एक भीषण वास्तव

Written by
स्थळ- Royal Albert Hall, UK.
टाळ्यांचा कडकडाट थांबला. मीरा तिचं मनोगत व्यक्त करण्यासाठी स्टेज वर उभी होती. “कुठून सुरू करावं, काय बोलावं हे मला या क्षणीही उमजत नाहीये खरंतर..” एवढं बोलून मीरा ने डोळे बंद केले..एक ५ सेकंद पॉज..तिच्या मनात जणू एखादी चित्रफित तरळून गेली. आनंदाची, दुःखाची, हुरहुरीची, तळमळीची. सर्वजण ऐकण्यासाठी आतुर..आणि पिनड्रॉप सायलेंस…
मीरा ने डोळे उघडले आणि मनोगत सांगू लागली. “यंदाचा संस्कृती पुरस्कार मला मिळाला, याचा मला फार अभिमान आणि आदर वाटतोय. मान्यवर, पुरस्कार आयोग यांचे आभार. महाराष्ट्रातील छोट्या गावापासून सुरू झालेला एक प्रवास ते आजचा परदेशात मिळालेला सन्मान; प्रवास सोपा नसला तरिही तो छोट्या छोट्या रूपात सार्थकी लागतो आहे याचं समाधान जास्त. मी तुमचा फार वेळ न घेता माझा अनुभव मी शेअर करते. मी जे सांगते आहे, ते वास्तव आहे, ज्याचा विचार प्रत्येक वादकाने करावा. वादकांचे पालक उपस्थित असतील तर नमूद गोष्टी पडताळून पहाव्यात. विषयाची व्याप्ती फार मोठी आहे, त्यामुळे  काही उल्लेख जास्त खोलात न जाता माहितीपूरक करते.
एका छोट्या गावातून शहरात शिक्षणासाठी आलेली एक मुलगी, पुण्यात गणपतीची मिरवणूक पाहते काय, भारावून जाते काय ..सगळंच नवल वाटायचं तिला. त्यावेळी ढोलपथक मुलांचे राज्य. सहज म्हणून थांबलेल्या एका वादक दादाला विनंती करून ढोल वाजवून पाहते. त्यावेळी नवखी असल्याने वाद्याबद्दल फार कळत नव्हते  पण तो ताल तिला पुढे नेत होता..त्या दादाने त्या १५ मिनिटांत टिपरु कसं धरायचं, ताश्याची लय ताल ओळखायची आणि पहिला ठोका, थापी शिकवलेली. मला संगित मात्र उमजत होतं. दुसऱ्या दिवशी ये तालमीत लय भारी जमतंय बघ तुला एवढं तो बोलला. मी गेलेही, पण शर्ट पँट मधे अवघडायचे..ऐन मिरणुकीला नऊव्वारी नेसून उभी असणारी मी एकटी वादक होते. आयोजक व सोबती कोणालाही पटत नव्हते. मला त्या मिरवणूकीत वादन करू दिले नाही. शेवटच्या शिवस्तुतीला बोलावले, आनंदानं वादन केले. प्रेसचे फोटोग्राफर्स नी दुसऱ्या दिवशीच्या पेपरला फोटो दिले, ते पाहून आणखी मुली इंप्रेस झाल्या, आम्हालाही यायचं , काही हौशी, काही फक्त फोटो भारी, आपलेही हवे एवढंच मनात ठेवून आलेल्या. मग दरवर्षी ही मुलींची संख्या वाढली. मुलींसाठी म्हणून मी स्वतः शिकवता शिकवता स्वतःचे वाद्यपथक सुरू केले. त्या दरम्यान लग्न ठरलं, सासरी सपोर्ट सिस्टीम होती, त्यामुळे अगदी झोकून देऊन हे आवडीचे काम चालू होते. मुलींची संख्या वाढली. बॕचेस दिवसभर चालत. सोबतीला मदतनीस घेतले. कामं वाटून दिली की सोपी होतात. दुसरं  वाद्यपथकही सुरू झालेले. तर असा प्रवास सुरू होता.
गणपती आले कि उधान असायचं माझ्या सर्व विद्यार्थीनींना. त्यावर्षी २१ तालांचं महावादन आम्ही आयोजित केलेलं. सलग २ तास वादन चालू होतं. माझ्या विद्यार्थीनी आलटून पालटून सर्व मन लाउन ढोल, ताशा, काही स्वतःहून ड्रेस ठिक कर, मेकअप व्यवस्थित कर अशी हौसेने काम करीत होती. त्यांचा उत्साह मलाही हुरूप देत होता. १२ ताल झालेले, एका क्षणी पोटात चमक निघाली की काय असं ओझरतं वाटून गेलं. वादन अखंड चालू होतं, मी काही वेदना झाली हेही विसरून गेले १७ ताल झाले  तेव्हा थोडं दमल्याप्रमाणे वाटू लागले, मी थोडे थांबून सुरू करु या विचारात असतानाच महापौर कार्यक्रमात हजर, मी थांबू शकत नव्हते. १९ ताल झाले, मला जाणवले थापी देताना हलकी वेदना झाली. आता थोड्या वेळात संपवू वादन म्हणून मी एकही छोटा का असेना ब्रेक घेतला नाही. २०वा ताल मला ना पाय उचलला जात होता ना कमरेला बांधलेला ढोल सांभाळता येत होता,ताशाचा नाद थांबला, सर्वाचा एक ठोका सोबत पडला, माझा मात्र १-२ सेकंद लेट पडला. तो चुकीचा ठोका सर्व डिस्टर्ब करून गेला. मला कसेही करून २१ ताल पूर्ण करायचे डोक्यात होते, घामाघूम अवस्थेत २१वा ताल सुरू झाला. घशाला कोरड पडलेली. तरिही मी थांबले नाही, हेकेखोरपणे काहीही न ऐकता जोशात ताल धरलेला. २१वा ताल ज्या क्षणी थांबला, तेव्हाच मी खाली कोसळले होते.
जाग आली तेव्हा प्रचंड वेदना मला पाठीत, कमरेत, पोटात जाणवत होत्या, त्या वेदना इतक्या असह्य होत्या, कधीनव्हे ते अपशब्द नर्सला बोलून गेले. ती काही न बोलता पेनकिलर दिली आणि  खांद्यावर टॕप करून गेली.
राघव आला तसं मी पटकन विचारलं, राघव मी कशी
दिसत होते रे?? चंद्रकोर, गळ्यात माळ, फेटा..थोडा मेकअप करायला हवा होता, पण वेळ नाही मिळाला. मी काय म्हणते आता मी बरीये..कशासाठी ॲडमिट केलं? I know मी काही खाणं तर सोड पाणी सुद्धा विसरलेले, त्यामुळे बहुतेक चक्कर आली..बास आपण जाऊया घरी. राघव काहीच बोलत नव्हता. मी काही बोलणार, तेव्हा एकदमच चिडला “मीरा प्लिज जरा शांत राहशिल? आणि मला कालचंच काय त्या संदर्भात काहीही ऐकायचं नाहीये. स्वतःला फार हौस, आपल्या पुढे काय परिस्थिती वाढून ठेवलीय याचा अंदाज देखील नाही तुला.” राघवचा राग माहिती होता, पण काय होतंय किंवा झालंय काही कळत नव्हते. तितक्यात आई बाबा आले, बरं वाटतंय का गं, दुखत नाही ना? माझी नजर राघव कडे.. काय झालं आई पहा नं राघव ..आईंनी शांत हो डॉक्टरच काय ते सांगतील, राघव, मी, बाबा आम्ही तिघेही तुझ्यासारखे काळजीतच आहोत..तू फार खंबीर आहेस, राहशील..” पुढे  त्या काही बोलेना..”आई डोळ्यांत पाणी ??” उत्तर न देता त्या बाहेर गेल्या ..बाबाही आलोच म्हणत बाहेर.
मला राहवत नव्हते, राघव अजूनही खिडकीबाहेर नजर लाउन होता. ओ गॉड प्लिज राघव काय चाललंय? माझं बोलणं पूर्णपणे तोडत तो धावून आला..”मीरा..आपण आई बाबा होणं अवघड होऊन बसलंय..” मला तरिही अंदाज येत नव्हता. डॉक्टर आणि त्यांचे असिस्टंट आत आले, “मॉर्निंग मीरा, बीपी चेक केले, सो BP is normal. कालचा तुझा performance छान झाला, म्हणजे मी पेपर ला फोटो पाहिला ..फक्त आता थोडी काळजी करण्याची गरज आहे. तुझं वादन काही दिवस.. रादर काही महिने तुला थोडं बाजूला ठेवावं लागणार आहे.”
मी श्वास रोखून फक्त ऐकत होते. “तुझे सोनोग्राफी रिपोर्ट वरून असं दिसतय की गर्भाशयावर अतिरिक्त ताण आलाय, तू सक्तीने  आराम करावास असा माझा सल्ला आहे. तू आई होणं…(तो पॉज सर्वात जीवघेणा होता) It became little bit challenge now. सध्या तू स्वतः कडे लक्ष दे. वाद्यपथकाला ६ महिने सुट्टी. मला या याबाबत परत विचारणा नको. Alright take care. माझ्यासाठी हा खूप मोठा आघात होता. धीर एकवटून विचारलंही, म्हणजे  मी आई होणार नाही का? मला काहीच कळालं नाही तुमचं बोलणं…खरंतर बाळाचा अजून काही विचारही केला नाहीये..अचानक काय ..काल..”
“मीरा..शांत हो, कालचेच असे स्पेसिफिक नाही सांगता येणार मला. पण सतत ८-१० किलो वजनाचे वाद्य कमरेला बांधलेले, त्याचा ताण गर्भाशयावर आलाय. गर्भाशय नाजूक अवस्थेत आहे .. भविष्यात गर्भधारणा अवघड होऊ शकते, सद्ध्या इतकंच सांगू शकतो. आणि आत्ता you have lost 8 weeks foetus.६ महिने तू सक्तीने  आराम करावा. ओके.”  एवढं बोलून डॉक्टर बाहेर. आई बाबा, राघव चे आई बाबा सर्व आत आले.
“एकवेळ बाळ नसेल तरिही चालेल, माझ्या मीराला काही त्रास नको”राघव च्या  आईला सावरणे मुश्किल झाले होते. मला अजूनही काही वाटत नव्हते. आई होणं अवघड हेच शब्द कानांत घुमत होते. मला पेनकिलर्स दिल्याने वेदना थांबलेल्या, त्यामुळे मला काही त्रास वाटत नव्हता, काहीच घडले नाही असे वाटत होते. राघव अरे मी 8 weeks pregnant होते..and now I have lost my baby..मीरा काहीही विचार करू नको सध्या, आराम कर. त्यानंतर १५ दिवसांत मी रिकव्हर झाले.
घरातील सर्वच जण आता वाद्यपथका विषयी बोलणे टाळू लागले. त्यांची बाजू काळजी ने घेरलेली. कोणत्याही पालकांनी हेच केलं असतं. मी बळेच मन वळवण्याचा प्रयत्न केला, वाद्यपथकेच बंद झाली पाहिजेत या वाक्यावर आमचे संभाषण संपत असे. रडून उपयोग नव्हता, किती दिवस दुःख कुरवाळत बसणार. याही परिस्थिती मधून बाहेर यायचे हे मनात पक्कं होतं.
हा फार मोठा बदल होता अचानक घडून आलेला. त्या ६  महिन्यात माझ्याकडून झालेल्या चूका मी चिकित्सकपणे शोधल्या, जाणून घेतल्या. या ठिकाणी मी नसते, माझी विद्यार्थीनी असती तर काय झालं असतं. मला ह्या गोष्टी बदलायच्या होत्या. त्यासाठी डॉक्टरांचेही सल्ले घेतले.
दरम्यान पुण्यातील डॉ. कल्याणी यांचे लेख मला मिळाले. अवजड असणारे ढोलवाद्य तासंतास तरूणी कमरेला बांधतात, त्यांची मुलभूत वारंवारता (fundamental frequency) २० हर्टस पेक्षा कमी येते आणि ती वादकांच्या शरिराला घातक आहे. भविष्यात या तरूणींना गर्भधारणा होण्यास अडचणी येऊ शकतात असा आशय त्यात होता. आणि हे सर्व माझ्या बाबतीत खरे ठरले होते, प्रत्यक्षात घडले होते.
६ महिन्यांनी, माझे दोन्ही  पथक मी नव्याने उभे केले. सर्व काळजी, खबरदारी घेऊनच. आज प्रत्येक वादकाचे  मेडीकल चेकअप करूनच प्रवेश निश्चित होतो. पालकांना प्रत्यक्ष आमच्या स्टुडिओमध्ये बोलावलं जातं, सर्व नियम समजून सांगितले जातात. त्यांची परवानगी असेल तरच प्रवेश मिळतो.
ऐकायला विशेष नवल वाटेल, पण आमच्या पथकात कोणत्याही वादकाला कमरेला वाद्य बांधण्याची परवानगी नाही. त्यासाठी आम्ही स्टँड बनवून घेतले आहेत, जे तुमच्या उंचीनुसार ॲडजस्ट करू शकतात. रस्त्याने मिरवणूक निघते, त्याला आम्ही विरोध करतो. आपल्या हौसेखातर इतर नागरिकांना त्रास देणं आमच्या पथकाला योग्य वाटत नाही/पटत नाही. वाद्य शरिरापासून दूर केले असले तरिही, वेळेचं बंधन त्यावर आणलं. एकावेळी अर्धा तास वादन करू शकतात. नंतर सक्तीने ब्रेक. आवाजावर नियंत्रण आणले आहे. त्यासाठी टेक्नोलोजीची मदत आम्ही घेतली. स्टुडिओ त्यानुसारच डिजाईन केला आहे. मग आमचे वादन पथक कसे काम करते, याबद्दल उत्सुकता असते, आमचे वादन आम्ही आमच्या स्टुडियो मधेच करतो आणि स्टेज परफॉरमन्स रूपाने  होतात. युट्युबला तुम्ही ते पाहू शकतात.
हे एवढं करायचीही काय गरज? अशीही विचारणा आम्हांला झाली, अजूनही होते. याचं कारण एकच संस्कृती! आपली वाद्य ही आपल्या परंपरेची ओळख आहे, जपणूक झाली पाहिजे. वादन करताना जे पूर्वी आपले पूर्वज वादन करत होते, तसेच केले पाहिजे हा अट्टहास कशासाठी, काळ वेळेनुसार बदल घडतच असतात, त्यावेळची त्यांची शरिरयष्टी मजबूत असायची शारीरिक मेहनतीचा त्यांना सराव असल्याने त्यांना तसे अवजड वाद्य, वादन सोपे जात असेल. आज त्या पद्धतीत बदल केला तर काय बिघडलं?
आणखी एक शेवटचं, घडलेली घटना हे एक भीषण वास्तव आहे. वादक तरूणींनी, पालकांनी इतकंच कशाला  प्रत्येकाला हे वास्तव तेवढ्याच सिरियसनेस ने माहिती असावे. आपण सर्वांनीच याबाबत जागरूक असावे. आपण बघ्याच्या भूमिकेत असलो तरीही ते वादन, तो जोश आपल्याला हूरळून टाकतो.  दिखाऊपणा, सोशल नेटवर्कींगवर वायरल होणे अथवा फक्त फोटोसेशन हे  तुमच्या विचारात असेल तर वेळीच सावरा स्वतःला. तुमची हौस महागात पडू शकते. जबाबदार होऊन वागणे हे गरजेचे आहे. आपली परंपरा आपण जपायची आहे, त्यामुळे सामाजिक भान जपायला हवं. मिरवणूकां मधला आमचा सहभाग आम्हीच टाळला. सलग अमूक तास वादन ही फॕड बंद झाली पाहिजेत. प्रत्येक वादक ही वाद्यपथकाची जबाबदारी आहे. त्यांची हेळसांड होऊ नये. आज शेकडो ढोलताशा पथके आपल्या आजूबाजूला आढळतात, तरूणींनी हौस, मौज, आनंद तर घ्याच परंतु स्वतःच्या काळजीचेही भान राखावे.
मला विशेष अभिमान आहे, आमचे वाद्यपथक या भाऊगर्दी पेक्षा वेगळे आहे. या वेगळेपणाचाच हा आजचा सन्मान. मी सर्वांची आभारी आहे. धन्यवाद!!”
Article Categories:
मनोरंजन

Comments

  • फारच स्पष्ट सत्य लिहलय. मस्तच.

    विकास 7th ऑगस्ट 2019 12:36 pm उत्तर

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत