कल क्या हो किसने जाना …..

Written by

कीती बावळट आहेस ग् तू …..समजत नाही का काही ….आपलं वय काय आणि आपण वागतोय काय …..किती जोराने बोलते…..किती जोराने हसते…..लहान आहेस का वाकडं दाखवायला…..लहानांसोबत काय खेळते …..वेडी आहेस का, अशी एकदम काय नाचत सुटलीस…..एवढ्या जोराने काय बोलतेस ग् ,कुठे काय बोलावं समजतं का तुला…..किती बालीशपणा…….कीती हा वेडेपणा…..वेडी वेडी वेडीच…..

मी आहे सुनिता  …….ही वरची सगळी वाक्य माझ्यासाठी रोज हजेरी लावतात ते ही न चुकता बरं का …… बरं आता माझी थोडी ओळख करून देते हा……

मी सुनिता….. पेशाने एक डाॅक्टर आहे त्याआधी माझं नर्सिंगही झालं आहे नंतर लग्न केलं नवरा डाॅक्टर म्हणून मलाही डाॅक्टरकीचं शिक्षण घ्यावं लागलं आणि आता मी डाॅक्टर म्हणून माझी प्रॅक्टीस करते ……. बरं पण,  मराठी भाषेवर माझं खुप प्रेम म्हणूनच मराठी साहित्यात पोस्ट ग्रॅज्युएशन पण केलंय …….

आता माझं शिक्षण सांगण्याचं प्रयोजन हे होतं की,  एवढं सगळं असूनसुद्धा “किती हा वेडेपणा” चा  टोमणा मला सतत ऎकावा लागतो.

मला ना मनसोक्त बागडायला आवडतं, अगदी फुलपाखराप्रमाणे ……खळखळून हसायला आवडतं ……वयाचं बंधन झुगारून जेंव्हा मी जगते तेंव्हा इतरांच्या नजरेत मी वेडी ठरते.

एवढी शिकलीस जरा तरी तुझ्या स्टेटस् ला शोभेल असं वाग की, काय म्हणतील लोकं …..

हाय रे …..ऊफ्फ ! ही असली लोकं मुळात जन्मालाच का येत असतील ????मला खरच समजत नाही. जन्म घ्यायचा , शिक्षण करावं, पैसा कमवावा नंतर पोरांचं करत बसा आणि स्वतः जगणं विसरून जा…..का तर ….. चार लोकं ,काय म्हणतील …. हा विचार सतत येतो.

पण मी मात्र ह्या सगळ्या विचारांना फाटा देऊन, “जिओ और जीने दो सोबत हसो और हसने का मौका दो” ह्या माझ्या फंड्याला घेऊन मिळालेला जन्म सार्थकी लावतीये.

कधी मोठेपणी साबणाचे फुगे उडवलेत का हो तुम्ही?अहाहा ! …. काय तो आनंद ज्याची तोड कशातच नाही. वेड्यासारखं बेभान होऊन फुलपाखरांच्या मागे पळावं….आनंदाच्या क्षणी मोठमोठ्याने ओरडावं …..अगदी पाय दुखेस्तोवर एखाद्या गाण्यावर थीरकावं ….लहान मुलांसोबत असताना लहानपण अनुभवत आपणच लहान व्हावं …..समोरच्याच्या दु:खात ,वेडेवाकडे चित्र – विचित्र चेहरे बनवून तर कधी शब्दाच्या मायाजालाने खळखळून हसवून समोरच्याला स्वतः चं दु:ख काही काळ का होईना विसरायला लावणं हीच तर आपल्या माणूसपणाची खरी पावती असते नाही का ……

सुने तू हवीच बरं का नाहीतर मजा येत नाही .…अशी पोकळी निर्माण होत असेल तर तुम्ही माणसांना जिंकत आहात हे शंभर टक्के खरं. आणि मी ह्या जिंकण्याच्या मार्गावर दिवसेंदिवस प्रगती करत आहे याचा मला अभिमान वाटतो ……आनंदाच्या क्षणी सगळेच आठवतात पण दु:खातल्या क्षणाच्या फुंकर वरची मानकरी मी असावी ह्यासाठी माझा सतत प्रयत्न असतो …

अग् आपल्या डिग्री नुसार वागावं ग् ….. नाहीतर लोकं आपला मान ठेवत नाहीत…..हा ही एक नेहमीचाच डायलाँग बरं का …..

अरे पण समोरच्याचं मन च जिंकलं की मग मान – सन्मान येतोच कुठे नाही का?

वृद्धाश्रमात काम करताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की स्वतः ला जे मनाने तरुण समजतात ते कधी म्हातारे होतच नाहीत. म्हणूनच मनाने नेहमी तरुण आणि स्वच्छंदी राहण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो.

एखाद्या साध्या कमेंट ने ही हास्यफवारा उडावा अाणि समोरच्याचा मुड एकदम फ्रेश व्हावा यासाठी वेडं व्हावं लागतं आणि आपल्या शहाणातल्या वेडेपणाला जपावं लागतं. आणि हेच तर मी करते…..कशाला हवय समाजातल्या त्या चार लोकांचं अटेंशन? …..आज मी माझी डाॅक्टरकी करते, वृध्दाश्रमात आणि अनाथ आश्रमातही कामही करते. पण माझ्या जगण्याच्या फंड्यामधे मी माझं स्टेटस् कधीच मधे आणत नाही आणि हो त्या चार लोकांचाही विचार करत नाही बरं का…..आणि तसंही वपु म्हणतातच की,

  •  कसलं ना कसलं वेड हवं माणसाला ज्याला वेडं होता येत नाही तो शहाणा माणूसच नव्हे.

हो मला वेड आहे मनसोक्त जगायचं, इतरांनाही स्वतः चं भान विसरायला लावायचं ….निखळ झ-यासारखं रहायचं, भेदभाव न करता प्रत्येकाला हसवून तृप्त करतं.

काहीतरी छानसं,भन्नाट असं केलं पाहिजे आयुष्यात असंच वाटतं मला नेहमी…..इतरांच्या भावनांना जपत अापला हळवा कोपरा पण आपण जपला पाहिजे आणि मग जे होतं त्याला कोणीतरी शायरीत शब्दबध्द केलय की,

  • कहानी खत्म हो तो कुछ ऎसे खत्म हो की,लोग रोने लगे तालीयाँ बजाते बजाते …..

अरेरे ब्लाॅग जरा मोठाच झाला वाटतं …. तुम्ही कंटाळलात का हे सगळं वाचून ….चला आता बास करते हा…..कारण बाहेर आता मस्त पहिला पाऊस पडतोय…..अहाहा !…… काय तो मातीचा सुगंध .

मी तर निघालीये पावसात भिजायला ….नाचायला

काय म्हणालात? ……. डाॅक्टर आहे मी मला शोभतं का हे करायला ?……हाहाहाहाहाहा ….

मी असला विचार करत नाही ….मला वेडंच रहायला आवडतं ……मी निघालीये हा ……चला आता तुम्हीपण कारण,

  • हँसते गाते जहाँ से गुजर 
  • दुनिया की तू परवाह ना कर 
  • मुस्कुराते हुए दिन बिताना 
  • यहाँ कल क्या हो किसने जाना

©Sunita Choudhari.

(मित्र-मैत्रीणिंनो आज मी एखादा ब्लाॅग लिहायचाय म्हणून हे लिहिलं नाहीये तर मी जशी आहे तसच स्वतःला मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न करतीये. तुम्हाला काय वाटतं माझ्या ह्या जगण्यासाठीच्या अशा फंडाबाबत ?…. तुमचे अनुभवही असेच असतील तर मला ते नक्की शेअर करा हा….. )

Article Categories:
इतर

प्रतिक्रिया व्यक्त करा