कथा-अधुरी राहिलेली कविता

Written by

अधुरी राहिलेली कविता  

 

दवांत भिजुनी पानं फुलं बहरली

गंध तयांचा सभोवार उधळू लागली

हासू लागली, डोलू लागली

उषेचे गीत नवे झंकारू लागली

वा ! पांघरूणात शिरून जोजविणारी अश्विनाची पहाट. घरासमोरच्या वाटांनी धुक्याची शाल पांघरलीय असंच वाटतंय. अंगणातली शेवंती, जास्वंदीनं झुकलेल्या फांद्या आणि तो कोपर्यातला सोनचाफा तोही पहाटेच्या थंडीनं गाऱठुन गेलाय. फांद्यांच्या कुशीतल्या कळ्या हळुहळू डोळे टक्क उघडुन पाहु लागल्यात. हातातलं पेन वहीच्या कागदावर टेकवत मी तोंडासमोर हात धरला आणि वाफांचा एक ढग तोंडातुन बाहेर पडला. इतक्यात दरवाजा उघडुन आई बाहेर आली.

“अगं तनु आत ये. बाहेर गारवा किती आहे  ! ”

“हो गं आई” , मी बसलेल्या खुर्चीतुन मागे वळुन न पाहता म्हटलं

“आधी आत ये तु. थंडीनं सर्दी खोकला व्हायचा.” आई च्या सुचनेवरून अखेर अंगणातुन वही, पेन च्या लवाजम्यासहीत मी घरात आले.

“मस्त वाटतंय बाहेर. अंगणात बसल्या बसल्या कविता पण सुचली.”

“बरं बाई” हसुन आई म्हणाली.

“यंदा दहावी आहे.सर्दी तापानं आजारी पडलीस तर शाळेला रजा होईल.” स्वंयपाकघरातून आईचं पालुपद सुरुच होतं. तिच्या बोलण्याकडे फारसा लक्ष न देता मी कवितेचा कागद दप्तरात भरला आकाशला दाखविण्यासाठी. आकाशचं घर आमच्या घरापासुन दहा ते पंघरा मिनिटांच्या अंतरावर होतं. आम्ही पहिली पासुन एकाच वर्गात शिकत होतो. शाळेला एकमेकांच्या खोड्या काढत जायचो. मराठी माझा आवडता विषय त्यात कविता तर खुपच आवडायच्या. आमच्या बालभारती च्या कविता वाचुन एकदा अति उत्साहानं मी ही कविता करायली घेतली. सहावीला वगैरे असेन. शर्यतीत हरलेल्या सश्यावरची कविता सर्वांना खुप आवडली होती. तेव्हा पासुन गट्टीचं जमली कवितेशी. आकाश आणि माझी लहान बहीण रश्मी माझ्या कवितेचे पहिले वाचक असायचे. तू काय बुवा मोठी कवयित्री होशील अशी त्यांची मस्करी चालायची. त्यांच्या बोलण्याने हुरळून जायचे मी. नेहमी प्रमाणे आजची कविता वाचुनही आकाशने मनमुराद दाद दिली. कवितेखाली सही कर की तन्वी सबनीस. कागद माझ्या हातात देत तो म्हणाला. “आठ दहा वर्षानी तुझ्या कविता आम्हाला पुस्तकात वाचायला मिळतील.”  त्याची थट्टा सुरू झाली.

 

“आई ग् सांग ना गवतफुलं कसं असतं?” माझ्या हाताला धरून विनु विचारत होती. मघापासून ती काहीतरी बोलत होती कवितेविषयी आणि कविता हा शब्द ऐकुनचं मी दहा ते बारा वर्ष मागे भुतकाळात फेरफटका मारून आले होते.मांडीवरचा लॅपटॅप बाजुला केला.विनु च्या पुस्तकात इंदिरा संतांची गवतफुला होती. विनुची छोटी बोटं कवितेच्या शब्दांवर नाचत होती. विनु माझी मुलगी दुसरीत आहे. इतर लहान मुलांसारख्या तिलाही नव्या शब्दांविषयी, वस्तुंविषयी शंका असतात.

“तुझी मम्मी गणितं शिकवते मोठी मोठी, कविता नव्हे विनु.” उगीच मला छेडायचं म्हणून सलील म्हणाला.का कुणास ठाऊक त्याचा इतका राग आला पण मी काही म्हणण्या आधीच त्याला होस्पीटल मधुन फोन आला होता. नाश्ता संपवुन बाय म्हणत तो घराबाहेर पडला. नंतर सांग हा मम्मी असं सांगुन विनि खेळायला गेली. मन काही शांत बसेना. पुन्हा पुन्हा भुतकाळाच्या बंद खिडकीपाशी घुटमळु लागलं आणि आठवला तो शेवटचा दिवस. दहावीचा मे महिना. परिक्षेचा ताण हलका झाला होता. त्यातच घरि बाबांनी बातमी आणली. त्यांची पुण्याला बदली झाली होती. आम्हाला सिंधुदूर्ग सोडावं लागणार या कल्पनेनंचं मन निराश झालं. जाताना आकाशने निरोपाची भेट म्हणून कुसुमाग्रजांचं  ‘ प्रवासी पक्षी ’ दिलं. खुप कविता कर तनु, कवितेला विसरू नको तो म्हणाला. माझ्या डोळ्यांतले थेंब हातातल्या पुस्तकावर पडले. मागे वळुन न पाहता मी चालु लागले.

पुण्यात आल्यावर बांबाच्या इच्छेप्रमाणे सायन्स ला प्रवेश घेतला. बारावी, बी.एस्सी. वर्ष भराभरा जात होती. रसायनशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतलं. पुण्यातल्या महाविद्यालयात नोकरी मिळाली. चेस्ट स्पेशालिस्ट सलिलशी लग्नही झालं. नव्या शहरात नवी दुनिया वसवताना कविता कधी दुर गेली समजलंच नाही.हल्ली संदिप खरेंचे कवितेचे कार्यक्रम पाहुन आई हळहळते. माझी तनु ही मोठी कवयित्री झाली असती म्हणते.तनुचं सगळं चांगलं चाललंय की,नवरा ही चांगला मिळाळा अश्या शब्दांत बाबा तिची समजुत घालतात.त्यांच्या म्हणण्यानुसार सगळं चांगलं चाललंय फक्त कविता….. तिची नाळ गावाच्या मातीशी घट्ट जोडली होती. सेटल होण्यासाठी धावत मी खुप पुढे निघुन आले. ती मात्र एकाकी उरली. मंद पावलांनी आयुष्यात आली. आनंदाचं झाड लावलं अन् निघुनही गेली.त्या आनंदा च्या झाडाकडे लक्ष द्यायला मला वेळ होता कुठे. तनुचं निरागस मन मी केव्हाचं कुलूपबंद केलं होतं. त्याचवेळी कविता वजा झाली आयुष्यातुन. कपाटातुन आकाशनं दिलेलं ‘ प्रवासी पक्षी ’ बाहेर काढलं. गेली बारा वर्ष दाबुन ठेवलेला हुंदका बाहेर पडला. पटकन पेन हातात घेतलं आणि कागदावर शब्द उमटले,

‘ दौडत जाई काळ ठेऊनी मागे असे क्षणांचे ठसे

वालुकापात्र कण् कण् जसे रिते रिते भासे ’

एव्हढ्यात विनुने हाक मारली. बापरे ! तिची शाळेची तयारी,डबा सगळंच बाकी होतं. हातातला कागद टेबलवरती टाकुन मी किचन कडे धावले. कविता………. ती अधुरीच राहिली, आजतागायत अधुरीच आहे.

 

स्नेहा डोंगरे

पुर्वप्रसिद्धी- दै.लोकसत्ता, चतुरंग-२३-१२-२०१७

 

 

 

 

 

 

 

 

Article Tags:
· · ·
Article Categories:
इतर

प्रतिक्रिया व्यक्त करा