# कादंबरी – ती सध्या काय करते? भाग – 17

Written by

‘ती’ सध्या काय करते ? भाग – 17 ©®: नीलिमा देशपांडे

भाग 16 लिंक :

https://www.facebook.com/581606972323826/posts/816535205497667/

 

पूर्वार्ध भाग 16 :

मागील भागात आपण पाहिले, की त्यांच्या नेरळ मुक्कामातील दिवस खूप छान गेले. ते दोघे नुकतेच लग्न झालेले आहेत आणि
तिथे फिरायला आले आहेत हे कोणाला माहीत नव्हते.. त्यावरून झालेल्या गमतीजमती आपण पाहिल्या. त्यांचा फिरायला गेल्यावरही सगळा वेळ एका कुटुंबासोबत आणि ट्रेनिंग मध्ये गेला होता. आज पाहुयात पुढचा भाग….

भाग 17 –

“सुहाना सफ़र और ये मौसम हसी…हमे डर हैं, हम खो न जाये कही…वो आंसमां झुक रहा हैं जमीनपर ….ये मिलन हमने देखा यही पर ….”

ती खुप खुश होती आणि चक्क गाण म्हणत त्याच्या सोबत प्रवासाचा आंनद घेत होती. त्यांचा हा परतीचा प्रवास त्यांच्या नेरळला जात असतानाच्या प्रवासा पेक्षाही अधिक सुखकर आणि समाधानाचा होता.

एकमेकांबद्दलचे मनात असलेले दडपण आता कमी झाले होते. मोकळेपणा वाढल्यामुळे त्यांच्यात हळूहळू मैत्री होऊ लागली होती.

“आपण गाण्याच्या भेंड्या खेळुयात का?” असे तिने विचारल्यावर त्याला हसू आले. त्याने उत्तर दिले, “यात तूच जिंकशील! कारण मला गाण्यांचे शब्द पाठ होत नाहीत. म्युझिक लक्षात राहते.

त्यामुळे तू एकटीच गाणं म्हणशील आणि मी मग बॅकग्राऊंड म्युझिक देईल, ते ही आठवले तर!” हे ऐकून तिला आश्चर्य वाटले. तुला एकही गाणं पाठ नाही! बरं मग निदान एक कडवं किंवा काही ओळी तरी म्हणशील ना? ” असे तिने विचारले पण त्यावरही त्याचा नकार होता.

त्याने मनापासून कबूल केले की त्याला काही निवडकच गाणी तेवढी पाठ आहेत. आठ-दहा गाण्यांचे एखाद दुसरे कडवे मी म्हणू शकेल. खूप वेळा ऐकली आहेत ती गाणी म्हणून. माझ्याकडे दोन कॅसेटस होत्या. मी सतत त्या ऐकल्यामुळे आणि त्या एका वेगळ्या टप्प्यावर असताना ऐकेल्या म्हणून असेल कदाचीत.” ती समजू शकत होती…त्यामुळे दोघेही जरा शांत झाले.

घरी परत आल्यावर त्या दोघांना लगेच दुसऱ्या दिवसापासून सुट्टी संपल्यामुळे ऑफिसला जावे लागणार होते.

नव्या घरातील नवीन रुटीन अंगवळणी पडेपर्यंत थोडीशी कसरतच होत होती तिची! पण त्यातून जमेल तसा मार्ग काढत, हसत-खेळत ती राहत होती!

लग्नानंतर आलेला पहिला सण होळीचा…
‘त्याच्यासोबत खूप रंग खेळता येईल’ असे तिला वाटले. चित्रकला, रांगोळी यात ती चांगलीच पारंगत होती. या दोन्ही कलांनी तिला रंगाची ओळख आणि त्यांच आपल्या अयुष्यात असलेलं महत्व पटवून दिले होते. घरच्यांकडून त्याला रंगपंचमी खूप आवडते आणि तो कसा दिवसभर रंग खेळून संध्याकाळीच परत येतो.. हे तिला समजले होते.

पण होळी दोन दिवसावर आली तरी त्याच्याकडून याबद्दल काही बोलणे झालं नाही आणि हालचाल पण दिसली नाही. ‘आपल्याला सरप्राईज द्यायचं असेल’ असं वाटून ती शांत राहिली.

नव्या सुनेच्या हातून पुरणाची पोळी बनवून घेत, होळीला नैवेद्य दाखवून …सगळ्यांनी सणाचा आनंद लुटला. त्यामुळे तर तिला खात्रीच पटली होती, दुसऱ्या दिवशी रंगही तसाच जोरात खेळला जाईल याची.

याबाबतीत मात्र सारे थोडेसे उदासीन दिसले. रंगांचा पहिला सण एकमेकांना रंग न लावताच पार पडला.
आयुष्य विविध रंगांनी भरलेलं असावं असं नेहमीच वाटणारी ती, तरीही शांत राहिली.

पुढे हळूहळू वर्षभर एक-एक सण पार पडत गेले. ‘मागचे सारे विसरून पूर्वपदावर यायला त्याला कदाचित काही काळ द्यावा लागेल’ हे ‘ती’ ने गृहीतच धरले होते. दिवसेंदिवस मग तिचा तो निर्णय… ‘त्याचे मन जिंकून घेण्याचा!’ आणखीनच दृढ होत गेला. स्वतःच्या अपेक्षा कमी करत तिने, घरातल्या, संसारातल्या आणि तिच्या ऑफिस मधल्या जबाबदाऱ्या अधिक चांगल्या कशा पार पाडता येतील?याचा विचार करून त्यातच स्वतःला तिने मग झोकून दिले. सोबतीला तिचे असणारे विविध छंद, तिचं मन रमवायला उपयोगी पडत होते तिच्या.

दिवाळी जवळ आली तशी तिला काही दिवाळी अंकांनी आणि
वृत्तपत्रान्नी तिचे लेख आणि कविता मागितल्या. जमतील त्या सगळ्यांना तिने त्या पाठवून दिल्या होत्या ऑफिस मधूनच! त्यामुळे घरी जेव्हा ते सगळे दिवाळी अंक आणि वृत्तपत्रांची कात्रणे पोस्टाने तिच्या नावाने आली तेव्हा सगळ्यांना एक सुखद धक्का बसला. तिच्या अंगी असलेल्या हा गुण आणि त्याविषयी फारसे काही घरात बोलले गेले नव्हते. तिच्यासाठी मग कौतुकाचे एक वेगळेच वातावरण घरात निर्माण झाले. आकाशवाणीवर देखील तिचे कार्यक्रम परत सुरु झाले.

त्याला आता तिचे कौतुक वाटत होते…तिने खुप लवकर या घराला तर आपलेसे केले होते आणि तिचे छंद आणि नोकरी सुध्हा ती अतिशय छान संभाळत होती.

दिवाळीत तिचे आयुष्य आपणही उजळून टाकुया विचाराने त्याने काही प्रयत्न करायचे ठरवले.

पहिला दिवाळी सण असल्याने तिच्या माहेरून तिला कोणीतरी नक्कीच घ्यायला येईल भाऊबीजेच्या दिवशी याची तिला खात्री होती. गोड पदार्थ बनवण्यात ती फारशी पारंगत नव्हती पण सासूबाईंच्या हाताखाली मदत करत तिने जितके जमेल तितके सगळे दिवाळीच्या फराळाचे पदार्थ बनवले.

तिच्या येण्याने घरातील वातावरण एकदम बदलून गेले होते. घरात एक कलाकार असल्याची जाणीव तिने केलेल्या दिवाळीच्या सजावटीतून दिसून येत होती.

तसे घरात आल्यापासून तिने बरेचसे छोटे छोटे बदल केले होते. वस्तूंना ठेवण्यात, त्यांची मांडणी करण्यात, त्यांना सजवण्यात आणि दर महिन्याला शक्य तितक्या सगळ्या फर्निचर आणि इतर वस्तूंची जागा बदलण्यात…. प्रत्येकाला त्यामुळे स्वतःची रूम आणि घर नवीन वाटत असे. नवेपणाचा उत्साह त्यांच्या नात्यांमधल्या गोडीला वाढवत होता. घरात फक्त स्वच्छता असली टाप टीप असली आणि घरातील काही अडगळ वेळच्या वेळी बाहेर काढली तरी दिवाळी ही फक्त सफाई करण्यात न घालवता, सगळ्या कुटुंबियांना एकत्र पणाने आनंदात कशी साजरी करता येते, याचे उत्तम उदाहरण तिने दाखवून दिले.

अगदी साधं उदाहरण द्यायचं तर, प्रत्येक गोष्टीची जागा ठरलेली होती तिची. त्यामुळे वस्तू पटापट सापडायच्या आणि त्या व्यतिरिक्त जास्तीच्या असलेल्या वस्तू ती
हातो हातच एक तर पॅक करून ठेवून देत होती किंवा देण्याच्या वस्तू गरजू लोकांना वाटून मोकळी होत होती. घरातील रद्दी सुद्धा एक महिन्याच्या वर तिने कधी वाढू दिली नव्हती. दर महिन्याला किलोभर जरी असली तरी ती ते देऊन टाकायची आणि म्हणायची, “यामुळे घरातली जागा रिकामी होईल. निगेटिव ऊर्जा निघून जाईल. स्वच्छता ही राहील आणि सगळ्यांच आरोग्य टिकेल. मुळात आपण सगळेच दिवसभर बाहेर जातो. त्यामुळे घरात असलेल्या गृहिणीला म्हणजे आपल्या आईंना घर हे नेहमी प्रसन्न वाटले पाहिजे. कारण त्यांचे मन रमणारी ही मुख्य जागा आहे. त्यांच्या मनासाठी हे करत असताना त्याचा फायदा आपल्या सगळ्यांना देखील मिळतोय.” लग्न होऊन घरी आल्यानंतर ती हे जे काही बोलली होती ते तिने तिच्या कृतीतून दाखवून दिले होते. दर रविवारी जणू काही दिवाळी असल्यासारखी सगळ्या कानाकोपर्‍यातून तिची नजर फिरायची. तिची हीच सवय मग घरातल्या इतरांनाही लागली.

पहिल्यांदाच दिवाळी आली म्हणून एकट्या सासुबाईवर सगळी साफसफाईची जबाबदारी पडली नाही किंवा त्यांना त्रास झाल्यावर होणाऱ्या चिडचिडी मुळे इतरांनाही कामे सोडून त्यात पडावे लागले नाही.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सासू-सासर्‍यांनी ही गोष्ट आवर्जून बोलून दाखवली आणि घरातली लक्ष्मी म्हणून स्वतःच्या वागण्यातून तिने सिद्ध केलेले तिचे रूप आणि तिचे स्थान तिला देत “यावर्षीपासून आता लक्ष्मीपूजन तुम्ही दोघेच करत जा ” असे सांगून ते मोकळे झाले.

पाडव्याला ओवाळणी म्हणून त्याने तिला एक छान ड्रेस घेतला. तिच्या साठी त्याने केलेली ही पहिली खरेदी होती….ती हो आता तिच्यात गुंतत चालला होता याचाच तर तो संकेत दिला त्याने तिला!….

“मेरे रंग में रंगने वाली….परी हो या हो परीयोंकी रानी?? या हो मेरी प्रेम कहानी ???मेरे सवलों का जवाब दो….”

*** सदर कथेच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व हक्क फक्त
लेखीकेकडे राखीव आहेत. आपल्याला ही पोस्ट शेअर करायची झाल्यास नावासह जरूर करावी. आपला अभिप्राय हा सर्वात महत्त्वाचा ! तेव्हा कृपया लाईक सोबतच खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले मत जरूर कळवावे.
सस्नेह नमस्कार🙏🙏

©®: नीलिमा देशपांडे

Article Categories:
प्रेम

Comments are closed.