काच फुटली होती अन् …..

Written by

काच फुटली होती आणि त्याचे तुकडे जमिनीवर विखुरले होते’. कितीतरी वेळ मी त्या तुकड्यांकडेच पहात आजचा गेलेला दिवस आठवत होते.

आठवडाभर आॅफीसमधे दिवसभर काम करून हक्काचा रविवार हा खरंतर स्वतः साठी नसून पेंडिंग कामाचा असतो हे आपण कितीही नाकारलं तरी हेच सत्य आहे. आज पटापट कामं आवरून लेकीबरोबर मस्त फिरायला जाऊन आईस्क्रीमचा प्लॅन होता, म्हंटलं आज बाळाला अचानक न सांगता बाहेर घेऊन जाऊन सरप्राईज द्यावं,म्हणून आज स्वतः च्या शरीराकडे दुर्लक्ष करत घड्याळ्याच्या काट्यावर मी माझी कामं उरकत होते.

सहा वर्षाची लेक बेडरूममध्ये काहीतरी करत होती, मला बेडरूम मधे न येण्याची सक्त ताकीद मिळाली होती. म्हंटलं चला छानच आहे ती तिचं काम करेस्तोवर माझीही कामं पटापट आटोपतील. पण माझं काम चालूच होतं आणि बाळाने त्याचं काम संपवलं होतं, तिचं काम होताच मला ती बोलवीत होती.

“माँ डोळे बंद करून बेडरूम मधे ये प्लीज 

हो रे मन्या थांब हा येते, अशी आश्वासनं देत मी माझी कामंच पूर्ण करत राहीले. म्हंटलं जरा पण उशीर नको! आज पिलूसोबत मनसोक्त बागडायचं ….

कामं होऊन तिच्याकडे बघते तर पिलू मस्त झोपी गेलं होतं म्हंटलं आता हिला जरा झोपू द्यावं आणि नंतर बाहेर जावं म्हणून तिला वरतून चादर टाकत होते, पण बघते तर काय ! पिलूने माझा स्टोल हातात गुंडाळून घेतला होता. तो स्टोल बाजुला सरकवावा म्हणुन अोढत होते तर स्टोल सरकवताच एक,

खळ्ळ्ळ्ळ् ……… आवाज झाला……….

आवाजानेच पिलू जागं झालं, आणि माझ्याकडे असहाय नजरेने पहात होतं.

मी मात्र तीच्या नजरेपूढे हतबल झाले होते,

“नक्की चूक काय? अाणि नक्की कोण कोणासाठी सरप्राईज प्लॅन करत होतं”; हा प्रश्न स्वतःलाच करत होते. अजाणतेपणाने झालेल्या माझ्या चुकीला मी स्वतः लाच माफ करू शकत नव्हते. मोठ्या कष्टाने मी माझे अश्रू डोळ्यांच्या कड्यांवरच थोपटत लेकीच्या नजरेला नजर चूकवत जमिनीवर विखुरलेल्या फुटलेल्या काचेसोबतचा एक कागद डबडबलेल्या डोळ्यांनी वाचत होते. त्यावर लिहिलं होतं,

“I am princess because my mom is queen.”

सोबत एका ग्लासावर पिलुने रंग दिलेली काच घरभर पसरली होती. लेकीचं सरप्राईज जमिनीवर विखुरलं होतं, आणि माझं मनातच गढूळ होऊन गेलं होतं.

©Sunita Choudhari.

(वाचक फ्रेंड्स , मला माहीत आहे ह्या धक्काधूकीच्या जीवनात ब-याचदा असं होतं ना? काय वाटतयं तुम्हाला…..लाईक,कमेंट आणि शेअर करुन मला नक्की सांगा  )

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा