एक ना धड..भाराभर चिंध्या..

Written by

“नाही….”

काकू माफ करा पण मला जमणार नाही. 

सानिका च्या या उत्तराची सवयच नव्हती शेजारच्यांना…

एका फार मोठ्या शिकवणीतून सानिका ने नाही म्हणण्याचं कौशल्य आत्मसात केलं होतं.

झालं असं की…

सानिका, संकेत आणि त्यांचा मुलगा पार्थ… एका मोठ्या इमारतीत राहत. त्या इमारतीत सर्वजण मिळून मिसळून राहायचे, कायम येणं जाणं, गेट टूगेदर आणि सर्व सणवार अगदी एकत्र साजरे करत. 

सानिका गृहिणी होती, पाककला, चित्रकला, हस्तकला आणि इतर सर्व कालाकुसरीमध्ये तरबेज. गणपती च्या डेकोरेशन पासून ते सोसायटी चे सर्व कार्यक्रम तिच्या सजावटी शिवाय पूर्ण होत नसत. 

सोसायटी मधील सर्वजण काही काम असलं की सानिका कडे जात. मुळातच दुसऱ्याला मदत करायचा स्वभाव असल्याने सानिका सर्वांना मनापासून कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न करता मदत करत असे. त्यामुळे सानिका च्या घरी दिवसभर येणं जाणं चालू असे. 

एकदा पेपर मध्ये एका पाककला स्पर्धेची जाहिरात आली होती. सानिका ने त्यात भाग घ्यायचं ठरवलं. फक्त कृती आणि आपण बनवलेल्या पदार्थाचा फोटो त्यांना पाठवायचा होता. सानिका खूप उत्सुक होती ते करायला.

“सानू मावशी, माझी फॅन्सी ड्रेस स्पर्धा आहे, काहीतरी सुचव ना मस्त…” शेजारची कुहू बोलत बोलत घरात आली..

“स्पर्धा…काय बनवावं बरं… हां.. तुला ना मी मस्त जिजाबाई चा मेकअप करून देईन…वाक्यही शोधून ठेवेल..”

“ठीक आहे सानू मावशी, पण लवकर हा…परवाच आहे स्पर्धा….”

“बापरे परवा?? ठीक आहे…चल मी करते काहीतरी…”

“सानिका, अगं तू ढोकळ्यांचं पीठ दिलंय ना…मला काही लावता येत नाही बघ ढोकळे, तू येतेस का जरा 5 मिनिटा साठी??”

“हो लगेच येते..”

सानिका ने चहा चा गॅस बंद केला आणि मैथिली कडे पळाली…

“घे, झाले बघ ढोकळे…आता 15 मिनिटांनी गॅस बंद कर हा आठवणीने..”

“हो हो, अगं अजून एक काम आहे…ओम ला शाळेत प्रोजेक्ट दिला आहे, टाकाऊ तुन टिकाऊ बनवायचा…मला तर काही जमत नाही बाई, तूच काहीतरी दे बाई आता बनवून..”

“काळजी करू नकोस, देते मी बनवून…”

सानिका मैथिली कडून घरी जायला निघाली..वाटेतच अनघा भेटली…

“वहिनी बरं झालं तू भेटलीस…अगं मला कॉलेज च्या खूप असाईनमेंट दिल्या आहेत..फक्त कॉपी करून लिहायचंय… खूप काम दिलंय ग…तू घरी बोर होत असशील..मला करून देशील का??”

“देईल की करून, नको काळजी करु..”

सानिका घरी आली…चहा चा गॅस पुन्हा चालू केला…चहा पिणार इतक्यात नवरोबांचा फोन, “अगं संध्याकाळी घरी कंपनीतला मित्र येणार आहे, छान हलवा वगैरे बनवून ठेव…”

“फक्त हलवा कशाला, जेवायलाच बोलवा त्यांना…मस्त बेत करते आज…”

सानिका आता कामाला लागली, फॅन्सी ड्रेस च्या स्पर्धेसाठी साडी शोधली, ज्वेलरी विकत आणली…टाकाऊ तुन टिकाऊ साठी वस्तू शोधल्या… ते बनवत बसली…अर्धेच काम झाले…ते करत करत संध्याकाळ होऊन गेली…असाईनमेंट करायला घेतली…ती अर्धी झाली तोच यांचा मित्र येणार म्हणून स्वयंपाकाला लागली…जेवण, झाकपाक उरकून रात्री परत टाकाऊ तुन टिकाऊ आणि असाईनमेंट करत बसली…

ते करत असतांनाच अजून 4-5 कामं तिच्यावर येऊन पडली…सानिका ती करण्यात दंग होऊन गेली…

काही दिवसांनी ओम ला त्याची आई शाळेतून घरी आणत होती, सानिका गेट जवळ भेटली…

“काय ओम…दाखवला का प्रोजेक्ट?? कसा वाटला…”

ओम काही म्हणायच्या आत त्याची आई म्हणाली..

“छान होता, पण दुसऱ्या मुलांचा खूपच सुंदर होता ओ, त्यांच्यासमोर ओम चा काहीच नाही…”

एक तर स्वतः प्रोजेक्ट केला नाही, सानिका कडून मोफत बनवून घेतला आणि वर हे असलं बोलणं…

सानिका ला वाईट वाटलं..

घरी गेली असता तिने पेपर चाळला…पाक कृती स्पर्धेचा विजेता जाहीर करण्यात आला होता…

अरेच्या, आपल्यालाही भाग घ्यायचा होता की…सानिका हिरमुसली…

सानिका चा नवरा म्हणजेच संकेतही अश्याच स्वभावाचा…सर्वांना मदत करण्याचा नादात आणि नाही म्हणू न शकणाऱ्या स्वभावामुळे सगळ्यांची कामं तो आपल्यावर ओढवून घेई…त्यामुळे वैयक्तिक अशी कामं करायला त्याला वेळच मिळत नसे…

त्यांचा मुलगा पार्थ कॉलेज ला जात होता…आई वडीलांप्रमाणे तोही त्याच स्वभावाचा…कोणाला नाही म्हणणे त्याला जमतच नसे…

सानिका ने कुहू ची फॅन्सी ड्रेस साठी तयारी करून दिली, रात्री ती तिचं बक्षीस दाखवायला उड्या मारतच आली… सानिका ला बरं वाटलं…पार्थ कॉलेज मधून उशिरा घरी आला, सानिका ने जेवायला वाढलं, तो जेऊन झोपी गेला…

संकेत ने ऑफिस मधल्या इतरांची कामं हातात घेऊन ठेवलेली, ती आता तो घरीही आणू लागला…घरात एकमेकांशी बोलायला फार कमी वेळ सगळ्यांना मिळे… संकेत उशिरा पर्यंत कामं करत राहिला..पार्थ आजही उशिरा घरी आला…न जेवताच झोपी गेला…

सानिका आणि संकेत, दोघांनीही दुसऱ्याला खुश ठेवायचा जणू ठेकाच घेतला होता…कोणालाही कधी नाही असं म्हटलेच नाही…पण त्यामुळे झालं असं की काही लोकं त्यांना अगदी गृहीत धरू लागले, स्वतः काहीही न करता सानिका वर कामं थोपवून स्वतः मात्र निर्धास्त राहायचे, कधी प्रयत्नही करून बघायचे नाही, ऑफिस मध्येही संकेत ला असंच… इतर कर्मचारी एखादं कंटाळवाणं काम आलं की केविलवाणा चेहरा करून संकेत कडे जात, मग संकेत नाही म्हणू शकायचा नाही…बरं एवढं करूनही काही लोकांना त्याचे काही नव्हते, आपला कार्यभाग साधला गेला म्हणजे झालं, फार कमी लोकं त्यांच्या या मदतीचे आभार मानत…

एकदा सानिका दुकानातून समान घेऊन घरी येत होती, मैथिलीच्या घरी बिल्डींग मधल्या काही बायका जमून गप्पा मारत होत्या…काही शब्द कानावर पडले..

“पुढच्या आठवड्यात मुलाची चित्रकला स्पर्धा आहे, त्याची तयारी करून घ्यायची आहे…पण नेमकं माझ्या कॉलेज च्या मैत्रिणींनी एक ट्रिप काढलीये, तिकडे जायची खूप इच्छा आहे पण याच्या स्पर्धेमुळे काही जमणार नाही असं वाटतंय…”

“कशाला टेंशन घेतेस, सानिका आहे की…नाहीतरी ती कुठे नाही म्हणते….”

सानिका ने विचार केला, आपल्याला किती गृहीत धरलं जातंय…

एकदा सानिका बिल्डींग च्या जिन्यावरून पडली, संकेत आणि पार्थ दोघेही बाहेर होते, बिल्डींग मधल्या लोकांनी तिला दवाखान्यात नेले… सानिका जवळ कोणीतरी थांबयला हवं होतं… पण बिल्डींग मधला प्रत्येक जण पद्धतशीरपणे ‘नाही’ सांगत पळवाट काढत होतं… सानिका ला नर्स कडून ते समजलं…

काही महिने उलटले, 

सानिका आणि संकेत डायनिंग वर पार्थ समोर गप्पा मारत बसलेले,

“सर्वांना खुश करायच्या नादात आपण आपलंच नुकसान करून घेतो असं नाही वाटत तुम्हाला??”

“बरोबर बोललीस सानिका, मीसुद्धा आता कंपनीत लोकांची कामं करणं कमी केलंय, त्यांना नीट समजावलं की ही कामं मीच करत गेलो तर तुम्ही कधी शिकणारच नाही, आणि त्यात तुमचंच नुकसान आहे…त्यामुळे झालं असं की मला माझ्यासाठी वेळ काढायला जमायला लागलं…”

“बरं केलंत, आपण आपलं आयुष्य जगायचं बाजूलाच ठेवलं होतं…आता नाही म्हणायच्या कलेत नैपुण्य मिळवण्याचा आपण सर्वच जण प्रयत्न करू…”

पार्थ ते सर्व ऐकत होता..

दुसऱ्या दिवसापासून तो वेळेत घरी यायला लागला…

“अहो ऐकलं का, आपला प्लॅन यशस्वी झाला….”

“होना सानिका, बरं झालं…पार्थ ला अप्रत्यक्षपणे जे समजायचं ते समजलं..त्याला समजावून सांगितलं असतं तर कदाचित त्याने ऐकलं नसतं…”

झालं असं की…

पार्थ आणि अभिजित एकमेकांचे जवळचे मित्र…कॉलेज मध्ये उच्चवर्गीय मित्रांशी मैत्री झालेली…खुप छान ग्रुप जमलेला…पण ती मुलं रेव्ह पार्टी, हुक्का पार्टी करणारी…पार्थ आणि अभिजित लाही ते यायला आग्रह करत…अभिजित स्पष्ट नाही म्हणायचा, पण पार्थ ला नाही म्हणायची सवय नव्हती, आणि इतका चांगला ग्रूप सुटेल याची त्याला भीती, आपण नाही म्हटलो तर मित्रांना वाईट वाटेल, सर्वांना खुश करायच्या नादात तो स्वतःच चांगलं वाईट विसरून गेलेला…पण वेळीच अभिजित ने ही गोष्ट गपचूप सानिका आणि संकेत च्या कानावर घातली….म्हणून सानिका आणि संकेत ने मुद्दाम पार्थ समोर हा संवाद केला….त्यामुळे पार्थ विचारात पडला…त्यालाही समजलं की ‘नाही’ म्हणणे किती महत्वाचे असते ते….

जागृती सानिका ची अगदी जवळची मैत्रीण, तिच्याकडे सानिका ने हे सर्व सांगितलं…

“सानिका खूप बरं केलंस, मलाही तुझी ही गोष्ट खटकत होती…पण याचा अतिरेकही करू नकोस हा..”

“म्हणजे??”

“अंग आमचे नवरोबा, कंपनीत त्यांना याच विषयावर एकदा ट्रेनिंग दिलं, की ‘नाही’ म्हणणे किती महत्वाचे असते ते…पण त्यामुळे त्यांच्यावर इतका प्रभाव पडला की … येतांना भाजीपाला आणाल का??…”नाही..”….मला पेपर वाचायला देता का??…”नाही…”…जय च्या शाळेत जाल का??..”नाही..”

अगं सगळ्याच गोष्टीला नाही म्हणायला लागले..

चल मला उशीर होतोय…मी यांना घ्यायला बोलावते…हॅलो… अहो मला जरा घ्यायला याल का?? 

“नाही..” 

बघ…आत्ताही नाही…

दोघी पोट धरून हसायला लागल्या…

म्हणजे नाही म्हणायचा अतिरेक ही करायचा नाही हेही सानिका ला समजलं…

आता घरातले सर्वजण नाही म्हणायच्या कलेत नैपुण्य मिळवायचा प्रयत्न करत होते…

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा