभाळायचे होते..?

सासूबाईंच्या तब्बेतीत मात्र किंचितही सुधारणा होत नव्हती..राधा गेल्यानंतर ३ वर्षांनी त्यांनीही जगाचा निरोप घेतला… घरं अगदी उदास झाले होते..त्या कशाही वागल्या तरी  माझ्या नवऱ्याची आई होत्या …त्या होत्या तेव्हा त्यांचा आधार वाटायचा..पण त्या गेल्यानंतर घरात आणि मनात एक पोकळी निर्माण झाली होती…?

?त्या गेल्यानंतर माझ्या सासर्यांची तब्बेतही खालावली ..त्यांनीही अंथरूण धरले होते..ते फार उदास राहू लागले होते..त्यांची सेवा करत होते… , कुसुमला मोठं होतांना बघत होते..घर सांभाळण्यात ह्यांचीही मदत व्हायची..माझ्या मनाची होणारी घालमेल त्यांना कळायची… सासूबाई आणि राधाचं दुःख   त्यांनाही होतंच..पण तरीही….?

एकदा माझ्या सासऱ्यांनी मला जवळ बोलवलं आणि म्हणाले, तुझ्यावर खूप अन्याय झालाय लक्ष्मी..तुझी सासू तुझ्याशी इतकी वाईट वागली तरीही तू तिची मनोभावे सेवा केलीत..तुझे आयुष्य आमचं करण्यातच जातंय..त्यात आपली राधा आपल्याला सोडून गेली..?

आता मात्र ,भरीस भर मि ही अंथरुणाला खिळलोय..मला फार वाईट वाटतंय..तुझी अशी धावपळ बघतो , तेव्हा असं वाटतं , देवाने मला लवकर न्यावं… माझ्या जगण्याची इच्छाच संपलीय …मी तुझ्यासाठी काहीच करू शकलो नाही, ह्याची सलं कायम राहिली माझ्या मनात..?मला माफ कर लक्ष्मी !!

इतकं बोलून त्यांच्या डोळ्यात अश्रू जमा झाले..मलाही काय बोलावे ते सुचेना….त्यांच्या मनात माझ्याबद्दल इतकी काळजी असेल , हे मला कधीच वाटले नव्हते..मी आणखी त्यांची काळजी घेऊ  लागले..हळू हळू त्यांची तब्बेत बरी व्हायला लागली होती…?

मी परत नव्याने संसार उभा करत होते…माझी कुसुम शिक्षणात फार हुशार निघाली.. ..तिच्याकडे बघून मला माझ्या राधाची फार आठवण यायची..? पण मला कुसुमसाठी नव्या उमेदीने जगणे भागचं होते..

बघता बघता कुसुम वीस वर्षांची झाली..तिच्यासाठी वर संशोधन सुरू झाले..दिसायला देखणी आणि हुशार असल्यामुळे तिला एका चांगल्या घरातून मागणी आली.. स्थळ नाकरण्या सारखे नव्हतेच…म्हणून आम्हीही होकार दिला..?

कुसुमचं लग्नं आनंदात पार पडले..मी एका जबाबदारीतून मुक्त झाले होते..ती गेल्यानंतर घरात आम्ही तिघेच उरलो..ती तिच्या सासरी खूप खुश होती..अधून मधून भेटायला यायची..पत्र पाठवायची..माझ्यासारखं नशीब घेऊन ती जन्माला आली नाही म्हणून देवाचे आभार मानायचे..?

सगळं अगदी दृष्ट लागण्या सारखं सुरळीत चालू होत..कुसुम गरोदर होती म्हणून मी तिच्या बाळंत    – पणाला  गेले..पहिलं बाळंतपण तसे माहेरीच करतात..पण तिची नाजुक अवस्था बघता , तिला डॉक्टर ने प्रवास करायला मनाई केली होती..म्हणून मग मीच गेले होते..☺️

तिला मुलगा झाला..सगळेच अगदी आनंदात होते..मी तसेच ह्यांना पत्र पाठवून कळवले ..पत्र मिळाल्या नंतर हे आणि सासरे तसेच यायला निघाले तर…तर.. आमच्या गाडीचा अपघात झाला आणि त्यात दोघांचाही मृत्यू झाला..???

माझा परत एकदा संसार मोडला होता.. खरंतर माझ्या नशिबात संसार सुखचं नव्हते..नवऱ्याचा आधार आणि सासऱ्यांची मायेची सावली कायमची हरवली होती..मी अगदी एकटी पडले होते..?

पण माझ्या लेकी बरोबरच माझ्या जावयाने त्या काळात मला खूप जपले..मला आधार दिला..आणि कुसुम मला कायमची तिच्या सासरी घेऊन गेली.. ?

मला अजूनही प्रश्न पडतो, मला दोन्ही मुली म्हणून     सासूबाई राग राग करायच्या.. खरचं ?? मला मुलगा असता तर माझ्या कुसुम इतकेच त्याने मला जपले असते का???असो…?

मी मात्र माझ्या कुसुमचा संसार फुलताना बघतेय..?

लक्ष्मीने तिची डायरी लिहून बंद केली..आणि मनाशीच पुटपुटली..

ही माझी आयुष्याची संध्याकाळ आहे..आता माझ्या कोणत्याच इच्छा , अपेक्षा अपुऱ्या राहिल्या नाहीत..खूप जगले..आता ह्यांच्या भेटीसाठी मन आतुर झालंय…?आणि कायमचे डोळे मिटून घेतले..

? नमस्कार ! तुम्हाला माझी कथा कशी वाटली?? आवडल्यास नक्की कळवा..☺️ नाही आवडली, तरीही कळवा.. ?

धन्यवाद!

? योगिता विजय ?

२०/६/१९

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत