# कादंबरी – ती सध्या काय करते ? भाग- 29

Written by

‘ती’ सध्या काय करते ? भाग – 29 ©®: नीलिमा देशपांडे

भाग 28 लिंक :

https://www.facebook.com/581606972323826/posts/825310001286854/

पूर्वार्ध भाग 28 :

मागील भागात आपण पाहिले की नोकरीसाठी दुसऱ्या राज्यात गेलेला तो, तिला आणि बाळाला घेऊन जाण्यासाठी परत येतो. जाण्यापूर्वी सगळ्यांचा निरोप घेऊन आणि मदत केलेल्या सगळ्यांना त्यांचे पैसे परत करून, ती त्याच्यासोबत पुढच्या प्रवासाला निघते.

भाग 29 :

“हम तो चले परदेस, हम परदेसी हो गये….छूटा अपना देश.. हम परदेसी हो गये!”

ज्या मातीत तुम्ही वाढता… लहानाचे मोठे होता, जिथे तुमचे बालपण जाते, तुमचा मित्र परिवार तुमचे आप्तेष्ट सगळे असतात, त्या सगळ्यांना सोडून निघताना एक विचित्र प्रकारची पोकळी मनाला जाणवते जी लवकर भरून निघणार नाही किंवा कदाचित कधीच भरणार नाही, हे माहीत असते तरी आपणच आपल्या मनाला समजावत राहतो मग कधीकधी फक्त धीर देण्यासाठी! तसंच काहीसं ती करत होती.

हातातून सगळं सुटून चालले आहे हे कळत असूनही ती स्वतःच्या मनाला बजावत होती,… “ती ला अपघाता नंतर मिळालेले, आयुष्य हे तिच्यासाठी एक प्रकारचे वरदान आहे. कदाचित तिला काहीतरी मोठे काम मिळालेल्या जीवनात करता यावे यासाठी ते मिळाले आहे. यानंतर आयुष्यातला प्रत्येक क्षण हा जणू काही आपल्याला बोनस मिळालेला आहे असाच घालवायचा, हे तिने ठरवून ठेवलं होतं.”

कुठल्याही कामाच्या बाबतीत पुर्ण करायला ती अगदी चोख व्यवस्था करायची. नियमितपणा आणि शिस्त या गोष्टी तिच्या अंगी होत्याच पण आता एक प्रकारची धास्ती असल्याने म्हणा किंवा प्रिकॉशन म्हणून…

सगळ्या गोष्टी या नंतर ती वेळेवर करण्यापेक्षा, वेळेच्याही जितक्या आधी पूर्ण करणे शक्य होईल तितके करून ठेवण्याच्या ती मागे लागली होती.

जे काही करायचं, ते अगदी व्यवस्थित करुन त्याची माहिती त्या कामाशी ज्यांचा ज्यांचा संबंध आहे त्यांना लगेच सांगून मोकळं व्हायचं ! हा तिने तिचा स्वभावच बनवून टाकला.

मनातल्या मनात ती खूप वेळा देवाचे आभार मानत होती, ती त्या अपघातांतून सुखरूप वाचली म्हणून…

पण तरी कधीतरी हे सुद्धा मनात येई की, कदाचित यापेक्षा काही वेगळे घडले असते तर ?….

“आपल्याला आपल्या मनातल्या अनेक गोष्टी कधी बोलून दाखवता आल्या नसत्या त्याला आणि आपल्यावर आजवर उपकार केले, आधाराचा हात दिला त्यांनाही! इतक्या वर्षात आपल्या सोबत ज्यांचे आशीर्वाद होते, त्या सगळ्यांना कधी तरी
मनातले भाव बोलून आभार मानायला तरी आपल्याला नंतर वेळ मिळाला असता का?” असे विचार करताना, तिचा अपघात तिला खूप काही शिकवून गेला.

आयुष्यात पुन्हा एकदा संधी मिळाली तर त्याचं सोनं करून दाखवाव. सगळ्यांना दुसरी संधी मिळतेच असे नाही. माणसाच्या जिवाचा काही भरवसा नाही. आपण आज आहोत तर उद्या नाही! आणि उद्याही कशाला कदाचित पुढच्या क्षणी पण नसूत हे लक्षात ठेवून जर प्रत्येक क्षण जगता आला तर उत्तम!

प्रत्येक क्षणात मदतीला आलेल्या हातांचे आभार मानत पुढे जावे. छोट्या, मोठ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत आणि मन जिंकत… जग जिंकावे.

छोटेसे आयुष्य देखील खूप सुंदर करावे. खुप वर्ष जगलो, पण कुठल्या भावनाच मनात नसतील तर सगळं निरस वाटत.

आयुष्यात जे जे मिळालं आहे, त्याबद्दल कृतज्ञता असेल, उपकाराची जाणीव असली की
सृष्टी देखील भरभरून देते.

सतत इतरांवर अवलंबून असलेलं आयुष्य असेल तर प्रवास खडतर होतो. सुरुवातीच्या काळात जेव्हा ती अपघातानंतर पलंगावर पडून होती, आणि स्वतःचा हात सुद्धा हलवायला तिला, दुसऱ्यांवर अवलंबून रहावे लागत होते, तिने हा अनुभव घेतला होता आणि त्यातून ती हे शिकली होती.

यानंतरच्या आयुष्यात त्याला संपूर्ण साथ देऊन पुन्हा एकदा यशाच्या शिखरावर गेलेलं तिला पहायचं होतं.

आपल्या मुळे त्याची नोकरी गेली, पैसा खुप जास्त खर्च झाला आणि आपण कमावण्यासाठी घरदार सोडून इतक्या दूर आलो आहोत…हे तिच्या मनाला लागत होते. या सगळ्यात जसे आपण एकटे पडलो आहोत तसाच तोही एकटा आहे तेव्हा, त्याला आयुष्यभर आपल्या कडून कशी साथ देता येईल याचाच विचार करत ती स्वतःला सावरायची.

तो आणि त्यांचे बाळ हेच तिचे विश्व बनले. त्या दोघांना आयुष्यामध्ये एका विशिष्ट उंचीपर्यंत यशस्वी झालेले बघेपर्यंत तिला चैन पडणार नव्हता. त्या दोघांना सतत आनंदी बघण्याची तिची इच्छा होती आणि त्यासाठी ती सज्ज झाली घर आणि नोकरी साठी!

तिला थोडसं अंतर चालायलाही बराच वेळ लागत असे पण तिने माघार घेतली नाही कधीच. एक वर्ष लागले तिला पाय उचलून टाकायला. नाहीतर दोन्ही हाताने डावा पाय उचलून पुढे टेकवून मग ती चालू शकत होती.थोडे चालले की थांबावे लागे. एकेक पावलं प्रगतीच्या मार्गावर पडत गेली आणि तिचा हुरुप वाढवत गेली.

जुन्या हॉस्पीटलच्या तिच्या, फाईल्स बघून त्याच्याशी बोलताना तिला त्यांचा अपघात कसा झाला? किंवा त्या अपघाता नंतर काय काय झाले ? हे समजले होते,…अगदी ती कधीच चालू शकणार नाही, उठणारही नाही हे देखील!

तो तिचे खुप कौतुक करत असे, तिच्या अगम्य इच्छा शक्तीचे, जिद्दीचे व चिकाटीचे.
तो तिला नेहमी म्हणत असे की, “तू परत एकदा ऊठून चालतेस हा निव्वळ योगायोग वाटेल इतरांना पण त्या मागे तुझे कष्ट आहेत आणि किती सकारात्मकतेने तू
हे करुन दाखवलं याचा आम्हाला अभिमान राहील कायम!”

तो वर्षभराचा काळ खुप छान गेला. त्यांच्या समोर रोज अनेक नवी आव्हाने असायची. पर प्रांतात तिथली भाषा येत नाही, सोबत अगदी तुटपुंजे पैसे….मित्र आणि नातेवाईक अनेक मैल अंतर दूर होते. ई – मेल आणि सोशल नेटवर्कींग काय असते ? हया विचारा पासून सगळे कोसो दूरवरच होते.
मोबाइल फोन हा हजारो मधे एखादयाच्या हाती असे. घरा घरातही
लैंड लाईन फ़ोन फार नव्हते आलेले…त्यांमुळे कुणाची मदत होईल हे तर सोडा, नुसती एकमेकांची विचारपूस करणे पण पत्रानेच होई. एखाद्या वेगळ्या बेटावर किंवा ग्रहावर गेल्याचा भास होता तो जवळच्या सर्वांपासून दूर गावी राहत असण्याचा…

अशा परिस्थितीत वर्षभर ते तिथे होते. गरजेपुरती कन्नड भाषा येवू लागली पण बैंगलोर शहराची महागाई त्यावेळी त्यांना कठीण जात होती. मुलगा दोन वर्षाचा झाला होता, तेंव्हा त्याला शाळेत टाकायची वेळ आली. दोघेही दिवसभर काम करुन सुद्धा हाती काही शिल्लक राहत नव्हते. घर आणि नोकरी हे अंतरही बरेच असल्याने रोज येण्याजाण्यातच तीन तास लागून जात. यावर उपाय म्हणून त्यांनी परत एकदा निर्णय घेतला तिथून वेगळ्या ठिकाणी जाण्याचा !

वर्ष भरात थोड्या का असेना पण काही ओळखी झाल्या होत्या, आणि पुन्हा एकदा त्या गुंतलेल्या मनाला चटका लावून आणि परत कधी, कुठे भेट होईल याचा विचार करत त्यांनी भेटी घेतल्या आणि ते निघाले मध्यवर्ती राज्यातल्या इंदौर शहराकडे !

” जीवन के सफ़र मे राही, मिलते हैं बिछड जाने को….और दे जाते हैं यादे…तनहाई मे
तडपाने को!”

*** सदर कथेच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व हक्क फक्त
लेखीकेकडे राखीव आहेत. आपल्याला ही पोस्ट शेअर करायची झाल्यास नावासह जरूर करावी. आपला अभिप्राय हा सर्वात महत्त्वाचा ! तेव्हा कृपया लाईक सोबतच खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले मत जरूर कळवावे.
सस्नेह नमस्कार🙏🙏

©®: नीलिमा देशपांडे

Article Categories:
प्रेम

Comments are closed.