सौंदर्याचे वेड…

Written by

सायन्सच्या सिस्टर रोझी काही तरी शिकवत होत्या. पुर्ण क्लास लक्ष देवून ऐकत होता. अचानक धाडकन काही तरी पडल्याचा आवाज आला. सगळ्या माना आवाजाच्या दिशेने वळल्या. इशिका बेंचवरून खाली पडली होती. सिस्टर तिच्याकडे धावल्या. इशिका बेशुद्ध झाली होती. लगेच तिला मेडिकल रूममध्ये नेण्यात आले. नर्सने तिला तोंडावर पाणी शिंपडून शुद्धीवर आणले. सहजच तिला नर्सने विचारलं “अशी कशी ग पडली खाली” तर तिने सांगितले, “अचानकच चक्कर आली नी पडली खाली.”
“सकाळी काही खाल्लं नाहीस का?”
“मी रोज ब्रेकफास्टला फक्त एक बनाना नी एक ग्लास मिल्क घेते.”
“आणि फक्त तेवढ्यावरच लंच टाईमपर्यंत बसतेस!!!” नर्स चकित झाली होती.
“हो सिस्टर, शेपमध्ये राहायचे तर इतकं करावं लागेल ना?” इशिकाने उलट नर्सलाच विचारले. सिस्टर रोझी न नर्स एकमेकांकडे पाहातच बसल्या. काय बोलावे त्यांना सूचले नाही.
आठवीत शिकणारी इशिका खूप सुंदर होती. तिला त्याची पुर्ण कल्पना होती. तिला आपले सौंदर्यच आपले करियर बनवायचे होते. सौंदर्यस्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न पाहणारी इशिका खूप आधीपासूनच त्या दृष्टिने पावले टाकत होती. ती ग्रूमिंग क्लासेसला जायची. फॅशन जगतात कसे वावरायचे याचे प्रशिक्षण घेत होती. कथकचे प्रशिक्षणसुद्धा घेत होती कारण फक्त सुंदर दिसून फायदा नव्हता ना अंगात एखादी कलाही असावी लागते. इशिका अगदी काटेकोर डाएट पण फाॅलो करायची. या सगळ्यात तिला तिच्या आईचा पुर्ण पाठिंबा होता. अगदी खरं सांगायचे झाले तर इशिकाच्या आईचेच स्वप्न होते इशिकाला मिस वर्ल्ड, मिस युनिवर्स किंवा गेला बाजार निदान मिस इंडिया तरी झालेले पाहायचे. तिनेच या स्वप्नाचे बीज इशिकाच्या मनात रोवले होते.
वर्गात झालेला प्रसंग आणि मेडिकलरूममधील बोलणे सिस्टर रोझीने मदर मार्गारेटच्या कानावर घातला. मदरचे म्हणणे होते की तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे आपण यात उगाच लक्ष घालू नये. यावर सिस्टर रोझी काही बोलू शकली नाही. पण ही साधी वाटणारी गोष्ट खूप मोठे रूप घेवू शकते असे तिला वाटत होते.
वर्ष संपले. इशिका नववीत गेली होती. तारुण्याच्या ऊंबरठ्यावर उभी असणारी ती एखाद्या आसमानी परी सारखी दिसत होती. आता ती थोडी जास्तच सजग झाली होती आपल्या दिसण्याबाबत. एका रात्री सहज तिने आरश्यात पाहिले तर एक छोटासा पिंपल उमटला होता गालावर. “ओह नो…” जोरात किंचाळलीच ती. तिचे ओरडणे ऐकून मम्मी पप्पा धावत आले.
“इशू काय झाले?” पप्पांनी विचारले.
“पप्पा हा बघा पिंपल आलाय गालावर, किती घाण दिसतोय.” घाबरलेली इशिका बोलली.
“अग फक्त पिंपलच आहे ना तो, जाईल आपोआप. आता तू मोठी होत चाललीस तर हे असले पिंपल वगैरे एकदम नॅचरल आहे. तू नकोस चिंता करू.” पप्पा बोलले.
“काय चिंता नको करू, त्याच्याने चेहरा खराब नाही का दिसणार आणि जरी तो पिंपल गेला तरी त्याचा डाग राहिला तर.” मम्मी पप्पांकडे रागाने पाहत बोलली.
“बेबी तू काळजी नकोस करू, आपण करू काहीतरी. या एवढ्याशा पिंपलमुळे तुझे करियर नाही खराब होवू देणार मी.” आईने इशिकाला धीर दिला.
दुसऱ्या दिवशी आईने घरातच कसलातरी लेप बनवून पिंपलवर लावला. पण जास्त काही फरक पडला नाही. आता इशिकाचे वय पाहता चेहऱ्यावर मुरूम येणे ही अगदीच नैसर्गिक गोष्ट होती. वेळोवेळी पाणी पिणे, चेहरा स्वच्छ ठेवणे अशा साध्या साध्या उपायाने सुद्धा हा प्रश्न सुटला असता पण लेकीच्या चेहऱ्यावर आलेला पहिला मुरूमाचा ठिपका पाहून आईचाच धीर सुटला होता. निरनिराळे उपाय आजमावण्यात येत होते. क्रिम्स, लोशनचा भडीमार इशिकाच्या नाजुक त्वचेवर करण्यात येत होता.
आणि शेवटी जे घडू नये तेच झालं. क्रीममधल्या रसायनाच्या प्रभावाने इशिकाचा कोवळा चेहरा मुरूमांनी भरून गेला. सौंदर्याची पुतळी दिसणाऱ्या मुलीचा चेहरा भाजलेल्या पापडासारखा डागाळला. इशिकाला शाळेला जायची लाज वाटू लागली. जे वर्गमित्र आधी तिच्यासोबत एकशब्द तरी बोलायला मिळावा म्हणून धडपडायचे ते तिला पाहून कुजबूजू लागले किंवा कणवेच्या नजरेने पाहू लागले होते. आतापर्यंत फक्त कौतुकाची नजर झेलायची सवय असलेल्या इशिकाला हे सहन होत नव्हते. तिने शाळेला जाणेच बंद केले. तासंतास आपल्या रूममध्ये आरशाकडे पाहत बसायची नाहीतर आपले जुने फोटो पाहायची. आईला हे पाहावत नव्हते. ती मुलीची समजूत काढायचा प्रयत्न करत होती पण इशिका समजून घेण्यापलीकडे गेली होती. आता ती डिप्रेशनच्या दिशेने वाटचाल करत होती. ती आपला आत्मविश्वास पुर्णपणे गमावून बसली होती. तिला हा ताण आता सहन होत नव्हता.
एके दिवशी सकाळी मुलीला उठवायला आलेल्या आईला भयानक दृश्य दिसले. इशिकाने आपल्या हाताची नस कापून घेतली होती. तिला लगेच दवाखान्यात नेण्यात आले. रक्त जास्त गेले नव्हते म्हणून ती लवकरच बरी झाली.
सौंदर्याची आवड असणे, स्वतः सुंदर दिसावे म्हणून प्रयत्न करणे यात काही गैर नाही. सौंदर्याची उपासना माणूस आदिम काळापासून करत आहे. पण गेल्या काही वर्षात हे वेड लक्षात येण्याइतपत वाढले आहे. टीवी वर दिसणाऱ्या सौंदर्यप्रसाधनाच्या वाढलेल्या जाहिराती पाहूनच हे लक्षात येते. फॅशन इंडस्ट्री, सिनेमा इंडस्ट्रीत शिरकाव करण्यासाठी या ब्यूटी काॅन्टेस्ट महत्वाच्या भूमिका बजावतात हे खरे आहे पण यामध्ये इशिका आणि तिच्या आईसारखी लोकं इतकी वाहवत जातात की त्यांना कुठे थांबायचे ते कळत नाही. सुदैवाने इशिकाचा जीव वाचला पण ती बरी झाल्यावर परत याच चक्रात अडकणार नाही याची खात्री नाही.

Article Categories:
सामाजिक

Comments are closed.