कलावंत कि कवडे

Written by

कोणत्याही राष्ट्रातील कलावंताच्या सामाजिक प्रगल्भतेचे ” प्रबळ ” प्राबल्य त्या राष्ट्राच्या सुदृढतेचे द्योतक मानले जाते. कलावंताची सामाजिक आणि सांस्कृतिक अप्रगल्भता देशाच्या एकूणच व्यवस्थेवर घाव घालत असते. एकीकडे लोकशाहीचे भरभक्कम बिरुद गौरवाने मिरवणाऱ्या आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य या केवळ ‘ गोंडस ‘नावालाच उरलेल्या आमच्याच समाजामध्ये एकनेकप्रकारे चित्रपटबंदी , साहित्यबंदी ,सांस्कृतिक असहिष्णुता , विषारी विचारधारेचा थोपवलेला दहशतवाद आणि अतिरेकी झुंडशाही वेळोवेळी समोर आली आहे.. राष्ट्राचा सामाजिक गाभा मजबूत करण्याचे काम अनेक सांस्कृतिक माध्यमातून केले जाते..याच सांस्कृतिकतेला तेजोमय धार देण्याचे काम सवेंदनशीलतेने केले आहे आणि या संवेदनशीलतेतून सृजनशीलतेचा जन्म झाला.. भारतीय साहित्याला , कलासृष्टीला सुगीचे दिवस आले…लेखन , साहित्य , काव्य , चित्रपटे , नाटक यामाध्यमातून आजतायागयात एक नवा अध्याय लिहिला गेला आहे..समाजाला ताठ मानेने जगायला शिकवणारा हा वारसा निडर , विवेकवादी असणं महत्वाचं असत. जाणिवांचा जागर होणं आणि सवेन्दनाना कलाकृतींच्या माध्यमातून मूर्तरूप देणं महत्वाचं ठरत . वैचारिक , कलात्मक कल्पनांच्या मर्यादा जेवढ्या विस्तीर्ण असतील तेवढ्याच त्या देशहितार्थ असतात..परंतु काळानुसार याच विचारवंतांनी , कलावंतांनी क्षणिक फायद्यासाठी स्वतःची प्रगल्भता एका विशिष्ट विचारसरणीला बांधून घेऊन सृजनशीलतेचा पर्यायाने व्यवस्थेचा मुडदा पडण्यास सुरुवात केली हे जळजळीत सत्य आहे..समाज जीवनाचं प्रबळ नेतृत्व कलावंताच्या माध्यमातून पडद्यावर उभं केल जाते..काल्पनिक विश्वात व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवून न्याय मिळवून देणारे हेच नायकत्व वास्तवात मात्र व्यवस्थेसमोर लाचार होऊन जीने जगत आहे हि शोकांतिका आहे..पडद्यावर दंड थोपटायचे आणि प्रत्यक्षात मात्र हाथ जोडून उभे राहायचे हा विरोधाभास आता निर्माण होऊ लागला आहे.चित्रपटातील भूमिका आणि वास्तवतेचं दर्शन यांचा दूरदूरपर्यंत संबंध नसतो हे मान्य परंतु चाहत्यांच्या प्रेमाच्या जोरावर पडद्यावरचे नायकत्व मिळालेल्या कलावंतानी सामाजिक प्रगल्भता वेशीवर टांगण्याचा प्रकार किळसवाणा आहे हे मात्र नक्की..कलावंतांना देवत्व बहाल करणारी मानसिकता भारतीय संस्कृतीमध्ये जन्मास आली अन त्यामुळे ” हिरो “ म्हणेल तेच अंतिम सत्य मानणारी वृत्ती इथेच निर्माण झाली आहे ..व्यवस्थेच्या अधिपत्याखाली शरमेने मन टेकवून असाह्यतेचे जीने जगण्याची सवय आमच्या कलावंतांना लागत असेल तर त्याला/तिला देवत्व बहाल करणारा समाजही हेच जगणे आंधळेपणाने स्वीकारतो..स्वाभिमानाचा कणा व्यवस्थेच्या दावणीला बांधला जातो..जेव्हा कलावंत हे व्यवस्थेचे गुलाम होतात तेव्हा त्यांच्यातील सृजनशीलतेचा अंत होतो आणि अश्यातूनच बिकाऊ कलाकृतींचा जन्म होत असतो (गेल्या काही महिण्यामध्ये असे चित्रपट प्रदर्शित झाले ) ..त्यामुळेच हे टाळण्यासाठी सामाजिकतेची जाण ठेवून समाजहितासाठी व्यवस्थेविरुद्ध त्यांनी उभं राहायला हवंय..नाही म्हणायला प्रकाश राज यांच्यासारखे अनेक दाक्षिणात्य कलावंत वेळोवेळी हे काम करत आले आहेत..मराठी चित्रपट सृष्टीमध्ये जरी अश्या “ रिअल “ नायकांची वानवा असली तरीही नाना पाटेकर , अमोल पालेकर , अतुल कुलकर्णी , जितेंद्र जोशी , सोनाली कुलकर्णी ( सिनियर ) यासारख्या बोटावर मोजता येण्यासारख्या मंडळींनी व्यवस्थेला जाब विचारण्याचा खटाटोप चालू ठेवला आहे हे मात्र नक्की..मात्र दुसरीकडे सत्ताधार्यांचे , त्यांच्या विचारसरणीचे थोडेपार कोडकौतुक आणि चमचागिरी केली अनेक मोठमोठे सरकारी पुरस्कार , महत्वाच्या संस्थांचे अध्यक्षपदे , खासदारकी पदरात पडून घेणारी जमात गेल्या ४०-५० वर्षांपासून देशात निर्माण झाली आहे..प्रादेशिक कलावंत मात्र स्वतःचे सांस्कृतिक अस्तित्व टिकविण्यासाठी व्यवस्थेच्या विरोधात जाण्यासाठी धजावत नाही.एकादृष्टीने हे त्यांना योग्य जरी वाटत असले तरीही स्वतःच्या वैयक्तिक अस्तित्वासाठी सांस्कृतिक अस्मितेचा बळी त्यांच्याकडून दिला जातोय याच कुणालाच सोयर -सुतक का नाही ? शासकीय अनुदान मिळावं यासाठी पोटात असणारा व्यवस्थेविरुद्धचा आक्रोश त्यांच्या ओठी कधीच येत नाही ..त्यांच्या कलाकृतींमधून तर मुळीच नाही.त्यामुळे नकळत का होईना पण आमची संवेदशीलतेला आमच्याच सृजनशीलतेचा गळा घोटत आहे…सामाजिक , राजकीय , सांस्कृतिक असहिष्णुता देश कमकुवत करते म्हणून थोडेपार आंदोलने निघतात , पुरस्कारवापसी देखील होते परंतु उठलेला तो आवाज अचानक क्षीण होतो..दडपून टाकला जातो…सोशल मीडियाच्या , प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून निबंध लिहिणं , निषेध व्यक्त कारण वेगळं आणि प्रत्यक्षात व्यवस्थेविरुद्ध व्यक्त होणं वेगळं..इफिच्या वेळी ” न्यूड ” वरील बंदीवर सर्वांनी वेगवेगळ्या माध्यमातून निषेध व्यक्त केला प्रत्यक्षात मात्र फारच थोडी मंडळी न्यूडच्या बाजूने उभी राहिली (तुलनेत s दुर्गा च्या पाठीशी उभी राहणारी कलाकारांची संख्या लक्षणीय होती )…सोशल मीडियावरचा आव वेगळा आणि प्रत्यस्ख कृती मात्र वेगळी हि दुटप्पीभूमिका कलावंतामध्ये पोसली जातेय..आणि हल्ली मराठीमध्ये त्यांचे प्रमाण जास्त आहे..प्रगल्भतेची पारायणे केवळ पुस्तके , चित्रपटे हिट करण्यासाठी केली जात आहेत…प्रदर्शनाआधी देशप्रेमाचे दोन-चार डोस समाजाला दिले कि आपला चित्रपट , पुस्तक हिट होन्याची लकब कलावंतानी अवगत केली आहे..प्रत्यक्षात मात्र स्वहितार्थ देशाचा वापर करून घेणारी पिलावळ वाढत चालली आहे..सामाजिक प्रगल्भता केवळ नाममात्र राहिली आहे.त्यामुळे कलावंतानी वेळीच सावध होणं गरजेचं आहे…कलावंत म्हणून कितीही मोठे झालात तरीही एक नागरिक म्हणून तुमचं मोठेपण तुम्हाला स्वकृतीतून सिद्ध करावाच लागेल..इथे तुम्हाला ” रिटेक ” घेण्याची संधी फारशी उपलब्ध होत नाही . कलावंत आणि कवडे यांच्यातील फरक ओळखण्यास सजग जनता उशीर करत नाही हे शाश्वत सत्य आहे..त्यामुळे कलावंतानी जिथे व्यवस्था समाजहितार्थ उभी राहील तिथे त्यांच्या पाठीवर कौतुकाने थाप टाकून त्यांच्या सोबत देशासाठी एक अध्याय लिहावा आणि जिथे व्यवस्था समाजाविरुद्ध , अभिव्यक्तिस्वतंत्र्याविरुद्ध दडपशाही उगारते तिथे त्यांच्याच पाठीत धपाटा टाकण्यासही मागे पुढे बघू नये..न्यायाची चाड आणि अन्यायाची चीड ” खऱ्या ” कलावंताचे लक्षण असते ..सजग , विवेकवादी , निडर कलावंताची पिढीच देशाची तारणहार ठरणार आहे.

Article Categories:
राजकीय

प्रतिक्रिया व्यक्त करा