#एक_व्यथा_अशीही

Written by

“आजी… आईला सांग बरं.. मी कितीदा सांगत्येय पण माझं ऐकतच नाही.. विनाकारण काळजी करतेय माझी..” नुकतीच नववीची परीक्षा दिलेली अन्वी आजीला फोन करुन आईची तक्रार करत होती.

“अगं पण काय झालं सांग तर खरं..” आजी.

“काही विशेष नाही गं.. पहिल्यांदाच पिरीयड्स आलेत.. थोडा त्रास तर होणारच ना.. आणि आम्हांला हल्ली सांगतात गं स्कुल मध्ये सगळ्या गोष्टी समजावून.. पण ही ऐकतच नाही.. सकाळपासून नुसत्या सूचना देतेय. आणि आता तर काय म्हणे ऋतुन्हानाचा कार्यक्रम करायचा.. आजकाल कोण करतं गं आज्जी.. पिरीयड्स आले त्यात काय एवढं विशेष..कशाला साजरं करायचं.. सगळ्यांनाच येतात..!!

ती आजी-नातीचं सगळं बोलणं ऐकत होती.. अन्वीचं शेवटचं वाक्य ऐकलं आणि तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं.. हातातल्या हिरव्या साडीवरुन अलवारपणे हात फिरवत ती हळूच पुटपुटली.. “कसं सांगू बेटा.. सगळ्यांच्याच नशीबात नसते गं हे सुख.. निसर्ग सगळ्यांनाच नाही हा आनंद देत.. काहींची ओटी कोरडीच ठेवतो..अगदी शेवटपर्यंत..!!” ही तीच साडी होती जी तिच्या कोवळ्या वयात तिच्या आईने तिच्यासाठी हौसेने आणून ठेवली होती. तिने ती अगदी जपून ठेवली होती.. कपाटाच्या खालच्या कप्प्यात.. तशाच कितीतरी आठवणी..स्वप्ने..इच्छा आणि दु:खं पण ठेऊन दिली होती. आज सगळं दाटून आलं.

ती आठवीत असतानाच वर्गातील मुलींना पिरीयड्स यायला सुरु झाले. त्या काळी या गोष्टीवर इतकं मोकळेपणे बोललं जात नसे. तरी फक्त मुलींचाच वर्ग असल्याने हळू आवाजात चर्चा चालायची. तिला बरं वाटायचं.. अजून आपल्याला पाळी नाही येत.. किती तो त्रास.. पोटदुखी.. इकडे जाऊ नको.. असं बसू नकोस.. मोठं झाल्याची जाणीव…!! पण हळूहळू तिच्या वर्गातील आणि शेजारपाजारच्या सगळ्याच मुली न्हात्या झाल्या.. शेवटच्या दिवशी न्हायल्यावर तिच्या मैत्रिणी खूप सुंदर दिसायच्या.. अगदी गुलाबाच्या फुलासारख्या टवटवीत.. तेव्हाच तिला जाणीव होऊ लागली की आपण यांच्यासारख्या नाही.. काहीतरी वेगळ्या आहोत. दवाखाने झाले.. देवाधिकाचं बघून झालं.. सगळे प्रयत्न झाले पण कशालाच यश आलं नाही. मैत्रिणींचं ऋतुन्हाणं साजरं होऊ लागलं.. काहींच्या घरी चोरुन ओटी भरली जाऊ लागली.. अशा कार्यक्रमावरुन आल्यावर आई गुपचूप अडगळीच्या खोलीत जाऊन पदराने डोळे टिपत असायची. तिच्या गर्भाशायलाच प्रॉब्लेम होता आणि ऑपरेट करण्यात अडचणी होत्या.. विसावं वर्ष लागलं आणि आई-वडीलांनी देखील प्रयत्न करायचे सोडले. हे असंच आहे हे स्विकारायला त्यांना खूप जड गेलं.

तिच्या मन:स्थितीची तर कुणाला कल्पनाही करवणार नाही. आई होऊ शकणार नाही म्हणून लग्न नाही. तिला देखील लग्न करायचं होतं.. नवऱ्यावर भरभरुन प्रेम करायचं होतं.. छोट्या पिल्लांना घेऊन सगळीकडे मिरवायचं होतं.. सगळ्यांकडून लाड-कौतुक करुन घ्यायचे होते.. पण अशा कितीतरी इच्छा, अपेक्षा तिने मनाच्या तळाशी डांबून ठेवल्या.. आणि हसत मुखाने वावरत राहिली.. आई-वडीलांसाठी. पण त्या वेदना.. कोरडं असण्याची जाणीव तिच्या डोळ्यातून कितीही लपवली तरी व्यक्त होत असे.

अशातच त्याचं स्थळ सांगून आलं… पहिल्यांदाच.. माळवलेल्या आशा पुन्हा जाग्या झाल्या.. तिला संसार हवाच होता पण तडजोड करुन किंवा कुणाचीतरी सहानुभूती म्हणून नको होता.. नाईलाजानेच ती समोर गेली. नऊ महिन्यांच्या छोटीला घेऊन तो देखील त्याच्या आईसोबत तसाच नाईलाजाने तिला पहायला आला होता. बाळाच्या जन्मावेळीच त्याची बायको दगावली होती. जेमतेम दीड वर्षांचा संसार त्यांचा… बायकोच्या जाण्याने निर्माण झालेल्या पोकळीने तो खचून गेला होता. त्याला तिच्या नजरेतही तसाच एकटेपणा दिसला… तिची आणि छोटीची नजरानजर झाली.. क्षणमात्र.. दोघींना कळलं एकमेकींच दु:ख.. छोटीने तिच्याकडे ऊसळी घेतली.. तिने देखील पटकन छोटीला जवळ घेतलं.. घट्ट पकडलं.. जणू काही जन्मोजन्मीचं नातं होतं त्या दोघींचं.. एवढ्या समरुप झाल्या.. तीन समदु:खी जीव एकत्र आले होते. एकाकीपणाच्या नाजूक धाग्याने त्यांना एकत्र बांधलं होतं. पण मग त्यांनी मागे वळून कधी पाहिलंच नाही. आलेला प्रत्येक क्षण साजरा करत गेले. त्याचा अन् तिचा संसार बहरत गेला..छोट्या अन्वीने तिला पूर्णत्व दिलं.

अन्वी नववीत गेली तरी तिला देखील पिरीयड्स आले नाहीत.. मग तिही धास्तावली.. हा योगायोग असावा का.. जे दु:ख मी भोगलं तेच माझ्या लेकीला भोगावं लागेल की काय अशी भिती तिला वाटू लागली. अशा मन:स्थितीत असतानाच अन्वीने पोट दुखत असल्याचं आणि ब्लिडींग होत असल्याचं तिला सांगितलं.. तिला कोण आनंद झाला.. कितीतरी दिवसापासून आणून ठेवलेलं पॅड्सच्या पॅकेट तिला दिलं.. शंभर सूचना सांगितल्या.. तरी मन भरत नव्हतं.. काय करु अन् काय नको असं तिला झालं होतं..

आजीने हे सगळं सांगितल्यावर अन्वीचे डोळे पाणावले.. आईजवळ येवून म्हणाली, “किती गं सहज केलंयस तू आई.. आता इथून पुढचे सगळे क्षण दोघी मिळून अनुभवू.. माझ्या आनंदात तू तुझ्या कोवळ्या वयातल्या सगळ्या व्यथा विसरुन जाशील..” आपल्या अल्लड छकुलीच्या तोंडचे असे शहाणपणाचे बोल ऐकून तिला खुदकन हसू आलं.. ती म्हणाली… अनू.. तू खरंच शहाणी झालीस की गं.. आणि दोघी एकमेकींच्या कुशीत शिरुन जोरजोरात हसू लागल्या.©Madhuri Ivare Pawar

Article Categories:
नारीवादी

Comments are closed.