“औकात”

Written by

*औकात*
..बाप घरी यायची येळ झाली तशी अक्ष्याचं पाय आपसूकच घराभायर पडलं.. गेलं काही दिस त्यो ठरवूनच असा वागत व्हता .. आधी त्याच्या माय न ईचारायच ठरिवलं, पन तो काऊन अस वागतोय हे म्हायती असल्यानं ती गप ऱ्हायली..
..अक्ष्याने पन इचार केला, काय सांगायचं त्यात? कारन न्हेमीचंच तर व्हतं.. आता त्यो बाप म्हनवणारा यनार, दारू पिऊन ल्हास झालेला.. आल्या आल्या माय-भैनी वरून गाळ्या देनार.. जो गावलं, त्याला झोडपून काडणार , अन सीद्धा झोपाय जानार..
अन, रातीची जाग आलीच तर मायचं शरीर ओरबाडत ऱ्हानार.. अन त्ये बी आम्हा सर्व्या पोराम्होरच.. लहानग्यांच एक येळ बर हाय, त्याना काय उमगत न्हाय, पन त्ये बी कवा कवा टक लावून पाहत्यात, बा अन माय रातीच अस काय करत्यात म्हनून.. मायने त्याना दोन रट्टे दिल्यापासून बारके दोघ काय ईचारत न्हाईत,.. पन, माज् काय ? मला आताच बाराव वरीस सरलंय.. सगळं समजायच्या वयात आलोया मी.. बापाला सांगूनबी काय कळनार न्हाय.. माय त्या दिवसी बोलायला आली तर, “त्याची तरफदारी करू नगस.. त्याची औकात मी चांगलीच वळखून हाय.. बाप म्हनून घ्यायची लायकीच न्हाय त्याची..”अस म्हनून डोसक्यात राख घालून निघून गेलो आपुन तिथन..
त्या दिसापासून मी असाच भायर जातो बाप यायच्या येळेेला..बाप झोपल्यावरच घरी परतायचं,अन भायेरच्या वट्यावरच झोपायचं, अस चालू हाय आपलं..
इकडतीकड टाइमपास करून न्हेमीच्या येळला अक्ष्या घराकडं परतला.. पन न्हेमीसारक वस्तीला झोप नवती.. वस्ती टक्क जागी व्हती.. अक्ष्याला बघताच गर्दीला तोंड फुटलं..”पाठ तर फोडूनच काढली बया, .. देवबी असा काय वागतो कुनास ठावूक..”
अक्ष्या ते आयकून धावतच घराकडं निघाला, “त्या बापाची तर.. शेवटी औकात दावलीच.. न्हाय सोडनार आज..”.
पन घरी जाताच त्याच पाय थबकलं.. समोरलं बघून डोळ्यात पानी याला लागल..
.. धाकला पळतच त्याच्याकडं आला, अन सांगू लागला,” दाद्या, ह्ये बग काय झालाय.. कुनीतरी त्या आग्यामोहोळला दगुड मारून पळालं.. अन साऱ्या माशा घरात घुसल्या की.. हे एवढाल्या येकेक.. आमाला डसू लागल्या.. बा झोपला व्हता..त्याला बी चावल्या, तसा त्यो उठला, अन आमच्याकडं धाऊन आला, अन माय, मी, अन बबलू ला अंगाखाली घेऊन झोपला.. मंग न्हाय चावली एक बी माशी..मंग बाजूवाले मामा आले, अन त्यांनी मोठा धूर करून माशा पळविल्या..”
धाकटा अजून काहीबाही सांगत व्हता..पन अक्ष्याला फक्त बापाची मधमाशांनी फोडलेली पाठ दिसत व्हती.. अन सुरक्षित असलेले घरचे..
बापाची “औकात” त्याला आज नव्याने समजून आली होती.

Article Categories:
सामाजिक

Comments are closed.