ओली की सुकी

Written by

” भाई टूर्नमेंटला गेलतो काल… तालुक्याच्या ठिकाणी ” ‘ आयला , भारी की…. काय केलं मग ‘ ” बॅटिंग ला उतरवलंचं नाही त्यांनी ” ‘ उगाच गेलता का मग ? ‘ ” मला टीम मधी तरी घेतलं त्यांनी… तुला तर बॉन्डरीच्या बाहेर बॉल धरायला पण ठेवलं नसतं ” ‘ जास्त तोंड नको चालवू… सगळ्या गल्ली ला माहिती आहे कोण कसं खेळतं ते ‘ ” असल दम तर लाव ना मग मॅच ” ‘ हा लाव की मग… भीतोय व्हय मी ‘ ” उद्या शाळा सुटली की लगेच इथंच ग्राउंड वर भेटू ” शाळेतून घरी येत असतांना त्यांच्यात अचानक भांडणाला सुरुवात झाली… घर अजून लांब होतं… पण त्यांच्यातलं संभाषण मात्र बंद झालं होतं… दोघांच्या मनात उद्याची मॅच जिंकायचा विचार घोळू लागला… शनिवार असल्याने उद्या सकाळची शाळा होती… पूर्ण दिवसभर सामने रंगणार होते… दोन गल्ल्यामधले सामने… दिवस उजाडला… शाळा सुटली…मैदानावर पोर येऊ लागली… ” हे आमचे पाच जणं ” ‘ माझ्याकडे सहा जण आहेत ‘ ” शेवटच्याला कॉमन ठेवू मग… ” ‘ मी राहतो भो कॉमन… पण फक्त विकेटकीप्रिंग करलं… आणि दोन्ही साईड नी एक एक ओव्हर बॅटिंग पाहिजे ‘ सदर मागण्या दोन्हीही बाजूने मान्य करण्यात आल्या…ओली की सुकी… टॉस झाला… ” बॉल फुटायवर आला आहे भो … आधीच सांगतो … ‘ तुमच्या इनिंग ला तुमचा वापरा आणि आमच्या इनिंग ला आमचा ‘ ” आणि आमच्या बॅट घायच्या नाही रे भो … ” ‘ सात ओव्हरची मॅच…. सातवी कॉमन ला ‘ कॉमन चा चेहरा खुलला होता… नियमावली इव्हाना संपत आली होती… ” गटारीच्या पलीकडे दोन दा फुल्टस मारला तर आऊट रे … ” ‘ अन जो गटारीत मारेल त्यानेच काढून आणायचा ‘ ” चल आता टॉस पाडू ” डॅडी माझ्या ‘ टॅब ‘ मध्ये EA स्पोर्ट्स क्रिकेटचा गेम टाकून द्या ना… माझ्या फ्रेंड कडे पाहिला… बेस्ट आहे एकदम…. त्याच्या कानावर आवाज आला… तो थोडा दचकला… ” हो बेटा ” आपल्या पोरासाठी टॅब मध्ये गेम डाउनलोड करत असतांना त्या ‘ तालुका रिटर्न ‘ प्लेयरला ” होम ग्राउंड ” वरचा प्रत्येक ‘ प्रसंग ‘ अजूनही जसाच्या तसा आठवत होता… एव्हाना नैसर्गिक हास्याची जागा कृत्रिम हास्याने घेतली होती…

Article Tags:
·
Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा