# कादंबरी – ती सध्या काय करते? भाग – 28

Written by

‘ती’ सध्या काय करते ? भाग – 28 ©®: नीलिमा देशपांडे

भाग 27 लिंक :

https://www.facebook.com/581606972323826/posts/824616991356155/

पूर्वार्ध भाग 27 :

मागील भागात तिचा आणि त्याचा अपघात झालेला आपल्याला समजले. अपघातातून ती कशीबशी नुकतीच उठून चालायला लागली. मोडक्या पायावर परत आयुष्यात उभे राहताना तिला बराच संघर्ष करावा लागला. त्याची एक झलक आपण पाहिली.

भाग 28 :

“जो मै ये जानती के प्रीत के ये दु:ख होय…. नगर धिंडोरा पीटती के प्रीत ना करियो कोई… मोहे भूल गये सावरिया.. आवन कह गये, अजहू ना आये… ली, ना मोरी खबरिया… मोहे भूल गये सावरिया….”

नोकरीसाठी बाहेरगावी गेलेल्या त्याचे परत तिला घेवून जाण्यासाठी येणे सतत कुठल्या ना कुठल्या कारणाने पुढे ढकलले जात होते.

ती डोळ्यात प्राण आणून त्याची वाट पाहत होती. पुढच्या आठवड्यात तो तिला घेऊन जाण्यासाठी येणार असा नुकताच तिला निरोप मिळाला आणि ती सामानाची बांधाबांध करायला गेली तिच्या घरी.

खुप दिवसांनी ती आज तिच्या घरी आली होती. घर सोडून माहेरी जाण्याआधी झालेल्या बऱ्याच गोष्टी तिला आठवून गेल्या.

अपघातानंतरचा काळ खूप बिकट होता त्या सगळ्यांसाठीच! अनेक ऑपरेशन करून त्याने तिला वाचवली तर खरी पण ते करताना हॉस्पिटलचे प्रचंड मोठे बील झाले होते.

जवळपास आठ दिवस तर ती शुद्धीवर देखील आली नव्हती. शुद्धीत आल्यानंतरही पंधरा, वीस दिवस तिला आयसीयू मध्ये ठेवण्यात आले.

त्यावेळी त्याची नोकरी मार्केटिंगची होती. सतत फिरावे लागायचे, टूर असायचे. त्याचे ते टूर न करू शकल्याने आता तीही नोकरी जाणार हे माहीत होते पण या सगळ्याचा विचार करण्याचा वेळच नव्हता.

अपघाताच्या रात्री हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर एकीकडे बाळाला सांभाळत आणि दुसरीकडे धावपळ करत त्याने कशीबशी ती रात्र काढली.

पहाटे घरातले जवळचे पोहोचले. तेव्हा तो घरी जाऊन आधी बाळाला पाळणाघरात सोडायला निघाला.

हाताला येईल तेवढे कपडे, खेळणी, खावू आणि थोडे पैसे घेऊन तो लेकराला त्याच्या पाळणाघरात सोडून आला.

झालेल्या प्रसंगाचे गांभीर्य समजून पाळणाघरातील काकूंनी बाळाची पूर्ण जबाबदारी घेतली आणि त्याला सांगितले की,” तो आता सात-आठ दिवस आला नाही तरी चालेल. बाळाला तुमची आठवण आली आणि त्याने त्रास दिला तर मीच त्याला घेऊन येईल हॉस्पिटल मधे तुमच्या भेटीसाठी!”

“त्या माऊलीचे उपकार कसे आणि कधी फेडू शकणार आहोत आपण?” हे त्याला वाटून गेले. आभार मानत असताना डोळ्यातून अश्रू ओघळले. त्यांचा निरोप घेतला तो लगेच परत तिच्या कडे गेला.

त्या माऊलीने स्वतःच्या आर्थिक परिस्थितीचा विचार न करता, रात्रं – दिवस लेकराची काळजी घेतली, जेणेकरून घरचे सगळे धडपड करतील तिला वाचवण्यासाठी ! तिच्याजवळ थांबतील…

आपल्या आयुष्यात अशी अनेक माणसं, कुठल्यातरी वळणावर अचानक येऊन जातात. कित्येक जन्म आपण अशा माणसांसाठी खूप काही केले तरी त्यांच्या ऋणातून आपण कधीही मुक्त होणार नाही अशा कर्जात ते आपल्याला टाकून जातात. त्यांच्या उपकारांची परत फेड होण काही केल्या शक्य नसते.

अपघाता नंतर, स्माईल स्टोन पासून ते थेट हॉस्पिटल पर्यंत त्या रात्री स्वतःच्या गाडीत त्यांना लिफ्ट दिलेले दोन मानवरूपी देव सुद्धा त्यातलेच एक आणि आता या पाळणा घरातल्या काकू !

दोन वेळा त्या स्वतःच बाळाला हॉस्पिटल मध्ये घेवून आल्या. ती तर शुद्धीत नव्हती त्यामुळे आयसीयूमध्ये दुरूनच त्यांनी बाळाला त्याची आई दाखवली. त्याला समजावले की, ” आई इथे आहे तिला लागले आहे म्हणून. डॉक्टर तिला इंजेक्शन देतील आणि बर करतील. तोवर आपण नको तिथे जायला, नाहीतर आपल्याला पण इंजेक्शन देतील ते! ”

त्या जीवाला काय आणि कितपत समजले होते माहीत नाही आणि त्या काकूंनी त्याला तिथून घरी नेताना नंतर कसे सांभाळले हे त्यांनाच ठावूक होते.

दुसऱ्या वेळी त्या खास लेकराला त्याच्या बाबांच्या भेटीला घेऊन आल्या हॉस्पिटलमध्येच! त्यांची धडपड बघून त्याला खूपच अपराध्या सारखे वाटत होतं पण इलाज नव्हता.

साधारण महिनाभराने ती घरी आली तेच मुळी ऍम्ब्युलन्स मधून. पुढचे पंधरा-वीस दिवस तो सतत तिच्यासोबत घरी होता. सकाळी उठून तो बाळाला तयार करुन त्याला पाळणाघरात नेऊन सोडत असे
संध्याकाळपर्यंत!

तोवर तो पैशांची जमवाजमव करत पुढचे नियोजन करी. ती अंथरुणातून उठून बसेल की नाही हे तिला माहीत नव्हते पण त्याला माहीत होते की ती कधीही साधे उठून देखील बसू शकणार नाही तरी तिला धीर देण्याचे खूप मोठे काम तो करत होता.

तिच्याशी खोटं बोलून आणि सांगून की, …..
“महिना दोन महिन्यातच तू उठून बसशील, तेव्हा लेकरू परत तुझ्या जवळ येईल. आता हट्ट करू नको. बाळांने तुझ्याजवळ येऊन त्याच्यामुळे तुला त्रास होऊ नये म्हणून आम्हीच त्याला दूर ठेवत आहोत.”

तिला सगळं समजत होतं पण मन तयार होत नव्हतं. गेलं वर्ष – सव्वा वर्ष लेकरू सतत 24 तास तिच्यासोबत होते. तिला एका सेकंदाची देखील उसंत नव्हती. कोणाच्याही मदती शिवाय ती एकटीच त्याचा सांभाळं करत होती. ती रात्री झोपली तरी, झोपेत – स्वप्नात सुद्धा तिला बाळाचं काहीतरी करायच आपल्याकडून राहून गेलं…. हेच दिसायचं!

आज तेच लेकरू अचानक एका अपघाता नंतर तिच्या समोर येऊनही तिला दुरून बघत होतं. महिनाभर आई दिसली नव्हती आणि आता दिसूनही त्याच्या नजरेत तिच्या साठी एक परकेपणा होता, भिती होती…

सगळ्या मोठ्यांनी त्याला ती भिती घालून ठेवली होती त्याने तिच्याजवळ जाऊ नये म्हणून! हा अनुभव तिच्या साठी खूप भयानक होता.

ती सुरुवातीला पडल्या पडल्या सुद्धा हालचाल करु सुद्धा शकत नव्हती. अंगात तेवढं त्राण नव्हतं. फ्रॅक्चर मुळे एक इंच जरी ती हलली किंवा शरीराची पलंगावर पडल्या पडल्या थोडी जरी हालचाल झाली, तरी प्रचंड ठणक आल्याने ती स्वतःवर
ठेवलेला ताबा नाईलाजाने सोडून मोठ्याने ओरडायची… अशा परिस्थितीत बाळाला तिच्या पासून दूर ठेवणे हाच एक उपाय होता.

ती अचानक कधी अशी ओरडली आणि बाळ घाबरून रडायला लागले तर त्याला सांभाळावे की तिच्या वेदनांकडे बघावे, समजले नसते त्यामुळे ती पूर्ण बरी होईपर्यंत त्याने बाळाला पाळणा घरात ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

आता त्याला सुद्धा नोकरीसाठी प्रयत्न करायचा होता तो त्याने केला पण तिथे तात्काळ नोकरी मिळत नसल्याने त्याने बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. डोक्यावर कर्जाचा भला मोठा डोंगर उभा होता.

नोकरी साठी तो दुसऱ्या शहरात आणि मग शोध घेत दुसऱ्या राज्यातही गेला. तिथे त्याच्या मित्रासोबत राहून नोकरी शोधण्याचा तो प्रयत्न करत होता. त्याकाळात त्याने तिला आणि बाळाला तिच्या माहेरी ठेवले.

लग्नानंतर ती तिच्या माहेरी पहिल्यांदाच इतके महिने राहिली होती. ते तिचं माहेरपण कदाचित शेवटचं असेल, हे त्याला समजत होतं. कारण यानंतर इतक्या मोठ्या काळासाठी ती परत येऊ शकेल की नाही ? आणि आली तरी कधी ? किती वर्षानी ? हे त्याला त्यावेळी माहीत नव्हते. त्याला तो अंदाज येणे शक्यही नव्हते कारण,……

तो नोकरीसाठी बाहेर गेला तेव्हा, ती तर पलंगावरच झोपलेल्या अवस्थेत असायची. ‘ती परत कधीही उठून सुद्धा बसणार नाही’ ही गोष्ट फक्त त्याला माहीत होती म्हणूनच चांगली नोकरी मिळवून, थोडेसे पैसे जमवूनच तो तिला घेऊन जाणार होता.

त्याला जाऊन आता पाच महिने महिने पूर्ण झाले होते आणि त्याच्या माघारी ती जिद्दीने पलंगावरून उठून बसली आणि हळूहळू लंगडत चालत होती. त्याला हे समजले तेंव्हा तो खुप आनंदी झाला.

तिला जेंव्हा हे समजले की आपण परत येथे लवकर येऊ शकणार नाही… त्यामुळे जेवढे गरजेचे आहे तेवढे सगळे सामान घेऊन आपण कायमचे इथून जातोय, आयुष्यातल्या नव्या वाटा शोधण्यासाठी! तेंव्हा कशाची निवड करावी हेच तिला समजत नव्हते…..

एकीकडे अपंग अवस्थेत असणाऱ्या तिला आणि बाळाला स्वीकारणारा तो घेऊन जाण्यासाठी येत होता तर दुसरीकडे कधी शहराबाहेर देखील न गेलेली ती मुलगी, तिच्या राज्याबाहेर जाणार होती. भविष्यात काय लिहून ठेवले आहे हे माहीत नसल्यामुळे जणूकाही इथून कायमचे चाललो आहोत असे वाटून ती खूप रडली.

शहर सोडण्यापूर्वी काही आर्थिक देण होतं ते पण चुकती करुन जायचे होते, त्यांना!

अनेकांच्या प्रेमाच्या आणि सहकार्याच्या कर्जातून कधीच मुक्तता होऊ शकत नव्हती. काहींनी अपघाता नंतर बरीच आर्थिक मदत केली होती. तेही परत करायचे होते, त्या सगळ्यांनी नाही मागितले तरी !

वर्षभरात जमवलेल्या काही थोड्याफार वस्तू तिच्या हाती होत्या अगदी नव्या. किचन सामान ते कपडा प्रकार आणि गरजेच्या विकत घेतलेल्या गाडी, वॉशिंग मशीन पर्यंत! ती एक कलाकार होती. तिने बनवलेल्या वॉल पेंटींगज, फ्रेमस, हाताने विणलेल्या नव्या चादरी, ड्रेस मटेरियल, बाटीक आणि बांधणी केलेले स्कार्फ, ओढ़ण्या काय नव्हते जमवले आणि बनवले तिने…त्याचा प्रदर्शनात विक्रीसाठी ठेवण्याचा विचार करुन!

त्या वस्तू तिने आधी त्या सगळ्यांना देण्याचा निर्णय घेतला त्यांना हवं ते निवडू देवून आणि काही तिच्या कडून आठवण म्हणून!

उरलं सुरल…जे आणि जितकं विकता येईल आणि कमीत कमी सामान घेवून जाता येईल हे ती ठरवत होती तिच्या घरात एकटी बसून!

आज बर्‍याच महिन्यांनी ती तिच्या घरात आली होती, ज्या घराचा तिने अखेरचा निरोप नीट घेतला नव्हता, स्ट्रेचरवरुन या घराबाहेर शेवतचे पडताना ! याच घरात तिच लेकरू पहिले बोल बोललं होत आणि त्याची पावलं सुद्धा त्याने याच घराच्या अंगणात उचलायला शिकली होती. शेजारच्या काकू तिच्यासाठी खुप मोठा आधार होत्या कायमच… तो टूरला गेला की ती बाळाला सकाळी अर्धा तास त्यांच्या कडे देई आणि सगळे आटोपून त्याला घेऊन जाई त्याच्या पाळणाघरात आणि मग पुढे नोकरीला….

आजही त्या आल्या होत्या, पटापट आजु बाजुच्या बायकांना घेवून. त्यांनीच मदत करुन जमेल ते त्यांना विकत घ्यायला लावलं आणि लगेच पैसे गोळा करुन तिच्या कडे सोपवत गेल्या.

शहर सोडण्याआधी जमेल त्या सगळ्यांना भेटून, तिने तिच्याकडे जे आहे, त्यातले काही ना काही सगळ्यांना प्रेमाने वाटल्या.

नव्या संसारात काडी काडीने जमवलेल्या,
हौशिने घेतलेल्या…. सगळ्या मोठ्या वस्तू विकून तिने विकल्या आणि मदत केलेल्या सगळ्यांचे पैसे परत केले.

थोडीशी भांडी, कपडे आणि अंथरुण हे पैक करुन तिने ट्रान्स्पोर्ट मधून पाठवून दिले होते.

महत्वाची कागद पत्रे आणि लहानाची मोठी जिथे झाली त्या गावच्या खूपशा आठवणींची न संपणारी शिदोरी घेवून तिने शहराचा निरोप घेतला.

“एक चिरैया घोसले को छोड उड उड जाये,… और ये सोचे काश ऐसा हो, कदम मूड जाये… तिनका तिनका कर बटोरा और बनाया घर…
पर समय की बारिशों ने कर दिया बेघर…
एक चिरैया घोसले से उड उड जाये…

*** सदर कथेच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व हक्क फक्त
लेखीकेकडे राखीव आहेत. आपल्याला ही पोस्ट शेअर करायची झाल्यास नावासह जरूर करावी. आपला अभिप्राय हा सर्वात महत्त्वाचा ! तेव्हा कृपया लाईक सोबतच खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले मत जरूर कळवावे.
सस्नेह नमस्कार🙏🙏

©®: नीलिमा देशपांडे

Article Categories:
प्रेम

Comments are closed.