कद्रु मनं…….!!

Written by
शाळांना सुट्टी पडली तशी पोरांनी दिवाळीसाठी किल्ला बनवायचा बेत रचला. टिपू, सोनी, राही, क्षितिज, सावी, ध्रुव, निहार, मनस्वी सगळ्या बच्चे कंपनीच्या अंगात उत्साह संचारला होता. वर्षभर अगदी उत्सुकतेने वाट बघायचे ते किल्ला बनवायची.
यावेळी त्यांनी किल्ल्याला द्यायला छानसं नाव ही ठरवलं होतं, मैत्रीगड!! सगळ्या पोरांना कधी एकदा हा मैत्रीगड उभा करतोय असं झालेलं!!
किल्ल्यासाठी त्यांची एक दरवर्षीची ठरलेली जागा होती. जागा अगदी ऐन मोक्यावरची, येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला किल्ला अगदी नजरेस पडेल अशी.
बिल्डिंगच्याच पुढच्या साईडला राखून ठेवलेला छोटासा व्हरांडा.
पण म्हटलं तर एक छोटासा आणि म्हटलं तर मोठासा प्रॉब्लेम हा होता की, बरोब्बर त्या व्हरांड्यासमोर बिल्डिंगमधल्याच एका कुटुंबाची गाडी लावायची जागा होती. हल्ली पोरांना खेळायला जागा मिळाल्या नाहीत तरी चालेल, पण गाड्या लावायला जागा असणं जास्त जरुरी झालंय.
गाडी बाहेर फिरायला काढण्याचा मुहूर्त महिन्यातून कधीतरी एकदाच असायचा त्या कुटुंबाचा. बाकी सर्व दिवस बिचारी जागेवर धूळ खात उभी!!
मुलांचा किल्ला त्या गाडीमुळे झाकला जाणार होता.
सगळ्या मुलांनी ठरवलं, किल्ला बनवू मग त्यांना विनंती करू चार दिवस गाडी दुसरीकडे लावण्याची.
मुलांनी किल्ला बनवण्याचे काम सुरू केले. सगळी बच्चे कंपनी हिरीरीने पुढाकार घेऊन काम करत होती.
दुसऱ्या दिवशी किल्ल्याचं काम चालू असताना, गाडीवाल्या कुटुंबातल्या आजी बाहेरून कुठूनतरी आल्या, आणि मुलांना ओरडू लागल्या.
ए, तिकडे कुठे करताय रे किल्ला? गाडीला घाण लागली तर बघा. गाडीच्या इथे कशाला कडमताय, हिच जागा मिळली का, तुम्हाला??
मुलांमध्ये त्यातल्या त्यात मोठी असलेली मनस्वी म्हणाली, अहो आज्जी आम्ही तर दरवर्षी इथंच किल्ला बनवतो.
मग यावर्षी इथे नका बनवू, दुसरी जागा शोधा, आजी तिरसटपणे म्हणाल्या.
नाहीये कुठे जागा, सगळीकडे गाड्या लावल्यात.
ही आमची नेहमीची जागा आहे, निहार पटकन बोलून गेला.
आमच्या गाडीला काही झालं तर बघा, नुकसानभरपाई घेईन एकेकाकडून.
तसंही कोण बघणारे तुमचा किल्ला इकडे येऊन, आज्जी मुलांना दम भरून जातात.
मुलं आपापसात म्हणतात, ह्यांनी गाडी काढली तर सगळ्यांना दिसेल आमचा मैत्रीगड!!
मोठ्या माणसांना उलट बोलायला नको म्हणून सगळी मुलं शांत बसतात.
दोन दिवस खटाटोप करून मुलं मैत्रीगड उभा करतात. तो जरी गाडीमागे झाकला जात होता, तरी बिल्डिंगमधले सगळे येता जाता गाडीमागचा किल्ला मुद्दाम डोकावून बघून, मुलांचं कौतुक करत होते.
प्रत्येकजण म्हणत होतं, ही गाडी काढायला हवी.
त्या कुटुंबातलं प्रत्येक जण जाता येता मुलांच काय चाललय बघत होत, वरून आमच्या गाडीला काही करू नका म्हणत होतं.
पण एकालाही दिवाळीच्या चार दिवसांसाठी गाडी दुसरीकडे लावून मुलांना आणि इतरही सर्वांनाच त्या किल्ल्याचा आनंद घेऊ द्यावा असं वाटलं नाही.
शेवटी मुलांनी धीर करून त्यांच्या घरी जाऊन विचारलंच, चार दिवसांसाठी गाडी दुसरीकडे लावाल का म्हणून, पण त्यांनी ठाम नकार दिला. हे अजिबात शक्य होणार नाही, गाडी दुसरीकडे लावून आमची गाडी खराब होईल. जागा कोण शोधत बसेल आणि?? तुम्हाला बोललेलो ना आम्ही, तिथे किल्ला करू नका म्हणून?
मुलं नाराज होऊन परत फिरली. नंतर मुलांच्या पालकांंनी पण त्यांना विनंती करून बघितली, पण त्या कुटुंबाने कोणाचंच ऐकलं नाही.
दिवाळीचे सर्व दिवस ती गाडी किल्ल्याला झाकत उभी होती.
पण मुलांसाठी आनंद एवढाच की तरीही बिल्डिंगमधले, आजूबाजूच्या परिसरातले बरेच जण खास त्यांचा किल्ला त्यांचा “मैत्रीगड” आपल्या लहान मुलांना दाखवायला घेऊन येत होते.
खरंच फार हेकट असतात काही माणसं!!
वास्तविक पाहता त्याच एरियात त्यांची गाडी ठेवायला दुसरीही सुरक्षित जागाही होती. पण त्यांना गाडी त्यांचाच नजरेसमोर हवी होती. चार दिवस देखील त्या कुटुंबाला त्या मुलांना छोटासा आनंद स्वतःहून द्यावासा वाटला नाही.
किती कद्रु मनं असतात ना एकेकाची😏
©️स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार : गुगल
लेख आवडल्यास लाईक, कमेंट करा आणि शेअर करताना  नावासकटच शेअर करा.

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत