आयुष्य नावच पुस्तक

Written by
  • 4 महिने ago

आयुष्य नावाचं पुस्तक

‘ जीवनगाणे गातच रहावे
झाले गेले विसरुन जावे
पुढे पुढे चालावे…’

आपली माणसं या चित्रपटातील हे गाणं आयुष्य नव्याने जगायला शिकवितं. आयुष्य नावाच्या पुस्तकात अनेक चढऊतार येतात तरी डगमगून न जाता तसेच चुकींच्या ओझ्याखाली दबून न बसता जीवनाच्या प्रवासात हजार चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत त्याकडे लक्ष केंद्रीत करुन पुढे चालले पाहिजे. चुकामधूनच माणूस शिकतो पण, वारंवार त्याच चुका कधी होणार नाहीत याची काळजी घेतली तर आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोनच बदलून जाईल. आपल्यासोबत काय घडलं याचा विचार करत बसण्यापेक्षा आपण मार्ग काढून जीवनात काय करु शकू याचा जर प्रत्येकांने विचार केला व धैर्यपुर्तीसाठी कष्ट केले चर आयुष्यच सोन होईल.
माणसाचे आयुष्य हे सुख-दुःखाने, कडू-गोड, आंबट-तिखट अाठवणीनी भरलेले असते. आईच्या गर्भात जेव्हा अंकुर फुलू लागतो तेव्हाच विधाता आयुष्य नावाचे पुस्तक लिहिण्यास घेतो. गम्मत म्हणजे ते पुस्तक आपण इतर पुस्तकाप्रमाणे हातामध्ये घेऊन वाचू किंव्हा लिहू शकत नाही. चालत बोलत पुस्तक कितीतरी नात्यागोत्यात गुंतलेलं. पहिल पान जन्म तर शेवटच पान मृत्यू. तो कधी येणार माहित नसूनही अटळ आहे हे सर्वांनाच ज्ञात असतं. या दोन गोष्टी सोडून सर्व पान कोरीच असतात. आपल्या प्रत्येक श्र्वासाबरोबर आपण त्यामध्ये भूतकाळ लिहितो, वर्तमान जगला जातो तर भविष्यकाळ जेव्हा समोर उभा रहातो तेव्हाच कळतो. वैशिष्ट्य म्हणजे या पुस्तकामधील नको असलेला मजकूर आपण वगळूही शकत नाही की रबर घेऊन पुसूही शकत नाही. जसे चांगल्या क्षणांचा साक्षीदार हे पुस्तक असते तसेच वाईट क्षणांचासुध्दा…
असे म्हणतात परिस्थिती माणसाला शिकविते. उद्याच्या सुखासाठी कालच्या वेदना सहन करत जीवाची ओढाताण करत एक अपयशी माणूसच अनुभव व जिद्दीच्या जोरावर उंच भरारी घेत यशाला गवसणी घालतो. माणूस फक्त एक कळसुत्री बाहुली असते या जीवनपटावर. कळ फिरविणारी आणि आपल्याला हवे तसे नाचवणारी नियतीच असते. पण, नियतीवरच सर्व सोडून आपण गप्प राहिलो तर मात्र आपण आळशी बनू म्हणून स्वतःच्या स्वप्नांना सत्यात उतरविण्यासाठी कष्ट केलेच पाहिजेत. अशी कितीतरी माणसं आजुबाजूला असताता जी मिळालेल्या संधीचा योग्य वापर न करता स्वतःला, आयुष्याला, वडिलधाऱ्यांना दोष देत असतात. अनेकवेळा मानसिक खचिकरण, आत्मविश्‍वास गमावणे अशा अनेक कारणामुळे आत्महत्या करण्यासुध्दा मागेपुढे पाहत नाहीत.
परिस्थतीशी दोन हात करून जीवनाचे धैर्य, स्वतःचा स्वतःकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदला तरच जीवन सुखकर एखाद्या फुलपांखरासारख स्वच्छंदी पुढे जाताना रंगीत छटा उमटविणारं होईल. आजच्या धावपळीच्या जीवनात जीवन म्हणजे जणू घड्याळच बनले आहे. जगाबरोबर आपणही धावत सुटलो आहे. या धावण्याच्या शर्यतीत आपण नक्की जिंकू पण, कधी याचा विचार केला आहे का? या सर्वात आपल बालपण, तारूण्य, नाती कुठंतरी मागे पडत आहेत. आजकालचे जीवन खूप ‘बिझी‘ आणि व्यावहारिक बनले आहे. स्वतःकडे, कुटुंबाकडे, समाजाकडे लक्ष देण्यासाठी वेळच भेटत नाही. आयुष्याला जणू यंत्रमानवच बनवले आहे. पुढे आपल्याजवळ वेळ असेलही पण आता जगू पाहणारे सोनेरी अक्षरानी कोरू पाहणारे क्षण त्यावेळी भेटतील का ?
माणसाने प्रगत व्हावे. जगाबरोबर चाललेच पाहिजे. त्याचबरोबर रंगीत आयुष्यालाही फुलविले पाहिजे. आपण जन्माला येतो, लहानाचे मोठे, घरची जबाबदारी, लग्न, संसार, कुटुंब सुखी असावं म्हणून कष्ट, मुलांच्या शिक्षणासाठी दिवस-रात्र पैसाच्या पाठीमागे धावणे, जरा निवांत होणार म्हणजे मुलांची नोकरी, संसार सर्व व्यवस्थित होईपर्यंत जीव थकलेला असतो. मग तेव्हा कुठे स्वतःच्या अस्तीत्वाची जाणीव होते. मागे वळून पाहताना कुणाच पुस्तक प्रत्येक क्षण जगून छोट्या – छोट्या गोष्टींनीसुध्दा रंगीबेरंगी बनलेल असत तर कुणाचं पुस्त मोठी मजल मारून, सर्व कमवूनसुध्दा कोरच असतं.
तव्यावरची भाकरी जोपर्यंत उलट – सुलट करुन भाजत नाही तोपर्यंत ती फुलत नाही. तसेच आयुष्याचे आहे. सुख-दुःखाचे चटके जोपर्यंत बसत नाहीत तोपर्यंत तेही खुलत नाही. बहिणाबाई चौधरी म्हणतात त्याप्रमाणे, जगणं आणि मरणं यात एका श्र्वासाचं अंतर आहे! होत्याचं नव्हतं व्हावं.. पुढचं हेच आखले असावेत, आनंदोत्सवाच्या क्षणांची चित्रं रंगवली असावीत आणि अनपेक्षितपणे क्षणार्धात श्र्वासांचा हिशोबच संपावा. मृत्यू असाच येतो बेभरवशाचा म्हणून आनंदात रहा. विचार, काळजी करणे सोडा आपण आहात तर जीवन आहे.
अपंग माणसेही आयुष्य नव्या जिद्दीने जगतात. आयुष्यामध्ये काहीतरी साध्य करण्याची प्रामाणिक धडपड असते त्या जीवामध्ये व आपण सामान्य माणसे देवाने ओंजळीत इतक भरभरून देऊन सुध्दा जरा मनाविरुध्द झालं की आत्महत्या,जीवन संपविण्याचे विचार करतो. विकलांग असूनसुध्दा त्यांच्या चेहऱ्यावर निखळ आनंद असतो व आपण अनेकवेळा आनंदाचा खोटा मुखवटा चढवून स्वतःच स्वतःला फसवतो.
मित्रहो, आजचा क्षण तुमचा तो कडू -गोड कसाही असो आनंदाने जगा. जस पावसाला माहित नसतं मातीतून काय उगवणार, तो मनसोक्त कोसळतो. आयुष्यसुध्दा असचं असावं काय मिळणार याचा विचार न करता आलेला प्रत्येक क्षण नव्याने जगावं. ज्यामुळे निवांतक्षणी आयुष्य नावाचा पुस्तक उघडाल तेव्हा ते एकेरी मार्गासारऱख भासेल मागे वळून पाहू शकू पण मागे जाता येणार नाही. एखादा कडू क्षणसुध्दा सुखद धक्का देईलं. आपण जेव्हा दुसऱ्यांना आनंद देऊ तेव्हाचा आनंद तर स्वर्गागून अदभूत असेल. जीवनात सगळ्यात जास्त आनंद देणारं पान म्हणजे बालपण म्हणून तर माठे झालो की नकळत मुखातून येत ‘ बालपण दे गा देवा’ गेलेले बालपण परत भेटत नाही पण जगलेले ते क्षण आयुष्यभर स्मरणात असतात. जीवनातील त्या निरागस क्षणांना जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
स्वतःवरती विश्र्वास असेल तर कोणत्याही परिस्थितीत जीवनाची नव्याने सुरुवात करता येते. प्रयत्न करून करून आपण थकलो आहे व आपल्या जीवनात पुढे जाण्याचा कोणताच मार्ग नाही असे जेव्हा वाटते तेव्हाच तर जीवन बदलून टाकणारा क्षण जवळ आलेला असतो गरज असते फक्त डोळस होऊन तो क्षण आपल्या मुठीत पकडण्याची. आपल्या आयुष्यातील अपेक्षा कधीही संपत नाहीत. पण त्या अपेक्षांच्या पाठीमागे धावून जीवनातील आनंद मात्र संपतो. म्हणून स्वप्नांचा पाठलांग करताना आयुष्यातील प्रत्येक क्षण भरभरून जगा.
‘लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले
पाऊले चालू पुढे… जे थांबले ते संपले’

Article Categories:
इतर

Comments

प्रतिक्रिया व्यक्त करा