एक फुल काय फुललं……!!

Written by

मम्मी, तुझ्या गुलबक्षीला फुल आलंय ग!

ये लवकर……

मी हातातलं सर्व सोडून खिडकीकडे धाव घेतली.

खरंच, माझ्या गुलबक्षीवर एक सुंदरसं फुल डुलत होतं.

आलं ग बाई आलं एकदाचं!!

कितीतरी दिवसांपासून वाट बघत होते, चांगली वाढलेली पण फुलं काही येत नव्हती. अगदी रोज मी तिच्याकडे बघून समोर दिसेल त्याला सांगत बसायचे, इतके दिवस झाले लावून, पण फुलं काही येत नाहीत.

नवऱ्याला आणि मुलीला तर माझा दुखडा पाठ झालेला. मी खिडकीजवळ गेले, की तेच सुरु व्हायचे, हो आम्हाला माहीत आहे, खूप दिवस झालेत, नुसती फोफावलीये, फुलं कधी येणार देव जाणे, तुझी टेप पाठ आहे, आम्ही तुझ्या दुःखात सहभागी आहोत.

म्हणूनच आज त्यावर फुल दिसल्यावर मुलीने अगदी उत्साहाने ओरडून मला बोलावलं.

घे मम्मी, आलं एकदाचं तुझं फुल? खुष का आता??

हो ग हो, करून मी तिला मिठीच मारली.

खिडकीबाहेर गेलेल्या फांदीवर आलं असल्याने मला कळी काही दिसली नव्हती. पण माझ्यामुळे गुलबक्षीकडे रोज बघायची सवय मुलीलाही लागली.

आणि माझ्याअगोदर तिलाच फुल दिसलं.

माझ्या आवडत्या झाडावर आलेलं पहिलं फुल!

मन भरेपर्यंत पाहत बसले त्याच्याकडे! तेवढ्याने मन भरलं नाही म्हणून स्टुलावर चढून, खिडकीच्या कट्टयावर उभी राहून, ग्रील बाहेर हात काढून त्याला हलकेच कुरवाळलं. त्याचा सुगंध मनात भरून घेतला. हलकेच ओठ टेकवले त्यावर आणि मनात आनंद उचंबळून आला अगदी.

हा सगळा प्रताप पाहून, मुलीने डिक्लेअर केलं, आमच्या मम्मीला येड लागलं.

चिंट्या म्हणाला, मम्मी हा काय बाबू आहे तुझा?

काय सांगू आता यांना….. ते फुल माझ्या बालपणाची आठवण घेवून आलंय, माझ्या आजीची माया घेवून आलंय, त्याच्या स्पर्शातून मला ते सारं पुन्हा अनुभवता येतंय का ते पहायचं होतं.

किती आतुरतेने वाट बघत होते मी या क्षणाची, नुसत्या वाढलेल्या फांद्यांना नेहमी विचारायचे, एवढा का उशीर फुलं यायला, काय झालं, काही कमी पडतंय का तुम्हाला??

घुम्यासारख्या असायच्या नुसत्या.

त्यांनाही आज गोड हसून Thank you म्हंटलं.

इकडे नवरा घरात शिरतोय न शिरतोय तोच पोरीने बातमी पोचवली,

पप्पा, मम्मीचं फुल आलं बरं का!

हो का, चला…. म्हणजे आता एक टेप तरी बंद होईल म्हणायची.

खूष ना आता!! आज काही बाईसाहेब खिडकीतून हलणार नाहीत.

ह्या गुलबक्षीची टेप वाजवून जिवलग मैत्रिणीला सुद्धा मी खूप पकवलं होतं, खुशखबर देण्यासाठी तिलाही लगेच फोन लावला,

माझ्या गुलबक्षीला फुल आलं ग……

हो का, मस्तच……खूष का? फोटो पाठव फोटो!!

माझी गुलबक्षी फक्त ऐकून माहिती असणाऱ्या माझ्या मैत्रिणीला झालेला आनंद मला फोनवरूनही दिसत होता.

एक फुल काय आलं, पाहता पाहता किती जणांना आनंद देऊन गेलं.

त्या फुलाने हरखून जाणारी ती, कुणाची लाडकी मम्मी होती, कुणाची लाडकी बायको तर कुणाची  जिवलग मैत्रीण!! तिच्याशी जोडले गेलेले सारे तिच्या आनंदात आपसूकच आनंदी झाले.

आनंदाची साखळीच तयार झाली; वाढलीही….

मुलीने अगदी आनंदाने मम्मीच्या फुलाची गोष्ट तिच्या मैत्रिणींना सांगितली, नवऱ्याने त्याच्या व्हाट्सप ग्रुपवर ‘माझ्या बायकोचं सुख’ म्हणून फुलाचा फोटो अगदी आनंदाने पाठवला, आणि मैत्रिणीने तिच्या घरी सगळ्यांना फुलाचा फोटो मोठ्या कौतुकाने दाखवला.

साऱ्यांनी अगदी आनंदाने आनंद वाटला.

संध्याकाळी फुलणाऱ्या एवढ्याश्या फुलाने केवढा आनंद पसरवला, अगदी थोड्या वेळ फुलणंही किती सार्थकी लागलं नाही त्याच्या!!

© स्नेहल अखिला अन्वित

लेख आवडल्यास लाईक, कमेंट आणि फॉलो नक्की करा.


आणि शेअर करताना नाव मात्र विसरू नका ?

 

Article Categories:
रोमांचक

प्रतिक्रिया व्यक्त करा