कलंक प्रेमाचा भाग 3

Written by

प्रिया स्वतःच्या धुंदीत असताना कधी घर आलं हे तिला कळलंच नाही. गाडी तिच्या सोसायटीजवळ येऊन थांबली तरी तीच लक्षच नव्हतं. रोहन बाहेर उतरला आणि त्याने तिच्याजवळील दरवाजा उघडला. तशी प्रिया दचकली. प्रियाने रोहनच्या बहिणीला व रोहनला घरी चला म्हणून विचारले पण उशीर होईल म्हणून ते दोघेही नाही बोलले. प्रिया बाय बोलून निघणार तितक्यात रोहनने तिला आवाज दिला.
रोहन : प्रिया ऐकणं.
(प्रिया तिथेच थांबली)
रोहन :  तु हे विसरलीस. (प्रियाने शॉपिंग केलेली साडी व अंगठीची पिशवी ती गाडीतच विसरली. रोहन तिला पिशवी दाखवत बोलला)
प्रिया : ओहह, थँक्स.
रोहन : तुला नक्की आवडलीना ग साडी.
प्रिया : हो आवडली.
पुढे रोहन काही बोलणार तितक्यात ती तिथूनच त्याला बाय करून निघाली. रोहन तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिला. प्रियाने मागे वळून पाहिलेच नाही ति आता रोहनपेक्षा ऋषीकडे वळत होती. तिला हे काय होत काहीच कळत नाही. घरी देखील ती आई पप्पांशी त्यातल्या त्यात बोलली आणि तिच्या बेडरूमकडे वळली.  तशीच बेडवर झोपून गेली दिवसभर विचार करून, रडून आणि जास्त फिरून तिला झोप लागली.
प्रियाला वाटल कि ऋषी एवढा फोन करतोय म्हणजे त्याला मी हवी आहे. दुसऱ्या दिवशी ती ठरल्याप्रमाणे ऋषीला भेटायला जाते. ऑफिसमधून सुटल्यावर प्रिया नेहमीच्या ठिकाणी जाते. जवळ जवळ अर्धा तास होऊन गेला तरी ऋषी येत नाही. ती त्याला फोन लावते. थोडा वेळ अजून लागेल असे तो प्रियाला सांगतो. जवळ जवळ अर्ध्या तासाने ऋषी येतो आणि प्रियाला सॉरी बोलतो. प्रिया शांत बसलेली असते. नेहमी प्रमाणे ती त्याच्यावर रागवत नाही. तो तिला मिठी मारायला जातो तोच प्रिया त्याला हाताने थांबण्याचा इशारा करते
ऋषी : अस  काय करतेस ग प्रिया. सॉरी बोललो ना ग मी.
प्रिया : लग्न कधी करतोस ते सांग माझ्याशी.?
ऋषी : तू काय नुसत लग्नाच घेऊन बसलीस.
प्रिया : मग अजून मी काय बोलू. पुढच्या आठवड्यात माझा साखरपुडा ठरला आहे. आणि मी घरी आता नाही बोलू शकत नाही.
ऋषी : मग तू करणार?
प्रिया :  मला करावा लागतोय ऋषिक. नाही तर मग पळून चल. एवढच प्रेम करतोस ना माझ्यावर मग तेवढी हिंमत ठेव नि चल. पुढच पुढे बघू.
ऋषी : तुला वाटत तेवढ सोप्प आहे का प्रिया.
प्रिया : मग तुला वाटत ते सोप्प होत का ऋषी… (प्रिया रडू लागते) काल दोन आठवड्यानी तू मला फोन करतोस. त्या दोन आठवड्यांत हजार वेळा मरणाचे विचार येऊन गेले रे मनात.  किती फोन लावले तुला पण नाही. तुला माझ्याशी संबंध ठेवयचाच नव्हताना. मग आता का आलास. म्हणजे तुला वाटेल तेव्हा बोलशील. वाटेल तेव्हा भांडून मोकळा होशील. पण आता नाही हा ऋषी. बस झालं..
ऋषी : हे बघ प्रिया. मी पण नाही नीट राहिलो ग ह्या दोन आठवड्यात.
प्रिया : दिसलं ते तुझे फेसबुक वरचे स्टेटस बघून. कुठे कुठे गेलेलास मग फिरायला?
ऋषी : हे बघ प्रिया ते सगळं सोड. मला एक शेवटची संधी दे. प्लिज..
प्रिया : देते तर आहे मी. पण आत्ताच्या आत्ता लग्न कर. ठीक आहे लग्न नको तुझ्या आई वडिलांना माझ्या आई वडिलांशी बोलायला सांग. मग तर झालं.
ऋषी : माझे मॉम डेड अस करतील हे वाटत नाही ग. ते सहजा सहजी ऐकणार नाही. तू का नाही समजत.
प्रिया : मग चल पळून लग्न करू संसार तर आपल्याला करायचाय. नंतर तुझे आई वडील देखील ऐकतील.
ऋषी : पुन्हा तुझं तेच. तुला समजत नाही का प्रिया. मीच मूर्ख  जो तुला भेटायला आलो. ( ऋषी एकदम रागाने चिडून)
प्रिया : ऋषी माझा साखरपुडा ठरलायरे. तू जस तुझ्या आई वडिलांना दुखवू शकत नाही तस मीही नाही दुखवू शकत. मी खर प्रेम करतेरे तुझ्यावर म्हणून बोलते चल पळुन.
ऋषी : ठिक आहे तू कर लग्न मी राहील एकटा. खुश रहा. काळजी घे
प्रिया : हेच ऐकायचं होत मला.
अस बोलून ऋषीने तिला दिलेलं महागडं घड्याळ आणि एक लॉकेट तिने दोघांच्या मध्ये ठेवलं. तुझ्याकडून मी अजून कोणती अपेक्षा करू शकते सोड… काळजी घे स्वतःची. आणि प्रिया निघते.
ऋषी प्रियाला अडवण्याचा प्रयत्न देखील करत नाही. प्रियाने ह्यापुढे कधीही ऋषीला फोन न करण्याचा निर्णय घेतला. तिला रोहन ला फसवायचे नव्हते. अश्यातच दोघांचा साखरपुडा झाला. साखरपुडा झाल्यानंतर रोहन प्रियाला फोन करू लागला. प्रिया रोहनच्या प्रश्नांची तेवढीच उत्तर द्यायची. तिने एकदा दोनदा सुयशला फोन करून ऋषी बद्दल विचारलं. तो बरा असल्याचं तिला कळलं. त्यात तीला समाधान. प्रिया आपल्याशी मोजकच बोलते म्हणून रोहनने तिला ह्या बद्दल विचारल. मला थोडा वेळ दे म्हणून प्रियाने रोहनला सांगितले. प्रियाला आपण रोहनला फसवतो असे वाटत होते. तिला एकदा तरी ऋषी बद्दल रोहनला सांगावे असे देखील वाटत होतं संधी बघून ती सांगेल ह्या विचारात असताना संधी ही आलीच नाही.
उद्या लग्न.. आज हळदीचा दिवस. प्रिया खूप रडली. ऋषीला  शेवटचा फोन करावा असा तिला वाटत होता पण तिने तस अजिबात केलं नाही. फक्त त्यांच्या आठवणी पुन्हा जाग्या होऊ नये म्हणून मनसोक्त रडून घेतलं. तिला खर तर मनस्ताप होत होता आपली निवड ऋषींच्या बाबतीत चुकली. तो किती सहज बोलला की कर लग्न म्हणून पण करताना तिला खूप जड जाणार होत. अश्यातच बोलतात बोलता दोघांचे लग्न झालं. हळू हळू सगळी पावणी मंडळी आपापल्या घरी परतली. काका काकू शेतीची काम म्हणून 4 दिवस थांबून ते हू गावी जायला निघाले. हळूहळू घर खाली झालं. वहिनीला मदत म्हणून सीमा 15 दिवस तीच्यासोबत थांबली. अगदी बहिणी प्रमाणे तिने प्रियाच सर्व काही केलं. अश्यातच सीमासुद्धा आपल्या घरी जायला निघाली. प्रियाला सीमा जाते हे बघून गहिवरून आलं. ती तिच्या गळ्यात पडून रडू लागली. प्रियाच सीमावरच प्रेम बघून रोहनला त्याची निवड चुकली नाही ह्याची खात्री झाली.
