कंटाळा अभ्यासाचा…!

Written by

कंटाळा अभ्यासाचा…!

निर्मय म्हणजे अगदी खोडकर मुलगा आणि तितकाच लोभस सुद्धा. त्याला खेळायला फार आवडायचं. दिवस रात्र जरी तो खेळत राहिला तरी तो थकणार नाही इतका प्रचंड उत्साही..!तितकाच निसर्ग प्रिय. निसर्गाला इजा होईल असं कुठलंही काम तो करीत नव्हता. त्याला झाडाचं, फुलांच सुद्धा फार वेड होतं. त्याचा घराच्या गॅलरीत तो तासनतास बसून झाडांना बघत बसायचा. पण ह्या सगळ्यांमुळे त्याचे अभ्यासाकडे फार दुर्लक्ष व्हायचं. अभ्यासात तो हुशार होता पण कंटाळा करुन तो पुस्तकांना हातात घेत नसे. उमाने त्याला खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण सारंच व्यर्थ होत… सकाळी सहजच खाली फिरतांना सुकलेल्या झाडांकडे बघून तिच्या डोक्यात छान युक्ती आली आणि ती प्रत्यक्षात आणायचं तिने ठरवले.

सुट्टीचा दिवस असल्याने निर्भय आज उशिराच उठला. ब्रश करुन तो स्वयंपाक घरात येऊन उमाला बिलगला. आता सकाळ उठून आई परत अभ्यासाला बस असेच म्हणेल म्हणून आधीच आईला खाली खेळायला जाण्यासाठी लाडीगोडी लावत होता…उमाने त्याला थोडं खायला दिले आणि “मला एक छान गंमत करुन बघायची आहे ,माझ्या मदतीला येशील का ?” म्हणून हसतच त्याला विचारले.

” काय करुन बघायचं आहे तुला ..” तोंडात बिस्कीट टाकताच फार आश्चर्याने विचारले….

” सोबत चल ना, सगळं सांगते ” म्हणतं त्याला गॅलरीत घेऊन गेली.

” आई आपण इथे काय करणार आहोत..?” त्याचे प्रश्न सुरूच होते.

” अरे बघ तर… बघ मी काय करते आहे..” ती त्याला धीर देत म्हणाली.

तिथे ओळीने तिने अनेक रोप लाऊन ठेवली होती. त्यात त्याची आवडती गुलाबाची रोप सुद्धा होती.. झाडाकडे बघत ती म्हणाली ” छान आहे हे रोप..”

” हो आई ..खूप छान आहे..” निर्भय म्हणाला…

” उचल मग ही कुंडी आणि आता घरात आणून ठेव…” उमा म्हणाली…

“आता का ठेवायची?” त्याने विचारले…

निर्भयने हात कुंडी घेतली आणि उमाच्या सांगण्यानुसार घरातल्या एका कोपऱ्यात नेऊन ठेवली.

” आई इथे कुंडी ठेवायची..?” त्याने परत उमाला विचारले…

” अरे हो रे बाळा, हीच तर गंमत आपल्याला करुन बघायची आहे…” उमा म्हणाली आणि गालातच हसली…निर्भय मात्र पुरता गोंधळलेला होता. त्याने लाडात येऊन परत उमाला विचारले..” आई तू नक्की काय करणार आहेस ते झाड घरात ठेऊन ?”

आता ह्या झाडाचं काय होणार हे आपण दोन दिवसानंतर बघू,अस सांगून निर्भय जरा शांत झाला. दोन दिवस झाल्यावर उमाने निर्भयला नेमकं काय केलं हे सांगायला जवळ घेऊन बसली. जे रोप तिने घरात आणून ठेवले होते ते आज पाणी टाकूनही सुकायला आलं होत. हे बघून त्याला आश्चर्यच वाटलं. तो उमाला काही विचारणार तितक्यात तिने त्याला गॅलरीत घेऊन आली. गॅलरीतले रोप एकदम छान होते…फुललेले…घरातील रोप अस का झालं ह्या विचारात निर्भय मग्न असतांना उमा म्हणाली,” बाळ तुला लक्षात आलं का घरात ठेवलेलं रोप का वाळून गेलं? कारण त्याला पाणी मिळालं पण पुरेसा सूर्यप्रकाश मिळाला नाही. म्हणून ते वाळत चाललं आहे. ”

” मग ह्यात गंमत काय झाली ?” निर्भय उमाकडे बघून म्हणाला.

” अरे बघ ना, जस त्या रोपाला सूर्यप्रकाश न मिळाल्याने ते रोप सुकलं तसच प्रत्येक विद्यार्थ्याच असतं. जर त्याने नियमित अभ्यास केला नाही तर त्याला त्याच्या जीवनात यश प्राप्त होत नाही. कारण, रोजचा रोज मन लाऊन अभ्यास केला तर अभ्यास चांगला होतो आणि परीक्षेच्या वेळी आपली धांदल उडत नाही. नियमितता ही यशाची गुरुकिल्ली आहे. जस एक रोप मोठ व्हायला त्याला सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते तसेच विद्यार्थी असतांना नियमित अभ्यास आवश्यक असतो. हीच गंमत होती मला तुला सांगायची. तू अभ्यास करतो ,पण नियमितपणे करीत नाहीस ना ,मग आपल्यामध्ये योग्यता असून सुद्धा आपण चांगले मार्क मिळवू शकत नाही…”

निर्भयला आपली चूक समजली आणि त्याचा चेहरऱ्यावर डोळ्यातून टपटप थेंब गळत होते. ” आई , माझं खरचं चुकलं. आता मी रोज नियमित अभ्यास करणार. अभ्यासाचा कंटाळा मुळीच करणार नाही…खेळाचा वेळ ठरवून टाकणार आणि टीव्ही पण थोडाच वेळ बघणार…” पुढे त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडत नव्हते . कारण त्याचे डोळे भरुन आले होते…

मग कशी वाटली कथा? मला सांगायला विसरु नका. तुमच्या प्रतिक्रिया मला अमूल्य आहे …

धन्यवाद…!

©नेहा खेडकर.

Article Categories:
शिक्षण

प्रतिक्रिया व्यक्त करा