कणखर पुरुषाची व्यथा

Written by

©सरिता सावंत भोसले

एरवी सकाळी सहाला उठून मॉर्निंग वॉकला जाणारा तो आज साडेसात वाजले तरी अंथरुणात होता. उठवायला म्हणून हात लावला तर अंग तापाने फणफणत होत. उठू नको आराम कर..तुला ताप आलाय अस सांगूनही तो उठलाच आणि ऑफिसला जायला उशीर होईल आता अस म्हणत आंघोळीला गेला. आज नको जाऊ कामावर…डॉक्टरकडे जाऊन ये आणि आराम कर सांगताच म्हणाला मागच्याच आठवड्यात बहिणीच्या लग्नाला चार दिवस सुट्टी घेतलेली पण तीच जास्त दिवसाची झाली..आता सगळ्या सुट्ट्या संपल्या. सुट्टी घेऊन आता परवडणार नाही..महिन्याचं सगळं बजेट हलेलं आणि परीचाही वाढदिवस आलाय…ओव्हरटाईम करावं लागेल. मेडिकल मधून गोळ्या घेऊन खातो…होईन बरा आजच. काही बोलायच्या आतच डबा घेऊन तो निघून गेला.

त्याच्या बोलण्याने अचानक बाबांची आठवण आली. ते पोलीस खात्यात..त्यामुळे चोवीस तास ड्युटी…तुमचा रविवार असो की मग कोणताही सणवार…सुट्टी हा प्रकार तिथे नाहीच. कधी सुट्टी घेतलीच तरी तातडीने फोन आला की जावं लागायचं. मला जेव्हा ताप यायचा तेव्हा मी शाळेतून सुट्टी घेऊन आराम करायचे..तेव्हा बाबांचा रात्रभर डोळ्याला डोळा लागायचा नाही. सकाळी उठून ते पुन्हा कामावर हजर. त्यावेळीही मला प्रश्न पडायचा बाबांना ताप वगैरे येत नसेल का कधी….बाबा कधीच सुट्टी घेत नाहीत. पुढे मोठं झाल्यावर ते किराणा मालाची बिलं, लाईट बिल,पाणी बिल, आमच्या शाळेची फी, आमची कपडे या सगळ्याची जुळवाजुळव करत महिन्याचा हिशेब जेव्हा वहीत मांडायचे तेव्हा कळायचं की या वहीत काही कमी किंवा कोणाच काही देणं बाकी राहायला नको म्हणून ते आजारपणालाही थोपवायचे. स्वतः प्रत्येक सणाला जुने शर्ट घालून आम्हाला मात्र नवीन कपड्यांनी नटवायचे. आमच्या जबाबदाऱ्या त्यांना कधी सुट्टी घ्यायची परवानगी देत नसाव्यात. आज ते रिटायर झाले तरी आमची काळजी,नातवंडांची काळजी यात ते नेहमी व्यस्त आहेतच.

आज आठवलं मला हवं तेव्हा मी ऑफिसमधून सुट्टी घेतली..लग्नाआधी बाबा आहेत सांभाळायला या विश्वासावर आणि लग्नानंतर नवरा आहे ना अस म्हणत त्याच्यावर विसंबून निर्धास्त राहीले. पण या पुरुषांना नसेल का वाटत कधी सुट्टी घ्यावी? कधी कंटाळा आला, कधी आजारी पडलो, कधी मनाला वाटल म्हणून घ्यावी सुट्टी अस वाटत नसेल का? वाटलं तरी कशी घेणार….संसार सांभाळायची,मुलांची हौस पुरवायची, वृद्ध आई वडिलांच्या तब्येतीची, बहीण भाऊ यांच्या गरजेची जबाबदारी त्यांच्यावरच तर असते…एका सुट्टीनेही त्याच बजेट इकडे तिकडे सरकू शकत या भीतीने तो यंत्रवत चालूच राहतो. कितीही दुःख आली,संकट आली, जवळची माणसं सोडून गेली तरी तो मात्र पहाडासारखा उभा असतो.

कदाचित उपजतच पुरुष म्हंटल की तू रडायचं नाहीस,दुःख गोंजारत बसायचं नाहीस,तू धाडशी आणि शौर्यवानच आहेस, सगळा परिवार,घर फक्त तूच सांभाळायचं…ही तुझीच जबाबदारी अस मनावर बिंबवलं जात आणि तो डोळ्यातले अश्रू पापण्याही न ओलावता रोखून धरण्याची अजब कला शिकतो. शांत,निःशब्द,अव्यक्त असा मनातच कुढत राहतो.

पण बायको,मुलं, आई,वडील सगळ्यांना ठाम सांगत राहतो ‘मी आहे ना..काही काळजी करू नका’…त्याचे तेच शब्द आधार बनतात. तोच सगळ्यांचा भक्कम आधार बनतो.

स्वतःची दुखणी लपवून सगळ्या परिवाराची आजारं, आनंद, मागण्या यांचं ओझं घेऊन तो आयुष्यभर चालत असतो…मुलांच्या,कुटुंबाच्या नजरेत पडू नये…सगळी सुख त्यांच्या पायाशी घालावी म्हणून रात्रंदिवस तो झगडत असतो. सगळ्यांच्या इच्छा ऐकण्याच्या नादात तो मात्र अव्यक्त, मुका राहतो. आपल्या माणसांसाठी परिपूर्ण बनण्याचा तो आटोकाट प्रयत्न करतो आणि कदाचित आपण आपली जबाबदारी पूर्ण करू शकत नाही या चिंतेने जेव्हा तो ग्रासला जातो तेव्हाच एका शेतकऱ्यातला पुरुष आत्महत्त्या करतो. घराचं छप्पर असणारा तोही कधीतरी कोलमडतो. पुरुषही दुःखी होतो पण मनातून..चेहऱ्यावर ते दाखवायला त्याला बंदी असते.

नेहमी स्त्रीच्या व्यथा, तिची दुःख, तिच्या कथा मी मांडत असते. आज पुरुष दिनानिमित्त पुरुषाच्या मनाचा ठाव घेण्याचा छोटासा प्रयत्न करून हा शब्दप्रपंच केला.

अर्थातच स्त्रीला दुय्यम दर्जा देणाऱ्या, तिची अवहेलना करणाऱ्या, अत्याचार करणाऱ्या, तिच्यावर ऍसिड हल्ला करणाऱ्या, बलात्कार करणाऱ्या नामर्दासाठी हा लेख नसून जे स्रीजातीचा सन्मान करतात…”मी आहे ना” अस म्हणून आपल्या कुटुंबाचा, जिवलग माणसांचा भक्कम आधार बनतात अशा कणखर पुरुषास हा लेख समर्पित🙏.

लेख कसा वाटला नक्की कळवा कंमेंट्स मध्ये. लेख आवडल्यास लाईक,कंमेंट्स नक्की करा आणि शेअर करा फक्त नावासहितच अन्यथा कॉपीराईट कायद्याअंतर्गत कारवाई केली जाईल😊🙏.

फोटो साभार गुगल

©सरिता सावंत भोसले

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा