कहाणी एका दुर्दैवी बापाची

Written by

(थोडीशी सत्य,थोडीशी काल्पनिक)

मी कामावर जात असताना रोज मला रस्त्याच्या कडेला एक वेडसर भिकारी बसलेला दिसायचा, फाटके कपडे,केस दाढी वाढलेली आणि अंग मळकटलेला.मनात यायच हा कोण असेल? आणि असा का बसलेला असतो हा रस्त्याच्या कडेला? पण कामावर जायची घाई असल्यामुळे मी तसाच पुढे जायचो. पण तो मला दररोज दिसायचा आणि मी त्याला पाहिल्याशिवाय पुढे जात नसत.
त्याच्यात आणि माझ्यात काहीतरी नात निर्माण झाल्यासारख वाटत होत.
एक दिवस मला तो तिथ दिसला नाही तर माझ मन सैरभैर झाल मी त्याला इकड तिकड शोधु लागलो पण हा काय दिसेना. मी आजूबाजूला चौकशी केली तर समजल की महानगरपालिकेने त्याला आरोग्य तपासणीसाठी नेला आहे.मी हॉस्पिटलमध्ये गेलो आणि त्याची चौकशी केली तर डॉक्टरनी मला सांगितल की याचा स्मृतीभ्रंश झाला आहे, पण याची स्मृती येत जात राहते. पण कधी येईल कधी जाईल हे सांगता नाही येणार.
डॉक्टरांनी हे सांगितल आणि मला माझ्या स्वर्गीय आजोबांची आठवण आली. त्यांचापण अधुनमधून स्मृतीभ्रंश होत होता आणि ते घर आणि रस्ता भटकायचे पण पंचक्रोशीत त्यांना सगळे ओळखत असल्यामुळे ते आम्हाला फोन करून सांगायचे की आजोबा या ठिकाणी आहेत, मग हातातल काम आहे तिथ टाकून आम्ही त्यांना आणायला जायचो.त्या आठवणीमुळे तो माणूस आणखी जवळचा वाटु लागला.
आणि मनात ठरवल की त्याच्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे.
सुट्टीदिवशी मी माझ्या मित्राला बरोबर घेतल आणि जेवण एका नवे कपडे आणि एका न्हाव्याला बरोबर घेवून त्या ठिकाणी पोहोचलो, तो नेहमीच्या जागीच बसलेला आणि येणाजाणाऱ्या वाहनांकडे बघत होता. आम्ही त्याच्या जवळ गेलो असता तो घाबरून पळु लागला,आम्ही त्याला पकडून त्याच्या अंगावर पाणी ओतल आणि न्हाव्याने त्याचे केस आणि दाढी कापली. मग त्याला अंघोळ घालून नवीन कपडे त्याला घातले. काय चालु आहे हे त्याला काहीच कळत नव्हत. मी त्याच्याशी संवाद साधायचा म्हणून विचारल,” बाबा तुमच नाव काय? घर कुठे आहे तुमच?”
पण तो फक्त माझ्याकडे निरागस नजरेने बघत राहिला. मग मी जेवण आणलेल त्याला खायला दिल. तो घेत नव्हता मी त्याच्या हातावर ठेवून दिल तरी तो घाबरत होता. कदाचित त्याला जेवणावरुन कोणीतरी मारहाण केली असावी म्हणून तो घाबरत होता. आम्ही जेवण तिथ ठेवून थोडस बाजुला गेलो. त्याने थोड इकडतिकड बघितल आणि थरथरत्या हाताने तो घास तोंडात घालु लागला आणि त्याच्या डोळ्यातुन अश्रू वाहु लागले,ते दृश्य बघून नकळत माझ्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या.
वातावरण खुपच भावूक झाल म्हणून मित्र म्हणाला,” अरे रडतो काय वेड्या तु एक पुण्याच काम केल आहे,हास आता.”
मग एक हास्याची लकेर चेहऱ्यावर उमटली आणि आम्ही तिथून परतलो.पण रात्री झोपल्यावर मनात विचार आला की तो बिचारा कुठ झोपत असेल? त्याला पांघरूण असेल ना?
तसाच उठलो एक चादर घेतली आणि खोलीला कुलूप लावुन बाईकवरुन तो बसायचा तिथ आलो.तो थंडीने कुडकुडत होता,मी त्याच्या अंगावर चादर घातली आणि परत खोलीवर आलो, मला त्याच्यासाठी करेल तेवढ कमीच वाटत होत. मी मनाशी ठरवल की त्याला जेवण आणि त्याला काय हव नको ते सगळ आपण पुरवायच, कारण त्याच्यात कुठेतरी मला माझे आजोबाच दिसत होते.
असेच दिवस पुढे ढकलत होते आणि त्यालापण आता मी आपला वाटु लागलो,तो माझी वाट पाहु लागला मी आलो की त्याच्या चेहऱ्यावर हसु येवु लागल.
एक दिवस ते घडल ज्याची मी कल्पना केली नव्हती,तो चक्क माझ्याशी बोलला आणि माझा आनंद गगनात मावेना. कारण डॉक्टर बोलले होते तसच झाल होत. मी त्याला जेवण घेवून गेलो तेव्हा तो म्हणाला,” बाळ एवढ का करतोयस माझ्यासारख्या भिकाऱ्यासाठी?”
मी म्हणालो,” बाबा मी हे का करतोय हे मला माहीत नाही पण मला तुमच्याबद्दल आपुलकी वाटते.”
तो बोलला,” बाळा या जगात कोणी कोणाच नसत, आपली रक्ताची नातीच आपली वैरी होतात,मग तुझ माझ काय नात आहे?”
मी अचंबित झालो कारण तो एकदम तत्वज्ञानी वाटावा असा बोलत होता.
मी म्हणालो,” बाबा तु कोण आहेस मला सांग, तु भिकारी नाहीस,तु चांगल्या घरातला असल्यासारखा वाटत आहेस मला.”
तो मिस्किलपणे हसत म्हणाला,” चांगल घर काय असत बाळा? तसा असतो तर असा खितपत पडलो नसतो.”
नक्कीच त्याच्याबरोबर काहीतरी वाईट घडल होत याची मला जाणीव झाली.
मी त्याला विचारल,” बाबा काय झाल मला सांगशील का? मी तुझा आहे ना? तुला कधीच एकटा सोडणार नाही.”
माझा कळवळा बघून तो सांगु लागला.
तो म्हणाला,” बाळ मलापण परिवार आहे,पोरबाळ आहेत ,नातवंड आहेत, मी पैसा मिळवत होतो तेव्हा मी सगळ्यांनाच हवा होतो,नंतर मला स्मृतीभ्रंश होण्याचा आजार जडला आणि मी अधूनमधून सगळच विसरु लागलो, मग कोणीच ओळखायच नाही मला,बायको होती तोवर माझ सगळ बघत होती,पण ती जग सोडुन गेली आणि मी नकोसा झालो माझ्याच पोटच्या पोरांना. बाबा असाच करतो,बाबा तसाच करतो,रात्री कशाला खोकतो? आमची झोप मोड होते, कुठे जाऊन मरत का नाही? आन बरच काही जे ऐकून माझ्या काळजात भोक पडायची.
पण म्हातार झाड म्हणून ऐकून घेण्याशिवाय काय हातात नव्हत. एक दिवस असाच सगळ विसरून भरकटत इथ येवून पोहोचलोय. आता हेच माझ घर हेच अवघ जगच माझ कुटुंब. इथपण माणस त्रास देतात,शिव्या देतात,मारहाण करतात पण एक गोष्ट सुखावुन जाते ती म्हणजे ती उघडउघड परकी माणस असतात ती माझ्या रकताच्या नात्यातली नसतात.
रोज आपल्या कुटुंबासाठी रस्त्यावरून धावणारी माणस मी बघत असतो आणि मला माझ्या तरुणपणाची आठवण येते आणि हे म्हातारपण जास्तच बेकार वाटायला लागत. बायकोने जाताना जीवाच काही बरवाईट करु नको अस बजावल आहे म्हणून जगतोय बघ बाळा.
इतकी वर्षे झाली माझ्या पोरांनी मी कुठ आहे हे बघितल पण नसणार हे मला माहीत आहे आणि मलासुद्धा त्या स्वार्थी जगात परत जायची इच्छा नाही राहीली.
माणुसकीवरचा विश्वासच उठला होता,पण बाळा तुझ्याकड पाहिल आणि या जगात अजुन माणुसकी आहे हे मला पटल. तुझे आईवडील खुप नशीबवान आहेत बाळा.
काही नात नसताना तु किती जीव लावतोस मला. तुला उभ्या आयुष्यात काही कमी पडायच नाही बाळा माझा आशीर्वाद आहे तुला.”
आणि तो रडू लागला,मी त्याला आधार दिला आणि बाटलीतल पाणी पाजल. त्याची व्यथा ऐकुन माझ्या डोळ्यातुन नकळत पाणी वाहू लागल आणि त्याच्या मुलांबद्दल खुप चीड आली.
मी स्वतःला सावरल आणि तिथून निघून गेलो,खोलीवर गेल्यावर मला आई बाबांची खुप आठवण येत होती मग मी गावाकडे फोन लावला आणि त्यांना ही सगळी हकीकत सांगून खुप रडलो,आई बाबांनी मला समजावल मग जरा बर वाटू लागल.
मी त्याला खुपवेळा त्याच्या मुलांचा पत्ता मागितला पण तो नेहमीच लक्षात नाही म्हणून टाळायचा.
असेच दिवस जात होते आणि पूर्ण जिल्ह्यात तेव्हा एका विशिष्ट जमातीतील चोर सगळ्या जिल्ह्यात पसरले असल्याची अफवा पसरली होती. सगळीकडे या अफवांनी धुमाकूळ घातला होता,सगळ्यांची भीतीने गाळण उडाली होती. कोणतीही अनोळखी व्यक्ती दिसली की तिला चोर म्हणून संशयाने बघितल जावु लागल आणि कसुन चौकशी करण्यात येत होती.
नेहमीप्रमाणे मी कामावर जात होतो तेव्हा एका ठिकाणी खुप जमाव जमलेला दिसला. त्या घोळक्यात काहीतरी होत ते सगळे जावून बघत होते. मीपण बाईक लावली आणि वाट काढत तिथ पोहोचलो आणि ते दृष्य बघुन मला जबरदस्त धकका बसला आणि मी मटकन खाली बसलो,
लोक आपाआपसात बोलत होते,” चोर होता, भिकाऱ्याच सोंग घेवून बसला होता,नाव गाव विचारल तर काय सांगत नव्हता म्हणून आम्ही जरा दरडावुन विचारल तर पळायला लागला,मग पाठलाग करून मारला सगळयांनी,बर झाल मेला ते,असच मारायला पाहिजे चोरांना.”
माझ डोक बधिर झाल होत,चक्कर आल्यासारख वाटत होत,एवढ्यात पोलीस आलेत त्यांनी गर्दी पांगविण्यासाठी लाठीमार चालु केला मलापण एक दोन काठ्या बसल्या आणि मी भानावर आलो.
मला बाजुला घालवल आल आणि पंचनामा करून त्याचा मृतदेह बेवारस या नावाखाली शववाहीकेतुन नेण्यात आला. मी फक्त बघत होतो कारण मला समोरच्या दृश्यावर विश्वास बसला नव्हता. मी बराच वेळ तिथ स्तब्धपणे बसून होतो मग कामावरून मित्राचा फोन आला मी त्याला म्हणालो ,” माझी तब्येत बरी नाही आणि मी इथ रस्त्यावर आहे मला खोलीवर सोडायला ये.”
तो मला खोलीवर घेवून गेला आणि मी त्याच्या गळ्यात पडुन ओक्साबोक्सी रडलो.
खुप वाईट वाटत होत आणि मनात प्रश्न पडले होते.
की काय चुकी होती त्याची?
कसाबसा देवाच्या फोटोसमोर उभा राहीलो आणि देवाला म्हणालो,” का? का असा निष्ठुर बनला आहेस? का त्याच्या जीवाशी खेळ केलास? त्याला असाच मारायचा होता तर एवढे दिवस त्याला का मरणयातना दिल्यास?
आणि ज्यांनी विनाकारण त्याला जीवानिशी मारल त्यांना कोणी अधिकार दिला त्याला मारायचा? ज्यावेळी तो रस्त्याच्या कडेला उपाशीपोटी मरत होता,थंडीने कुडकुडत होता, भरपावसात भिजत होता तेव्हा कोणालाही त्याची दयामाया आली नाही.त्याला काय हव काय नको हे बघायला कोणालाही वेळ नव्हता. मग आज त्याला चोर ठरवून जे त्याला मारुन पुरुषार्थ मिरवणारे खरच पुरुष होते काय? एक म्हातारा माणूस ज्याला घरातून हाकलून लावल आहे कारण तो आता म्हातारा झालाय आणि त्यात भर म्हणजे त्याला स्मृतिभ्रंश होतो हाच त्याचा दोष आहे काय?
तो पण एक तुमच्या आमच्यासारखा जीव होता ना? त्यालापण वेदना झाल्या असतील ना? मार खात असताना त्यालापण वाटल असेल की यातून सुटका करून घ्यावी,पण हजारो लांडग्यांच्यासमोर त्या बापड्या म्हाताऱ्याचा निभाव कसा लागणार? जीव जाताना त्याला आपल्या माणसांची आठवण झाली असेल का? पण त्याच आपल खरच कोणी होत का? हजारोंच्या गर्दीत एकपण माणूस असा नव्हता का ज्याला त्याची दया यावी? जीवंतपणी मरणयातना भोगल्या त्याने पण कोणाला कधी त्रास नाही दिला त्याने की एका भाकरीचा तुकडा त्याने चोरला नव्हता.असा माणसाचा शेवट चोर म्हणून व्हावा यासारख दुर्दैव नसाव. पण जी गर्दी त्याला हकनाक मारुन गेली त्यांना त्याच काय घेणदेण?
मला माहीत होत देवाकडेपण याच उत्तर नसणार आहे,नंतर गावी फोन केला आणि आईशी बोलून ढसाढसा रडलो, तिकडे आईचापण बांध फुटला आणि दोघपण रडू लागलो.
त्यादिवशी न जेवताच झोपलो.
दुसऱ्या सकाळी रोजच्याप्रमाणे मी कामावर निघालो आणि तो जिथ बसायचा त्याजागी जावुन त्याला इकडेतिकडे शोधु लागलो, माहीत होत तो कुठेच नाही आहे तरीपण एक वेडी आशा होती. मग भानावर आलो आणि मी त्याच जेवण त्याच्या जाग्यावर ठेवून पुढे चाललो, थोड पुढे जावून मागे वळून पाहिल तर एक कावळा तिथ अन्न चोचीत धरुन खावु लागला होता.जणु तो कावळ्याच्या रुपात तिथ येवुन बसला होता. मी आजही तिथ थोडफार जेवण ठेवत असतो आणि तो कावळा येवुन ते खात असतो.माणूस संपला तरी त्याच्या आठवणी संपत नसतात.
(जाताजाता एकच सांगतो, ज्यानी आपल्याला जन्म दिला त्या आईवडिलांना कधिच दुख देवु नका, भलेही त्यानी काही मिळवून ठेवल असेल नसेल पण ते आपले जन्मदाते आहेत,त्यांच्यामुळेच आपण हे जग बघत असतो, आपल्याला लहाणाच मोठ करायला त्यांनी खुप खस्ता खालेल्या असतात. आणि रस्त्यावरचा भिकारी असो किंवा कोणी वेडा असो त्याला मारहाण करु नका ते परिस्थितीमुळे तसे झालेले असतात तुम्ही त्याना जगवु शकत नाही तर त्यांना मारायचा अधिकारपण तुम्हाला नाही हे लक्षात ठेवा.)

श्री. सारंग शहाजीराव चव्हाण.
कोल्हापूर.९९७५२८८८३५

फोटो सौजन्य: गूगल.
(copyright कायद्यानुसार सर्व हक्क राखीव आहेत.
शेअर करताना लेखकाच्या नावासहीत शेअर करावे)

Article Categories:
सामाजिक

Comments are closed.