#कादंबरी संधिकाल -12

Written by

बरेच दिवसानी न्याहारीला आज परतलेला कोलीम आणि भाकरी खाल्ली.. मग गावातल्या लोकांना आणि मित्रांना भेटायला बाहेर पडलो. कारण आजचा एकच दिवस माझ्या हातात होता. उद्या निघायचं होतं. सगळ्यांना भेटून आलो. 

दुपारी माई च्या हातचं जेवण. ताज्या सुरमयीचं कालवण, तांदळाची भाकरी, गरमागरम भात आणि सोलाची कढी. 

आहाहाsss….. अगदी गळ्याशी येईपर्यंत जेवलो आणि माजघरात मस्त तंगड्या पसरून झोपलो. 

संध्याकाळी दिवे लागण झाल्यावर, माई, मी, तात्या दादा सगळे एकत्र बसलो. व्यवसायासंबंधी विचारपूस केली. मुंबईचे अनुभव सांगितले. आते-काका, अनुराधा, तिच्या घरचे, चाळीतले लोक, सगळ्यांविषयी सांगितलं. 

मी तिथे रूळलोय हे बघून सगळ्यांना बरं वाटलं. 

रात्री जेवण झाल्यावर गोखले काकांकडे गेलो. सगळं त्यांच्या कानावर घातलं. त्यांना खूप बरं वाटलं. काही मोलाचे बोध ऐकून घेतले त्यांच्याकडून. काकूंजवळ मनसोक्त गप्पा झाल्या आणि मग काकूंनी तळलेले गरे घेऊन, मी पुन्हा घरी आलो. 

 

   पहाटे निघालो. दादा आणि तात्या मला सोडायला येत होते. मी ट्रंक उचलली. माई चे डोळे पाणावले. ट्रंक खाली ठेऊन माईला घट्ट मिठी मारली आणि माझे अश्रू आवरत माईचा निरोप घेतला. 

  बोटीने मुंबईला पोहोचलो. आतेच्या घरी आलो. संध्याकाळी तळलेले गरे घेऊन अनुराधाच्या घरी गेलो. अनुराधा नव्हती. विशाखापट्टणमजवळच्या त्यांच्या गावी गेली होती. दुसऱ्या दिवशी येणार होती ती. 

 

दुसऱ्या दिवशी अनुराधा आली. तिला भेटून पुढच्या अभ्यासक्रमाची रूपरेषा निश्चित केली. आतापर्यंत अनुराधाच्या घरच्यांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले होते. त्यांच्या घरातीलच एक असल्यागत मला वागणूक मिळत होती. अनुराधाच्या आप्पांच्या म्हणण्याप्रमाणे, त्यांच्या घरीच दोघांनी मिळून अभ्यास करायचं ठरलं. अनुरधाच्या आप्पांचाही भौतिक शास्त्र ह्या विषयाचा अभ्यास दांडगा होता. अनायासे त्यांचही मोलाचे मार्गदर्शन आम्हाला मिळणार होतं. 

सहा महिन्यानंतर स्कॉलरशिपसाठीची प्रवेश परीक्षा पार पडली. महिन्याभरातच त्याचा निकालही आला. आम्ही दोघही स्कॉलरशिप ची परीक्षा देण्यासाठी पात्र ठरलो होतो. ह्यातून प्रचंड आत्मविश्वास मिळाला आणि अभ्यासाचा हुरूप आणखीनच वाढला. 

 

  करता करता एक वर्ष कधीच गेलं. वर्षभर फक्त अभ्यास, अभ्यास आणि अभ्यासच करत होतो आम्ही. ह्या काळात कॉलेजच्या शिक्षकांकडूनही मोलाचे सहकार्य मिळालं आम्हाला. 

विद्यापीठाची परीक्षा पार पडली. ह्यात कमीतकमी ७०% गुण मिळवणे आवश्यक होतं. ते मिळतीलही ह्याची सगळ्यांनाच खात्री होती. 

ह्या एक वर्षात अनुराधाच्या घरच्यांनी केलेलं सहकार्य मी कधीच विसरू शकणार नाही. आप्पांचे बहूमूल्य मार्गदर्शन आणि अनुराधाबरोबर अभ्यास करण्याची संधी मिळाली नसती तर, कदाचित एवढं यश मला मिळालंच नसतं. आता माझी लिखाणाची शैलीही सुधारली होती. आता फक्त एक महिना राहिला होता. महिन्यानंतर स्कॉलरशिप ची परीक्षा होती. वर्षभराच्या अभ्यासाचा कस लागणार होता इथे. ह्या महिन्यात कॉलेजकडूनही खूप सहकार्य मिळालं. आतापर्यंत होऊन गेलेल्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका, संभाव्य प्रश्न, महत्वाचे मुद्दे, लिखाणाची पद्धत ह्याकडे विशेष लक्ष दिलं प्राध्यापकांनी. त्यांचं मार्गदर्शन खूपच महत्वाचं होतं. 

 

झालं…. म्हणता म्हणता महिना गेला आणि परीक्षेचा दिवस आला. पेपर्स उत्तम गेले.. वर्षभराचे परिश्रम कामी आले. आम्ही उत्तीर्ण होणार, ह्याची 100% खात्री होती. 

सगळ्यांना खूप बरं वाटलं. 

आता प्रत्यक्ष निकाल हाती येण्याचे वेध लागले होते. तेवढ्या दिवसांत पासपोर्टसाठीचे महत्वाचे कागदपत्र आणि प्रक्रिया पूर्ण करून घेतल्या. 

 

   आणि तो दिवस आला.. 

अनुराधा आणि मला दोघानाही स्कॉलरशिप मिळाली होती. निकालाच्या दिवशी मी, अनुराधा आणि अप्पा एकत्रच होतो. कॉलेजच्या प्राध्यापकांकडून आमचं अभिनंदन करण्यात आलं. वेड लागल्यागत आनंद झाला होता आम्हाला. विद्यापीठाचा निकाल १५ दिवसानी येणार होता. त्यात कमीतकमी ७०% गुण आवश्यक होते. ते मिळतील ह्याचीही खात्री होती. त्यामुळे आता निश्चिंत झालो होतो आम्ही. विद्यापीठ परीक्षेचे प्रमाणपत्र जोडल्यावर स्कॉलरशिप संबंधी पुढच्या गोष्टींची पूर्तता होणार होती. 

मला धीर निघत नव्हता. ही गोष्ट माई-तात्यांना कधी कळवतोय असं झालं होतं. पत्र पाठवावे तर कमीतकमी चार दिवस जाणार, टेलिफोन करावा तर तो फक्त गावाजवळच्या पोस्ट ऑफिस मधे. शनिवार रविवार असल्याने ते ही बंद असणार. आता म्हटलं पैसे गेले तरी चालतील. लगेच तार करायची. मग आम्ही तीघही पोस्टऑफिस मधे गेलो. गावच्या पत्त्यावर ‘तार’ केली. हलवायच्या दुकानात पेढे घेतले आणि अनुराधाच्या घरी आलो. अम्माना पेढा दिला आणि वाकून नमस्कार केला. लगेच तसाच चाळीत आलो. आते ला पेढा दिला आणि म्हटलं, “मी अशी अशी परीक्षा पास झालो आणि आता उच्चशिक्षणासाठी इंग्लंडला जाणार तीन वर्षासाठी…..!! 

आतेला प्रचंड आनंद झाला. ती दवंडी पिटवल्यासारखी चाळीत प्रत्येकाच्या घरात जाऊन सांगायला लागली की, “आपला सुहास आता इंग्लंडला जाणार…!”

   

    इकडे गावाकडे मात्र वेगळाच प्रकार घडला. कारण तार आली म्हणजे काहीतरी अघटीत घडलं असणार असं मानायचे लोक. नेमकी तार आली तेव्हा, दादा आणि तात्या घरी नव्हते. अचानक तार कसली आली म्हणून माई भांबाऊन गेली. तिने तार देणाऱ्यालाही विचारायची तसदी घेतली नाही की काय लिहिलंय. तिने तडक देवघरात जाऊन देव पाण्यात ठेवले आणि तशीच ती धावत हायस्कूल मुख्याध्यापकांच्या घरी गेली. माई प्रचंड घाबरलेली होती. तोपर्यंत गावात खबर लागली. की, सामंताच्या घरी तार आलेय. अर्धा गाव आमच्या मांडवात जमला इकडे. 

तार वाचून मुख्याध्यापकांना खूप आनंद झाला. म्हणाले माई अहो, पेढे वाटा पेढे….! आपला सुहास आता इंग्लंडला जाणार…! स्कॉलरशिप परीक्षा उत्तीर्ण झाल्याच कळवलंय त्याने…! 

माईला खूप आनंद झाला. तसंच रवळनाथाच्या देवळात जावून आधी नारळ दिला तिने. आणि घरी जमलेल्या गर्दीला चहापाणी करून आनंदाची बातमी दिली. 

संध्याकाळी दादा, तात्या आल्यावर त्यांना बातमी समजली. त्यांनाही खूप आनंद झाला. 

दुसऱ्याच दिवशी मुंबईसाठी निघायचा निर्णय घेतला तात्यांनी. विशेष म्हणजे ह्यावेळी ते माईलाही घेऊन येत होते. 

#कादंबरी संधिकाल -11

Article Categories:
मनोरंजन

Comments are closed.