आता पूर्ण घरात रोहन आणि प्रिया एकटेच. प्रिया सीमाला सोडून किचनमध्ये काम करायला गेली. रोहन तिच्या मागे हळूच गेला. त्याने तिला बाहेरूनच आवाज दिला.
रोहन : प्रिया….
प्रिया एकदम स्तब्ध उभी राहिली. भीतीची एक लहर तिच्या अंगात संचारली तशी ती मागे वळली. लग्नानंतर जे मिलन दोघांत व्हायला हवं ते झालंच नव्हतं. दोघांना एकांत मिळावा असा वेळच त्यांना मिळाला नव्हता. प्रियाला वाटलं रोहन त्यासाठीच तिला आवाज देत आहे.
रोहन : उद्या आपल्याला गावी जायचं आहे. कुलदैवताच दर्शन घ्यायला आणि तिथून 2 दिवस तरी काकांकडे राहावं लागेल ग. नाही तर त्यांना वाईट वाटलं. तुला चालेल का?
प्रिया रोहनच्या ह्या शब्दावर खूप भारावून जात असे. तुला चालणार का ? रोहन कोणतीही गोष्ट करताना आपल्याला किती महत्व देतो हे बघून ती हळू हळू रोहनमध्ये गुंतत होती.
रोहन : प्रिया.. सांग ना.
(विचारांत गुंतून गेलेल्या प्रियाला रोहन विचारात होता. )
प्रिया : हो चालेल. एवढं बोलून प्रिया कामात पुन्हा गुंतली.
रोहन : मग आत्ताच निघुया का. रात्री पर्यंत पोहचू. तुला चालेल ना पण.
प्रियाला खूप आवडला त्याचा नम्रपणा.
प्रिया : हो चालेल.
रोहन : ठिक आहे काकांना कळवतो मी तस. म्हणून रोहन वळला. तोच प्रियाच किंचळण्याच्या आवाजाने तो पुन्हा किचनमध्ये शिरला. रोहन दिसताच प्रिया त्याला घाबरलेल्या अवस्थेत मिठी मारते. रोहन ला देखील कळत नाही हिला काय झालं. प्रियाने अशी मिठी मारताच रोहनने त्याचे दोन्ही हात वर्ती केले. प्रिया त्याला बोट दाखवून काही तरी दाखवायचा प्रयत्न करते.
रोहन : तू झुरळाला घाबरलीस होय. किती घाबरलो मी प्रिया..
प्रिया : मला… भीती वाटते खूप झुरळाची (प्रिया घाबरूनच रोहनला बोलली.
रोहन : तू थांब इथे.. (अस बोलून रोहन किचन जवळील झाडू घेऊन झुरळाला मारतो. प्रियाला पाणी देतो.)
रोहन : तू तैयार हो मी हे सगळं आवरतो.
प्रिया रोहनच्या बोलण्याकडे बघतच बसली. रोहन सगळं आवरत होता. आणि ती एकटक त्याच्याकडे बघत होती. तशीच ती बेडरूमकडे वळली. तिने रोहनला मारलेली मिठी त्याच्या शरीराचा तिला झालेला स्पर्श आठवून ती थोडी सुखावून गेली. पण तिला अजून एक चांगला वाटलं की त्याने तिला झुरळाला घाबरतेस म्हणून हिनवले नाही. जे नेहमी ऋषी तिच्यासोबत करायचा. दोघेही काका काकूंकडे जायला निघाले.

रोहन आणि प्रिया प्रवासाला निघाले. थोडा वेळ शांततेत गेल्यावर
रोहनने प्रियाला विचारले, तुला कोणती गाणी आवडतात.
प्रिया : मला जुनी गाणी आवडतात. आणि तुम्हाला?
रोहन : जी तुला आवडतात तीच. एवढं बोलून त्याने त्याच्या कारमध्ये ठेवलेले जुन्या गाण्यांचे कलेक्शन तिला दाखवले)
( नेहमी रोहन खिडकीचा मिरर सेट करायचा प्रियाला बघण्यासाठी. आता प्रिया खिडकीच्या मिरर मधून रोहन कसा दिसेल अस स्वतःला ऍडजस्ट करून बसत होती.)
रोहन ने जुनी गाणी लावली. प्रिया आणि रोहन दोघेही त्या गाण्यावर धून पकडून गाणी गाऊ लागले.

प्यार हुआ इक़रार हुआ है प्यार से फिर क्यों डरता है दिल (कहता है दिल, रस्ता मुश्किल मालूम नहीं है कहाँ मंज़िल ) – २ प्यार हुआ इक़रार हुआ …

प्रियाला देखील कळलं नाही ती कधी एवढी त्यात गुंतून गेली. प्रवास खूप लांबचा होता म्हणून रोहनने व प्रियाने एका हॉटेलमध्ये जेवण केले व पुढच्या प्रवासाला निघाले.

जेवण करून आल्यावर पुन्हा काय बोलायचे ह्या विचारात रोहन असताना पाच दहा मिनिटे शांततेत गेली.
रोहन : जेवण छान होत ना.
प्रिया काहीच उत्तर देत नाही.

रोहन : प्रिया…
प्रिया झोपलेली असते. रोहन काचेतुन तिच्या निरागस चेहऱ्याकडे बघतो आणि हसतो. रोहन जशी गाडी डावीकडे वळतो. प्रियाच डोक त्याच्या खांद्यावर पडत. रोहनला खूप मस्त वाटतो. तो तिला तसच झोपू देतो. तिच्या डोळ्यांसमोरील केस ज्याच्या तो प्रेमात पडला तो ते अलगद बाजूला करतो. पण प्रियाला त्याचा स्पर्श होणार नाही ह्याची काळजी घेतो. जवळ जवळ 9 तासाचा प्रवास करून अखेर तो काकांकडे पोहचतो. प्रिया अजून झोपलीच असते. कदाचित आज ती ऋषीला पूर्णपणे विसरून मनसोक्त रोहनशी बोलली असेल. म्हणूनच तिला आज झोप लागलेली. रोहनला तिला उठवावस वाटत नसत. तो तिला प्रिया, उठतेस… ए राणी उठतेस का… रोहनने हळूच तिचा हात हलवला तस प्रियाला जाणवलं की ती रोहनच्या खांद्यावर आहे. ती लगेच उठली. बाहेर रोहनची काकी हातात भाताचा गोळा आणि तांब्यात पाणी घेऊन दोघांची नजर काढायला उभी होती सोबत गावातले पण. नवीन नवरा नवरी म्हणून सगळेच त्यांना म्हणजेच रोहनच्या बायकोला बघण्यासाठी उत्सुक होते. रोहनने त्याच्या स्वभावाने खूप माणस जोडली होती.
सगळी जण प्रियाला खूप नशीब काढलस लेकी आमच्या रोहनसारखा मुलगा मिळाला. शोधूनही कुठे सापडणार नाही असे बोलू लागले. प्रिया खरकच आतल्या आत सुखावत होती.रोहनची होणारी स्तुती बघून. सगळी जण रोहन आणि प्रियाच निरोप घेऊन घरी निघाले. काकीने दोघांनाही जेवायला वाढले. रोहन दिवसभर गाडी चालवून खूप थकून गेलेला. तो बाहेरच एक उशी घेऊन आडवा झाला. प्रिया काकीना मदत करत होती. काकी : माझ्या लेकाने खुप वाईट दिवस काढलेत लेकी. आता मुलगा माझा सुखात आहे. खूप सादा आहे बाळ माझं. माझ्या पदरी देवाने मुल दिलंच नाही. पण रोहन ने त्याचू कमी मला कधीच जाणवू दिली नाही. कधीच दुखवू नकोस माझ्या लेकाला. त्याच्याकडे फक्त तुला प्रेम मिळेल. राग हा रोहनला माहीतच नाही.
(काकींना नकळत रडू आलं)
प्रिया : काकी तुम्ही असे रडू नका.
काकी : खूप छान वाटत ग आज असा लेकाचा संसार बघून. सून न खूप लाडाची आणि गोड भेटली.
अस बोलून काकी प्रियाला मिठी मारतात. चल आता रात्र खूप झालीय झोपुया. म्हणून अंथरून घालून द्यायला काकी निघाल्या प्रिया त्यांच्या मागे निघाली. रोहन तिथेच उशी घेऊन झोपलेला बघून काकी बोलतात बग ह्याच असच असत. एवढा दमलेला त्याने दाखवलं देखील नाही. किती निरागस होऊन झोपलय. प्रियाने देखील रोहनकडे बघितलं. आणि खरच ती रोहनकडे बघतच बसली. आपण किती मस्त झोपलो गाडीत. आणि रोहन मात्र गाडी चालवत होता. काकींनी प्रियाला त्यांच्याच बाजूला अंथरून घालून दिल. प्रियाने एक चादर घेऊन रोहनच्या अंगावर टाकली. जणू रोहन चदारीचीच वाट बघत होता. प्रियाने चादर टाकताच रोहनने चादरीर संपूर्ण अंग लपवत कूस परतून झोपून गेला. प्रियाला नकळतच आपण रोहनला ओळखू लागलो हे जाणवू लागल. काकींनी प्रियाला झोपायला सांगितलं उद्या लवकर उठुन देवळात जायचं आहे तुम्हाला. तशी प्रिया झोपण्याचा प्रयत्न करत होती पण दिवसभर घडलेले प्रसंग तिच्या डोळ्यासमोरून तरंगत होते. तिला खरच रोहन आवडू लागलेला. मंद दिव्याच्या प्रकाशात ती रोहनकडेच बघत झोपली.

   दुसऱ्या दिवशी दोघे देवदर्शनाला निघणार तोच प्रियाने काका काकींना सुद्धा चला म्हणून हट्टपणा चालू केला. काका काकू सुद्धा तिला टाळू शकले नाही. रोहन हट्ट करणाऱ्या प्रियाकडे बघतच राहिला. कारण जर रोहनने काका काकूंना सांगितलं असत तर ते आलेच नसते. चौघेही मग देवदर्शन करून आले. ठरल्याप्रमाणे दोन दिवस काका काकुंकडे मुक्काम करून मुंबईला निघाले. रोहनने गाडी चालू केली. प्रिया काका काकुंच घर दिसे पर्यंत त्यांना हात हलवून बाय करत होते. नेहमी रोहन दोघांत संभाषण व्हावं म्हणून विषय चालू करायचा. पण आता प्रिया बोलू लागली.
प्रिया : किती छान आहेत तुमचे काका काकु
रोहन : हम्मम
प्रिया : एक बोलू
रोहन : बोलणं
प्रिया : मला अजून थोडे दिवस इथे राहवस वाटत होतं. किती सुंदर निसर्ग आहे ना हा.
रोहन : तू म्हणतेस तर मी गाडी परत फिरवतो
प्रिया : खरच
रोहन : हो खरच. पण उद्यापासून तुला कामावर रुजू व्हायचं. बघ सुट्टी मिळत असेल मग माझं काही नाही. मला काय मी इथे बसून पण काम करू शकतो
प्रिया : नको राहू दे.. जाऊया आपण.
प्रिया उदास चेहऱ्याने खिडकी बाहेर दिसण्यात डोंगर वैगेरे बघू लागली.
रोहन : ऐकणं आता पुढच्या महिन्यात जत्रा आहे. खूप धमाल असते इथे तेव्हा येऊया का. पण तुला चालणार असेल तर.
प्रिया : हो चालेलना.
प्रियासुद्धा मनसोक्त रोहनशी बोलत होती.

क्रमशः

©भावना विनेश भुतल

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा