आरक्षणाचे बळी… कुठवरं ??

Written by

आज पुन्हा मानसी अस्वस्थ झाली होती. नुकत्याच घडलेल्या डॉक्टर पायल तडवीची आत्महत्या तिला भूतकाळात घेऊन गेली.

मानसी तशी बुजऱ्या स्वभावाची, आपण बरे आणि आपलं काम बरं या वर्गात मोडणारी, अभ्यासात अती नाही पण तरी पहिल्या पाचात येणारी मध्यमवर्गीय घरातील मुलगी. तिची हुशारी बघूनच तर आई वडिलांनी तिला चौथ्या इयत्तेनंतर मोठ्या शाळेत शिकण्यासाठी अडमिशन घेऊन दिली.
शाळेची तीन मजली इमारत पाहून तिलाही शाळेचा अभिमानच वाटायचा, पण लवकरच मानसीला वास्तवाचं भान घडत गेलं. तो काळ गणेशोत्सवाचा होता, त्यांच्या शाळेत साक्षात बाप्पा विराजमान व्हायचे. त्याच दरम्यान मानसीच्या डोळ्यासमोर प्रसंग घडला की बाप्पाची पूजा फक्त सवर्ण विद्यार्थ्यां मार्फत केली जाते, समोर घडलेला प्रकार पाहून कोवळ मन खट्टू झालं, आणि असही काही असू शकत हे मनात रुजत गेलं. शाळा म्हणजे समानता आणि बंधुभाव यांचं प्रतिक असतं हेचं ती तिच्या आधीच्या शाळेत शिकली होती. पण या मोठ्या शाळेची, किंबहुना इथल्या मोजक्या शिक्षकांची आणि बऱ्याचश्या उच्च शिक्षित, उच्चवर्णीय पालकांची पर्यायाने त्यांच्या मुलांची मानसिकता निराळी होती.
बऱ्याच गोष्टीत कळत नकळत जाती पाती वरून भेदाभेद चालायचे. उच्चजातीय आणि इतर वर्गातील दरी या शाळेत तिला प्रकर्षाने जाणवली. त्यामुळे ती शाळेत कधी रमलीच नाही ना तिला शाळा आपलीशी वाटली. अश्याच घुसमटलेल्या वातावरणात मानसीची दहावी पार झाली आणि ती शाळेतून पहिल्या वर्गात पास होऊन बाहेर पडली. आता तिला कॉलेज खुणावत होत. आरक्षणामुळे तिला चांगल्या कॉलेजला अडमिशन मिळालं. जरा बिचकतच तिने कॉलेजमध्ये प्रवेश केला आणि काय गम्मत बघा मानसीला इथे नवीन फ्रेंड्स मिळाले, ज्यातले काही उच्चवर्गीय ही होते, इथे जात – पात, वर्ण भेद असं काही नव्हतं. होत तर फक्त दूरवर पसरलेले आकाश आणि बरोबरीला मोकळा श्वास. अशी समजून घेणारी लोकही समाजात आहेत याची प्रचीती मानसीला कॉलेज जीवनात आली. त्या कॉलेजरुपी आकाशात मानसी मनसोक्त बागडली, पडली तरी पुन्हा उभी राहिली आणि पुढे उच्चपदवी घेऊन चांगल्या पदावर पोहोचली. या गोष्टीला २०- २५ वर्ष होऊन गेली. पण अजूनही ही खंत वाटते की बरीचशी शिकली सावरलेली उच्चवर्णीय लोक ज्यांच्या पिढ्यान् पिढ्या शिकत आल्या आहेत. उच्च शिक्षित आहेत, त्यांच्या हे पचनी पडत नाही की आरक्षणामुळे का होईना पण एखादा विद्यार्थी जो/जी त्याच्या कुटुंबातील शिकणारी पहिली व्यक्ती असते ज्याच्यासाठी आत्ताकुठे शिक्षणाची दारं उघडली असतात, त्याला खुलण्याआधीच चिरडले जाते. जन्म घेत असताना तुमचा जन्म कुठे होणार आहे हे कुणालाच माहीत नसतं. तो करता करविता देव जर भेदभाव करीत नाही तर हा अधिकार तुम्हाला कोणी दिला. उच्च जातीत जन्म झाला हे तुमचं कर्तृत्व नाही, ते तुम्हाला सिध्द करावं लागतं. उच्चजातीमध्ये जन्माला येऊन नैतिकतेच्या मर्यादा ओलांडून जातीचा टेंभा मिरवण्याऱ्यांवर तर काय प्रतिक्रिया दयावी हे सुज्ञ च जाणे. आजही कोणाचं बरं चाललं असेल तर तो आरक्षणामुळे शिकला म्हणून, नाहीतर तो इतर जातीमधला आहे, अशी टिप्पणी जेव्हा होते तेव्हा या सो कॉल्ड सुशिक्षित लोकांच्या विचारशक्तीची किव करावीशी वाटते. अरे, तुम्हाला ज्या सोयीसुविधा, चांगलं शैक्षणिक वातावरण पिढीजात मिळत ते वंचितांना शिक्षणाशिवाय मिळणार नाही. तुम्ही जर स्वतः ला उच्च वर्गातील समजता तर मनाचा मोठेपणा ही दाखवा आणि वंचितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करा, तर आणि तरच तुम्ही खऱ्या अर्थाने उच्च आहात हे मान्य करता येईल. नाहीतर पायल, रोहित सारखे बळी जातच राहतील आणि जनता सिस्टमला दोष देण्यात धन्यता मानत राहील. आपल्यातून सिस्टम जन्म घेते हे लोकांना कधी कळणार हे बाप्पाच जाणे.

तळटीप: हा लेख कुठल्याही एका जाती धर्माविरोधी नसून माणसाला माणूस म्हणून जगण्याचं स्वातंत्र्य मिळावं इतकीच अपेक्षा ठेऊन लिहिलेला आहे याची कृपया नोंद घ्यावी.

©स्नेहा किरण✍️

Article Categories:
सामाजिक

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत