एक कप चहा आणि जबाबदारी

Written by

#CORONA
#WeAreThareForYou
#staysafe

एक कप चहा आणि जबाबदारी

ओ साहेब ऱ्हाउंदया वो
मी देतंय पैसं
कधी तरी आम्हला बी द्या संधी सेवा द्यायची…!

मी चहाचा संपलेला ग्लास खाली ठेवत चहाचे पैसे द्यायला उठलो आणि समोर बसलेले आजोबा पुढे आले.

अहो तुम्ही आमचं मायबाप…असूंद्या थांबा मी देतंय पैसे..

त्यांची ती प्रेमळ विनवणी ऐकली आणि मला त्याना नाही म्हणवलं नाही…

आज जवळ जवळ 3 महिने होत आलेत…मी इथे थाम्बणारच नाही माझी इच्छाच नाही पासून ते हा आता पर्यंत च म्हनजे अडीज तीन महिन्याचा कालावधी यात खूप फरक आहे.
माझी ज्यावेळी पोस्टिंग झाली होती त्यावेळी माझी इथे काम करण्याची अजिबात इच्छा नव्हती आणि ज्यावेळी इथे थाम्बण्याचा निर्णय घेतला त्यावेळी पाहिले दोन दिवस देखील दोन महिण्यासारखे वाटले होते…पण आज ज्यावेळी मी मागे वळून पाहतो त्यावेळी मात्र तो अनुभव खुपच भारावून टाकतो…
तुम्ही फ्रेश आहेत तर बिल्कुलच जाऊ नका ,लोक चांगले नाहीत तिथे,तिथपासून अगदी लोक तुम्हला मारून टाकतील इथपर्यंत मला सांगण्यात आलं होतं.पण आज तुम्ही आमचे मायबाप म्हणून आमचे चहाचे पैसे देणारे आजोबा पाहिले आणि मग मला जॉइनिंग च्या वेळी काही बाही सांगणाऱ्यांच हसू येऊ लागलं.
त्यां नंतर बरेच दिवस ते आजोबा कुठे दिसले नाही.पण काल सकाळी ते पुन्हा एकदा दिसले.तब्येत बरी नाही म्हणून दाखवायला आले होते phc मध्ये.
मी त्याना चेक केलं.साधारण सर्दी खोकला होता.मी त्यांना ओषधें लिहून दिली आणि म्हणालो

“बाबा काळजी घ्या काय होणार नाही …..
फक्त थोडे दिवस बाहेर फिरू नका…हा..?
नाका घेऊ टेन्शन…!”

माझं बोलणं संपलं आणि माझं लक्ष आजोबांकडे गेलं..आजोबाच्या डोळ्यात पाणी होतं…

मी विचारलं “काय झालं आजोबा…?”

“काय सांगू साहेब…?
कसं टेन्शन नको घेऊ..
माझी सगळी माणसं तिकडे मुबईत अडकलेत ओ…
माझी पोरं,माझी नातवंड,माझ्या सुना…सगळी ….कसं टेन्शन नको घेऊ…?”

प्रत्येक शब्दाला त्यांचा हुंदका दाटून येत होता…

डोळे पुसत ते म्हणले

“मी एकटाच आहे ओ इथं गावाला
माझी सगळी तिथंच आहेत….
आणि आता हा कसला काय आजार आलाय..
मला लय काळजी वाटते ओ..
देवानं हवं तर मला नेउदे पण माझी माणसाना काय नको व्हायला…!.”

“काही नही होत आजोबा .
तिकडे पण माझ्यासारखेच खूप डॉक्टर आहेत जे आहेत त्यांची काळजी घ्यायला..”

“तुमच्या सारखं च असुदे बाबा डॉक्टर तिकडं पण…!” म्हणत त्यांनी डोळे पुसले..

मी रजिस्टर मध्ये त्यांच नाव नोंद केलं आणि मोबाईल नंबर मागितला….

“मला पाठ नाय वो….
लक्षात राहत नाही….
माझ्या पोराचं नंबर आहे याच्यात बगा ..”
म्हणून त्यानी मोबाईल हातात दिला साधा किप्याड चा फोन …

“लक्षात राहायला नारलीच झाड च फोटो ठेवलन हाय म्हणू त्यांनी सांगितलं….”

इतकी ही म्हातारी शरीरं आपल्या मुंबईच्या मुलांवर अवलंबून आहेत…

देशात कर्फ्यु लागू केल्यानंतर मग ह्या सध्याभोळ्या माणसांचं काळजी करणं आणि त्यांनी आपल्या पोराना आपल्या जवळ बोलावून घेणं रास्तच आहे
पण सध्या ची परिस्थिती पाहता…मुबाईला असलेल्या सगळ्या लोकांना एकच सांगावस वाटतंय की सुटी आहे बंद आहे म्हणून तुम्ही गावी न येता जिथे आहेत तिथेच थाम्बवून हा आजार पसरवण्यापासून वाचू शकता .
राहिला प्रश्न गावात राहणाऱ्या या आजोबांसारख्या लोकांचा तर महाराष्ट्रातील प्रत्येक खेड्यापाड्यात माझ्यासारखा एक तरी डॉक्टर नक्की असेल ज्याने कधी न कधी अश्या आजोबांकडून एखादा चहा पिला असेलच जे त्या चहाची जाणीव ठेऊन त्यांची काळजी घेत असतील…!

“काही काळजी करू नका आजोबा ;
आम्ही आहोत ना इथे …?
सांगा पोराना रहा निवांत …….”
अस म्हंटल्यावर आजोबाचा चेहरा खुलला….,

व्हय साहेब म्हणत आजोबा उठले आणि जाता जाता माझ्या पायाला हात लावून नमस्कार करु लागले…मी लगेच त्यांचा हात पकडला आणि डोक्यावर ठेवला…!
त्यांनी एकदा भरल्या डोळ्यांनी हसून माझ्याकडे पाहिलं आणि निघून गेले

आजोबा निशिंत होऊन चालले होते आणि माझ्या डोळ्यासमोर मात्र त्यादिवशी त्यांच्या पैशाने पिलेल्या चहाचा रिकामा कप दिसत होता..जो माझ्या ही नकळत माझ्या खांद्यावर एक मोठी जबाबदारी देऊन गेला होता……!

✍️डॉ अजित सुगंधा कृष्णन
शासकीय वैद्यकीय अधिकारी सिंधुदुर्ग

मुबाई पुण्याच्या माझ्या सर्व मित्रांना एकच विंनती आहे की सुटी आहे म्हणून गावी येऊ नका इथे गावात असलेल्या तुमच्या माणसांची मी आणि माझ्यासारखे बरेच डॉक्टर काळजी घेत अहेत ….तुम्हीही तुमची काळजी घ्या…!

COVID 19 बद्दल काहीही माहिती पाहिजे असल्यास ,भीती असल्यास नक्की MSGवर विचारा #WeAreThareForYou

Article Categories:
सामाजिक

Comments are closed.