कशी नशिबाने थट्टा आज मांडली.

Written by

 

आज कॉलेज सुटायला जरा वेळच झाला होता . पाच वाजताची बस बहुतेक गेली असणार म्हणून थोडी घाईघाईतच धावत बसस्टॉप वर पोहचले तर बस जायच्या तयारीतच होती धावत जाऊन बस पकडली आणि एक रिकामी सीट पाहून त्यावर विसावले…धावल्यामुळे थोडा दम लागला होता म्हणून डोळे मिटले तर ” तू अंजली ना ” शेजारी बसलेल्या मुलीने विचारलं म्हणून तिच्याकडे पाहिलं तर समोर स्मिता…हो स्मिताच होती ती…माझी क्लासमेट… बारावीपर्यंत आम्ही दोघी एकत्रच शिकत होतो…अभ्यासात हुशार , सुंदर , चैतन्याने एकदम भरलेली , जाईल तिथे हास्याचे कारंजे उडवणारी , नेहमी उत्साहित , अशी स्मिता आज बारावीनंतर बहुतेक चार वर्षांनी भेटत होती…
बारावीनंतर मी Bcs ला ऍडमिशन घेतली आणि तिने बहुतेक Bsc ला…मध्यंतरी तीच लग्न झालं अस काहीतरी कानावर आलं होतं . आज चार वर्षानंतर ती अचानक भेटली…
” अगं इथे कुठे ? काय करतेस आजकाल ? आणि मी ऐकलं तुझं लग्न झालं…काय करतात आमचे जिजू…” माझ्या तोंडाचा पट्टा सुरू झाला…
ती शांतच होती माझ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत ती म्हणाली ” आधी तु सांग काय करतेयस , कशी आहेस . ”
अगं मी मस्त आहे ही काय आताच कॉलेज मधून येतेय ” मी सांगितलं …” तू सांग तू कशी आहेस ? तुझं खरंच लग्न झालं ? माहेरी आलीस का?
” मी !! मी एकदम मस्त …छान चाललंय माझं…बीए ला ऍडमिशन घेतलं आणि सोबत कॉम्प्युटर कोर्स सुद्धा… करतेय…”तिने सांगितले
” आणि जिजू कसे आहेत आमचे ? छान आहेत ना ? तुझी काळजी घेतात ना नीट ” माझं आपलं चालूच होत…
“जिजू !! जिजू …ती अडखळली डोळे पाण्याने भरले… काय बोलावं तिला काहीच समजत नव्हतं… तोंडातून शब्द फुटत नव्हता…फक्त डोळे वाहत होते…”
मला काहीच कळेना , अचानक हीला काय झालं?आता तर ठीक होती .अचानक रडू लागली , मी तिला गप्प करण्याचा प्रयत्न केला…
तोपर्यंत कंडक्टर ने ओरडून आमचा स्टॉप आलेलं सांगितलं…आम्ही दोघी बस मधून उतरलो…मला तिच्याशी बोलायचं होत पण तिचे बाबा बस स्टॉपवर तिला न्यायला आल्यामुळे मला तिच्याशी बोलता आलं नाही…
रात्री मला व्यवस्थित झोप ही लागली नाही राहून राहून स्मिताचेच विचार मनात येत होते…काय झालं असेल तिच्या सोबत …तिचे सासरचे चांगले असतील ना? आणि तिचा नवरा …नवऱ्या बद्दल विचारल्यावर ती रडू का लागली काहीच कळत नव्हतं…
दुसऱ्या दिवशी कॉलेज ला जाण्याऐवजी मी स्मिताच घर गाठलं…ती ही तयार होऊन कॉलेज ला जायच्या तयारीतच होती…”काका आम्ही आज कॉलेज न जाता इथेच गप्पा मारत बसू का ?…माझी मैत्रीण खूप दिवसांनी मला भेटली आहे…तिच्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत…” मी तिच्या बाबानां विचारलं…त्यांनी माझ्याकडे बघितलं , त्यांच्या नजरेत मला एक अगतिकता एक हतबलता स्पष्ट जाणवली…त्यांनी डोळ्यांनीच होकार दिला आणि तिथून निघुन गेले…आम्ही दोघी तिच्या खोलीत गेलो…
आत जाताच मी इकडतीकडच न बोलता स्पष्टच विचारलं,” अगं , काय झालं स्मिता काल तू अशी अचानक का रडू लागलीस…सांग मला ” आज तिचे डोळे मला निर्विकार , भावनाशून्य जाणवले…
” जाऊ दे सोड तो विषय , मला त्या कटू आठवणींना उजाळा नाही द्यायचा आहे…
“अगं कसल्या कटू आठवणी तुझं वयच काय आहे अजून तुझे खेळून खायचे दिवस , तुझ्या बरोबरचे आम्ही अजून आमची शिक्षणच पूर्ण करतोय आणि तू कसलं कटू आठवणींचं ओझं घेऊन फिरतेयस…काय झालंय मला सांग , झाली तर माझी मदतच होईल तुला या सगळ्यातून बाहेर पडायला…बराच वेळ हुज्जत घातल्यानंतर शेवटी ती तयार झाली…
“अगं अंजली काय सांगू तुला , मी काय काय भोगलय , Bsc च पहिलं वर्ष संपता संपता एक छान स्थळ सांगून आलं होत. मुलगा चांगला सुशिक्षित , श्रीमंती तर एवढी की जणू पैशाचा पाऊसच व्हायचा त्यांच्या घरी पण हाच पैशाचा पाऊस माझ्या जीवनात अश्रूंचा महापूर घेऊन येईल अस कधी वाटलंच नव्हतं…स्थळ माझ्या काका काकूंनी सुचवल्यामुळे शंकेच कारणच नव्हतं , आणि लग्नानंतर मला शिकण्याची परवानगी दिल्यामुळे मी पण जास्त आढेवेढे न घेता लग्नाला तयार झाले . आईबाबा तर खूप खुश होते. पोरीनं नशीब काढलं म्हणून सगळ्यांना कौतुक सांगायचे…लग्न छान थाटामाटात पार पडलं , मग देव देव पूजा करत , नव्या आतुष्याची सोनेरी स्वप्न बघत आठवडा कसा निघून निघून गेला काही कळलंच नाही…”
” पहिल्या रात्री आम्ही दोघे गप्पा मारत एक दुसऱ्याला समजून घेत होतो , एकमेकांच्या आवडीनिवडी , स्वभाव , जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो , इतक्यात अचानक ह्यांना काय झालं माहीत नाही , दातखीळ बसून अचानक बेहोष झाले…मी खुप घाबरले धावत जाऊन सासूबाईंना बोलावले…थोड्या वेळात सगळेच गोळा झाले…कसतरी करून त्यांना शुद्धीवर आणण्यात आलं , कसलीतरी औषध चारण्यात आली…सगळेजण आपापसात काहीतरी कुजबुजत होते…मला काहीच कळत नव्हतं मी पूर्णपणे गांगरून गेले होते , घाबरुन चुपचाप एका कोपऱ्यात उभी होते…”
” सासरच्या लोकांच्या वागण्यावरून मला नेहमी जाणवायचं ते माझ्यापासून काहीतरी लपवत आहेत…सगळे बोलत बसलेले असायचे मला पाहिलं की एकदम चूप व्हायचे…त्यामुळे माझ्या मनात आता शंकेची पाल चुकचुकायला लागली होती…दिवसेंदिवस ह्यांची तब्येत ढासळतच चालली होती…”
” एक दिवस घरातील सगळे कोणत्यातरी पाहुण्याच्या घरी पूजेसाठी गेले होते, मला ह्यांच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठो घरीच ठेवलं होतं…ह्याच संधीचा फायदा घेऊन मी घरात शोधाशोध केली तर मला ह्यांची मेडिकल रिपोर्ट्स असलेली एक फाईल सापडली…मी पटकन त्यांचे मोबाईल वर फोटो काढून घेतले आणि सगळं सामान परत होत तस करून ठेवलं…”
” एक दिवस अचानक ह्यांची तब्येत खुप बिघडली आणि ह्यांना दवाखान्यात ऍडमिट करण्यात आलं , पण काही उपयोग झाला नाही , आणि हे गेले कायमचे सगळ्यांना सोडून…आमच्या नात्याची अजुन सुरवात पण झाली नव्हती गं !!! ” आणि हे गेले “…
” लग्नानंतर दोन महिन्यातच बघितलेल्या सुंदर स्वप्नांचे मनोरे ढासळले होते…नशिबानं क्रूर थट्टा केली गं माझ्यासोबत…”
एवढं बोलून ती मोठमोठ्याने रडू लागली…माझ्या साठी तर हे सगळं कल्पनेच्या पलीकडे होत…लग्नानंतर फक्त दोन महिन्यातच एका विधवेच जीणं तिच्या वाटेला आलं होत…
तिला जवळ घेऊन तीच सांत्वन केलं तिला शांत केलं…थोड्या वेळानी ती शांत झाली…
” हा धक्का माझ्या साठी एवढा मोठा होता की मी आतुन पूर्ण तुटले होते. माझ्या सगळ्या संवेदना मेल्या होत्या… मी जिवंत असून ही मेल्यातच जमा होते…थोड्या दिवसांनी सासरच्यांनी मला पांढऱ्या पायाची म्हणून माहेरी आणून सोडले…माझ्या आईबाबांवर तर दुःखाचा डोंगरच कोसळला होता…”
” माझ्या बाबांनी बाहेर चौकशी केल्यानंतर समजले की माझा नवरा थोडेच दिवस जगणार आहे हे त्याच्या घरच्यांना माहीत होत तरीही लग्नानंतर तो नीट होईल या आशेने त्यांनी त्याच लग्न माझ्याशी लावून दिल होत…ह्या सगळ्यात माझे काका काकू ही सामील होते , त्यांना ही माझ्या सासरच्यांनी स्थळ मिळवून दिलं म्हणून मोठी रक्कम देऊ केली होती…काका काकूंना जाब विचारला असता आम्हाला काही माहीत नाही म्हणून ते सरळ हात झाडून मोकळे झाले…”
” फोटो काढलेले रिपोर्ट्स आमच्या ओळखीच्या डॉक्टरांना दाखवले असता त्यांना मेंदूचा एक दुर्मिळ आजार असल्याचं त्यांनी सांगितलं होत…”
” या सगळ्या परिस्थितीतुन बाहेर यायला मला दोन वर्ष लागली गं!!!…दोन वर्ष मी स्वतःला घरात कोंडून घेतलं होत…दुःखाचा एक कोष निर्माण झाला होता माझ्या अवतीभोवती…आईबाबांचे हाल तर बघवत नव्हते…”
” शेवटी ह्या सगळ्यातून बाहेर येण्याचा निर्णय घेतला…पुन्हा नव्यानं एक नवीन सुरवात करण्याचा निर्णय मी घेतलाय , अंजली !!!!”
“तु अगदी योग्य निर्णय घेतलास , स्मिता …ते एक वाईट स्वप्न होत अस समजून विसरून जा ”
” नाही अंजली असं कसं विसरून जाऊ , माझं आयुष्य बरबाद झालंय नाही विसरू शकत मी…अगं दोन महिन्याच्या लग्नामुळे जन्मभरासाठी विधवेचा शिक्का माझ्या माथी मारला गेलाय…सगळ्यांनी आपापला स्वार्थ साधला…पण मग माझं भविष्य काय ? ”
” मग आता पुढे काय करणार आहेस तू ” मी विचारलं…
” ज्या काका काकूंनी पैशासाठी माझं आयुष्य पणाला लावलं…आपला मुलगा थोडे दिवस जगणार आहे हे माहीत असून देखील सासरच्यांनी माझं आयुष्य उध्वस्त केलं त्यांच्या विरुद्ध कोर्टात केस दाखल केली आहे मी…फसवणुकीचा आणि मानहाणीचा दावा लावलाय मी त्यांच्यावर…नुकसान भरपाई म्हणून एक करोडची मागणी केली आहे मी…”
” मला माहिती आहे अंजली जे नुकसान झाल ते पैशांनी भरून निघणार नाही , पण या स्वार्थी जगात मी पण थोडी स्वार्थी झालं तर कुठं बिघडलं…पूर्ण आयुष्य माझा समोर पडलंय…व्हायचं ते नुकसान होऊन गेलंय दुसरं कोणी माझ्यासोबत लग्न करेल की नाही ते माहीत नाही…माझ्या आईबाबांची जबाबदारी माझ्यावर आहे …अस असताना माझं भविष्य तरी आर्थिक दृष्ट्या मी मजबूत केलं तर कुठं बिघडलं ,अंजली!!!…”
तीच हे नवीन रूप बघुन मी स्तब्ध झाले , पुढे काय बोलावं मला काहीच समजत नव्हतं…मी निशब्द झाले होते…

तर मग मैत्रिणींनो तुम्हाला काय वाटतं स्मिताने घेतलेला निर्णय योग्य आहे की अयोग्य…प्लिज कमेंट बॉक्स मध्ये मला कळवा…

 

 

©® सुनीता मधुकर पाटील.

Article Categories:
नारीवादी

Comments

प्रतिक्रिया व्यक्त करा