“कच्चा चिवडा”

Written by

आज शुक्रवार…
गावात आज बाजार भरलेला असणार…
तो तळलेल्या पदार्थांचा सुगंध अजूनही आठवणीत माझ्या दरवळतो…

माझं आजोळी फार जाणं येणं असायचं आधी.
आमचे आजोबा (आप्पा)गावात बऱ्यापैकी श्रीमंत.
मोठा वाडा,
त्याहून मोठा गायवाडा,
गाई , बैल, म्हशी, बकऱ्या , कुत्रे आणि त्यांची सुंदर पिल्लं.
जस भरलेलं गोकुळ…

वाड्या समोरचं शेणाने सारवलेलं अंगण…
तो मातीचा सुगंध…
आजूबाजूची कौलारू घरे..
वाड्यासमोरच्या रस्त्याच्या पलीकडे वडाचे झाड…
जसं एखाद्या चित्रकाराने रंगविलेले सुंदर चित्र.

असो आठवाव्या तेवढ्यां कमीच त्या आठवणी..

गावात आठवडी बाजार असला की त्या दिवशी गावात एक वेगळीच धूम असायची. प्रत्येक घरात लगबग…
कोणी बाजार मांडणार म्हणून, तर कोणाला बाजार आणायचा म्हणून, तर कोणी आपलं उगीच…
पण लगबग तर असायचीच..
आणि वाट असायची ती बाजार भरण्याच्या वेळेची.
कारण आठवडी बाजार म्हणजे आमची मेजवानी च…

दुपार संपताच सायंकाळ होता होता बाजार भरायचा गावात तो थेट आमच्या घरापर्यंत यायचा..

आम्ही मात्र वाट बघायचो ते आप्पा बाजारात जायला तयार केव्हा होतात याची…
त्यांचं जेवण होऊन तासभर झोप झाली की ते दारातून बघायचे बाजार कुठपर्यंत भरला ..
मग ते थेट तयारीला लागायचे …
कडक इस्त्रीचा पांढरा सदरा, पायघोळ पांढर पण बारीक किनारीचे धोतर, टोपी ती ही इस्त्रीचे आणि कडक इस्त्री हो…

हा.. झाले तयार..
आम्ही तर वाटच बघायचो की केव्हा निघतात..

सोबत एक गडी आणि पिशव्या घेऊन निघायचे आप्पा..
कधी कधी आम्ही ही जायचो बाजारात पण फार वेळ फिरण्याची मुभा नसे आम्हा चिमुरड्यांना..
खाऊ घेऊन दिला की गाड्यासोबत आमची रवानगी थेट घरी असायची..

बाजारात अनेक दुकाने असायची भाजी,फळं, भांडे, खेळणी… पण आमचं लक्ष सगळं खमंग भाजून मिळणाऱ्या मुरमुऱ्यांकडे, फरसाण आणि गरम गरम जिलेबी कडे…

आता वाट त्यांच्या (आप्पांच्या) परतण्याची…
अंधार पडायला लागला की बाजारातील गर्दीही ओसरायला लागते..

ते घरी येण्याची वेळ झाली हे बघून आमची माई (आजी) गडी-बाईला घेऊन कामाला लागे. आप्पांना आल्या आल्या गरम वाफाळता चुलीवरचा चहा लागत असे..

आप्पा आले की घरात लगबग सुरू होत असे..
आणलेले सामान काढणे, भरून ठेवणे, फळं वेगळी काढणे, आणि  ….
आणि आमचा खाऊ वेगळा काढून ठेवणे…

हे सगळं आटोपलं की आत्ता खरी मजा असे ती आमची.
आप्पा मोठ्या उत्साहाने सगळ्यांसाठी ‘कच्चा चिवडा'(भेळ) बनवत असे…

एका मोठ्या पातेल्यात भडंग, मुरमुरे, दाणे, फुटाणे, फरसाण, जाडी शेव, बारीक शेव, पापड्या सगळं प्रमाणात टाकून मिक्स करत असे…
त्यावर ताजा पातीच्या कांद्याची कातरण, हिरवी कोथिंबीर, लाल टमाटे बारीक चिरलेले तेही ताजे ताजे..
लिंबू आणि साखर घालून परत मिक्स करे..
आणि कच्चा चिवडा तयार…

अहाहा…
पाणी सुटलेच बघा…

दिवसभऱ वाट बघितले त्याचे आता चित होणार या आशेने बसलेले सगळ्या चिमुरड्यांना हा कच्चा चिवडा मनसोक्त खायला मिळत असे आणि मग गरम गरम जिलेबी चा आस्वाद….

पोट भरून चिवडा खाल्यावर सगळे अंगणात आप्पा आणि माई सोबत मस्ती करत, भुताच्या गोष्टी ऐकत, रात्रीच्या अंधारात आकाशातील चांदणं बघत झोपी जात असू…

असा हा ‘कच्चा चिवडा’ खाऊन पोट भरून मिळाला तरी मन भरत नसे परत वाट असायची ती पुढच्या शुक्रवारी असलेल्या बाजाराची…

आता आप्पा तर नाहीत पण त्यांच्या आठवणीत आम्ही आजही त्याच उत्साहाने ‘कच्चा चिवडा’ बनवून त्याचा आस्वाद घेत आहोत…

                                                        —

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा