एक आगळं वेगळं व्हॅलेंटाईन..

Written by

व्हॅलेंटाईन डे साठी खूप काही ठरवून राहुल तयारीला लागला होता, नेहा ला प्रपोज केल्या नंतरचा हा पहिला व्हॅलेन्टाईन.नेहा ला काय गिफ्ट द्यावं, तिला कसं खुश करावं या बाबतची सगळी माहिती मित्रांशी चर्चा करून आणि इंटरनेट वर शोधून एक पुरेपूर प्लॅंनिंग केली गेली…
राहुल आणि नेहा एकाच कॉलेज मध्ये, मैत्रीण म्हणून तिचं घरी येणं जाणं असायचं, घरच्यांना ती आधीपासूनच आवडत होती आणि आता तीच सून करावी असं घरीही वाटत होतं… त्यामुळे कसलीही अडचण नव्हती…
राहुल च्या आईने राहुल चे कपडे छान इस्त्री करून ठेवले, राहुल ची तयारी करून दिली, सोबत आगाऊ पैसे दिले…हे करत असतांना ती मोठ्याने बोलली, 
“तुझ्या पप्पानाही शिकव की रे थोडसं, करावं म्हणा तुम्ही पण काहीतरी…”
राहुल चे पप्पा ऐकतच होते, त्यांनी ऐकावं असं मुद्दाम मोठ्याने ती बोलली..

सगळे गालातल्या गालात हसायला लागले…
“आईला म्हणा आजच्या दिवशी मी तुला आयता चहा करून देतो” पप्पा बोलले…
“चला, निदान आज तरी जरासा विसावा मिळणार.” आई खुश…
राहुल नेहा सोबत व्हॅलेंटाईन साजरा करून येत होता, राहुल खुश होता, कारण त्याचा गिफ्ट्स ने नेहा खुश झाली होती…
या सगळ्या विचारात असताना त्याचा पाय अडखळला आणि तो रस्त्यातच पडला,

राहुल कळवळून उठायचा प्रयत्न करू लागला, शेजारीच एका बिल्डींग च बांधकाम चालू होतं, तिथल्या एका गवंडी ने त्याला पाहिलं, किशन नाव त्याचं…त्याने राहुल ला हात देऊन एका जागी बसवलं..

“दादा जास्त लागलं का? राधे, अगं पाणी आणते का?”

राधा त्याची बायको, ती तिकडे वाळू उचलून टाकत होती, आवाज ऐकताच हातातलं काम बाजूला ठेवलं आणि पळत पळत पाणी घेऊन आली…
राहुल ने पाणी घेतलं…त्याला बरं वाटलं…

तो म्हणाला, “थँक्स दादा, मी ठीक आहे आता, तुम्ही तुमचं काम चालू द्या, मी बसतो इथे थोडा वेळ आणि मग जाईन घरी नीट”
राहुल बोलला तसं ते दोघं एक स्मितहास्य करून कामाला निघून गेले..
राहुल ते सगळं बघत होता, ती दोघे काम करत होती…
राधा एका टोपलीत वाळू भरून दुसरीकडे न्यायचं काम करत होती, किशन विटा उतरवण्याचं काम करत होता… पण त्याचं लक्ष राधा कडे होतं… राधा ची अंगकाठी तशी बारीक, तिला वाळू उचलायला न्यायला दम लागत होता… तो जरा वेळ मिळाला की राधा च काम करायचा… राधा कडून पटकन टोपली उचलायचा आणि दुसरीकडे वाळू नेऊन टाकायचा..राधा नको म्हणत असतांना सुद्धा…
संध्याकाळ ची वेळ होती..
मालकाने सर्व कामगारांना त्या दिवसाचा पगार वाटला…
किशन
किशन ने 200 रुपये घेतले आणि राधा च्या हातात दिले….

सर्व कामगार घरी जाऊ लागले…
तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान दिसायला लागलं..

आता या पैशांत संध्याकाळ च्या जेवणाची सोय होणार होती…
आजूबाजूला कोणी नाही ना हे बघत किशन ने विटांच्या आड उगवलेल्या एका सदाफुलीच्या रोपावरचं फूल हातात घेतलं…

घामाळलेल्या आणि मातकट झालेल्या हाताने 200 रुपये आणि सदाफुलीचं फूल अलगद राधा च्या हातात दिले. फूल पाहून ती लाजली, आणि पैसे घेऊन घरी जायला निघाली..
किशन परत एका ठिकाणी गेला आणि काम करू लागला..
राहुल ला समजलं नाही, सगळे तर आपापल्या घरी गेले…तरी हा किशन काम का करतोय??
त्याच्या बरोबरचे 2 गडी राहुल जवळून जात होते, त्यांचा संवाद राहुल च्या कानावर पडला…
“ह्यो किसन्या, अंगात जीव नाय तरी मालकाकडून जास्त काम मागून कामं करतुया..”
“आगाव पैका मिळतोया, त्या राधी ला दवाखाना करायचं म्हणतुया हा किसन्या… गरीब गाय ती, कुठलं पोटाचं दुखणं लागून गेलं बाय ला…”
राहुल च्या लक्षात आलं, राधा ची तब्येत ठीक नसते म्हणून हा किशन जास्तीचं काम करून पैसे जमा करतोय, आणि म्हणून काम करताना राधा जवळ तो सारखा जात होता आणि तिचं कामही हाच करत होता…
एकीकडे व्हॅलेंटाईन डे मध्ये 3-4 हजार खर्च केलेल्या राहुल ला एक आगळं वेगळं व्हॅलेंटाईन आज दिसलं होतं..
तो स्वतःशीच म्हणाला,
“आमच्यासारख्यांना लागतो हा दिवस प्रेम साजरा करायला, पण ही लोकं तर रोजच त्यांचा व्हॅलेंटाईन साजरा करताय, पैसे खर्च करून मोठी गिफ्ट देणाऱ्या हातांना मातकट झालेल्या आणि घामाने भिजलेल्या हातांची सर नाही येणार, आणि बळेच खतपाणी घालून वाढवलेल्या फुलांचा राजा असलेल्या गुलाबाला प्रतिकूल परिस्थितीतही सदा फुललेल्या सदाफुलीचीही सर नाही येणार…”
राहुल ने खरोखर आगळं वेगळं व्हॅलेंटाईन आज पाहिलं होतं..

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा