एकल पालकत्व(बाबांचा प्रवास) सत्यकथा

Written by
 • #माझे लेखन
  एकल पालकत्व
  26 मे 2011….
  वेळ सकाळची 6-30 ची
  भावाचा फोन आला….बाबा आता आपल्यात नाहीत….😪
  विश्वासच बसेना….ते अमरावतीला आणि मी गोंदीयला, जवळपास 8 ते 10 तासांचा रस्ता…
  मी त्यांची खूप लाडकी, मला न भेटताच ते कसे जाऊ शकतात…😢
  हा मला पडलेला प्रश्न?
  त्या आठ, दहा तासाच्या प्रवासात माझा एकही क्षण असा गेला नाही , मला त्यांचा आठवणी आठवत राहिल्या. त्या जर मी लिहायचा प्रयत्न केला तर, के जीवनपटच तयार होईल.
  पण तरीही…….
  “पालकत्व” ह्या विषयावर लिहतांना मी थोडं वेगळं लिहणार आहे.( माझीच कथा, पण आईविना आम्हा मोठं करनाऱ्या माझ्या बाबांचा एकल पालकत्वाचा प्रवास)
  मी आईविना मोठी झाले, माझे बाबाच माझ्यासाठी
  आई आणि बाबा. खरी आई कशी असतें, हे मी आई झाले त्यानंतरच कळलं. खूप छान आईपण अनुभवलं मी माझ्या पिलांबरोबर. 😊
  पण आईविना पोरं मोठी करणं, वयात येणाऱ्या मुलींना सर्व समजावून सांगणं, हे जरी आईच काम असलं तरी, बाबा शिक्षक असल्याने मला त्यांनी आम्हाला वेळोवेळी खूप छान मार्गदर्शन केलं.

  “दोन घडीचा डाव,
  त्याला जीवन ऐसें नाव”
  या जीवनाच्या सारीपाटावरच दान कोणत्या वेळी कसे पडेल हे सांगता येत नाही.
  नेहमी आपल्या ऐकण्यात असे येते की पालकत्व म्हणजे आई-बाबा नि उचललेली जबाबदारी…. किंवा आईने आपली मुलांसाठी केलेले कर्तव्य….
  “एकल पालकत्व”….मात्र वडीलांनी एकट्याने आपल्या चिमुकल्यानंसह केलेला जीवन प्रवास….
  माझे वडील ……
  अगदी अल्पशा आजाराने आईचे निधन…बाबांच्या जीवनात अंधःकार पसरला…😢पदरी तीन छोटी मुलं…माझी मोठी बहीण जेमतेम 6 वर्षाची, मी अडीच तीन वर्षाची, लहान भाऊ फक्त सात महिन्याचा.
  क्षणात होत्याचे नव्हते झाले. आणि वयाच्या केवळ 35, 36 व्या वर्षी अकाली आलेल्या वैधव्याने बाबा पार खचून गेले.कारण समोर खूप मोठा प्रश्न होता मुलांच्या (आमच्या)संगोपणाचा. आम्हा मुलांकडे पाहून त्यांनी लग्न केले नाही….पण स्वतःचे दुःख विसरून, आणि आपल्या सर्व भाव-भावनांना मूठमाती देऊन आपल्यात पितृत्वा सोबतच मातृत्वाची भावना प्रबळ केली.आणि नव्या उभारीने आम्हा तिघांना घडवायचा निर्णय घेतला, तो सुद्धा एकट्याने….
  बाबांचा शिक्षकी पेशा, नोकरी सांभाळून आमचा सांभाळ करणे म्हणजे तारेवरची कसरत.काही दिवस आम्हाला आजोळी ठेवले, पण बाबा आमच्या होणाऱ्या वाढीबद्दल समाधानी नव्हते.लहान भाऊ नेहमी आजारी असायचा, बाबा खूप काळजीत असायचे, मी मात्र बाबांची खूप लाडाची, बाबा जेव्हा शनिवारी, रविवारी भेटायला यायचे, मी त्यांचे पाय घट्ट पकडून ठेवायची, रडायची, त्यांच्या मागे लागायची. शेवटी बाबांनी परत आम्हाला त्यांच्यापाशी अमरावतीला आणले.
  आईच्या आठवणी माझ्यापाशी नाहीतच,कारण ते कळायचे माझे वयच नव्हतं. पण सर्व म्हणतात की मी माझ्या आइसारखीच आहे….
  पण माझ्यासाठी माझे बाबाच आई होते, दुसऱ्यांची आई बघून सुद्धा कधी त्यांचा हेवा वाटला नाही, कारण बाबांनी आईची जाणीव कधी जाणवूच दिली नाही. असो…
  बाबांच्या नोकरीमुळे त्यांना आमच्या आंघोळी, जेवण, वेणी यामुळे त्रास होऊ लागला.पण मला आठवत नाही की कधी ते आमच्यावर चिडले असतील, रागावले असतील, किंवा आम्हाला मारलं असेल. बाबांनी जर दुसऱ्या लग्नाचा विचार केला असता तर त्यांना लगेच मुलगी मिळाली असती, पण…..लग्नासाठी मागण्या येऊन सुद्धा त्यांनी ते नाकारलं, कारण सावत्र आई खरंच माझ्या पिल्लांचा सांभाळ करेल काय? हा विचार त्यांनी केला.
  बाबांच्या लग्नानंतर केवळ 8, 10 वर्षात वैधव्याची कुऱ्हाड कोसळल्याने फक्त आणि फक्त आपल्या मुलांचा सांभाळ, आणि आणि त्यांना संस्कारित करून मोठं करणं हे एकच ध्येय उराशी बाळगलं.
  मला आठवतंय, त्यावेळेस मी कलासला जायचे, कधी कधी यायला उशीर व्हायचा,लोकांचे अनेक प्रश्न? बरेचदा मी रडवेली व्हायची, पण बाबा मात्र ठम!
  ते म्हनायचे,”बीटा जीवनात एकटं असताना असे अनेक प्रसंग येतील, लोक नावही ठेवतील, पण रडायचं नाही, येणाऱ्या प्रसंगाला धैर्याने तोंड द्यायला शिक.
  बाबांची ही शिकवण आज खूप कामात येतेय. माझ्या मुलांना सुद्धा तेच सांगते.
  अशाप्रकारे आमचा सांभाळ करतांना, आम्ही मोठे झालो…..आम्हाला संस्कारित करण्यात त्यांनी कुठलीही कसर मागे ठेवली नाही.
  माझ्या लग्नापासून ते बाळंतपर्यंतच्या सर्व जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या.आई आणि बाबांचे प्रेम इतके भरभरून दिले की ,आईची कमतरता कधी जानवलीच नाही.
  आपल्या नेहमी ऐकण्यात येते की, एकटी स्त्री पती नसताना आपल्या मुलांना घडवते…पण तिला सुद्धा समाजात वावरताना अनेक अनुभवातून जावं लागतं.
  पण तीन मुलं पदरी असताना,एकट्यानं त्यांना वाढवन खरंच खूप कठीण हो….
  आमच्यासाठी झटता झटता त्यांना त्यांना केव्हा वार्धक्य आलं, हे त्यांच्या आणि आमच्या सुद्धा लक्षात आलं नाही, त्यांना आजारी पडतांना, किंवा आराम करताना मी कधी बघितलेच नाही.वयाच्या सतरीपर्यंत त्यांनी सायकल चालवली….
  पण काळापुढे कोणाचेच चालत नाही,छोट्या छोट्या आजारांनी त्यांना घेरलं, आणि कधीही आराम न करणाऱ्या बाबांना अंथरून धराव लागलं.
  त्यांच्या आयुष्याचा शेवट सुद्धा त्याना एकट्यानाच करावा लागला, कारण कोणाला त्रास देने, त्यांच्याच्याजवळून सेवा करवून घेणे, त्यांच्या स्वभावातच नव्हते.
  आज आम्ही तिन्ही भावंड खूप सुखी आहोत, पण आमचं वैभव पहायला ते मात्र हयात नाहीत.
  26 मे 2011 रोजी ते आम्हाला सोडून गेले…सुख काय असतं, हे त्यांनी अनुभवलंच नाही.
  आज 8 वर्षे झालीत पण माझा एकही दिवस असा नाही गेला की बाबा तुमची आठवण आली नाही.
  खूप काही लिहावंसं वाटतं, पण कितीही लिहिलं तरीही कमीच आहे…😢
  त्यांचे संस्कार, छोट्या छोट्या गोष्टीत सुख कस मानायचं,
  दुसऱ्यांना मदत करण्याची त्यांची सवय, जीवनात एकटं असताना खूप अनुभवातून जावं लागतं, पण घाबरून न जाता त्यातून मार्ग कसा काढावा, ही त्यांची शीकवन, आज खूप कमी येतेय.
  एका गोष्टीचा मला खुप आनंद होतो, तो म्हणजे त्यांची लीखा- नाची आणि वाचण्याची सवय …हा गुण माझ्यात आला.आणि तो मी जोपासायचा पुरेपूर प्रयत्न करतेय.
  हीच माझ्याकडन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली🙏🙏
  असा हा माझ्या बाबांचा एकल पालकत्वाचा प्रवास.
  #माझे लेखन
  ©️लता राठी

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत