कर माझे जुळती

Written by

“अग बघ ना रिटायर व्हायला चार वर्षे राहिली नि ही बदली.खूप वाईट वाटतंय ग शाळा बदलतांना.”अबोली माझ्या नवऱ्याची मैत्रीण बालपणीची,माझ्याशी बोलत होती. जरी ती माझ्या नवऱ्याची मैत्रीण असली तरी ,आता गेल्या काही वर्षात माझीच खास मैत्रिण झाली होती. आमचे असंख्य सुखदुःख आम्ही एकमेकींशी नेहमी शेअर करायचो .
गेली जवळपास तीस वर्ष अबोली मतिमंद मुलांच्या शाळेमध्ये शिक्षिका म्हणून काम करत होती.ही नोकरी फक्त तिच्यासाठी नोकरी नव्हती ,तर ज्या ज्या शाळेत बदली होईल ,तिथे तिथे त्या मुलांसोबत तिचं कुटुंब तयार होत असे. फक्त मुलेच नव्हे तर त्यांचे आई-वडीलही अबोलीची तेवढ्यात मोकळेपणाने चर्चा करायचे .
खरंतर अबोली नावापुरतीच फक्त अबोली होती. प्रत्यक्षात मात्र खूपच बोलकी .प्रत्येक गोष्ट अगदी विस्ताराने सांगणार .अर्थात स्वाभाविकच होतं ते. दिवसातले जवळपास दहा तास मतिमंद मुलं आणि त्यांचे पालक यांच्यासोबत आवरल्यानंतर, त्यांना समजावून सांगता सांगता जी तिची जीवनशैली झाली होती त्यात हे स्वाभाविकच होते.
आधी घेतलेले बीए पर्यंतचे शिक्षण, बीएड आणि नंतर अशा खास मुलांसाठी शिक्षिका होण्यासाठी घेतलेले प्रशिक्षण.
अबोलीचा प्रवास सोपा नव्हता. ज्यावेळेस तिने मतिमंद मुलांची शिक्षिका ,म्हणून शिक्षण घेण्याचे ठरवले त्यावेळेला घरातून अर्थातच विरोध होता.
” अगं सोप असतं का अशा मुलांसोबत वावरणं. त्यांना सांभाळणं. त्यांना शिकवणं .आपली व्यवस्थित साध्या मुलांच्या शाळेत नोकरी कर ना झालय ना तुझं बीएड”
आईने समजुतीच्या चार गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला, पण अबोली आपल्या निर्णयावर ठाम होती.
कारणही तसंच होतं .अविनाश तिच्या भावाचा मित्र इंजिनियर होऊन एका चांगल्या कंपनीत नोकरी करणारा. अविनाश तिला गेली दोन-तीन वर्ष मनापासून आवडत होता. दोघांमध्ये हळूहळू प्रेमाचं नातं फुलत होतं .अविनाशलाही गेली बरीच वर्ष घरातले सगळेजण ओळखत होते .त्यामुळे घरातून लग्नाला विरोध होण्याची शक्यता फारशी नव्हती .
फक्त एकच किंतु होता ,तो म्हणजे अविनाशचा मतीमंद भाऊ वसंता. तो जन्मतः मतिमंद नव्हता, पण एक छोटीशी शस्त्रक्रिया करताना त्याच्या मेंदूवर ती काहीतरी परिणाम झाला आणि तो मतिमंद झाला.
अबोलीला मनापासून त्याची जबाबदारी स्वीकारायची होती आणि त्यासाठी तिच्या बीएडच्या शिक्षणाला जर मतिमंद मुलांच्या शिक्षणाची जोड मिळाली तर ते खूपच चांगलं ठरणार होतं. त्यामुळेच अबोलीला हे प्रशिक्षण घ्यायचं होतं.
नेहमीप्रमाणे अबोलीच्या हट्टापुढे घरचे झुकले आणि अबोलीला मतिमंद मुलांची शिक्षिका होण्याचं प्रशिक्षण घेण्यासाठी परवानगी देण्यात आली.
त्यातच अबोलीने यशस्वीपणे ते प्रशिक्षण पूर्ण केलं आणि चांगल्या सरकारी शाळेत नोकरीही पटकावली. तिच्यासाठी ही नोकरी फक्त पैसे मिळवण्याचं साधन नव्हतं ,तर एक समाजसेवेचं समाधानही होतं.
फक्त मतिमंद मुलेच नव्हे तर त्यांच्या पालकांची ही ती जवळिकीने संवाद साधायची. त्यांच्या अडचणींवर सोपे सोपे मार्ग काढायची.
मतिमंद मुलांना स्वयंरोजगाराची शिक्षण देताना ,वेगवेगळ्या वस्तू त्यांच्याकडं बनवून घेण्याकडे ती लक्ष द्यायची. वर्षातून एकदा ती ज्या ज्या शाळेत असे, त्या शाळेमध्ये त्या मुलांनी बनवलेल्या कला वस्तूंचं, खाद्य वस्तूंचं प्रदर्शन सगळ्या परिसरासाठी आकर्षण ठरे.
फक्त या शिक्षकांच्या दर आठ-दहा वर्षांनी होणाऱ्या बदल्या ,तिला त्रासदायक वाटत .एखाद्या शाळेत चांगला जम बसला, व्यवस्थित सर्व स्टाफ आणि मुले पालक यांच्या ओळखी होऊन ते संबंध थोडे वाढायला लागतात, तोच नवीन शाळा स्वीकारावी लागायची. पुन्हा नवीन आव्हान आणि नवीन बस्तान. पण अबोली उत्साहाने हे करत असे.
तिच्या कामाची दखल सरकारदरबारी घेतली गेलीच.आदर्श शिक्षक पुरस्कार, महापौर पुरस्कार अनेक पुरस्कार मिळाले आणि गेली दहा वर्षे ती मुख्याध्यापिका म्हणून काम करत होती. आणि आता मुलांमध्ये कमी मिसळायला मिळते याची तिला खंत होती.
नोकरीची शेवटची चार वर्ष राहिली होती .आता तरी बदली नको, असे तिला वाटत होते ,पण सरकारी नियम आडवे येतातच. तिला ती बदली स्वीकारावीच लागली.
असो ,या शाळेतील मुलांना कदाचित माझी जास्त गरज असेल, चार वर्षात मी या शाळेत चांगला विकास घडवून आणेन, अशा जिद्दीने तिने बदली स्वीकारली आणि ती कामाला लागली.
कौटुंबिक आघाडीवरही ती वसंताला चांगलेच सांभाळत होती. घरातल्या इतर सर्वांपेक्षा तिची त्याच्यावर जास्त माया होती आणि ती त्याला आपल्या मुलांप्रमाणेच नीट सांभाळत होती.
अविनाश यासाठी नेहमीच अबोलीचे कौतुक करत असे आणि अबोली मात्र नम्रपणे, ही सर्वजण देवाची विशेष देणगी मिळालेली मुलं आहेत ,त्यांना सांभाळलाच पाहिजे अशा सेवा भावानेच वावरत असे.
अशा गुणी अबोलीला नियतीने मातृत्वाचे दान दिले नाही ,पण याचीही खंत तिने बाळगली नाही.एक मुलगी दत्तक घेतली. आता ती इजिनिअर होऊन अविनाशला व्यवसायात मदत रत आहे.
अशा समर्पित जीवनाला पाहिल्यावर नकळतच
“दिव्यत्वाची जेथे प्रचिती
तेथे कर माझे जुळती”
असे ओठावर येतेच .

भाग्यश्री मुधोळकर

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा