#कथालेखन.. एका बायकोचे पत्र

Written by

स्मिताला अग्नी देऊन सुमित घरी आला. हताश होऊन तो बेडवर पडला. प्रयत्न करत असतो झोप येते का? पण नाहीच आता झोप कसली…आता तर नेहमीसाठी त्याची झोप उडाली असते. भिजल्या डोळ्यांनी तो स्मिताच्या फोटोकडे पाहतो. का गेलीस मला सोडून…त्याला विचारावेसे वाटते. का तुला आत्महत्या करावीशी वाटली. इतकी शिक्षा… मान्य आहे तुझ्यासोबत अन्याय केला मी पण त्याची इतकी मोठी शिक्षा …त्याच्या डोळ्यातून अविरत अश्रू वाहत असतात.

जेमतेम दोन वर्षाचा संसार. गोंडस, गोड,लघवी स्मिता त्याच्या डोळ्यासमोरून हलायला तयार नसते. तो लग्नाचा अल्बम बघायला टेबलाचा खण उघडतो. तोच समोर त्याला एक लिफाफा दिसतो. थोड्याशा अधिरतेने तो तो लिफाफा उघडतो. त्यात सुवाच्य अक्षरात स्मिताचे पत्र असते.

प्रिय सुमित,

तुला प्रिय म्हणावं का नाही हा मला प्रश्न पडतो नेहेमी. पण प्रियच. कारण माझे प्रेम होतेच तुझ्यावर आणि ते अनंत काळापर्यंत राहील. पण तुझे प्रेम आहे की नाही, हा मला पडलेला मोठाच पश्र्न आहे. प्रेम असते तर माझ्या बाजूने ठामपणे उभा राहिला असतास. किती स्वप्न घेऊन आले होते रे मी तुझ्या घरात लग्न होऊन. असे वाटत होते किती हौसेने संसार करू. तुझ्या आई बाबांची सेवा करू. पण नाहीच रे माझे स्वप्न अपुरेच राहिले बघ. काय अशी चूक केली रे मी की तुझी आई सतत मला कश्यावरूनही ओरडायची, माझ्या हातून छोटीशी जरी चूक झाली तरी आकाश पाताळ एक करायची, आणि त्यांचे ऐकून तुझे बाबाही मला बोलायचे. किती आशेने बघायचे मी तुझ्याकडे, की तू काहीतरी बोलशील तुझ्या आई बाबांना, समजावशील, पण नाही, कधी तुझे तोंडच उघडले नाही. तुझ्या समोर मला किती शिवीगाळ व्हायची रे, तुला कधीच वाटले नाही का याचा जाब आई वडिलांना विचारावा? माझे आई ,वडील, भाऊ कधी आपल्या घरी आले, तर तुझे आई वडील कधीच त्यांच्याशी धडपणे बोलले नाहीत, आणि कधी आईंच्या माहेरचे आले की सगळेच तुम्ही त्यांना कुठे ठेऊ नी कुठे नाही असे करायचाच, का रे असा भेदभाव. मलाही कधी वाईट वाटत असेल असा विचार सुद्धा शिवला नाही का रे तुझ्या मनाला? मध्यंतरी आपलं बाळ गेलं पोटात माझ्या, किती हळवी मनस्थिती होती माझी…. त्या काळात किती अमानुषपणे वागले तुझे आई बाबा माझ्याशी. वेळेवर जेवण नाही, त्यात टोमणे, कितीतरी काम लावली मला आणि वर शेजारी पाजारी जाऊन माझीच कशी चूक आहे हे सांगून आले. तुझ्यासमोर सांगितले ना काही बायकांनी आपल्याला तुझ्या आई बाबांनी किती बदनामी केली माझी ते, तरी तू गप्पच. मला वाटले आता तरी समजावशील तू त्यांना, पण नाहीच. मी मनातून खूप ढासळत होते रे. कंटाळा आला होता या सगळ्या वातावरणाचा. माहेरी निघून जावं हा पर्याय पटत नव्हता. तुझ्यात जीव गुंतला होता. पण आता वाटते..की  माझा जेव्हढा जीव तुझ्यात गुंतला होता कदाचित तेव्हडा तुझा जीव नसावा तुझा माझ्यात. खूप भरभरून प्रेम केले तुझ्यावर. तुझा रागही यायचा बऱ्याचदा. वाटायचे आपल्या बायकोवर होणारा अन्याय दिसत असूनसुद्धा हा माणूस गप्पच बसतो? काय करणार आपल्या आई वडिलांचा श्रावण बाळ आहेस ना तू? राग यायचा तसाच काही वेळात जायचा सुद्धा आणि परत तुझ्यावर दुपटीने प्रेम उफाळुन यायचे. वेडीच होते ना मी.

किती वेळा तुझ्या आई बाबांनी आपल्या लग्नातल्या मानपानावरून, देण्याघेण्यावरून चार चौघात तुझ्या समोर माझा अपमान केलाय. तरी तू गप्पच.

मला माहित आहे रे, ते तुझे आई वडील आहेत, तू त्यांचा मुलगा या नात्याने तुझे कर्तव्य आहे त्यांना सांभाळायचे, त्यांची काळजी घेण्याचे. त्यात मीही कुठे कसूर सोडत नव्हते. पण एक नवरा म्हणून पण तुझे कर्तव्य होते नाआपल्या बायकोवर होणाऱ्या अन्यायावर जाब विचारायचे, तुला माहित होते कोण चूक आहे नी कोण बरोबर. पण या गोष्टी तू डोळ्याआड केल्यास. तुला तुझ्या आई वडिलांच्या स्वभावाची कल्पना होती ना, नातेवाईकांशी त्यांचे संबंध कसे आहेत, त्यांच्या बद्दल काय मत आहे लोकांचे,हे माहीत असूनही तुझ्या आई वडिलांनी माझ्या बद्दल काही खोटेनाटे सांगितले की तुझा विश्वास कसा रे बसायचा? तुझ्या त्यांच्यावर असलेल्या प्रेमाचा गैरफायदा घेतला त्यांनी. बळी मात्र माझा गेला यात.

हरले रे मी,  माझी बाजू सांगून सांगून थकले मी आता, जीव गुंतवा असे कोणीच नाही आता, कंटाळा आला आता या सगळ्याचा. ज्याच्या विश्वासावर या घरात आले, त्याच्यावरचा विश्वास उडाला आता.तुझी साथ असती तर लढा दीलाही असता मी पण नाही मी इतकी मजबूत की एकटी लढू शकेल या सगळ्यांशी. आई वडिलांना त्रास द्यायचीही इच्छा नाही. तुलाही या सगळ्याचा त्रास होतच होता ना, म्हणून तुलाही त्रास देण्याची इच्छा नाही आता. तुला या त्रासातून कायमचे मुक्त करते आता.

सुखात, आनंदात रहा . कधी दुसरा जोडीदार निवडलास तरी..मनाच्या छोट्याश्या कप्प्यात माझी आठवण कायम ठेव मात्र.

तुझ्यावर नेहेमीच प्रेम करणारी तुझी बायको

स्मिता.

पत्र हातातून केंव्हाच गळून पडले होते. एखाद्या लहान मुलासारखा सुमित हुंदके देऊन रडत होता. वेळीच आई बाबांना त्यांच्या चुकीची जाणीव करून दिली असती तर, तर आज माझी स्मिता माझ्याबरोबर असती. त्याला आता कळले होते….पण वेळ कधीच निघून गेली होती. त्याची स्मिता सोडून गेली होती त्याला एकटं करुन अनंताच्या प्रवासासाठी….

वाचकहो, तुम्हाला वाटेल हे असं कधी आजच्या काळात घडते का? आत्ताची कोणती मुलगी आत्महत्येसारखे पाऊण उचलेल का? आत्ताच्या मुली स्वावलंबी, कर्तबगार,खंबीर असतात. हो असतातही मान्यच आहे. पण काही हळव्या ही असतात. परिस्थितीशी दोन हात नाही करता येत त्यांना. त्यातून जीवनसाथी देखील असा असेल तर….

आत्ताच काही दिवसांपूर्वी वर्तमानपत्रात एका इंजिनीयर मुलीने आत्महत्या केली अशी बातमी वाचली. माहेरहून पैसे आण म्हणून सासू सासरा आणि नवरा यांनी तिच्याकडे तगादा लावला होता. तिला खूप मानसिक त्रास देत होते, आणि त्या त्रासाला कंटाळून त्या इंजिनीयर तरुणीने इमारतीवरून खाली उडी मारून आत्महत्या केली.

या काळातही मुलींना हे सर्व सहन करावे लागत आहे यासारखे दुसरे दुर्दैव नाही. तूर्तास तरी मुलींना इतकेच सांगणे आहे, खंबीर व्हा, परिस्थितीशी दोन हात करा, स्वतःवरचा विश्वास डगमगू देऊ नका.इतकेच.

धन्यवाद.

अश्विनी रितेश बच्चूवार.

Article Categories:
मनोरंजन

Comments are closed.