कलियुगातील पुण्यदान. #स्पर्धा

Written by

 

एक दिन बिक जाएगा माटी के मोल ।
जग मे रह जाएगें प्यारे तेरे बोल।।

कीती समर्पक शब्द आहेत ना ? मानवी शरीर हे क्षणभंगुर आहे आणि शेवटी मातीतच मिसळणार . मृत्युनंतर सगळं नष्टच होणार आहे . ” मरावे परी कीर्ती रुपी उरावे ” हे शब्द जर सार्थक करायचे असतील किंवा मेल्यानंतर ही जीवंत रहायचे असेल तर तुम्ही अवयव दान करून समाजात एक नवीन आदर्श घालून अवयवरुपी कायम जिवंत राहू शकता. आपण केलेल्या अवयवदानामुळे कोणालातरी जीवदान मिळू शकते. मृत्युनंतर देखील मृत शरीर कितीतरी लोकांना आशेचा किरण ठरू शकतो…आपल्या आर्थिक स्तरापलीकडे देवाने आपल्याला खुप देणग्या देऊ केल्यात. त्यातीलच अवयवदान ही एक देणगी समजावी , त्यामुळे अवयवदान हे सगळ्यात श्रेष्ठदान आहे असे म्हणायला हरकत नाही किंवा असे म्हटलंतर वावगं ठरणार नाही…

काही दिवसांपूर्वी पेपरात एक बातमी वाचली..अपघातात ब्रेनडेड झालेल्या तरुणाने दिले तिघांना जीवनदान…मयूर शहाजी मातंग असं त्या तरुणाचं नाव वय वर्ष 23. मोटरसायकल वरून आजीकडे जाताना मोटरसायकल घसरून अचानक तो खाली कोसळला. डोक्याला जबर मर लागला होता. गंभीर अवस्थेत त्याला दवाखान्यात दाखल करण्यात आलं. मेंदूला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे त्याला ब्रेनडेड घोषित करण्यात आले. अशा अवस्थेत त्याचे अवयव एखाद्या गरजू माणसाचे प्राण वाचवू शकतात याची माहिती त्याच्या परिवाराला देण्यात आली. आपले डोंगरा एवढे दुःख पचवत त्याच्या परिवाराने अवयवदानाचा निर्णय घेतला आणि तीन रुग्णांना जीवनदान मिळाले. मयूर हा अत्यंत गरीब कुटुंबातील मुलगा …मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबाने आपल्या मुलाचे अवयवदान करून समाजापुढे एक नवीन आदर्श घालुन दिला. या अपघातात मयूर जरी गेला असला तरी तो त्याने दान केलेल्या अवयवांमुळे तो अवयवरुपी जिवंतच राहणार आहे…

आजीने यकृत दान करून वाचवले नातीचे प्राण , लेकीने केलेल्या यकृतदानामुळे वाचले बापाचे प्राण , अशा बऱ्याच बातम्या रोज आपल्या वाचनात येत असतात…या सगळ्या वरून हे लक्षात येते कि आपल्या समाजात अवयवदाना विषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली आहे… अवयवदान म्हणजे एखादी व्यक्ती मृत झाली असेल किंवा ब्रेनडेड असेल म्हणजे त्याचा मेंदू मृत असेल तर अशा व्यक्तीचे किडनी , हृदय , डोळे, यकृत , स्वादुपिंड , त्वचा आणि फुफ्फुस आपण दान करू शकतो…पूर्वी साधं रक्तदान करण्यासाठी सुद्धा कोणी पुढं येत नव्हतं…पण आता परस्थिती बदलली आहे जागोजागी रक्तदान शिबिर आयोजित केली जात आहेत…नेत्रदान , रक्तदान या साठी लोकांचा सहभाग वाढलेला आहे…तशाच प्रकारे अवयवदानाचे महत्व देखील दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे…

मृत्यूनंतर आपण मृत शरीरावरील दागिने काढून घेतो ना ? अगदी तसच जर आपण निसर्गाने म्हणा अथवा देवाने दिलेले मौल्यवान दागिने म्हणजे डोळे, हृदय , त्वचा , किडनी , फुफ्फुस यांना जर काढून घेऊन जर एखाद्या गरजुला दान दिलं तर त्याच आयुष्य नक्कीच सुधारू शकतो…मृत्यूनंतर पशु पक्षी , कीटक , झाडे इतर प्राणी कुठल्या न कुठल्या रुपात इतरांच्या कामी येतच असतात…
चरबी , चामडी , मोरपीस , हत्तीदंत , हे सगळे आपण उपयोगात आणतोच तर काही प्राणी इतर प्राण्यांचे भक्ष्य बनतात…पण मानव शरीराला मृत्यूनंतर दफन किंवा दहन करून मातीमोल करून टाकतात…मृत्यूनंतर परमेश्वराने बहाल केलेला अनमोल खजिना कर्मकांडाच्या नावाखाली मातीमोल न करता त्याची राखरांगोळी न करता मानव जातीच्या उपयोगात आणल्यामुळे एखाद्याला जीवदान मिळू शकते…

कोणत्याही प्रकारचे दानधर्म करण्यासाठी माणसाला पैशाची , आर्थिक सुब्बतेची गरज लागते पण देहदान किंवा अवयवदान हि अशी पुण्यदाने आहेत याला काहीच लागत नाही , हे आपल्या आर्थिक स्तराच्या आणि सामाजिक स्तराच्या पलीकडे जाऊन आपण करू शकतो…यामुळे याला नक्कीच आपण कलियुगातील पुण्यदान म्हणु शकतो…आणि आशा महान पुण्यदानामुळे आपण मृत्यूनंतर देखील जिवंत राहु शकतो किर्तीरूपीआणि अवयवरुपी देखील…❤

पुण्यदान.❤

देहरूपी दान दिले दात्याने उपकार केले ।
मानवरूप देऊनी जगती महान बनवले ।।

अनमोल ठेवा निसर्गाचा मज करी सोपवला ।।
पुण्यकर्म करण्या साधन बनवुनी जीव सार्थक केला ।।

देहदान,अवयवदान असे कलियुगी पुण्यदान ।
करुनी ठेवा परत त्याचा त्याला राखू त्याचा मान ।।

पुण्यदान करुनी द्या गरजवंतास जीवनदान ।
अवयवरुपी रहा जिवंत करा हो अवयवदान ।।

समर्थ म्हणती मरावे परी कीर्ती रुपी उरावे ।।
करुनि देहदान जगी मरावे परी अवयवरुपी उरावे ।।❤

©®सुनीता मधुकर पाटील.

प्रतिक्रिया व्यक्त करा