आयुष्याला शेवटचा ब्रेक लागण्याआधी…. थोडा विसावा

Written by

थोडासा विसावा….
संगीता काकूंची कहाणी.. ज्यांनी फक्त फक्त आणि फक्त आयुष्यभर कष्टच केले. माहेरी मोठी मुलगी म्हणून लगेच भावंडाची जबाबदारी आली त्यांच्यावर. 16… 17वर्षाची होतं नाही तेच आई देवाघरी गेली. लहान बहीण -भावाला सांभाळून घरच सगळं आवरून, शिक्षण घेतलं.
आई नसलेली पोर कस आणि किती जपायचं म्हणून… बाबांनी उण्यापुऱ्या 20व्या वर्षी त्याचं लग्न करून दिल.
माहेरची जबाबदारी काय कमी होती जे पुन्हा सासरची जबाबदारी आली त्यांच्यावर.
माहेरच्या जबाबदारीची सवय होतीच आता सासरची देखील जबाबदारी आली. सासुबाई जस म्हणतील तसं हो ला…हो म्हणत, त्यांनी संसार सुरू ठेवला. या अशातच संसारवेलीवर तीन फुले उमलली. दोन मुली आणि एक मुलगा. त्यांचं करण्यात,  घरच करण्यात वेळ कसा निघून जायचा कळलच नाही त्यांना. प्रत्येक गोष्ट स्वतः करायची जणू त्यांना सवय झाली होती.
काकांना फिरण्याची भारीच हाऊस,  ते काकूंना कित्येकदा म्हणाले “हेच दिवस आहेत फिरण्याचे, मुलांना आई  सांभाळेल.चल आपण जाऊन येऊया. तुलाही घर कामातून विसावा काही दिवस “
पण
काकूंच नेहमीच वाक्य “नाही हो मुलं छोटी आहे. त्यांना घेऊन जाणं शक्य नाही व त्यांना येथेच सोडून जाणं मला शक्य नाही.” घर आणि मुलांमध्ये त्या खूपच गुरफटलेल्या होत्या.
हळूहळू मुलं मोठी झाली. कॉलेजला जायला लागली. मुल आपल आयुष्य एन्जॉय करत होती. पण काकूंच मात्र ठरलेलं “मुलांना सोडून मन नाही होत हो बाहेर जायला.”
काकांनी कित्येक वेळा प्रयत्न केला त्यांना फिरायला घेऊन जाण्यासाठी पण काकूंचं ठरलेल्या नुसार त्यांनी कधीही होकार दिला नाही.
वयानुरुप मुली मोठ्या झाल्या. त्यांची लग्न सुद्धा झाली. काका म्हणाले “आता मुलींची लग्न झालीत, आता काय काम आहे. आता तरी आपण निदान देवदर्शन करून येऊ.
काकू म्हणाल्या “नाही हो आपला सुमित आहे की. त्याला सोडून नाही जावसं वाटत आणि एवढा मोठ घर बांधलेल आहे, ते असे एकटे टाकून कस जायचं पंधरा-वीस दिवस?”  एकंदरीत काकू घरची कामे आणि मुलं यांच्यामध्ये इतक्या गुंतलेल्या होत्या की त्यांना स्वतःसाठी थोडा वेळही नव्हता.
नवरा म्हणून काकांचा जे कर्तव्य होतं त्यांना थोडासा विसावा  देण्याचा ते.. काका पूर्ण करत होते. पण काकूंना तो विसावा घ्यायचा नव्हता. एव्हाना त्यांचे सांधेदुखी सुरु झाली होती. वाढत्या वयानुरूप बीपी, शुगर हे आजार सुद्धा जडावलेले होते. चालताना सांधे देखील कुरकुर करत असत.
अशातच सुमीतच,  म्हणजे त्यांच्या मुलाचं लग्न झालं सून घरी आली, काकांना वाटलं “आता तरी ही सुनेवर जबाबदारी टाकेल आणि फिरायला सोबत येईल.”
पण कसलं काय….
काकूंच आपलं सासूबाई सारखं…  “नवीन मुलगी आहे तिला काय कळत आपल्या घरातल. तिला थोडी जबाबदारी कळू द्या घरातली नंतर जाऊया.”
काकूंची पासष्टी पार होत आली होती आणि काका देखील सत्तरीच्या वर गेले होते
काकूंनी अख्ख आयुष्य मात्र घर,  मुलं आणि घरच्यांच करण्यामध्ये घालवले स्वतःसाठी थोडीशी विश्रांती, थोडासा विसावा असा कधी घेतला नाही.
आता सून आल्यावर घराची जबाबदारी टाकावी न सुनेवर तर नाही… प्रत्येक गोष्टींमध्ये सुनेला “हे असं करायचं, ते तसं करायचं,  हे इथे ठेवायचं, ही भाजी करायची, सुमित हे आवडत नाही” असं आणि बऱ्याच सूचना ज्या सासूबाई  प्रत्येक सुनेला देतात.
आता मात्र खूप झालं होतं, काकांनी कंटाळूनच काकूला म्हटलं “आता बस कर घर, मुलं, सुना यांचा विचार करणं. विसावा घे जरा आयुष्याच्या या शेवटच्या दिवसात तरी. तुझे पाय देखील चालू देत नाही आहेत आणि तुला कधीच म्हणतोय की निदान देवदर्शन तरी करून येऊ तरी तू होकार दिला नाहीस. आता मला तुझं काही एक ऐकायचं नाही आहे. आता सगळा विचार सोड. मुलगा आणि सुन आहे. ते सांभाळतील त्यांचा संसार. तसही आपण चार दिवसांचे पाहुणे आहोत. कधी काय होईल सांगता येत नाही. तुला कधीही चल म्हणालो तू मला वारंवार एकच उत्तर दिलस. “नाही ” आता मात्र मला तुझं काही एक ऐकायचं नाही आहे. चल आपण दोघे आपल आयुष्य जगू या शेवटच्या दिवसात . तुझी पंढरपूर ला जायची इच्छा होती न.. आता सुरुवात तिथूनच करूया देवदर्शनाची.
घर, स्वयंपाक, मुलं, नातवंड याचा विचार न करता फक्त तू स्वतःचा विचार कर. तुला काय करायच आहे त्याचा.. थकलीस ग तू हा संसार करता करता.. तरी देखील तो रथ ओढण्याची तुझी इच्छा संपलेली दिसतं नाही. स्त्रिया या अशाच असतात का ग?? आता मात्र खरंच मी तुझं ऐकणार नाही. टूर अँड ट्रॅव्हल्स मधे आपल्या दोघांच्या नावाचं बुकिंग करतो.. आणि तू फक्त सामान पॅक कर.. घर, संसार इथेच टाकून.
तुझ्या शरीराला व मनाला थोडावेळ तरी विश्रांती दे.
आपल्या आयुष्याला ब्रेक लागण्याआधी…. माझ्यासोबत काही क्षण घालव. आणि तू जो संसार रथ नॉनस्टॉप ओढत आहे त्याला सुद्धा ब्रेक दे. आता तुझा विचार कर आणि वेळ मिळाला तर माझा.. असं मिश्किल पणे काका म्हणाले. आणि लगेच त्यांनी त्यांच्या जाण्याच बुकिंग केल.
काकाचं बोलणे ऐकून काकुलाही वाटल..” खरंच आपण आयुष्य घर, मुलं यांचं करण्यातच घालवल.  स्वतः साठी एकही सुट्टी घेतली नाही,  की क्षणभर विश्रांती देखील घेतली नाही. आता एक ब्रेक बनतोच.. आयुष्याला शेवटचा ब्रेक लागण्याआधी..
समाप्त… ©जयश्री कन्हेरे – सातपुते
आवडल्यास like, कमेंट करा, शेअर करायचा असेल तर नावासहित करा.. माझे इतर लेख वाचण्यासाठी मला फॉलो नक्की करा.धन्यवाद 🙏©जयश्री कन्हेरे -सातपुते फोटो साभार गुगल

Article Categories:
सामाजिक

प्रतिक्रिया व्यक्त करा